खड्डे बुजवणारे दादा (दादासाहेब बिल्होरे)... विनीत वर्तक ©
बाहेर गेली होती मी, आणण्यासाठी दो चार लिंबू ब्रिज पडला आल टेम्बू,
उरात होते धड धड जेव्हा बारिश सुरु झाली,
बस कुछ घंटे मैं मुंबई पाण्याखाली आली,
कुठे रस्त्याची लागली वाट,
ट्राफिक मध्ये हुई दिन की रात,
फक्त दो घंटे मैं खडी होती आमची मुंबई कि खाट,
कुठे पडलाय पुल, रस्ता हैं गुल, वाकडी झाली खाट,
गेली गेली गेली मुंबई खड्यात.........
काही वर्षापुर्वी रेडिओ जॉकी 'मलिष्का' ने मुंबईच्या रस्त्यातल्या खड्यांवर केलेलं हे गाणं खुप लोकप्रिय आणि त्याचवेळी टीकेचा विषय झालं होतं. त्यातला राजकारणाचा, गाण्याचा भाग जरा बाजुला ठेवला तर त्या शब्दात व्यक्त केलेली स्थिती प्रत्येक मुंबईकर आणि मुंबईत राहणाऱ्या, प्रवास करणाऱ्या सगळ्यांनी अनुभवलेली नक्कीच आहे. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांची होणारी हालत प्रत्येक वर्षी अजून जास्ती खराब होतं जाते आहे. त्याला भरीस भर म्हणुन इलेक्ट्रिक, टेलिफोन, नेटवर्क ते गॅस च्या कामासाठी खोदलेले खड्डे न बुंजवता वर्षभर चालणारी काम. लाच देऊन काम मिळवणारे कंत्राटदार आणि त्यांना मदत करणारे सगळेच हे मुंबई पालिकेच्या कारभारातील ओपन सिक्रेट आहे. पण ह्याच खड्यांमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दादासाहेब बिल्होरे ह्यांना आपल्या मुलाला मुंबईच्या खड्यांमुळे गमवावं लागलं. उमद्या वयात असलेल्या आपल्या मुलाला मुंबई पालिकेच्या गचाळ कारभारामुळे गमावल्यावर कोणीही बाप आयुष्यात हतबल झाला असता. मुलाच्या वियोगाच्या दुःखात रडत बसला असता पण दादासाहेब बिल्होरे यांनी मात्र त्याचवेळेस एक निश्चय केला की आपल्याने जेवढे होतील तेवढे मुंबईच्या रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवायचे. आपला मुलगा तर परत येणार नाही पण आपण निदान दुसऱ्यांच्या मुलाला मरणापासुन वाचवू शकतो. हीच खरी श्रद्धांजली आपल्या मुलाला असेल.
२०१५ चा जुलै महिना होता. १६ वर्षाचा मुसरूड फुटलेला प्रकाश बिल्होरे ने १० वी ची परीक्षा नुकतीच पास केली होती. कॉलेज च्या त्या मयूरपंखी दिवसांची स्वप्न बघणारा प्रकाश खूप आनंदी होता. भांडुप इथल्या कॉलेज मध्ये प्रवेशप्रक्रिया पुर्ण करून तो व त्याचा भाऊ राम गोरेगाव इथल्या घरी बाईक वरून परत येत होते. परत येताना खूप जोराचा पाऊस सुरु झाल्यावर त्यांनी पवई इकडे आडोश्याला काहीवेळ आसरा घेतला. मुंबईचा जुलै महिन्यातील पाऊस पुर्ण जगात गाजलेला आहे. अवघ्या काही मिनिटात नेहमीप्रमाणे मुंबई पाण्यात बुडाली. पाऊस थांबल्यावर दोघांनी जे.व्ही.एल.आर. वर आपला प्रवास सुरु केला. सिप्झ इकडे आल्यावर रस्त्यावर पाणी साचलेले होते. गढूळ पाण्यात मुंबईच्या रस्त्यांवर असलेले खड्डे न दिसल्यामुळे त्यांची बाईक अश्याच एका खड्यात अडकून पडली. काही कळायच्या आत दोघेही खाली पडलेले होते. राम च्या डोक्यावर खरचटलं पण त्याचवेळी प्रकाश मात्र ह्या आघाताने कोमात गेला होता. रस्त्यावरून येणारे जाणारे त्यांचे फोटो काढण्यात गुंग होते तर तिकडे हे दोघे मृत्यूशी लढत होते. त्या ही प्रसंगात राम ने दादासाहेब ना फोन करून अपघाताची माहिती दिली. हॉस्पिटल ला पोहचे पर्यंत आपल्या काळजाचा तुकडा मुंबईच्या खड्यांनी कायमचा दूर नेल्याचं दादासाहेब ह्यांना कळून चुकलं. (विनीत वर्तक ©)
दुःखाचा डोंगर बिल्होरे कुटुंबावर कोसळला होता. एकीकडे आपल्या मुलाला गमावल्याचे दुःख तर दुसरीकडे आपल्या पत्नीला सांत्वन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अश्या परिस्थितीत कोणताही बाप कोलमडला असता पण दादासाहेब ह्यांच्या मनात वेगळचं सुरु होतं. ज्या मुंबईच्या खड्यांनी त्यांच्या मुलगा त्यांच्यापासुन हिरावला होता त्या खड्यांना जबाबदार असणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई तर करायची पण ह्या खड्यांनी अजून कोणाचा बळी घेऊ नये म्हणुन त्यांनी आपल्या परीने हे खड्डे बुंजवण्याचं काम सुरु केलं. ज्यांनी हे खड्डे बनवले ते कंत्राटदार मात्र कायद्याचा फायदा घेत सुखरूपपणे जामिनावर बाहेर आले पण तरीही हार न मानता दादासाहेबांनी आपली लढाई सुरु ठेवली आहे. तुटलेले पेव्हर ब्लॉक, फावडे, खडी, दगड, माती असं सामान गोळा करून त्यांनी दिसतील ते खड्डे भरायला सुरवात केली. ते खड्डे भरल्यावर त्यावरून व्यवस्थितपणे बाईक जाताना बघुन आपण कोणाचा तरी जीव वाचवल्याचं समाधान त्यांना मिळत गेलं. रस्त्यावर असलेल्या खड्यात कोणी आपला जीव गमावत नाही किंवा त्यावर एफ.आय.आर. दाखल होतं नाही तोवर मुंबई पालिका प्रशासनाला जाग येतं नाही. कागदांच्या फाईल भरल्यानंतर मग कुठेतरी हालचालींना सुरवात होते पण तोवर १०-१५ दिवसांचा कालावधी गेलेला असतो. त्या दिवसात अजून कित्येक लोकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. प्रशासनाच्या अनास्थेला बाजुला ठेवुन दादासाहेब बिल्होरे ह्यांनी ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. सुरवातीला कुतुहलाने बघणारे मुंबईकर त्यांच्या ह्या कामात जोडले गेले आणि ‘Fill in the Potholes Project’ ची स्थापना झाली. (विनीत वर्तक ©)
आजवर ६५० पेक्षा जास्ती खड्डे मुंबईच्या रस्त्यांवर दादासाहेब बिल्होरे ह्यांनी भरून काढले आहेत. ज्यामुळे नक्कीच कितीतरी लोकांचा जीव वाचला आहे. एक साधा भाजी विक्रेता असणाऱ्या दादासाहेबांच्या आयुष्यातला एक दुःखद अनुभव एका चांगल्या गोष्टीची सुरवात करून गेला. आज ४ वर्ष त्या घटनेला उलटुन गेली तरी आपलं कार्य त्यांनी सुरु ठेवलं आहे. दरवर्षी खड्ड्यात जाणाऱ्या मुंबईला बाहेर काढणाऱ्या आणि अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या खड्डे बुंजवणाऱ्या दादांना (दादासाहेब बिल्होरे) एक मुंबईकर म्हणुन कडक सॅल्युट.
फोटो स्रोत :- गुगल
No comments:
Post a Comment