Tuesday 17 December 2019

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

घुंघट की आड से... विनीत वर्तक ©

भारतात शहराचा भाग सोडला तर अनेक भागात स्री ने इतर लोकांच्या समोर (इतर म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) डोक्यावरून पदर, दुपट्टा किंवा इतर गोष्टींच्या साह्याने डोकं आणि अनेकदा चेहरा झाकण्याची पद्धत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात हरियाणा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी आजही स्री पर पुरुषांसमोर येताना घुंघट घेऊन समोर येते. अर्थात ही पद्धत किती चुकीची / बरोबर अथवा स्री स्वातंत्र्याचा गळा घोटणारी की संस्कृती च रक्षण करणारी ह्या वादात मला जायचं नाही. कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात व प्रत्येक जण आपल्या समोर जी बाजु येते त्याला योग्य मानत असतो. आपलं जडणघडण ज्या पद्धतीने झालं आहे आणि आपल्या विचारांवर ज्या गोष्टींचा पगडा आहे तिचं योग्य असं समजुन आपण पुढे जातं असतो. पण ते करताना आपण विरुद्ध अथवा दुसऱ्या बाजुच्या विचारांची पायमल्ली तर करत नाही नं ह्याचं भान ही आपण राखायला हवं. ज्या गोष्टी आपल्या धर्मात / समाजात / संस्कृतीत रुजलेल्या आहेत त्या कदाचित आपल्याला बरोबर वाटत असतील पण इतर संस्कृती / समाजाच्या मानाने ती व्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली असु शकते. त्यामुळे तटस्थपणे आपण काही गोष्टींकडे बघायला हवं.

आज ह्या गोष्टींची प्रकर्षाने आठवण ह्याचसाठी की सध्या कामाच्या निमित्ताने मलेशिया ह्या मुस्लिम धर्माचं प्राबल्य असलेल्या देशात आहे. माझ्या सोबत असलेले इतर सहकारी मलेशिया चे नागरिक आहेत. मलेशिया मधे जवळपास ९०% मुस्लिम स्त्रिया ह्या हिजाब वापरतात. हिजाब म्हणजे डोकं आणि छातीचा भाग झाकण्यासाठी असलेलं वस्र. परपुरुषांच्या (परपुरुष म्हणजे कौटुंबिक व्यक्ती सोडुन ) समोर हिजाब वापरला जातो. अनेकदा बुरखा, हिजाब अथवा नकाब घालणाऱ्या स्त्रियांच व्यक्ती स्वातंत्र्य हे धर्माच्या नावाखाली नाकारल्याचं एक चित्र नेहमीच दाखवलं जाते. अनेक वेळेला ते योग्य असेल ही पण ह्याचा अर्थ असा होतं नाही की सरसकट ही गोष्ट लादली गेलेली आहे. अर्थात काही राष्ट्रात तसा कायदा ही आहे जसे सौदी अरेबिया आणि इराण. पण इतर अनेक मुस्लिम राष्ट्रात हिजाब, नकाब, बुरखा घालणं एक चॉईस आहे. माझ्या टीम मधे दोन मलेशियन मुस्लिम स्री अभियंता पेट्रोनास ह्या बलाढ्य ऑईल कंपनीसाठी काम करत आहेत. ह्यातल्या एकीने पेट्रोलियम इंजिनिअरिंग मधे ऑस्ट्रेलिया मधुन पदवित्तुर शिक्षण घेतलं आहे. तर दुसरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली पदवीधर आहे. दोन्ही टीम मेंबर सोबत काम करताना एकुणच मलेशियाच्या संस्कृती बद्दल खुप काही गोष्टी समजल्या.

हिजाब विषयी त्या दोघींशी बोलताना एक गोष्ट एकदम स्पष्ट होती ती म्हणजे ते त्या घालतात कारण हा त्यांचा चॉईस / निर्णय आहे. समाजात हिजाब न घालणं हे सहजगत्या स्विकारलं जात नसलं तरी त्यांच्यावर तो घालण्याचं कोणतच बंधन नव्हतं. आपल्याकडे ही लग्न झाल्यावर मंगळसुत्र न घालणं हे समाजात/ कुटुंबात सहजगत्या स्विकारलं जातं नाही. पण मंगळसुत्र न घालणं अथवा घालणं आज निदान शहरी भागात तरी चॉईस म्हणुन स्विकारल गेलेलं आहे. हिजाब घालणं हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आणि चॉईस असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं किंबहुना आज अनेक मुस्लिम स्त्रियांची ती एक चॉईस आहे. आपल्या कुटुंबात कोणी श्रेष्ठ व्यक्ती आल्यावर त्यांच्या पाया पडणं अथवा घुंघट डोक्यावरून घेणं जर संस्कृतीचा भाग असेल आणि त्यात आपली भावनिक आणि सांस्कृतिक गुंतवणूक असेल तर दुसऱ्या संस्कृतीत हीच गुंतवणुक वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाऊ शकते ह्याचं भान आपण नक्कीच ठेवायला हवं.

घुंघट असो वा हिजाब ह्या गोष्टी संस्कृती / प्रथा / पद्धती ह्या त्या धर्माच्या विचारसरणी चा भाग आहेत. त्या बरोबर किंवा चुक ह्यावर मतांतरे असु शकतात. ती मते बरोबर ही असतील. पण सरसकट कोणत्याही संस्कृतीला समजुन न घेता त्याला स्री स्वातंत्र्याचं लेबल चिकटवणं हे चुकीचं आहे. कोणत्या तरी मंदीरात प्रवेश केला म्हणुन जर भारतातील स्री स्वातंत्र्य होतं नसेल तर हिजाब न घालता केसं मोकळे सोडुन स्री स्वातंत्र्याची व्याख्या केली जाऊ शकत नाही.

घुंघट की आड से........ जर आपल्या संस्कृतीचा भाग आहे जर लग्न झालेल्या स्री ने टिकली लावणं, मंगळसुत्र घालणं संस्कृतीचं लक्षण आहे तर हिजाब ही कोणासाठी तरी त्यांच्या संस्कृतीचं लक्षण आहे हे समजुन घेण्याची आपली मानसिकता झाली तर स्री स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण एक पाऊलं पुढे टाकलं असं मी म्हणेन.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल 


No comments:

Post a Comment