Sunday 26 January 2020

बेवारस प्रेतांचा देवदूत... विनीत वर्तक ©

बेवारस प्रेतांचा देवदूत... विनीत वर्तक ©

आयुष्यातील अवचित घडणाऱ्या कधी कधी पुर्ण आयुष्य बदलवून टाकतात. होत्याच नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा असतो. आपण ह्या गोष्टींना कसं सामोरं जातो ह्यावर आपला पुढला प्रवास अवलंबून असतो. असं म्हणतात की, आयुष्यात काही लक्ष्य असायला हवं असं लक्ष्य जे मिळवण्यासाठी आपण तहान भूक आणि स्वतःला त्यात विसरून जाऊ. ते लक्ष्य म्हणजेच आयुष्य असेल. अशीच एक घटना २७ वर्षांपूर्वी अयोध्या,उत्तर प्रदेश इकडे राहणाऱ्या मोहम्मद शरीफ ह्यांच्या बाबतीत घडली. त्या घटनेने मोहम्मद शरीफ ह्यांना एक लक्ष्य दिलं असं एक लक्ष्य ज्याचा विचार करताना पण आपल्या आंगावर काटा येईल. पण मोहम्मद शरीफ गेली २७ वर्ष ते पूर्ण करत आहेत आणि आज वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा त्यात खंड पडलेला नाही.

२७ वर्षापूर्वी औषध आणायला सुलतानपूर इकडे गेलेला त्यांचा मुलगा मोहम्मद रईस हा परत आलाच नाही. अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर पण त्याचा कुठे थांगपत्ता लागला नाही. मित्र, नातेवाईक, दुकानदार ह्या सगळ्यांना विचारून पण त्याची काहीच माहिती मिळाली नाही. जवळपास एक महिन्यांनी त्यांना कळालं की त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचे अंतिम संस्कार बेवारस म्हणुन केले गेले. त्याच्या कपड्यावर असलेल्या टेलर च्या टॅग वरून पोलिस मोहम्मद शरीफ ह्यांच्या पर्यंत पोहचले. कपड्यावरून तो आपलाच मुलगा होता हे त्यांना कळून चुकलं. आपल्या मुलाचे अंतिम संस्कार पण आपल्या वाट्याला आले नाहीत ह्या विचाराने मोहम्मद शरीफ ह्यांना कुठेतरी आत भांडावून सोडलं. हाच एक क्षण होता जेव्हा त्यांनी आपलं लक्ष्य ठरवलं की अयोध्या च्या ह्या भूमीवर कोणाचेही अंतिम संस्कार बेवारस म्हणुन होणार नाही. भले मग ती व्यक्ती मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन किंवा अजून कोणत्याही धर्माची असो. प्रत्येक व्यक्तीचे अंतिम संस्कार त्यांच्या धर्माप्रमाणे मी करेन.

मोहम्मद शरीफ बेवारस प्रेतांचे देवदूत बनले. गेल्या २७ वर्षात त्यांनी ५५०० पेक्षा जास्ती बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार केले आहेत. ह्यात जवळपास ३००० पेक्षा जास्ती हिंदू तर २५०० पेक्षा जास्ती मुसलमान मृतदेहांचा समावेश आहे. जो ज्याचा धर्म असेल त्या प्रमाणे म्हणजेच हिंदू असेल तर विधीनुसार अग्नी देऊन आणि जर मुसलमान असेल तर विधिपूर्वक दफन त्यांनी केलं आहे. आज वयाची ८० वर्ष झाली तरी त्यांच लक्ष्य तेच आहे. हे करण्यासाठी त्यांना नगर पालिकेकडून प्रति महिना फक्त १५ रुपये मिळतात. प्रत्येक महिन्याला ७-८ मृतदेहाचं अंतिम संस्कार करताना त्यांना लोकांकडून, संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून रहावं लागते. सायकल चं दुकान चालवून एका भाड्याच्या घरात राहून पण त्यांनी त्यांच देवदूताच काम सुरु ठेवलं आहे. त्यांच्या ह्या हिमालया एवढ्या उत्तुंग कार्याची दखल घेताना भारत सरकारने त्यांना २०२० च्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

आज मोहम्मद शरीफ ह्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर खरे तर पद्मश्री पुरस्काराची उंची हिमालया एवढी वाढली आहे. गेली अनेक वर्ष हे पुरस्कार म्हणजे मागे- पुढे करणाऱ्या लोकांचे आणि ओळखी असणाऱ्या लोकांचे झाले होते त्यामुळेच भारताच्या जनमानसात त्याची उंची कमी झाली होती. ते देणाच्या पद्धतीवरचा विश्वास उडाला होता. पण येत्या काही काळात मिळालेले पुरस्कार ज्यात  मुहम्मद शरीफ ह्यांचा समावेश आहे त्याने ह्या पुरस्कराच गतवैभव आणि लोकांच्या मनात विश्वास नक्कीच पुन्हा प्राप्त होईल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही. गेली २७ वर्ष एका कठीण समयी ठरवलेल्या लक्ष्यावर कोणत्याही मदतीशिवाय काम करत राहताना ५५०० पेक्षा जास्ती बेवारस मृतदेहांच अंतिम संस्कार विधिवत करणाऱ्या देवदूतास माझा साष्टांग नमस्कार. 

मोहम्मद शरीफ चाचा तुम्ही मृत्यूलाही जिंकलं. कदाचित यम सुद्धा त्यांना म्हणत असेल, 'आपको मेरी उमर लग जाये'......

फोटो स्रोत :- गुगल 
 
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment