Friday 15 November 2019

चंद्रयान..एक नवीन आशा... विनीत वर्तक ©

चंद्रयान..एक नवीन आशा... विनीत वर्तक ©

चंद्रयान २ ही मोहीम सुरु असताना चंद्रयान ३ ची बीज रोवली गेली होती. विक्रम ल्यांडर ला आलेल्या अपयशानंतर इसरो एक पाऊल मागे गेली असली तरी विक्रम ल्यांडर चा अनुभव इसरोच्या सर्वच वैज्ञानिक आणि संशोधकांना खुप शिकवून गेला आहे. पंतप्रधान म्हणाले तसं, "विज्ञानात अपयश नसते.  असतो तो अनुभव". एकीकडे ह्याच अपयशातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होतं असताना दुसरीकडे इसरो ने पुन्हा नव्या जोमाने चंद्रावर भारताचं पाऊल टाकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. ह्या वेळेस चंद्रावर आपलं पाऊल टाकण्यास उत्सुक असलेले दोन देश एका तिसऱ्या देशासोबत एकत्र येण्यासाठी बोलणी सुरु आहेत. २०१७ ला जपान ची स्पेस एजन्सी जॅक्सा आणि भारताची इसरो ह्यांनी चंद्राच्या संशोधनासाठी एकत्र येऊन काम करण्याचा करार केला. जपान आणि भारत हे दोन्ही देश चंद्रावर आपलं पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्नशील असताना ह्या दोघांसोबत जगातील अग्रगण्य स्पेस एजन्सी अमेरिकेची 'नासा' ही ह्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

चंद्रयान ३ मोहीम नोव्हेंबर २०२० पर्यंत चंद्रावर स्वारी करेल अश्या बातम्या येत असल्या तरी त्यावर तुर्तास कोणीही अधिकृतरीत्या पुष्टी केलेली नाही. असं असलं तरी जॅक्सा आणि इसरो हे चंद्रयान मोहिमेवर काम करणार असल्याचं दोघांनी मान्य केलं आहे. जॅक्सा च्या मते चंद्रयानाला पाठवणार रॉकेट आणि रोव्हर जपान बनवणार असुन ल्यांडर हे इसरो बनवणार आहे. विक्रम ल्यांडर मध्ये राहिलेल्या प्रत्येक त्रुटीवर इसरो मेहनत घेतं असुन ह्या कामात अमेरिकेची नासा आपलं ह्या क्षेत्रातील ज्ञान दोन्ही देशांना देण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु आहेत. नोव्हेंबर २०२० पर्यंत इसरो चंद्रयान ३ मोहीम पाठवणार का? पाठवणार तर त्यात इतर देशांचा सहभाग असणार का? भारत, जपान आणि अमेरिका असे तीन देश मिळुन अवकाशात चीन च्या महत्वकांक्षेला रोखणार का? असे अनेक तर्क- वितर्क सध्या बांधले जात आहेत. पण एक मात्र नक्की आहे की इसरो ने चंद्रयान ३ च्या मोहिमेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली असुन येत्या काही महिन्यात चित्र स्पष्ट होईल.

चंद्रयान ३ मोहिमेत नक्की कोणते वैज्ञानिक उपकरणं असणार? ह्या मोहिमेचा कालावधी, खर्च आणि इतर सर्वच गोष्टी सध्यातरी नक्की झालेल्या नाहीत. आधी सांगितलं तसं जर का नासा ह्या मोहिमेत सहभागी झाली तर ल्यांडर- रोव्हर चं तंत्रज्ञान भारत /जपान ला देण्याच्या बदल्यात नासा आपली उपकरणं चंद्रयान ३ वर पाठवू  शकेल. असं जर का झालं तर ही गोष्ट तिन्ही देशांसाठी चांगली असेल. नासा च तंत्रज्ञान इसरो जसाच्या तसं न वापरता त्याचा वापर करून भारतीय ल्यांडर बनवेल. ह्याचवेळी २०२४ च्या मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यासाठी नासा ला वेगळं मिशन पाठवायला लागणार नाही. अर्थात ह्या सगळ्या जर - तर च्या गोष्टी आहेत. चंद्रयान ३ मोहीम आपल्या स्वबळावर ही इसरो करू शकेल. पुढील चंद्रयान मोहिम अनेक देशांसोबत आखली जाईल.

कोणी म्हणेल की भारत चंद्रयान मोहिमांनी नक्की काय साधतो आहे? अवकाशात पुन्हा चंद्र का? ह्याच वैज्ञानिक उत्तर मी आधीच्या लेखात दिलेलं होतं पण त्या पलीकडे चंद्रयान २ मोहिमेने काय साधलं ह्याचा जर लेखाजोखा घ्यायचा असेल तर इसरो चे डायरेक्टर के. सिवन ह्यांना पंचायत शाळेतील मुलांनी काही पत्रे लिहली होती. त्यात ७, ८ वी च्या विद्यार्थ्यांनी चंद्रयान २ मोहिमेने त्यांना आयुष्याचं लक्ष्य मिळाल्याचं नमूद केलं आहे. त्याच सोबत इसरो ला आलेल्या अपयशातुन इसरो सावरून पुन्हा एकदा भरारी घेईल असं म्हंटल आहे. त्यांच्या पत्राला उत्तर (हे पत्र खाली फोटो मध्ये दिलं आहे. तमिळ भाषेतुन त्यांनी उत्तर दिलं आहे. ) देताना के.सिवन ह्यांनी इसरो पुन्हा एकदा लवकरचं चंद्रावर पाऊल टाकेल असं नमुद करताना ह्या विद्यार्थ्यांचं पाठबळाने आपला आत्मविश्वास वाढल्याचं सांगितलं आहे. चंद्रयान मोहिमांनी अनेक तरुण मन प्रज्वलित केली आहेत जे काही दशकापुर्वी अमेरिकेत अपोलो मिशन ने केलं होतं. ह्याचे दुरगामी परिणाम आपल्याला येत्या काळात नक्कीच बघायला मिळतील.

चंद्रयान ३ मोहीमेबद्दलची उत्सुकता आत्तापासुन वाटत आहे. जर ह्या मोहिमेत जॅक्सा, नासा सारख्या स्पेस एजन्सी एक घटक झाल्या तर ह्या मोहिमेचं जागतिक पातळीवरील महत्व कैक पटीने वाढेल. मला नक्की खात्री आहे की ह्या वेळेस इसरो पहिल्यापेक्षा अजुन चांगल्या पद्धतीने चंद्रावर भारताचा तिरंगा फडकवेल.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
 

No comments:

Post a Comment