Monday 27 January 2020

झेन... विनीत वर्तक ©

झेन... विनीत वर्तक ©

माझ्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात आग लागल्यावर, एखादी आपत्कालीन स्थिती उदभवल्यावर प्रत्येकाने कुठे जमायचे, कोणत्या पद्धतीची आपत्कालीन स्थिती आहे त्याचा विचार करून आपल्या ठरलेल्या ठिकाणी कमीत कमी वेळात सुरक्षित कसं पोहचायचं ह्याची ड्रिल केली जाते. समुद्राच्या मधोमध काम करत असताना २०० लोकांपैकी प्रत्येकाचा ठावठिकाणा लागणं अतिशय महत्वाचे असते. त्यासाठी ह्या ड्रिल केल्या जातात आणि त्या ही न सांगता कोणत्याही वेळी. ह्या मागील उद्देश एकच की अगदी गाढ झोपेतून उठल्यावर सुद्धा घाबरून न जाता आपल्यासोबत आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षित स्थळी पोहचता यावं. आमच्यासाठी ह्या गोष्टी नित्याच्या असल्या तरी सामान्य लोकांना अश्या परिस्थितीत नक्की काय करायचे हे माहित नसल्याने घाबरून, गोंधळून अश्या एखाद्या आपत्कालीन स्थिती मध्ये होणाऱ्या अपघातात जास्ती बळी जातात.

ऑगस्ट २०१८ ला मुंबईच्या परळ येथील 'क्रिस्टल टॉवर' ह्या बिल्डींग च्या १२ व्या मजल्यावर सकाळी ८ वाजता आग लागली. ह्याच बिल्डींग च्या १६ व्या मजल्यावर ११ वर्षाची 'झेन सदावर्ते' रहात होती. बघता बघता आग पसरू लागली. धुराचे लोट वरच्या मजल्यावर येऊ लागले. आगीपेक्षा त्यातुन निर्माण होणाऱ्या धुरात अतिशय विषारी, घातक असे गरम वायू असल्याने ते नाकावाटे शरीरात गेल्यास ऑक्सिजन ची कमतरता आणि ह्या विषारी वायूमुळे जीव जाण्याचा धोका वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सगळ्यांना होता. १६ व्या मजल्यावर झेन सदावर्ते च्या कुटुंबा सोबत इतर शेजारी घाबरून जमा झाले होते. गच्चीचा दरवाजा बंद असल्याने तिकडे जाणं शक्य नव्हतं आणि खालुन येणारे धुराच्या लोटांमुळे प्रत्येकाला श्वास घेण्यात अडचण येत होती. त्यामुळे सगळेच गोंधळात आणि घाबरलेले होते. 

११ वर्षाच्या झेन सदावर्ते ने परिस्थितीच गांभीर्य ओळखलं आधी तर सगळ्यांना शांत करताना तिने तिला शाळेत शिकवल्या गेलेल्या आगीच्या वेळेस आपत्कालीन स्थिती मध्ये घ्यायच्या सुचना सर्वांना समजावून सांगितल्या. ११ वर्षाची चिमुरडी अश्या स्थितीत शांतपणे सगळं सांगते हे पाहून बाकीच्यांना ही धीर आला. झेन सदावर्ते ने सर्वांना आपल्या तोंडावर ओला केलेला रुमाल कपडा धरून त्यातून श्वास घेण्याची सूचना केली. आपल्या शाळेत आग लागल्यास आगीच्या विषारी धुरापासून बचाव करण्यासाठी ओला केलेला कपडा एका फिल्टर चं काम करतो. त्याच सोबत आत येणारी हवा थंड होऊन आपल्या नाकातोंडा पर्यंत पोहचते. ह्यामुळे विषारी धुरापासून आपला बचाव होतो. ह्या गोष्टीची कल्पना तिला होती. तिच्या सूचनेवर अंमल करताना तिकडे असलेल्या सगळ्यांनी लागोलाग आपल्या तोंडावर ओला रुमाल घेऊन श्वास घेण्यास सुरवात केली.

झेन सदावर्ते ने सांगितल्या प्रमाणे सर्वांना ह्या गोष्टीमुळे निट श्वास घेता येऊ लागला. तिच्या सतर्कते मुळे काही तासांनी आलेल्या अग्निशामक दलाच्या मदतीपर्यंत सर्वजण व्यवस्थित राहिले. झेन सदावर्ते ने शाळेत शिकवलेल्या ट्रेनिंग ने जवळपास १७ लोकांचा जीव वाचवला. समजा ह्या लोकांनी झेन सदावर्ते चं ऐकलं नसतं तर कदाचित ह्यातलं कोणीच जिवंत राहिलं नसतं.

झेन सदावर्ते च्या शब्दात सांगायचं झालं तर,

"I remembered the first thing they had asked us was to stay calm and ask others too.That is what I told my parents. Later, I asked them to wet a cloth and cover the face and breathe through it, I had learned this technique while researching for my Class 3 project for Disaster Management. I had also learnt during the project that in such scenario one should not panic. I told everyone exactly the same".

७ वीत शिकणाऱ्या ११ वर्षाच्या झेन सदावर्ते च्या बहादुरी आणि सतर्कतेने १७ लोकांचा जीव वाचवला. ह्या गोष्टीची दखल भारत सरकारने घेताना Indian Council for Child Welfare's National Bravery Award for 2019 साठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

ह्या प्रसंगातून शिकून आपण अश्या आपत्कालीन स्थितीमध्ये काय करायचं? ह्याच प्रशिक्षण आपल्या बिल्डिंग, सोसायटी तसेच शाळा कॉलेज मधून अनिवार्य करायला हवं. झेन सदावर्ते च्या बहादुरीसाठी तिला कडक सॅल्यूट आणि पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment