Saturday 4 January 2020

अचानक... विनीत वर्तक ©

अचानक... विनीत वर्तक ©

आयुष्यात अचानक अशी काही वळणे येतात की त्या वळणावर आपल्या हातात काहीच नसते. आपल्या समोर फक्त त्या समोर आलेल्या वळणावर पुढे जाणं हाच पर्याय असतो. ते वळण आपल्याला अश्या ठिकाणी घेऊन जाणार असते की ज्याची कल्पना पण आपल्याला अस्वस्थ करते. तो प्रवास किती लांब असेल हे लक्षात आल्यावर त्या शेवटच्या टोकापर्यंत न जाण्यासाठी आपण सगळी धडपड करतो. पण ती धडपड यशस्वी होईल ह्याची खात्री आपल्याला नसते. उजाडणारा प्रत्येक दिवस हळूहळू आपल्याला त्या शेवटच्या क्षणाची आठवण करून देणारा असेल तर ते जगणं किती कठीण असेल ह्याचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. एक दिवस सकाळी उठल्यावर कोणीतरी आपल्याला सांगाव की तुझ्या आयुष्यात आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्या वेळी आयुष्यात आलेल्या अचानक वळणामुळे आपल्या आयुष्याचे रंगच बदलुन जातात.

एक दिवस अचानक माझ्या व्हाट्स अप ग्रुप वर माझ्या एका मित्राचा मेसेज झळकला. त्यात लिहिलं होतं की 'डॉक्टरांनी केलेल्या निदानाअंती माझ्याकडे आता १.५ ते २ वर्ष आहेत. माझ्या आजाराने हळूहळू माझ्या शरीरा भोवती विळखा घातला आहे. माझे कुटुंब, माझे सहकारी, माझा मित्र परीवार माझी निट काळजी घेतात त्यांचा आभारी आहे'. हा मेसेज वाचुन मन एकदम भुतकाळात गेलं. आज जवळपास त्याला भेटुन १० ते १२ वर्षाचा कालावधी लोटला होता. आम्ही दोघे एकाच ठिकाणी काम करत होतो. ट्रेनिंग ते काम असा जवळपास ७-८ वर्षाचा काळ एकत्र घालवला होता. अतिशय विनम्र असलेल्या मित्राच्या त्या मेसेज ने मी काही वेळ स्तब्ध झालो. कोणीतरी अचानक आपल्या पायाखालची जमीन बाजुला करावी आणि अनपेक्षितपणे आपण त्या आठवणींच्या खोल गर्तेत आपण कोसळावं त्या प्रमाणे माझ्या मनात विचारांचं काहुर उठलं.

न राहवून दुसऱ्या मित्राला मेसेज केला. हा मित्र अजुनही त्याच्या सोबत काम करत असल्याने मला नक्की काय झालं ते जाणुन घ्यायचं होतं. पण त्याने सांगितलेलं ऐकुन मला राहवलं नाही. मी सरळ एका डॉक्टरला मेसेज केला त्याच्या आजाराची माहिती दिली. पण त्याच उत्तर ऐकुन कुठेतरी थोडीशी वाटणारी आशा खुप अंधुक झाली. त्या वेळेला मला हतबल वाटलं. माझा तसा काही संबंध नसताना सुद्धा मला इतकं हतबल वाटलं तर जो ह्या सगळ्यातून जातो आहे त्याला किती हतबल वाटत असेल. माझ्या मनात भविष्याची चिंता विचार यायला लागले तर त्याच्या मनात काय होत असेल असा विचार करून पण मला टेन्शन आलं. पण त्याच मेसेज च्या खाली त्याने अजुन दोन ओळी लिहल्या होत्या. त्या अश्या होत्या,

'२०१९ हे वर्ष संपत आलं आहे परंतु येणार वर्ष माझ्यासाठी नवं संजीवनी आणि नवं पर्व घेऊन आलं आहे. आत्तापर्यंत मी माझ्या वेळेप्रमाणे समाजसेवा करत असे पण १ जानेवारी पासुन समाजाच्या वेळेप्रमाणे मी उपलब्ध असेन. मी आजवर माझ्या संस्थेच्या अनाथ मुलांचा विचार करत असे पण ह्या पुढे पुर्ण जगातील अनाथ मुलं ही माझीच अंग असणार आहेत. त्यांच्यासाठी मी माझं उरलेलं आयुष्य झटणार'.

( माझा मित्र ही अनाथ असल्याने त्याने आपल्या नंतर अश्याच मुलांना पुढे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी स्विकारली आहे.)

त्याचे ते शब्द मला निशब्द करून गेले. मला राहवलं नाही. दुसऱ्या दिवशी मी परदेशी प्रवास करणार होतो पण कसही करून त्याची भेट घ्यायची मी ठरवली. वेळ नसताना सुद्धा बाकीच्या गोष्टी बाजुला ठेवुन त्याला भेटायला येतो असा मेसेज करून त्याच्या घरी गेलो. त्याच्या दुर्धर आजाराचा लवलेश ना त्याच्या शरीरावर जाणवला न त्याच्या बोलण्यात. कदाचित आयुष्यात आलेलं हे वळण त्याने सहजरीत्या स्विकारलं ही असेल पण त्याच्या कुटुंबाच काय? हा विचार मला क्षणभर निशब्द करून गेला.

१०-१२ वर्षानंतरची गळाभेट झाल्यावर मला काय बोलावे सुचेना. कदाचित माझी अडचण त्याने ओळखली असावी माझ्याबद्दल विचारपुस करून त्याने माझी ओळख आपल्या बायकोला आमच्या बॅच मधील हुशार मुलगा अशी करून दिली. आता मल्टीनॅशनल कंपनीमधे असुन देश-विदेशाचे दौरे करतो. आता खुप मोठा झाला आहे. पण मनात मात्र मी खुप खुजा झालो होतो. कारण पद, पैसा, प्रतिष्ठा आभासी मोठेपणा देते. खरा मोठेपणा सांगण्याची गरज नसते तो समोरच्याला भावतो. जसा माझ्या मित्राचा मोठेपणा, ह्या कठीण समयीपण त्याची आयुष्याकडे बघण्याची वृत्ती आणि समाजाप्रती असलेलं भान हे खुप मोठं होतं आणि त्या समोर माझी सगळी आभूषणे जी त्याने मला घातली होती ती खुप छोटी होती.

अवघी १५ मिनिटे त्याच्या सोबत गप्पा मारल्या. ज्या सहजतेने त्याने हे सगळं स्विकारलं होतं त्याच सहजतेने त्याच्या बायकोने, दोन मुलांनी ते स्विकारल्या सारखं नक्कीच वाटलं पण ते तितकं सहज असेल का? हा प्रश्न मात्र मला निरुत्तर करून गेला. आयुष्याची अनेक स्वप्ने आपल्यापैकी प्रत्येकजण बघत असतो. आयुष्यात येणार अचानक वळण मात्र कधी त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणते तर कधी त्या स्वप्नांचा चुराडा करते. पण ते वळण सहजरीत्या सगळ्याच पातळीवर स्विकारणं सगळ्यांना जमते असं नाही. कारण 'जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं' हे डायलॉग चित्रपटात कितीही छान वाटले तरी प्रत्यक्षात स्विकारणं तितकं सोप्पं नसते.

अचानक आपल्या आयुष्यात आलेली वळण त्याचा प्रत्यय आपल्याला आणुन देतात. अश्या अचानक आलेल्या वळणावर स्वतःला आणि त्या सोबत आपल्या कुटुंबाला सांभाळून समाजाच्या कल्याणासाठी झटण्याची जिद्द ठेवणाऱ्या माझ्या त्या मित्राला माझा कडक सॅल्युट आणि देव तुला खुप आयुष्य देवो हिच प्रार्थना.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment