Monday 11 November 2019

अनंताच्या प्रवासाला (भाग २)... विनीत वर्तक ©

अनंताच्या प्रवासाला (भाग २)... विनीत वर्तक ©

आपल्या सौरमालेतील दूरवरच्या सगळ्या ग्रहांना भेटी दिल्यानंतर आणि आपली प्राथमिक सर्व उद्दिष्ठ पुर्ण केल्यावर व्हॉयजर १ आणि व्हॉयजर २ ह्यांनी आपआपल्या रस्त्याने आपला प्रवास अनंताकडे तसाच सुरु ठेवला आहे. व्हॉयजर २ ला अवकाशात सोडुन जवळपास ४२ वर्ष २ महिने १८ दिवसाचा कालावधी लोटला असुन ते ५७,८९० किलोमीटर / तास ह्या वेगाने पृथ्वीपासुन दुर अनंताकडे जात असुन सद्य स्थितीला ते पृथ्वीपासुन १२२ ए.यु. (१.८३ गुणिले १० चा १० वा घात इतक्या किलोमीटर अंतरावर आहे.) ( १ ए.यु. (एस्ट्रोनिमिकल युनिट) म्हणजे सुर्य आणि पृथ्वी ह्यांच्यामधील सरासरी अंतर आहे. साधारणतः ते १५० मिलियन किलोमीटर इतकं असते.) व्हॉयजर १ ला अवकाशात सोडुन जवळपास ४२ वर्ष २ महिने ३ दिवसांचा कालावधी लोटला असुन ते ६२,१४० किलोमीटर / तास ह्या वेगाने अनंताचा प्रवास करत आहे. सद्य स्थितीला ते पृथ्वीपासुन जवळपास १४७ ए.यु. ( २२ बिलियन किलोमीटर) अंतरावर आहे. मानवाने विश्वाच्या न संपणाऱ्या पोकळीत केलेला हा सगळ्यात लांबचा प्रवास आहे.

युरेनस, नेपच्युन आणि आधीचा प्लुटो पलीकडे ही सूर्याचं अस्तित्व असते. सुर्यापासून प्लाझ्मा च्या स्वरूपात निघणारे सोलार विंड आपल्या सौरमालेच्या भोवती फुग्याच्या आकाराचं एक सुरक्षा कवच बनवतात. ह्या सुरक्षा कवचामुळे आपली पृथ्वी, सौरमाला ह्यांचं विश्वाच्या पोकळीतुन येणाऱ्या वैश्विक किरणांपासून रक्षण होते. सूर्याच्या सोलार विंड च हे सुरक्षा कवच सूर्यावर होणाऱ्या उलथापालथीमुळे कमी जास्त होतं असते. तसेच ह्या कवचात ही दोन भाग पडतात. एक आतला भाग जिकडे ते अतिशय प्रभावी असते (ज्यात आपली पुर्ण सौरमाला आणि त्या पलीकडील काही भाग येतो). त्याच्या बाहेर असणारा दुसरा भाग ज्याला ट्रान्झिशन झोन म्हंटल जाते. इकडे ह्या सोलर विंड ची क्षमता कमी होतं जाते आणि वैश्विक किरणांचा प्रभाव वाढत जातो. एक हद्द अशी येते की जिकडे सूर्याचा म्हणजेच सोलार विंड चा प्रभाव पुर्ण संपतो आणि वैश्विक किरणांची अमर्याद सत्ता सुरु होते. त्या हद्दीला 'हेलिओपॉझ' असं म्हणतात. ह्या हद्दीनंतर जे अवकाश आहे त्याला इंटरस्टेलर असं म्हंटल जाते.

२५ ऑगस्ट २०१२ ला व्हॉयजर १ ने इंटरस्टेलर माध्यमात प्रवेश केला. मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा एका मानवनिर्मित वस्तु ने सुर्याच्या अस्तित्वाबाहेर पाऊल टाकलं. हा क्षण पुर्ण मानवजातीसाठी अभुतपुर्व असा म्हणावा लागेल. आपल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत व्हॉयजर २ ने ही ५ नोव्हेंबर २०१८ ला इंटरस्टेलर माध्यमात प्रवेश केल्याचं नासा च्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं. दोन्ही यानांनी वेगवेगळ्या दिशेने जवळपास सारख्या अंतरावरून इंटरस्टेलर माध्यमात प्रवेश करणं हे सुर्याच्या प्रभावाची वेस ही सारखी असल्याचं स्पष्ट करते. इंटरस्टेलर माध्यमातुन अजून अनंताच्या प्रवासाला जात असलेली दोन्ही यान नासाच्या संपर्कात अजुन ही आहेत. डिसेंबर २०१७ ला नासा ने व्हॉयजर १ मधील इंजिन १९८० नंतर पुन्हा एकदा यशस्वी रीतीने चालु केली. तब्बल ३७ वर्षानंतर अवकाशात अनंताचा प्रवास करणारी ही यंत्रणा पृथ्वीवरून इतक्या कालावधी नंतर चालु करून नासा ने आपल्या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता पुर्ण जगाला दाखवून दिली आहे. व्हॉयजर १ वरून निघालेल्या संदेशाला पृथ्वीवर पोहचायला २० तासापेक्षा जास्त कालावधी लागतो आहे. इतक्या प्रचंड अंतरावरून संदेश पाठवून त्यावरील यंत्रणा आपल्याला हवी सुरु करणं हे खरचं रॉकेट सायन्स आहे. त्यासाठी नासा ला कुर्निसात. नासा च्या मते ह्या इंजिनांनी केलेल्या योग्य बदलामुळे व्हॉयजर १ चं आयुष्य वाढलं असुन अजून पुढली ३ ते ४ वर्ष ते पृथ्वीच्या संपर्कात राहील.

व्हॉयजर २ जवळपास २०२५ पर्यंत पृथ्वीच्या संपर्कात राहील असं नासा ला वाटते. वयाची ४२ वर्ष पुर्ण केल्यावर ही अजुन हे यां पुढली ५ ते ७ वर्ष पृथ्वीवर संदेश पाठवत राहील. ह्या दोन्ही यानावरील काही वैज्ञानिक यंत्रणा त्यांच्या बॅटरी ची शक्ती वाचवण्यासाठी बंद करण्यात आलेल्या आहेत. ह्या दोन्ही यानांना पृथ्वीशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्यावरील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आणि कॉम्प्युटर ला ऊर्जा देणार हृद्य म्हणजे आर.टी.जी. ( radioisotope thermoelectric generators (RTGs). व्हॉयजर यानात बसवण्यात आलेल्या आर.टी.जी. मध्ये प्लुटोनियम २३८ चे २४ युनिट बसवलेले आहेत. प्लुटोनियम २३८ मध्ये सतत  अणुविखंडन सुरु असुन ह्यातुन निघणाऱ्या उष्णतेचा वापर विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. ह्यात थर्मोइलेक्ट्रिक डिव्हाईस असुन दोन्ही बाजुला असणाऱ्या तापमानातील बदलाचा वापर करून ह्यात ऊर्जा निर्मिती होत आहे. प्लुटोनियम २३८ चं अर्धआयुष्य जवळपास ८७.७ वर्षाच आहे. २०१९ ला व्हॉयजर  यानात साधारण ७०% प्लुटोनियम २३८ बाकी असुन २०५० पर्यंत ते ५०% च्या आसपास उरलेलं असेल.

नासा च्या मते आर.टी.जी. ( radioisotope thermoelectric generators (RTGs) व्हॉयजर १ आणि २ चा संपर्क पृथ्वीशी २०२२ ते २०२५ पर्यंत होऊ शकेल इतकी ऊर्जा त्यातल्या उपकरणांना देऊ शकतील. त्यानंतर मात्र ही ऊर्जा कमी होईल. असं झालं तरी अनंताकडे निघालेल्या ह्या दोन्ही यानाचा प्रवास असाच अनंताकडे सुरु राहील. व्हॉयजर १ आपल्या बाजूच्या घरात म्हणजेच उर्ट क्लाउड मध्ये ३०० वर्षांनी प्रवेश करेल. कोणतीही अडचण अथवा टक्कर झाली नाही तर त्यात ते जवळपास पुढली ३०,००० वर्ष प्रवास करत राहील आणि ४०,००० वर्षांनी ग्लिसे ४४५ ताऱ्याजवळुन जाईल. तर तिकडे व्हॉयजर २ जवळपास ४२,००० वर्षाचा प्रवास करून रॉस २४८ ताऱ्याजवळ पोहचेल. ह्या दोन्ही यानांवर नासाने सोन्याने मढवलेली एक ऑडिओ - व्हिजुअल डिस्क लावलेली आहे. ज्यात ५५ वेगवेगळ्या जगातील प्रमुख भाषेतील संदेश, पृथ्वीवरील प्राण्यांचे, लहान मुलांच्या रडण्याचा आवाज तसेच अनेक संगीतकारांच्या रचना बंदिस्त केलेल्या आहेत. ह्या शिवाय युनायटेड नेशन च्या अध्यक्षांच्या आवाजातील आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आवाजातील संदेश ही ह्यावर रेकॉर्ड केलेला आहे. ह्या मागचा उद्देश पृथ्वी सारखी वस्ती जर का ह्या अनंताच्या प्रवासाला निघालेल्या यानांना कुठे रस्त्यात मिळाली. जर का त्यांची यंत्रणा पृथ्वीसारखी प्रगत असेल तर त्यावरून त्यांना पृथ्वीवर माणुस असल्याचा शोध लागेल.

अवकाश क्षेत्रातील प्रगती फक्त २० वर्षाची असताना निघालेल्या ह्या दोन्ही यानांनी तंत्रज्ञानातील मैलाचे दगड पार केले आहेत. ४२ वर्षापेक्षा जास्त काळ अवकाशात राहुनपण ह्यावरील यंत्रणा सुस्थितीत आहेत. अनंताच्या प्रवासाला जरी ही दोन्ही यान जात असली तरी त्यांनी आपल्या सोबत पुर्ण मानवाचा इतिहास बंदिस्त करून नेला आहे. व्हॉयजर १ आणि २ हे अवकाशातील नुसती यान नसुन माणसाच्या स्वप्नातील गोष्टींना दिलेलं एक मुर्त स्वरूप आपण अनंताच्या प्रवासाला पाठवून दिलं आहे. ह्या दोन्ही यानांच्या निर्मितीत असणारे नासा चे वैज्ञानिक, संशोधक, वैज्ञानिक आणि सध्यापण ह्याच्याशी संपर्क ठेवुन संशोधन करणारी नासा ची टीम ह्या सर्वाना माझा कुर्निसात.

समाप्त.

फोटो स्रोत :- गुगल


1 comment: