Thursday 9 January 2020

व्हिक्टोरिया क्रॉस विजेते 'नायक यशवंत घाडगे' इतिहासातील एक सोनेरी पान... विनीत वर्तक ©

व्हिक्टोरिया क्रॉस विजेते 'नायक यशवंत घाडगे' इतिहासातील एक सोनेरी पान... विनीत वर्तक ©

ए मेरी ज़मीं अफसोस नहीं
जो तेरे लिए सौ दर्द सहे
महफूज रहे तेरी आन सदा
चाहे जान ये मेरी रहे न रहे....

काळाच्या ओघात लुप्त झालेल्या इतिहासात काही भारतीय सैनिक ह्या ओळी अक्षरशः खऱ्या आयुष्यात जगले होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शत्रुशी लढा दिला. आपला मृत्यू साक्षात समोर असताना सुद्धा त्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि शत्रुच्या गोटात खळबळ माजवली. महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांचा इतिहास हा अश्याच पराक्रमांनी लिहिला गेला आहे. अवघ्या ७ साथीदारांसह शत्रुवर चाल करून जाणाऱ्या प्रतापराव गुर्जरांचा पराक्रम हा त्यातलाच..

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात!

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!

ह्याच पराक्रमाची गाथा अश्याच एका पराक्रमी मराठी सैनिकाने साता समुद्रापार लिहली. त्यांच्या पराक्रमाने जर्मन शत्रु सेना आणि ज्यांच्या साथीने ते लढले त्या ब्रिटिश सेना दोन्ही निशब्द झाल्या. ह्या पराक्रमी मराठी सैनिकांच नाव होतं नायक 'यशवंत घाडगे'.

यशवंत घाडगे ह्यांच्या जन्म १६ नोव्हेंबर १९२१ ला झाला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी सिपोई म्हणुन ब्रिटिश सेनेमध्ये प्रवेश घेतला. त्यांची नियुक्ती आखाती देशात करण्यात आली. त्यांनी दाखवलेल्या निष्ठा आणि पराक्रमामुळे त्यांची बढती 'नायक' म्हणुन करण्यात आली. १९४४ साली ५ मराठा इन्फ्रंटरी चा भाग म्हणुन दुसऱ्या महायुद्धात जर्मन सेनेशी लढण्यात इटली ला पाठवण्यात आलं. १० जुलै १९४४ ला अप्पर तिबेर व्हॅली ला नायक यशवंत घाडगे ह्यांच्या नेतृत्ताखाली असलेल्या तुकडीला जर्मन सेनेकडुन होणाऱ्या प्रचंड गोळीबाराला सामोरं जावं लागलं. ह्या गोळीबारात नायक यशवंत घाडगे ह्यांना सोडुन जवळपास सगळे सैनिक मृत्यूमुखी अथवा जखमी झाले. आपल्यासोबत अजुन कोणी नाही ह्याची जाणिव असताना पण मागचा पुढचा विचार न करता त्यांनी मशिनगन असलेल्या पोस्ट वर आपल्या टॉमी गन आणि ग्रेनेडसह हल्ला केला.

आपल्या ग्रेनेड ने त्यांनी मशिनगन आणि ती चालवणाऱ्या जर्मन सैनिकाला त्यांनी निष्प्रभ केलं. आपल्या टॉमीगन सह त्यांनी मशिनगन पोस्ट वर हमला केला. त्यांच्या बंदुकी मधील गोळ्या संपल्या आणि त्याच वेळी ती पोस्ट सांभाळणाऱ्या दोन जर्मन सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. गोळ्यांची मॅगझीन बदलायला वेळ लागेल लक्षात येताच त्यांनी गोळ्या संपलेल्या बंदुकीसह त्या दोन सैनिकांवर हल्ला केला. त्या दोन्ही सैनिकांचा त्यांनी आपल्या हातांनी खात्मा केला. त्याचवेळी मागे लपलेल्या एका स्नायपर च्या गोळीने त्यांचा वेध घेतला. नायक यशवंत घाडगे ह्यांनी एकट्याने जर्मन पोस्ट हस्तगत केली होती. पण हा सिंह शत्रुच्या गोळीमुळे धारातीर्थी पडला. ब्रिटिश सेनेने पोस्ट जिंकल्यावर त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला परंतु त्यांचा मृतदेह सापडला नाही.

त्यांच्या ह्या बहादुरी आणि पराक्रमाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांच्या सर्वोच्च सैनिकी पुरस्कार 'व्हिक्टोरिया क्रॉस' ने सन्मानित केलं.

The KING has been graciously pleased to approve the posthumous award of the VICTORIA CROSS to:—

No. 9192 Naik Yeshwant Ghadge, 5th Mahratta Light Infantry, Indian Army.

In Italy, on 10th July, 1944, a Company of the 5th Mahratta Light Infantry attacked a position strongly defended by the enemy.

The courage, determination, and devotion to duty of this Indian N.C.O. in a situation where he knew the odds against him gave little hope of survival, were outstanding.

— London Gazette, 2 November 1944.

त्यांच्या ह्या अभुतपुर्व पराक्रमाची नोंद भारत सरकारने घेताना तहसिलदार ऑफिस, माणगाव, रायगड इकडे त्यांच्या स्मारक उभारलं. वयाच्या अवघ्या २२ वर्षी नायक यंशवंत घाडगे ह्यांनी हा भिमपराक्रमाची नोंद इतिहासात सोनेरी अक्षरांनी केली. आपल्या एकटाच्या बळावर एक पुर्ण पोस्ट त्यांनी शत्रु कडुन हस्तगत केली होती. आपल्या जिवाची पर्वा न करता ते शत्रुवर चालुन गेले. त्यांचा हा पराक्रम ब्रिटिश आणि जर्मन सेनेसाठी अनपेक्षित असा होता कारण असे पराक्रम शिकवले जात नाहीत तर ते रक्तात असावं लागते. मर्द मराठी इतिहासाचा सोनेरी वारसा आपल्या रक्तात असणाऱ्या नायक यशवंत घाडगे ह्यांनी साता समुद्रापार पुर्ण जगाला ह्याची ओळख करून दिली. त्यांच्या ह्या पराक्रमापुढे माझा सॅल्युट आणि साष्टांग नमस्कार.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment