एका शेवटच्या प्रवासात... विनीत वर्तक ©
ओरायन (मृग ) नक्षत्रातला एक तारा सध्या जगभरातील संशोधकांच्या रडार वर आला आहे. ह्या ताऱ्याचे नाव आहे 'बेट्लज्यूस'. बेटलज्यूस हा रेड सुपर जायंट तारा आहे. आपल्या आकाशातील ९ वा सगळ्यात तेजस्वी तारा आणि ओरायन तारकासमूहातील दुसऱ्या नंबरचा तेजस्वी तारा आहे. सूर्यापेक्षा जवळपास २० पट हा तारा मोठा आहे. ह्याचा व्यास जवळपास १२०० मिलियन किलोमिटर इतका प्रचंड आहे. जर हा तारा सूर्याच्या जागी ठेवला तर हा गुरु च्या कक्षेपर्यंतची जागा व्यापेल इतका अवाढव्य आहे. इतका अवाढव्य असल्याने हा सुर्यापेक्षा अधिक वेगाने आपलं थर्मोन्यूक्लिअर इंधन संपवत आहे. आपल्या सूर्याचे वय साधारण ४.५ बिलियन वर्ष आहे तरीपण अजुन त्याच अर्ध आयुष्य बाकी आहे. पण बेटलज्यूस चं वय फक्त १० मिलियन वर्ष असुन तो शेवटच्या घटका मोजत आहे. आपल्या आतल्या भागात हेलियम चं न्युक्लीयर फ्युजन करत ऑक्सिजन आणि कार्बन तयार आहे. एका क्षणाला ह्या आतल्या भागाला तो सांभाळू शकणार नाही. मग जे होईल ती आकाशातली दिवाळी असेल. बेटलज्यूस एखाद्या बॉम्ब प्रमाणे फुटेल.
बेटलज्यूस हा टायमर लावलेला बॉम्ब आहे. तो कधी फुटेल ह्या बद्दल सध्यातरी कोणीच काही सांगु शकत नाही. कारण मानवी इतिहासात अश्या घटना अतिशय दुर्मिळ असुन आत्तापर्यंत खुप कमी घटनांची नोंद आहे पण त्याही खुप दशके आधी घडलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या रेड अथवा ब्लु सुपर जायंट ताऱ्याचा अंत कसा होतो ह्याबद्दल आपलं ज्ञान खुप कमी आहे. जे काही आहे तो अंदाज आहेत. ह्यामुळेच आपल्या सौरमालेपासुन ६४२ प्रकाशवर्ष लांब असलेला बेटलज्यूस वैज्ञानिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे. बेटलज्यूस चा बॉम्ब जेव्हा फुटेल तेव्हा होणाऱ्या स्फोटाला 'सुपरनोव्हा' म्हंटल जाईल. पृथ्वीपासून अवकाश अंतराच्या मानाने बेटलज्यूस जवळ असल्याने ही दिवाळी उघड्या डोळ्याने दिवसा ढवळ्यापण आकाशात काही काळ दिसेल. पण तरीही ह्याचा कोणताही परीणाम पृथ्वीवर होणार नाही. ही दिवाळी आकाशात सुरु असेल तेव्हा बेटलज्यूस चंद्रापेक्षा ही तेजस्वी असेल. ह्यामुळे बेटलज्यूस चा शेवटचा प्रवास वैज्ञानिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे.
ऑक्टोबर २०१९ पासुन बेटलज्यूस ने आपले रंग बदलायला सुरवात केली. आकाशात ९ वा सगळ्यात तेजस्वी असणारा तारा हळूहळू अतिशय मंद होतो आहे. गेल्या ३ महिन्यात त्याने ६०% तेजस्विता गमावली आहे. पहिल्या १० मधे असणारा बेटलज्यूस तेजस्वितेच्या बाबतीत २५ पलीकडे गेला आहे. बेटलज्यूस हा व्हेरिबल पद्धतीचा तारा असल्याने त्याच्या आकारात आणि तेजस्वितेत फरक होतं असतो. साधारण ५.९ वर्षाच त्याच एक सायकल आहे. ह्यातही ४२५ दिवसांनी ह्याच्या तेजस्वितेत घट होतं असते. पण सध्या झालेली घट ही अनपेक्षित आहे. तसेच त्याचा फुटण्याचा (सुपरनोव्हा होण्याचा) काळ हा आजपासुन १,००,००० वर्षात कधीही असल्याने बेटलज्यूस फुटण्याआधी अनपेक्षितरीत्या मंद झाला तर नाही न असा एक कयास जगभरातील वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. पण सुपरनोव्हा होताना बेटलज्यूस सारखा तारा कोणत्या स्थितांतरातून जातो ह्याची माहिती पुरेशी नसल्याने वेगवेगळे तर्क वितर्क मांडले जात आहेत.
इकडे सामान्य माणसांनी हे लक्षात घ्यायला हवं आता जो बेटलज्यूस दिसतो आहे तो ६४२ वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे १४ व्या शतकातल्या बेटलज्यूस ला आपण आत्ता बघत आहोत. आज तो आहे की नाही हे कळायला आपल्या पुढल्या ६-७ पिढयांना वाट बघावी लागेल. म्हणजे आज जरी सुपरनोव्हा आपल्याला दिसला तरी विश्वाच्या पोकळीत त्याच अस्तित्व संपलेलं असेल फक्त आपण आज भुतकाळात बघत असु. बेटलज्यूस पुन्हा एकदा तेजस्वी होईल असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे कारण सुपरनोव्हा चा कालावधी खुप प्रचंड आहे त्यामानाने आपल्या जीवनाचा कालावधी खुप कमी असल्याने सुपरनोव्हा दिसण्याची शक्यता धुसर आहे. काही झालं तरी बेटलज्यूस चा शेवटचा प्रवास मानवी अवकाश इतिहासातला एक अदभुत प्रवास असणार आहे ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
फोटो स्रोत :- गुगल
nice
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteGood
ReplyDelete