Friday, 3 January 2020

इसरो ट्वेन्टी ट्वेन्टी... विनीत वर्तक ©

इसरो ट्वेन्टी ट्वेन्टी... विनीत वर्तक ©

भारताचे भूतपुर्व राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी ह्या शतकाच्या सुरवातीला भारताच्या पुढल्या २० वर्षाच्या प्रवासाचा आलेख एका पुस्तकातुन मांडला होता. भारत २०२० साली कसा असावा ह्याची ब्लु प्रिंट त्यात त्यांनी लिहली होती. आज २०२० च्या सुरवातीला आपण त्या वळणावर येऊन पोहचलो आहोत. त्या पुस्तकातील किती गोष्टी आपण साध्य केल्या अथवा अपुर्ण राहिल्या हा वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकेल. आपलं व्हिजन आणि मिशन निश्चित असलं की त्या ध्येयाकडे आपली वाटचाल आपण समर्थपणे करू शकतो. अवकाश असं एक क्षेत्र आहे जिकडे भारताने गेल्या २० वर्षात दमदार वाटचाल केली आहे. गेल्या २० वर्षात भारताने अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत खुप काही मिळवलं असलं तरी अजुन खुप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. २०२० वर्षात प्रवेश करताना इसरो ने आपल्या समोर अनेक लक्ष्य ठेवली आहेत. त्या लक्षा पर्यंतचा इसरो चा प्रवास भारताच्या अवकाश प्रवासाची दिशा  नक्कीच ठरवणार आहे पण जागतिक पातळीवर पण अनेक देश ह्या वाटचालीवर बारीक लक्ष ठेवुन आहेत.

इसरो अध्यक्षांनी इसरो ट्वेन्टी ट्वेन्टी चा प्लॅन नुकताच जाहीर केला आहे. ज्यात विविध पातळीवर इसरो मधील प्रत्येकजण हे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी रात्रं- दिवस काम करत आहेत. इसरो च्या मिशन चा आढावा घेतला तर पुढली २-३ वर्ष इसरो साठी अत्यंत महत्वाची असणार आहेत. २०१९ मधे विक्रम ल्यांडर ला चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग आलेल्या अपयशाला मागे ठेवत इसरो ने चंद्रयान ३ मोहिमेसाठी तयारी सुरु केली आहे. विक्रम ल्यांडर चा वेग नियंत्रित करण्यात आलेल्या तांत्रिक अपयशामुळे विक्रम ल्यांडर चंद्राच्या पृष्ठभागावर अनियंत्रित वेगात आदळले. भारतासाठी, सामान्य माणसासाठी किंवा इतर देशांसाठी हे अपयश असलं तरी इसरो ला ह्यातुन खुप काही शिकायला नक्कीच मिळालं आहे. कोणत्याही वेगळ्या ग्रहावर आपलं यान सॉफ्ट लॅण्डिंग करणे हे तंत्रज्ञानातील एक मोठं आव्हान आहे. आजही कागदी रॉकेट बनवण्या पलीकडे मजल न मारलेल्या देशाने आपल्या देशावर आणि इसरोवर कुत्सितपणे केलेल्या टिकेला बाजुला ठेवुन इसरो पुन्हा चंद्रयान ३ वर आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे.

चंद्रयान ३ मोहिमेवर इसरो साधारण २५० कोटी रुपये खर्च करणार असुन ह्या मोहिमेत इसरो ल्यांडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार आहे. ऑर्बिटर आधीच चंद्राच्या कक्षेत स्थापन केलेलं असल्यामुळे त्याचा वापर पृथ्वीशी संवाद करण्यासाठी केला जाणार आहे. ह्याच्या पाठोपाठ इसरो जपान च्या जॅक्सा सोबत चंद्रयान मोहिमेची बोलणी करत आहे. चंद्रयान ३ ला भारत सरकारने मान्यता दिली असुन २०२१ पर्यंत चंद्रयान ३ चं उड्डाण अपेक्षित आहे. २०१८ ला भारताच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केलेल्या सुमारे १०,००० कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी अश्या 'गगनयान' मोहिमेने आता वेग घेतला आहे. ह्या मोहिमेत भारत स्वबळावर ३-७ अंतराळवीरांना ३-७ दिवस पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावर अंतराळात पाठवून त्यांना सुरक्षितरीत्या पृथ्वीवर उतरवणार आहे. असं करण्यात जर भारत यशस्वी झाला तर अशी क्षमता असणारा जगातील ४ था देश ठरणार आहे. ह्या मोहिमेसाठी खुप साऱ्या तंत्रज्ञानावर इसरो ला एकाच वेळी काम करावं लागणार आहे.  ह्याचसाठी भारताने आपल्या भरवशाच्या मित्राची म्हणजेच रशिया ची मदत घेतली असुन अंतराळात जाऊ शकणाऱ्या ४ भारतीय वायु दलातील पायलट ची निवड अंतराळयात्री म्हणुन झाली असुन जानेवारी २०२० च्या तिसऱ्या आठवड्यात हे ४ जण रशियाला पुढील सरावासाठी रवाना होतं आहेत. 'गगनयान' मोहिमेत अंतराळयात्रींना पाठ्वण्या अगोदर रॉकेट तसेच इतर सिस्टीम ची पुर्ण तपासणी करण्यासाठी इसरो डिसेंबर २०२० आणि एप्रिल २०२१ ला दोन मोहिमा रोबोट च्या साह्याने रंगीत तालीम म्हणुन करत आहे. ह्यात अंतराळवीरांची सुरक्षितता आणि त्यांना अवकाशात लागणाऱ्या सर्व गोष्टींची चाचणी करण्यात येणार आहे.

गगनयान मिशन संपत नाही तोच इसरो भारताच्या अवकाश स्थानकावर काम करून त्याला अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. १९९० च्या दशकात आय.एस.एस. (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) चा घटक म्हणुन इसरोकडे कोणी ढुंकून बघितलं नव्हतं पण आज भारत त्याचा हिस्सा व्हावा अशी अपेक्षा ह्याच प्रगतिशील राष्ट्रांनी बोलुन दाखवली आहे. पण ह्याच देशांसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या मिशन चा भाग होऊन आपले पैसे वाया घालवण्यापेक्षा इसरो ने स्वबळावर भारताचं अवकाश स्थानक येत्या ५-७ वर्षात अंतराळात स्थापन करण्याचं उद्दिष्ठ आपल्या समोर ठेवलं आहे. 

ह्या सगळ्या गराड्यात इसरो सुर्यावर आदित्य- एल १ मिशन २०२० ला पाठवत आहे. आदित्य - एल १ हे यान पृथ्वीपासून सुमारे १.५ मिलियन किलोमीटर अंतरावर लाग्रांगीण १ पॉईंट वर प्रक्षेपित करण्यात येणार आहे.  लाग्रांगीण १ हा असा भाग आहे जिकडे सूर्याच्या आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा सारखा असल्याने यान दोघांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली न येता सूर्याभोवती भ्रमण करू शकते. ह्या कक्षेत यान स्थापन केल्यामुळे कोणत्याही ग्रहणाचा अथवा इतर गोष्टींची अडचण न येता सुर्याचा अभ्यास केला जाऊ शकतो. आदित्य मिशन हे आजवर वैज्ञानिकांसाठी कोडं असलेल्या सुर्याच्या कोरोना चा अभ्यास करणार आहे. आदित्य सुर्याच्या कोरोना च्या वैश्विक माहितीत महत्वाची भर घालणार असल्याने अनेक देशांचं, वैज्ञानिकांचे लक्ष ह्या मोहिमेकडे आहे.

इसरो चा वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. चा लहान भाऊ म्हणुन जागतिक पातळीवर आधीच प्रसिद्ध झालेलं, सफल प्रक्षेपणा आधीच इतर देशांनी प्रक्षेपण विकत घेतलेलं आणि छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा खर्च जवळपास अर्ध्यावर आणणारं त्या सोबत अवघ्या ४-५ दिवसात उड्डाणासाठी सज्ज होणारं असं एस.एस.एल.व्ही. रॉकेट २०२० ला प्रक्षेपित होणार आहे. ह्याच्या उड्डाणासाठी वेगळं लॉन्च पॅड इसरो तुतिकोरन इकडे बांधत आहे. ह्या शिवाय इतर उपग्रह प्रक्षेपण पकडुन २०२० ह्या एका वर्षात इसरो २५ मोहिमा पुर्णत्वाला नेते आहे. 

एकीकडे देशाच्या अवकाश क्षेत्रातल्या गरजा पुर्ण करताना त्याचवेळी महत्वाकांक्षी वैज्ञानिक आणि तांत्रिक मोहिमा पुर्ण करण्यासाठी इसरो आपल्या टीमसह कंबर कसत आहे. ह्यातील प्रत्येक मोहीम किचकट आणि तांत्रिक कौशल्याची परीक्षा घेणारी आहे. प्रत्येक मोहीम कमीत कमी खर्चात यशस्वी करण्याचं उद्दिष्ठ इसरो समोर आहे. ह्यामुळेच इसरो ची ट्वेन्टी ट्वेन्टी मधील वाटचाल प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची आणि आनंदाचे क्षण देणारी व्हावी ह्यासाठी इसरो च्या टीम ला खुप खुप शुभेच्छा.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment