Wednesday, 18 December 2019

ए. बी. सी. डी. ची भाषा... विनीत वर्तक ©

ए. बी. सी. डी. ची भाषा...  विनीत वर्तक ©

संवादाची सगळ्यात प्रभावी भाषा ही आपली मातृभाषा असते. मातृभाषा ही राष्ट्रीय भाषा अथवा प्रांतीय भाषा असायला हवी ह्याची काही गरज नसते. अगदी आपल्या बोलीभाषेतील संवाद सगळ्यात जास्ती प्रभावीपणे मांडता येतो. पण जेव्हा आपण स्थानिय किंवा देशांच्या भिंती बाहेर काम करत असतो तेव्हा आपल्याला एका समान भाषेत संवाद साधण्याची गरज पडते. वैश्विक पटलावर गेल्या काही शतकात झालेल्या घडामोडींमुळे संवाद साधण्यासाठी इंग्रजी तर व्यवहार करण्यासाठी अमेरीकन डॉलर हे सर्वसाधारणपणे संपुर्ण जगात मापदंड झाले आहेत. अर्थात जगातील काही भागात अजुनही त्यांना मान्यता नाही तरीपण जगातील ८०% वर लोक संवादासाठी इंग्रजीच्या ए. बी. सी. डी. वर अवलंबुन असतात.

भारतावर ब्रिटिशांनी जवळपास १५० वर्ष राज्य केल्याने भारतीय लोकांनी सहजरीत्या इंग्रजी भाषेला आपलसं केलं किंबहुना त्यावर प्रभुत्व मिळवलं. आधी वैश्विक पटलावर गरज म्हणुन शिकली जाणारी इंग्रजी भाषा आता स्टेटस सिम्बॉल बनली. इंग्रजी सहजरीत्या बोलणारे आणि त्यावर प्रभुत्व असणारे लोकं हुशार पठडी मधे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बनत गेला. ह्याचा परीणाम असा झाला की संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम असणारी मातृभाषा मागे पडत गेली. मातृभाषे मधे बोलणं, लिहिणं, विचार व्यक्त करणं म्हणजे मागासलेपणाचे किंवा इंग्रजी भाषा येत नसल्याने कमीपणाचे लक्षण ठरवण्याचा ठेका आपल्याच समाजाने आणि सो कॉल्ड बुद्धीजीवी लोकांनी घेतला. ह्या सगळ्यात सर्वाधिक नुकसान आणि हानी आपलीच झाली आहे. ह्याचा अंदाज यायला कदाचित अजुन काही कालावधी लागेल.

वेगळ्या देशात असताना जरी इंग्रजी ही सर्वसाधारण संवादाची भाषा असली तरी जेव्हा वेगळ्या देशात आपल्या प्रांतातील कोणी आपल्याला भेटते तेव्हा आपल्या राष्ट्रीय भाषेत, मातृभाषेत अथवा बोलीभाषेत खरे तर संवाद करण्याची  एक वेगळी मज्जा असते. घरापासून लांब अनोळखी देशात, वेगळ्या संस्कृतीत, इतर लोकांच्या गराड्यात जेव्हा कोणी आपल्या देशातील कोणी अचानक समोर येते तेव्हा त्या आपलेपणात भाषेच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या भिंती खरे तर वितळून जायला हव्यात. पण तसं खुप क्वचित वेळा होते. अमेरीकेत असताना माझ्या सोबत एक अमेरीकन भारतीय मुलगा होता. त्याचा जन्म अमेरीकेचा आई - वडील भारतीय पण कामाच्या निमित्ताने अमेरीकेत स्थायिक झालेले. त्यामुळे घरी भारतीय वातावरण. त्याला हिंदी अस्खलित बोलता येतं होतं. आम्ही दोघं एकाच ट्रेनिंग मधे असल्याने नकळत मी अनेकदा हिंदी मधे त्याच्याशी बोलायचो. एकदा मला बाजुला बोलावून तो म्हणाला, 'आप सबके सामने मुझसे हिंदी मैं बात मत करो. मेरा स्टेटस कम हो जाता हैं, मैं अभी अमेरीकन अंग्रेजी एक्सेंट का क्लास कर रहा हूं. यु स्पिक इन इंग्लिश विथ मी.... मी मान डोलावून होकार दिला. नंतर त्याच्या सोबत काम करणाऱ्या अमेरीकन मित्राने त्याचा एक किस्सा सांगितला व तो म्हणाला,

We called them ABCD. (American Born Confused Desi). They are trying to be part of us but they are neither American nor Indian.

एकदा दुबई मधल्या सगळ्यात मोठ्या मॉल म्हणजेच 'द दुबई मॉल' मधे फेरफटका मारत होतो. दुबई फेस्टिवलमुळे मॉल मधे बरीच गर्दी होती. अचानक चालत असताना काही पुसटशे शब्द माझ्या कानावर पडले. ते शब्द वसई- विरार भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचे होते. ह्या भागात प्राबल्य असलेल्या वाडवळ, सामवेदी, ख्रिश्चन लोकांमध्ये बहुतांश संवाद आजही तिथल्या बोलीभाषेत केला जातो. माझं बालपण ह्या भागात गेल्यामुळे मला जरी ह्या बोलीभाषा बोलत्या येत नसल्या तरी मला त्यांच्यातील संवाद पुर्णपणे कळतात. वसई मधील दोन ख्रिश्चन माणसं अटे-तटे बोलत असल्याचं माझ्या कानांनी लगेच हेरलं. मी त्यांचा शोध घेऊन त्यांना जाऊन भेटलो. तुम्ही वसईचे का? ह्या एका प्रश्नावर माझी ओळख झाली होती. त्या अनेक देशांच्या नागरीकांच्या गर्दीने ओथंबुन वाहणाऱ्या दुबई मॉल मधे बोलीभाषेच्या गोडव्याने आपल्या माणसांना बरोबर हेरलं होतं.

दोन वेगवेगळे प्रसंग पण भाषेची  ए. बी. सी. डी. शिकवून जाणारे. एकात आपल्याच मातृभाषेत संवाद साधण्याची लाज वाटत होती आणि दुसऱ्या भाषेतील  लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधुन जोडण्याची केविलवाणी धडपड सुरु होती. ज्यांच्यासाठी त्याची ही धडपड होती तेच लोकं त्याला आपला मानत नव्हते. न घर का ना घाट का अश्या द्वंदात तो अडकला होता तर दुसऱ्या प्रसंगात आपल्या बोलीभाषेत संवाद करण्यासाठी देशांच्या भिंती आड येतं नव्हत्या. त्यात कोणता कमीपणा नव्हता. संवादाची भाषा जरी दुसरी असली तरी आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान नक्कीच बाळगायला हवा आणि जिकडे शक्य होईल तिकडे मातृभाषा, बोलीभाषा ह्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्या मधुन संवादाला, लिखाणाला प्राधान्य द्यायला हवं. ए. बी. सी. डी. ची भाषा जरी आज जगमान्य संवादाची भाषा असली तरी आपल्या मातृभाषेतील गोडवा त्यात येतं नाही हे तितकचं खरं.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment