Friday 6 December 2019

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

लॅरी आणि सर्जी चं गुगल... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी गुगल चे निर्माते लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी आपल्या अल्फाबेट ह्या कंपनीची सुत्र भारतीय वंशाच्या आणि सध्या गुगल चे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या सुंदर पिचई कडे देऊन एक प्रकारे एका दंतकथेचा शेवटचा अध्याय लिहिला असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही. २०१५ ला जेव्हा गुगल ला अल्फाबेट च्या छत्रछायेखाली आणलं गेलं तेव्हाच ह्या अध्यायाची सुरवात झाली होती. गुगल च्या रोजच्या कामातुन ह्या दोघांनी हळूहळू अंग काढुन घ्यायला सुरवात केली होती. गुगल २१ वर्षाच झाल्यावर ज्या प्रमाणे एखाद्या मुलाला त्याचे पालक त्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतात त्याच प्रमाणे आपलं मुलं असल्या प्रमाणे ह्या दोघांनी गुगल मधुन आपलं अंग काढुन गुगल च्या पुढच्या वाटचालीत आता पालकाची तटस्थ भुमिका स्विकारली आहे.

२१ वर्षांपूर्वी मेनलो पार्क, कॅलिफोर्निया इथे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्या दोघांनी ४ सप्टेंबर १९९८ ला एका गॅरेज मध्ये गुगल ची स्थापना केली. हे दोघेही स्टॅनफर्ड विद्यापीठात पी.एच.डी. शिकत होते. जेव्हा गुगल च्या सर्च इंजिन ची स्थापना झाली तेव्हा इंटरनेट च्या बाजारात याहू सर्च इंजिन चं साम्राज्य होतं आणि त्या सोबत अल्टा विस्टा आणि आस्क जिवास सारखी छोटी मोठी सर्च इंजिन होती. पण ही सगळी सर्च इंजिन रिव्हेलन्स पद्धतीने काम करत असत. (जी गोष्ट तुम्ही शोधत आहात त्याच्याशी मिळती जुळती गोष्ट तुमच्या सर्च मध्ये दिसत असे.) पण गुगल सर्च इंजिन मात्र शोधकर्त्या समोर प्रसिद्ध असलेल्या वेब साईट आणत होतं. ह्या पद्धतीमुळे गुगल ने सर्च इंजिन च्या क्षेत्रात क्रांती आणली. 'गुगल' हा पुर्ण जगात इंटरनेट चा आरसा झालं. आजच्या क्षणाला सुद्धा गुगल जगातील सगळ्यात जास्ती भेट देण्यात येणारी वेब साईट आहे. गुगल सर्च इंजिन इंटरनेट वरील ७५% टक्के सर्च इंजिन चा हिस्सा आहे ह्याशिवाय मोबाईल सर्च इंजिन मध्ये हाच हिस्सा ९०% इतका प्रचंड आहे. आज गुगल ज्या अल्फाबेट कंपनीच्या छत्रछायेखाली आहे त्याच मार्केट कॅपिटल ९३० बिलियन अमेरीकन  डॉलर पेक्षा जास्ती आहे. आज अल्फाबेट मध्ये १ लाख पेक्षा लोक काम करतात. अवघ्या २१ वर्षात गुगल ने केलेला प्रवास थक्क करणारा आहे.

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्यांनी जरी जरी गुगल च्या रोजच्या कामातुन निवृत्ती घेतली असली तरी अल्फाबेट चे ५१% शेअर ह्या दोघांकडे आहेत ज्याची आजमितीला किंमत १०० बिलियन डॉलर पेक्षा जास्ती आहे. अल्फाबेट ही कंपनी वर्षाला २५% वेगाने वाढते आहे. लॅरी पेज कडे आज ६२ बिलियन  डॉलर ची संपत्ती तर सर्जी ब्रिन कडे ६१ बिलियन डॉलर ची संपत्ती आहे. गुगल च्या ह्या अफाट वाढीला ह्या दोघांची दुरदृष्टी कारणीभुत आहे. एका साध्या गॅरेज मधे सुरु झालेल्या गुगल ने सुरुवातीपासुन इंटरनेट ची ताकद ओळखुन पावलं टाकली. गुगल ने आपलं तंत्रज्ञान आपल्या वस्तु मधे आणण्यासाठी  छोट्या, मोठ्या स्टार्ट अप कंपनी विकत घेतल्या. २००५ मध्ये १.६५ बिलियन डॉलर ला यु ट्युब विकत घेतलं. २०१४ मध्ये सोंगझा नावाची कंपनी विकत घेऊन गुगल ने बाजारात गुगल प्ले आणलं. बाजारात चालेल्या हवेचा रोख ओळखुन गुगल ने २००८ मध्ये गुगल क्रोम ब्राऊझर बाजारात आणला. आपल्या सेवा सर्व स्तरावर आणण्यासाठी गुगल ने सगळ्या बाजुने आपल्या वस्तु बाजारात आणल्या जसं गुगल च्या मेल अकाउंट वरून तुम्ही सगळ्या सर्विसेस वापरू शकता. गुगल मॅप्स, गुगल प्ले, गुगल क्लाउड, गुगल डॉक्स, गुगल शिट ते एनरॉईड. एकाच जागेवरून सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार गुगल प्रत्येक गोष्टीच केंद्रस्थान झालं त्यामुळेच गुगल आज प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. तुम्ही कुठे न कुठे गुगल शी जोडलेले असता.

गुगल च्या केंद्रस्थानी झालेल्या ह्या प्रवासाने गुगल जरी मोठं झाली तरी ह्या केंद्रस्थानामुळे माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न गुगल साठी अडचणीचा ठरला आहे. गुगल ला युरोपियन युनियन ने १.३ बिलियन पाउंड चा दंड केला आहे. २०१७ ला २.४ बिलियन पाउंड चा दंड तर २०१८ ला ५ बिलियन डॉलर चा दंड गुगल ला माहितीच्या सुरक्षितता आणि इतर इ- कॉमर्स मधील चुकीच्या गोष्टींसाठी केला गेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीनंतर गुगल थांबलेली नाही. गुगल ह्या पुढच्या काळात घडणाऱ्या बदलांवर काम करत आहे. ज्यातील एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे ड्राइव्हर नसणारी कार. गुगल सध्या ह्या तंत्रज्ञानावर काम करत असुन येत्या काळात स्वप्नवत वाटणारी गोष्ट जगाच्या रस्त्यांवर खरोखरचं वास्तव असणारं आहे. अश्या बदलांच्या काळात गुगल ची निर्मिती करणाऱ्या लॅरी आणि सर्जी ह्या दोघांनी एकप्रकारे निवृत्ती घेऊन गुगल च्या सुकाणु ची जबाबदारी भारतीय वंशाच्या सुंदर पिचईकडे देताना एक वेगळा पायंडा जागतिक बाजारात घातला आहे. एका स्वप्नाला प्रत्यक्षात आणुन पुर्ण जगाची दिशा बदलावताना अश्या सुंदर अनुभुती पासुन निवृत्ती घेणं हे लॅरी आणि सर्जी जाणोत.

भारतात आपल्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी कंपनीची मालकी आणि सत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना जगातील नावाजलेल्या पहिल्या १० कंपन्यांन मधे असलेली आणि जवळपास १००० बिलियन अमेरीकन डॉलर चं मार्केट कॅप असलेली गुगल एका दुसऱ्याच नेतृत्वाकडे देऊन लॅरी आणि सर्जी ने स्विकारलेली पालकांची भुमिका नक्कीच गुगल ला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment