Monday 18 November 2019

#सॅल्युट वर्दीतला माणुस (डी.सी.पी. विशाल ठाकुर)... विनीत वर्तक ©

#सॅल्युट वर्दीतला माणुस (डी.सी.पी. विशाल ठाकुर)... विनीत वर्तक ©

सामान्य माणसांच आणि पोलिसांच नातं थोडं वेगळचं असते. एकीकडे एक दरारा, वचक तर दुसरीकडे अनामिक भिती. त्यामुळेच सामान्य माणुस वर्दीतल्या लोकांपासुन थोडा लांबच राहणं पसंद करतो. सण, समारंभ, लोकशाहीने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना ह्या सगळ्यात कोणाच्या ही भावना, आनंद ह्यांना गालबोट न लावता ह्यामध्ये मिसळलेल्या वाईट प्रवृत्ती आणि त्या अंगिकारणाऱ्या लोकांपासुन समाजाचं रक्षण जबाबदारी 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असणाऱ्या पोलिसांवर असते. त्यात अडचणीला भरीस म्हणुन समाजाने आखुन दिलेल्या भिंती ज्यात धर्म, जात, उच्च, निच्च असे अनेक पदर असताना त्यात भेदभाव न करता त्यातल्या प्रत्येकाला आपलं मानुन त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस उचलत असतो. सैन्यात काम करणाऱ्या सैनिकांचा  शत्रु समोर असतो. त्यामुळे गोळी चालवताना विचार नाही करावा लागतं. पण घरभेदी असणारे शत्रु हे समाजाच्या साच्यात फिरत असतात त्यामुळे बंदुक जरी सोबतिला तरी तिचा वापर मात्र करताना खुप विचार करावा लागतो. त्यातही आपल्याला आखुन दिलेला भाग नक्षलक्षेत्र असेल तर ती जबाबदारी अजुन वाढते. महाराष्ट्र मधील काही भाग आजही नक्षल क्षेत्र आहे. खरे तर मुंबई, पुणे, नागपुर, सोलापुर, कोल्हापुर असा महाराष्ट्र ओळखणाऱ्या अनेकांना ह्याची माहिती नाही. भामरागड- गडचिरोली सारख्या नक्षल ठिकाणी एक-दोन नाही तर तब्बल तिन वर्ष तिथल्या पुर्ण भागाची सुरक्षा सांभाळून नक्षलवाद मोडुन काढून त्याच्या नंतर मुंबई सारख्या शहराच्या गुन्ह्यातील एक शाखा ज्याचं अस्तित्व आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे अश्या 'सायबर क्राईम' विभागाचे 'डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस' म्हणुन जबाबदारी स्विकारणाऱ्या विशाल ठाकुर ह्यांचा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी असा आहे.

   
डी.सी.पी. विशाल ठाकूर मुळचे धुळे, महाराष्ट्र इथले असुन २०१० साली महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत 'डेप्युटी सुप्रिटेंडन्ट ऑफ पोलीस' म्हणुन पदभार स्वीकारला. लहानपणापासुन युनिफॉर्म ची आवड त्यांना होती व आवडीतुन त्यांनी एन.सी.सी. मध्ये प्रवेश घेतला होता. आपली पहिली दोन वर्ष सातारा इकडे काम केल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील सुरक्षतेतीच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असणाऱ्या गडचिरोली- भामरागड इकडे २०१२ साली पदभार स्विकारला. भामरागड आज सगळ्यांना माहित आहे ते हेमलकसा इकडे असणाऱ्या लोकबिरादरी प्रकल्पामुळे. आमटे कुटुंबीयांनी इकडे केलेलं कार्य मांडायला शब्द पण कमी पडतील. पण आजही हा भाग नक्षल कारवायांनी धुसमुसत असतो. भामरागड ह्या परिसरात प्रचंड पाऊस पडतो. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा ह्या नद्या  काळात दुथडी भरून वाहतात. भामरागड-आलापल्ली या ६५ किमीच्या मार्गावरील सर्व पूल पाण्याखाली अनेकदा जातात त्यामुळे तालुक्यांमधील १२५ पेक्षा जास्त गावांचा संपर्क पुर्ण जगाशी तुटतो. ह्या काळात इथल्या सुरक्षततेची जबाबदारी सहाजिक इकडे असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर येते. ह्यात भरीस भर म्हणुन नक्षल कारवाया ही ह्या भागात सुरु असतात. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, कोसळणारा पाऊस,  बंद पडलेले फोन आणि मोबाईल टॉवर, इलेक्ट्रिसिटी नसताना दिव्यांच्या प्रकाशात जाणारी रात्र, मर्यादित असणारा इंधनाचा पुरवठा आणि जगाशी पूर्णपणे तुटलेला संपर्क जो परत केव्हा सुरु होईल ह्याची शाश्वती नसताना आपलं कर्तव्य पुर्ण जबाबदारीने आणि साहसाने पुर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी तब्बल तीन वर्ष पुर्ण केली.

एक पोलीस पण माणुस असतो हे अनेकदा आपण विसरतो. त्याला ही घरदार, कुटुंब, भावना असतात ह्या सगळ्यांमध्ये आपलं कर्तव्य त्याला पुर्ण करायचं असते. डी.सी.पी. विशाल ठाकूर ह्यांनी ते पुर्ण करताना त्यांनी व त्यांच्या टीम ने एक- दोन नाही तर सात नक्षली अतिरेक्यांचा खात्मा केला. भामरागड सारख्या अतिशय दुर्गम, संवेदनशील भागात सुरक्षा, शांतता राखण्यासाठी तसेच नक्षलांपासुन तिथल्या लोकांच संरक्षण करण्यासाठी त्यांना २०१३ साली राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आलं. (The President's Police Medal for Gallantry is awarded for, "gallantry in saving life and property, or in preventing crime or arresting criminals."). अतिशय निभिर्डतेने आपलं कर्तव्य पुर्ण करताना त्यांनी ३ वर्षाचा आपला पुर्ण कार्यकाळ नक्षल क्षेत्रात पुर्ण केला. त्यांना २०१४ मध्ये 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' (DGP's Insignia), २०१५ मध्ये 'स्पेशल सर्विस मेडल' तर २०१७ साली 'आंतरिक सुरक्षा मेडल' ने गौरवण्यात आलं. शहापूर- ठाणे इकडे आपला पुढला कार्यकाळ पुर्ण केल्यावर २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय किचकट पण त्याचवेळी प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याला कळत- नकळत स्पर्श करणाऱ्या 'सायबर क्राईम' विभागात डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस म्हणुन झाली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी जिकडे करोडो लोकं सोशल मीडिया, इंटरनेट, बँक सिस्टीम, तसेच ई कॉमर्स सारख्या पद्धतीने जोडलेली आहेत. ही सर्वच जण बँक, क्रेडिट कार्ड, सोशल मिडिया अश्या सर्वच ठिकाणी  पैश्याचे व्यवहार करतात. तसेच एम.एम.एस., पॉर्न व्हिडीओ ह्या सारख्या पद्धतीने आभासी जगात होणाऱ्या गुन्ह्यात कमालीची  वाढ झालेली आहे. ह्या सर्वांवर वाचक ठेवण्याच आपलं कर्तव्य डी.सी.पी. विशाल ठाकूर आजही पुर्ण करत आहेत.

आपल्या समाजात लपलेल्या, मिसळलेल्या वाईट प्रवृत्तीच्या माणसांचा वेध घेताना पण त्याचवेळी संवेदनशील मनाने आपल्या टीम, आपल्या भागाची काळजी कधी एक आठवडा तर कधी २५ दिवस जगापासुन तुटलेल्या अवस्थेत त्यांनी घेतली आहे. भामरागड सारख्या ठिकाणी आपल्याच माणसात लपलेला शत्रु तर मुंबई सारख्या शहरात आभासी जगातील शत्रुचा  वेध घेऊन तमाम मुंबईकरांना सायबर सुरक्षा देणाऱ्या डी.सी.पी. विशाल ठाकूर ह्यांचा प्रवास सगळ्यांना प्रेरणा नक्कीच देईल. त्यांच्या कर्तुत्वाला माझा कडक सॅल्युट.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment