हत्ती आणि मुंगीची गोष्ट... विनीत वर्तक ©
एक मस्तवाल हत्ती उन्मत्त होऊन आवेशात सगळीकडे भटकत असतो. आपल्याकडे असलेल्या शक्तीचा त्याला खूप गर्व झालेला असतो. त्याच्या जोरावर तो जो कोणी समोर येईल त्याला उद्वस्थ करत किंवा दडपशाही करत पुढे जात असतो. त्याला असं वाटते की आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही. त्याच्या समोर एक छोटीशी मुंगी येते. ती त्याला म्हणते इतका मस्तवाल होऊ नकोस. तुला जमिनीवर लोळवायला मी एकटी पुरेशी आहे. हत्ती ते ऐकून हसायला लागतो. कारण त्याच्या गर्वाचा फुगा खूप फुगलेला असतो. ती मुंगी हळूच त्याच्या अंगावर चढून त्याच्या कानात पोहचते ते त्याला कळत पण नाही. कारण एवढ्या महाकाय देहापुढे ती मुंगी दिसणार तरी कशी? मुंगी गुपचूप हत्तीला कळू न देता त्याच्या कानात एक कडकडून चावा घेते. या एका हल्याने हत्ती बेजार होतो. जमिनीवर गडबडा लोळायला लागतो. अक्षरशः जीव जाण्याच्या यातनांनी त्याच तेच महाकाय शरीर अगदी निपचित जमिनीवर कोसळलेल असते. हत्ती मुंगी ला विनंती करतो, बाई ग! दुसरा चावा घेऊ नको नाहीतर मला मृत्यूपासून कोणीही वाचवू शकणार नाही.
शालेय जिवनात आपल्यापैकी प्रत्येकाने ही गोष्ट वाचली किंवा कुठेतरी ऐकलेली असेल. पण तुम्ही विचार करत असाल की आजच्या हायटेक युगात या गोष्टीचा संदर्भ कुठे येतो. याचा संदर्भ आहे भारत आणि चीन या दोन देशांशी. यातील मदमस्त आणि गर्वाने मोठा झालेला हत्ती आहे तो चीन आणि त्याच्या समोर मुंगी होऊन उभा आहे तो भारत. निळ्याशार समुद्रावर आज चीन ची वाटचाल अशीच गर्वाने मस्तवाल झालेल्या हत्तीप्रमाणे सुरु होती. जवळपास ५३० पेक्षा अधिक लढाऊ जहाज ज्यात दोन विमानवाहू नौका, पाणबुड्या, फ्रिगेट, डिस्ट्रॉयर अश्या अनेक नौका समाविष्ट आहेत. या जहाजांच्या मदतीला असलेली ६०० पेक्षा जास्त लढाऊ विमान, ३ लाख पेक्षा सैनिक चीन च्या नौदलाला जगातील एक सामर्थ्यवान नौदल म्हणून ताकद देतात. त्यात २०३५ पर्यंत चीन तब्बल ६ विमानवाहू नौकांची बांधणी करत आहे. ज्यातील अनेक या आण्विक आहेत. ज्या की अनेक वर्ष कोणतंही इंधन न भरता समुद्रात राहू शकतात. याच्या जोरावर चीन ने साऊथ चायना समुद्रात आपली दादागिरी सुरु केली. भर समुद्रात बेट निर्माण करून त्याच्या आजूबाजूच्या समुद्रावर आपला हक्क सांगायला सुरवात केली. तिथल्या देशांनी काही विरोध केला तर आपल्या नौदलाच्या ताकदीने त्यांना गप्प करत चीन हळूहळू हिंद महासागरात येऊन पोहचला.
हिंद महासागरात त्याच्या समोर होता भारत आणि भारतीय नौदल. त्याला पण आपण सहज पराभूत करू अश्या माजात असलेल्या चीन समोर भारताने एक मुंगी सोडली. ती मुंगी आपलं काय बिघडवणार अश्या थाटात असलेला चीन आज त्याच मुंगीमुळे संपूर्णपणे बॅक फुटवर तर गेलाच आहे. पण ज्या ताकदीचा त्याला माज होता आणि त्याच्यासाठी त्याने कित्येक बिलियन डॉलर खर्च केले तो सगळा पैसा आज पाण्यात स्वाहा झाल्यात जमा आहे. भारताने अशी कोणती मुंगी चीन समोर उभी केली आहे. जिच्या नुसत्या नावाने चीन घाबरतो. त्या मुंगीच नाव आहे 'ब्राह्मोस'.
ब्राह्मोस बद्दल या आधी अनेकवेळा लिहून झालं आहे. पण चीन च्या नौदलाला ब्राह्मोस चा एवढा धसका का आहे? याचा विचार आपण कधी केला तर आपल्या देशातील संशोधक, अभियंते आणि डी.आर.डी.ओ. सोबत रशिया बद्दलचा आदर अधिक वाढेल. चीन च्या एका विमानवाहू नौकेला पाण्यात बुडवण्यासाठी किती ब्राह्मोस लागतील याचा आपण विचार केला तर उत्तराने आपण चकीत व्हाल. चीन च्या एका विमानवाहू नौकेला जलसमाधी द्यायला फारफार तर दोन ब्राह्मोस पुरेशी आहेत. एका ब्राह्मोस मधे चीन ची विमानवाहू नौका संपूर्णपणे निकामी होऊ शकते तर दुसऱ्या हल्यानंतर तीच पाण्यावरच अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. ब्राह्मोस चा वेग त्याला प्रचंड गतिशील ऊर्जा देतो. त्यात ब्राह्मोस अक्षरशः पाण्यावरून लक्ष्याकडे कूच करू शकते. एक अंदाज द्यायचा झाला तर तुम्ही जमीनीवर उभे आहात आणि बिल्डिंग च्या पहिल्या मजल्यावरून ब्राह्मोस उड्डाण करते. इतक्या जवळून उड्डाण केल्यामुळे ब्राह्मोस जगातील कोणत्याही रडार यंत्रणेला चकवा देऊ शकते. त्या शिवाय ब्राह्मोस एका सरळ रेषेत हल्ला करत नाही. ब्राह्मोस शेवटच्या टप्यात इंग्रजी S प्रमाणे रस्ता बदलते. समजा एखाद्या कार वर आपण समोरून ब्राह्मोस सोडलं. तर ते कारला समोरून धडक देण्याऐवजी अचानक वरती जाईल आणि ५-६ मजले उंचीवर जाऊन कारच्या दिशेने सरळ खाली येऊन कारच्या मध्यभागी हल्ला करेल. यालाच S मॅन्युअर असं म्हणतात. ही दिशा, उंची, कोन, जागा या सर्व गोष्टी ब्राह्मोस स्वतः ठरवते. याचा अर्थ हल्ला कुठून होणार याचा अंदाज शत्रूला लावता येत नाही.
ब्राह्मोस स्वनातीत वेगाने प्रवास करते. वर लिहिलं तसं ब्राह्मोस चा वेग आणि उंची जगातील कोणत्याही मिसाईल डिफेन्स सिस्टीम ला पकडता येत नाही. त्यामुळे ब्राह्मोस रडारवर अदृश्य असते. मित्र राष्ट्रांसोबत झालेल्या युद्ध अभ्यासात सुद्धा जगातील सर्वोत्तम असणाऱ्या एस ४०० प्रणाली ला ब्राह्मोस ने चकवा दिलेला आहे. लक्षात घ्या की हे सगळं ब्राह्मोस नुसतं रडारवर दिसणं इथपर्यंत येऊन थांबते बाकी त्याचा वेध आणि निष्प्रभ करणं अजून जगातील कोणत्याच प्रणाली ला जमलेलं नाही. हे झालं एका ब्राह्मोस च पण दोन किंवा जास्त ब्राह्मोस जर असतील तर लक्ष्याचा अंत ठरलेला आहे. कारण ही दोन्ही ब्राह्मोस एकाच ठिकाणावरून सुटली असली तरी लक्ष्याकडे वेगवेगळ्या मार्गाने झेपावण्यात सक्षम आहेत. याचा अर्थ ब्राह्मोस कुठून येऊन हमला करेल याचा काहीच अंदाज शत्रूला येत नाही. ब्राह्मोस हल्ला केल्यावर जवळपास १५-१६ मीटर वर्तुळाकार भागात असलेलं सगळं काही नष्ट करते.
आता विचार करा की एखाद्या विमानवाहू नौकेवर अथवा फ्रिगेटवर ब्राह्मोस आपलं S मॅन्यूवर करत जेव्हा मधोमध इतका मोठा खड्डा करेल तेव्हा त्या बोटीचं अस्तित्व संपूर्णपणे नष्ट होईल. विमानवाहू नौका एका हल्यात फक्त पाणी भरण्याच्या कामाची राहील. तिला परत नेणं पण शक्य होणार नाही. त्यात दुसरं ब्राह्मोस आदळलं तर मग तिथल्या तिथे तीचा गेम ओव्हर. चीन च्या विमानवाहू युद्धनौकांची किंमत जवळपास ९ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. ( १ बिलियन १०० कोटी ) आणि ब्राह्मोस ची किंमत आहे ५ मिलियन अमेरिकन डॉलर ( १ मिलियन १० लाख ). एक ५० लाख डॉलर किंमत असलेलं ब्राह्मोस ९०० कोटी डॉलर च्या युद्धनौकेला रसातळाला न्यायला पुरेसं आहे. हे गणित चीन ला अक्षरशः गडाबडा जमिनीवर लोळवते आहे. त्यात भारत दिवसेंदिवस ब्राह्मोस च्या ताकदीत भर टाकत चालला आहे. ब्राह्मोस चा वेग आणि अंतर यात भारताने ज्या गतीने प्रगती केली आहे. त्यामुळे चीन च्या हत्तीला घाम फुटला आहे.
सद्यस्थितीला ब्राह्मोस जगातील सर्व देशांच सगळ्यात आवडत मिसाईल म्हणून जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. फिलिपाइन्स ने तब्बल ३७५ मिलियन डॉलर खर्च करून अगदी २९० किलोमीटर च का होईना पण ब्राह्मोस खरेदी केलं आहे. कारण ब्राह्मोस नुसतं जवळ आहे यानेच चीन ची जहाज फिलिपाइन्स पासून वचकून राहणार आहेत याची पूर्ण खात्री फिलिपाइन्स ला झालेली आहे. चीन च्या मस्तवाल हत्तीची नशा आणि झिंग भारताच्या मुंगीने म्हणजे ब्राह्मोस ने उतरवली आहे. गेल्या महिन्यात चुकून पाकिस्तानात घुसलेल्या ब्राह्मोस चा अंदाज पाकिस्तान मधील एकाही रडार यंत्रणेला आला नाही यावरून ब्राह्मोस ची ताकद स्पष्ट होते. ते जमिनीवर पडल्यावर तिथल्या स्थानिक लोकांनी प्रशासनाला कळवल्यानंतर तिथल्या यंत्रणांना ब्राह्मोस पाकिस्तान मधे धडकल्याचं लक्षात आलं. या गोष्टींनी चीन अजून जास्ती अस्वस्थ झाला आहे कारण पाकिस्तान मधे चीन च मिसाईल डिफेन्स यंत्रणा कार्यंवित आहे. जिला थोडापण अंदाज आलेला नव्हता.
हत्ती आणि मुंगीची गोष्ट इकडे संपत नाही तर इकडून चालू होते. सद्या मुंगीने फक्त आपण काय करू शकतो हे दाखवलेलं आहे. हत्ती जर असाच आपल्या नशेत चालत राहिला तर एक कडकडून चावा घेतल्यावर त्याला अक्कल येईल अशी अपेक्षा आहे.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
वरील लेखातील 'ब्राह्मोस' हा शब्द 'ब्रह्मोस' असावा असे वाटते. गूगल शोधातून खालील माहिती मिळते:
ReplyDelete"ब्रह्मोस क्षेपणास्त्र यापूर्वीच लष्कर आणि नौदलात सामील झाले आहे. संरक्षण विभागाच्या अधिकार्यांच्या मते, ब्रह्मोस हे नाव ब्रह्मास्त्र या ब्रह्मदेवाच्या शक्तिशाली शस्त्रावरून ठेवण्यात आले आहे."
आता, ब्रह्म वरून 'ब्राह्मण' तसे 'ब्राह्मोस' पण होते किंवा कसे?
क्षमस्व. लेख उत्तम आणि माहितीपूर्ण झाला आहे. अभिनन्दन !!!
ReplyDeleteThank you
Deleteसुरेख…. तुमचे लेख नेहमी अभ्यासपुर्ण व वस्तुतीथी ला धरुन असतात…
ReplyDelete