Thursday, 16 January 2020

पृथ्वी सारखाच... विनीत वर्तक ©

पृथ्वी सारखाच... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यातील एका बातमीने जगभरातील संशोधकात आनंदाचे वातावरण आहे. अवकाशात पृथ्वी सदृश्य ग्रह शोधण्यासाठी पाठवलेल्या नासा च्या टेस (Transiting Exoplanet Survey Satellite) ने पृथ्वी सारख्याच एका ग्रहाचा शोध लावल्याची वर्दी दिली आहे. एप्रिल २०१८ ला अथांग अवकाशात अजुन कुठे पृथ्वी सदृश्य ग्रह आहेत का हे शोधण्यासाठी नासा ने टेस ला अवकाशात प्रक्षेपित केलं होतं. टेस एखाद्या ताऱ्याच्या भोवती परीक्रमा करत असलेल्या ग्रहांचा शोध ट्रांझिट पद्धतीने घेते. ट्रांझिट पद्धतीत जेव्हा एखादा ग्रह ताऱ्याभोवती परीक्रमा करतो तेव्हा त्या ताऱ्याच्या प्रकाशाच्या तिव्रतेत घट होते. जशी आपल्याकडे ग्रहणात होते. अशी घट किती वेळा आणि किती प्रमाणात होते ह्याचा अभ्यास करून आपण गणिताने सिद्ध करू शकतो की एखादा ग्रह त्या ताऱ्याभोवती किती वेळात प्रदक्षिणा करतो. त्या ग्रहाची त्या ताऱ्यापासून कक्षा किती लांब आहे. एकदा कक्षा समजली की ताऱ्याच्या प्रखरते वरून तो ग्रह ह्याबीटायटल झोन मध्ये आहे का नाही ह्याच गणित मांडू शकतो.

आपली पृथ्वी ह्या अवकाशात एकच का? तर ह्याच उत्तर दडलं आहे पृथ्वीची सुर्याभोवती फिरण्याची कक्षा. पृथ्वी सुर्याच्या ह्याबीटायटल झोनमध्ये परीक्रमा करते व ह्यामुळेच पाणी हे द्रवस्वरूपात आढळुन येते. पृथ्वीच तपमान हे सजीवांच्या वाढीसाठी अतिशय योग्य असल्याने आज पृथ्वीवर सजीवांची उत्क्रांती झाली आहे. त्यामुळेच टेस चं प्रमुख काम अश्याच ग्रहांचा शोध घेणं जे ग्रह त्याच्या ताऱ्याच्या ह्याबीटायटल झोन मध्ये येतात. नुकतेच टेस ने TOI 700 d ह्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह TOI 700 ह्या ताऱ्याभोवती परीक्रमा करत आहे. TOI 700 हा तारा पृथ्वीपासुन साधारण १०१.४ प्रकाशवर्ष दुर आहे. TOI 700 हा एक रेड डवार्फ तारा आहे. ह्याच वस्तुमान सुर्याच्या ४०% आहे आणि ह्याच तपमान सुर्याच्या तपमानाच्या अर्धे आहे.

TOI 700 भोवती तीन ग्रह परीक्रमा करत असुन TOI-700 b हा पृथ्वीच्या आकाराचा ग्रह सगळ्यात जवळ असुन १० दिवसात ह्या ताऱ्याभोवती परीक्रमा करतो. ह्याचा पृष्ठभाग खडकाळ आहे.  तर TOI-700 c हा दुसरा ग्रह ग्यास जायंट (आपल्या गुरु ग्रहासारखा) असुन प्रत्येक १६ दिवसात एक परीक्रमा करतो. संशोधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला TOI 700 d ग्रह हा सगळ्यात लांबुन  ह्या ताऱ्या भोवती ३८ दिवसात एक परीक्रमा पुर्ण करतो. TOI 700 d चा आकार पृथ्वीच्या १.१ पट आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते हा ग्रह आपल्या ताऱ्याच्या ह्याबीटायटल झोन मध्ये परीक्रमा करत आहे. ( अगदी पृथ्वी प्रमाणे) त्यामुळे ह्यावर द्रव रूपात पाणी असण्याची दाट शक्यता आहे. ह्या ग्रहावर असलेलं तपमान उणे २ ते ३ डिग्री सेल्सियस च्या आसपास असण्याचं अनुमान आहे. ह्यामुळेच सजीव सृष्टी ला पोषक अश्या दोन्ही गोष्टी ह्या ग्रहाच्या केलेल्या अभ्यासात आढळुन आल्या आहेत.

पण हे सगळे ग्रह आपल्या ताऱ्याभोवती फक्त परीक्रमा करतात स्वतःभोवती नाही. ह्यामुळे ह्यांची एक बाजु ताऱ्याकडे तर एक बाजु नेहमीच अंधारात असते. तरी सुद्धा ह्याच्या कक्षेमुळे TOI 700 d अगदी पृथ्वीसारखाच असल्याचं संशोधकांचं मत आहे. TOI 700 d वर असलेलं वातावरण, इथली ढगांची निर्मिती हे पृथ्वीपेक्षा अतिशय वेगळं असु शकेल. ह्या ग्रहा बद्दल असलेली माहिती सध्यातरी त्याच्या निरीक्षणातुन कॉम्प्युटर मॉडेल नी दिली आहे. अजुन बराच अभ्यास बाकी आहे. पण काही झालं तरी पृथ्वी सारखाच ग्रह शोधुन टेस ने आपल्या माहितीत खुप भर घातली आहे. टेस ह्या जानेवारीत आपला कार्यकाळ पुर्ण करेल. पण त्या आधी टेस ने आपल्या पृथ्वी सारखा ग्रह ह्या विश्वात आहे ह्यावर प्रकाश टाकलेला आहे.

टेस ची संशोधक टीम चे मानवांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या ह्या संशोधनासाठी खुप कौतुक. आपण नक्कीच येत्या शतकात पृथ्वी सारखाच ग्रह शोधण्यात आणि त्याचा अभ्यास करण्यात यशस्वी होऊ.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

1 comment:

  1. Toi700D झूम करून पाहिला तर अस लक्षात येत की या ग्रहावर जमीन पाणी, तसेच हिरवा भाग वनस्पती दर्शवितो.शिवाय आपण म्हणता हा ग्रह स्वतः भोवती फिरत नाही,पण अंधाऱ्या भागात पाहिलं तर पृथ्वी प्रमाणे रातीच्या वेळी जसे लाईट लागलेले दिसतात त्या प्रमाणे या ग्रहावर देखील लाईट सदृश प्रकाश दिसत आहे.म्हणजे जीव सृष्टी नक्की असावी,आणि माणसा प्रमाणे इथे वस्ती असावी.त्या मुळे तो स्वतः भोवती फिरत असावा.
    जर आपण दिलेला 700d चा हा फोटो ओरिजनल असेल तर वरील शक्यता नाकारता येत नाहीत,आपले मत काय जरूर सांगा.

    ReplyDelete