Monday, 13 January 2020

एका भारतीयाच्या फायबर ऑप्टिक्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका भारतीयाच्या फायबर ऑप्टिक्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

फायबर ऑप्टिक्स हे नावं आज घरोघरी पोचलेलं आहे. मुंबई, पुणे किंवा इतर शहरात रस्त्याच्या बाजुने निळ्या, शेंदरी रंगाचे प्लास्टिक पाईप टाकण्याचं काम अनेकांनी पाहिलं असेल. हे प्लास्टिक चे पाईप चौकशी केल्यावर फायबर ऑप्टिक्स चे असल्याचं सांगितलं असेल. फायबर ऑप्टिक्स म्हणजे नक्की काय? आणि ह्या फायबर ऑप्टिक्स ची जनक एक भारतीय व्यक्ती आहे हे खुप कमी जणांना ठाऊक असेल.

फायबर ऑप्टिक्स म्हणजे नक्की काय? हे समजुन घ्यायला आपल्याला थोडं माहितीचं हस्तांतरण कसं होते हे समजुन घ्यावं लागेल. टेलिफोन मधुन होणारं माहितीचं हस्तांतरण हे केबल मधुन होतं तर आपला मोबाईल हीच माहिती आपल्याला न दिसणाऱ्या रेडीओ वेव्हस च्या स्वरूपात पाठवते. पण ह्या सर्वांवर काही  मर्यादा येतात. प्रकाश अशी एक गोष्ट आहे जी माणसाला नेहमीच काहीतरी शिकवत आली आहे. जर आपण प्रकाशा सोबत माहिती पाठवली तर? असा विचार एका भारतीय संशोधकाने केला. प्रकाशाला आपण वळवू शकतो हे १९ व्या शतकाच्या सुरवातीला संशोधकांनी दाखवुन दिलं. पण त्यातुन माहिती पाठवणं शक्य होईल हे पहिल्यांदा सर्वप्रथम एका भारतीय  संशोधकाने जगाला दाखवलं. त्यांचं नाव आहे नरिंदर सिंग कापनी. १९५० ला लंडन इकडे हजारो ग्लास फायबर नी बनवलेल्या पाईप मधुन एक चित्र त्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं आणि एका जागतिक क्रांतीची सुरवात केली. त्यालाच आज आपण 'फायबर ऑप्टिक्स' असं म्हणतो.

फायबर ऑप्टिक्स चा वापर सर्वप्रथम एन्डोस्कोप मध्ये केला गेला. शरीराचा भाग न कापता त्याच्या आत बघण्यासाठी प्रकाशाचा वापर केला गेला. वैज्ञानिकांनी ह्यावर संशोधन करून ह्याचा वापर टेलिफोन कॉल ला एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला. वैज्ञानिकांनी हा प्रयोग जेव्हा केला तेव्हा माहितीच वहन हे निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने झालं म्हणजेच जवळपास ३ लाख किलोमीटर/ सेकंद. हा वेग पुर्ण जगाच्या माहितीच्या देवाण घेवाणीचे पुर्ण संदर्भच बदलवुन टाकु शकतो हे त्यांना स्पष्ट झालं. प्रत्यक्षात आज माहितीची देवाणघेवाण फायबर ऑप्टिक्स मधुन ह्या वेगाच्या २/३ वेगाने होते. फायबर ऑप्टिक्स मध्ये काचेचे अथवा प्लास्टिक चे खुप पातळ धागे असतात. प्रत्येक धागा आपल्या केसाच्या १/१० इतका जाड असतो. (अंदाज येईल की किती पातळ धागे असतात). एक धागा जवळपास २५,००० पेक्षा जास्ती टेलिफोन कॉल्स च्या माहितीच देवाणघेवाण एका वेळी करू शकतो. एका फायबर ऑप्टिक्स केबल मध्ये एक, दोन किंवा काही शेकडो असे धागे असतात. एक फायबर ऑप्टिक्स केबल एका वेळेला कित्येक मिलियन टेलिफोन कॉल्स च्या माहितीची देवाणघेवाण करण्यास सक्षम असते. ह्यामुळेच माहितीच्या महाजालाचा पाठीचा कणा म्हणजेच 'फायबर ऑप्टिक्स'.

फायबर ऑप्टिक्स मध्ये प्रकाश प्रवास करताना ह्या केबल च्या भिंतीवरून सतत परावर्तित होतं राहतो. प्रकाश समजा काचेवर पडला तर तो काचेच्या आरपार जातो. प्रकाश जर का काचेवर खुप कमी अंशात पडला ( ४२ डिग्री पेक्षा कमी अंशात) तर तो पुर्णपणे परावर्तित होतो. ती काच एका आरश्या सारखं काम करते. ह्याच तत्वाचा वापर फायबर ऑप्टिक्स केबल मध्ये केला जातो. प्रकाश सतत केबल च्या भिंतीवरून परावर्तित होतं राहतो. त्यामुळे आपल्या सोबत असलेली माहिती पुढे नेत रहातो. फायबर ऑप्टिक्सच्या केबल मध्ये प्रामुख्याने दोन भाग असतात एक असते 'कोअर' ज्यातुन प्रकाश प्रवास करतो तर दुसरं म्हणजे भिंत ज्यावरून तो पुन्हा पुन्हा परावर्तित होतं रहातो ज्याला 'कॅल्याडींग' असं म्हणतात. ज्या तऱ्हेने इलेक्ट्रिकल ऊर्जा अनेक पद्धतीने वापरली जाऊ शकते त्याच प्रमाणे प्रकाशातुन आपण अनेक प्रकारच्या माहितीचं वहन करू शकतो.

आज पुर्ण जगाच्या संपुर्ण माहितीच्या देवाणघेवाणीतला फायबर ऑप्टिक्स चा वाटा ९९% इतका प्रचंड आहे तर जगातील इंटरनेट अथवा माहितीच्या जगातील कोणताही संदेश आणि माहिती आपलं ९९% अंतर फायबर ऑप्टिक्स मधुन कापत असते. ह्या दोन गोष्टी 'फायबर ऑप्टिक्स' चं महत्व दाखवुन देण्यास पुरेश्या आहेत. फायबर ऑप्टिक्स का? ह्याच उत्तर दडलेलं आहे ह्या केबल च्या वापरामुळे होणाऱ्या फायद्यात.

१) फायबर ऑप्टिक्स मध्ये संदेश हरवत नाही. इतर कोणत्याही संदेश वहनाच्या तुलनेत ह्यातील संदेश १० पट जास्त अंतर कापतो जोवर त्याला पुन्हा एम्प्लिफाय करण्याची  गरज पडते. ह्याचा अर्थ फायबर ऑप्टिक्स अतिशय स्वस्त, किफायतशीर सेवा देणारी प्रणाली आहे.

२) ह्यात वहन होणारी माहिती एकमेकात मिसळत नाही. एखाद्या तांब्यांच्या तारेतुन होणाऱ्या वहनात 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरंस' होण्याची शक्यता असते. जे फायबर ऑप्टिक्स मध्ये होतं नाही. ह्यामुळे संदेश अतिशय स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेला जातो.

३) फायबर ऑप्टिक्स आधी सांगितलं तसं एकाच वेळेस मिलियन कॉल्स अथवा माहितीची देवाणघेवाण करू शकते. त्यामुळे हाय बॅण्डविड्थ ही फायबर ऑप्टिक्समुळे शक्य झाली आहे.

मेडिकल, मिलिट्री, इंटरनेट, कॉम्प्युटर ते अगदी साधं कोणत्याही संदेश वहनात पाठीचा कणा असलेल्या फायबर ऑप्टिक्स चे वडील म्हणुन पुर्ण जगात ज्यांची ओळख आहे ते नरिंदर सिंग कापनी ह्यांना आपलेच भारतीय लोकं ओळखत नाहीत ही शोकांतिका आहे. आजवर १०० पेक्षा जास्ती प्रबंध त्यांनी ह्यावर लिहले असुन १९६० साली अमेरीकन सायंटीफीक मध्ये त्यांनी प्रकाशातुन माहितीच्या देवाणघेवाणी च्या ह्या पद्धतीला 'फायबर ऑप्टिक्स' म्हणुन नावं दिलं. आज प्रत्येक घराघरात फायबर ऑप्टिक्स हा शब्द रोज उच्चारला जातो मात्र त्या शब्दाचा जनक मात्र आज वयाच्या ९३ वर्षी आपल्याच लोकांच्या विस्मरणात गेला आहे. फायबर ऑप्टिक्स चा शोध लावुन पुर्ण जगाला माहितीच्या संदेश वहनाने जवळ आणणाऱ्या ह्या भारतीयांस माझा कडक सॅल्युट....

फोटो स्रोत :- गुगल 
 
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment