Saturday 18 January 2020

एका गुन्हेगारासाठी... विनीत वर्तक ©

एका गुन्हेगारासाठी... विनीत वर्तक ©

गुन्हा करणारा नेहमीच कायद्याचा आधार घेऊन आपल्या शिक्षेपासुन वाचत आल्याच्या घटना आपण नेहमीच वाचत असतो. कधी कायद्याचा तर कधी दोन देशांच्या गुन्हेगार हस्तांतरण पद्धती मधील त्रुटींचा आधार घेऊन अनेक गुन्हे केले जातात. स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचारात तर अजुन अनेक गोष्टी गुन्हेगारांना वाचवत असतात. बलात्कारा सारख्या गुन्ह्यात आजही आपला समाज त्या गुन्हाल्या बळी पडलेल्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि त्यामुळेच समाजात होणारी नाचक्की, बदनामी ह्यापासुन वाचण्यासाठी स्त्री ह्या गुन्ह्यांना पाठीशी घालत रहाते. जोवर गुन्हा बाहेर येतो तोवर एकतर गुन्हा करणारा पळालेला असतो किंवा त्या गुन्ह्याचे साक्षीदार किंवा गुन्हा घडलेला आहे हे सिद्ध करणाऱ्या गोष्टी नाहीश्या झालेल्या असतात. त्यामुळेच गुन्हेगाराला हे चांगलच कळुन चुकलेलं असते की कायद्याचे हात त्याच्या पर्यंत पोहचु शकत नाही.

ह्याच पाळवाटेचा आधार घेऊन २०१७ मध्ये सुनील कुमार भद्रन (वय वर्ष ३८) ह्याने केरळ इकडे एका १३ वर्षाच्या मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर तिन महिने बलात्कार केला. सुनील हा ह्या पिडितेच्या वडिलांचा मित्र होता. कोवळ्या वयात ह्या पाशवी अत्याचाराला बळी पडलेली मुलगी कुठे काहीच बोलली नाही. काही दिवसांनी जेव्हा आपल्या काकांना झालेल्या अत्याचाराची गोष्ट सांगितली. काकांनी पोलिसांना ह्या गोष्टीची कल्पना दिली पण तोवर सुट्टीसाठी भारतात आलेला सुनील सौदी अरेबिया ला निघुन गेला होता. समाजात आपल्याकडे बघणाऱ्या नजरांना ती मुलगी झेलू शकली नाही. तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला. तिच्या काकांना तिची आत्महत्या जिव्हारी लागली. आपणच ही गोष्ट उघड केल्याने तिच्यावर ही नामुष्की आली हा विचार करून त्यांनीपण आपलं आयुष्य संपवलं. ह्या दोन आत्महत्या आणि बलात्कारासाठी कारणीभूत असलेला सुनील मात्र सौदी अरेबियात मोकळं आयुष्य जगत होता.

केरळ पोलीसांच्या सांगण्या वरून इंटरपोल ने सुनील कुमार च्या विरुद्ध नोटीस काढली पण गुन्हेगार प्रत्यर्पणासाठी लागणाऱ्या कागदांची आणि प्रक्रियेची कल्पना नसल्याने ही केस पोलीसांच्या फायलीत लुप्त झाली. दोन वर्ष फायलीत अडकलेल्या ह्या केसला नव्याने पदभार स्विकारलेल्या आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांनी सोडवायचा विडा उचलला. इंटरपोल च्या नोटिसी नंतर सौदी अरेबिया च्या पोलिसांनी सुनील कुमार ला बेड्या ठोकुन त्याची तुरुंगात रवानगी केली होती पण गोष्ट तिकडेच अडकुन होती. भारत आणि सौदीअरेबिया ह्या दोन्ही देशांमध्ये २०१३ एक ट्रीटी झालेली आहे त्यानुसार हे दोन्ही देश गुन्हेगारांना आपआपल्या देशात कायद्याच्या प्रक्रियेने शिक्षा देऊ शकतात. पण ही प्रक्रिया इतकी सोप्पी नाही. भारतातील सि.बी.आय., इंटरपोल तसेच सौदी अरेबिया च्या यंत्रणा ह्यांना लागणारी सगळी कागदपत्र सुपुर्द केल्यावर गुन्हेगाराच प्रत्यार्पण होऊ शकते.

 आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांनी त्या कोवळ्या मुलीला न्याय देण्यासाठी ह्या केसची सगळी सुत्र आपल्या हातात घेतली. सगळ्या कागद पत्रांची पुर्तता करताना सुनील कुमार भद्रन ला ताब्यात घेण्यासाठी आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांनी सौदी अरेबिया गाठलं. सौदी अरेबिया च्या कायद्यानुसार त्यांनी अगदी बुरखा घालुन प्रत्येक प्रक्रीयेत स्वतः जातीने लक्ष घालताना सुनील कुमार भद्रन ला त्याच्या गुन्ह्यासाठी भारतात आणलं. आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांचा हा लढा सगळ्याच गुन्हेगारांना एक वॉर्निंग देणारा ठरला आहे. तुम्ही कुठेही पळून गेलात तरी कायद्याच्या कचाट्यातुन सुटणं आता तितकं सोप्प नाही हे त्यांनी दाखवुन दिलं आहे.

लहानपणापासुन पोलिसात जाण्याची इच्छा असणाऱ्या मरीन जोसेफ ह्यांनी आपल्या पहील्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करताना आय.पी.एस. बनण्याचं आपलं स्वप्न साकार केलं आहे. आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ दिसायला सुंदर असल्याने अनेक सोशल मिडियावर त्यांच्या कामापेक्षा दिसण्याची चर्चा जास्त झाली. ह्यावर मत मांडताना त्या म्हणतात,

“People focusing on a particular aspect and airing sexist comments have never affected my work. I have no problem with complimenting my looks, but unnecessary glamorization of a very serious job is something I don’t agree with. Does anyone talk about the good looks of a male officer? It’s not fair to judge a person based on the looks, which has never been an advantage to be in this profession which is serious in nature. All these deviate attention from the good work we do. But I have never let it affect me or my work. I believe over a period of time, people’s thoughts will evolve and after a few years, no one will talk like this.”     

आपलं काम असच धडाडीने सुरु राहील हे सांगताना स्री वर होणाऱ्या अत्याचारासाठी मी नेहमीच लढेन असा विश्वास त्यांनी सर्वच स्त्रियांना दिला आहे. एका गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी देशांच्या सिमा ओलांडून त्याच्या मुसक्या आवळणाऱ्या ह्या पराक्रमी आय.पी.एस. ऑफिसर मरीन जोसेफ ह्यांना माझा सॅल्यूट.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment