२९ वर्ष युद्ध लढलेल्या सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©
'हिरो ओनोडा' हे नाव आपल्यासाठी नवीन असेल. कोण आहे हा हिरो ओनोडा? एक, दोन वर्ष नाही तर तब्बल २९ वर्ष दुसरं महायुद्ध लढणारा हा जपान चा सैनिक इतिहासाच्या पानात आज लुप्त झालेला असला तरी त्याने आपल्या समोर मांडलेला निष्ठा, अभिमान, निर्धार आणि वचनबद्धता यांचा आदर्श जगातील येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. या हिरो ओनोडा ने नक्की असं काय केलं? कसा लढा दिला? कसा तो शरण आला? या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या तर हिरो ओनोडा च आयुष्य आपल्यासमोर अनेक पदर उलगडेल ज्यातून आपण खूप काही शिकू शकतो.
हिरो ओनोडा ची गोष्ट सुरु होते जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर केलेल्या हल्यापासून. यानंतर अमेरिका आणि जपान यांच्यात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजले. याच्या एक वर्ष आधीच १८ वर्षाचा तरुण हिरो ओनोडा जपान च्या सैन्यात दाखल झाला होता. आधीपासून काटक, हुशार, चपळ असलेल्या हिरो ओनोडा ची निवड कमांडो ट्रेनिंगसाठी झाली. त्यात त्याला गोरीला युद्धकौशल्य, तोडफोड, काउंटर इंटिलिजन्स तसेच अतिशय विपरीत परिस्थिती मधे लढा कसा सुरु ठेवायचा याच प्रशिक्षण देण्यात आलं. १९४२ मधे जपान ने फिलिपाइन्स च्या अनेक बेटांवर कब्जा केला होता. पण अमेरिका च्या साह्याने जेव्हा फिलिपाइन्स सेनेने १९४४ च्या सुरवातीला युद्ध सुरु केलं तेव्हा जपानी सेनेला पराभूत होण्याची नामुष्की आली. अमेरिकेच्या सेनेला थोपवण्यासाठी हिरो ओनोडा ला फिलिपाइन्स च्या 'लुबंग' बेटावर पाठवण्यात आलं.
गोरीला युद्धाच (ज्याची तुलना गनिमी काव्याशी होऊ शकेल) प्रशिक्षण घेतलेल्या हिरो ओनोडाला आपण समोरासमोरील युद्धात हरणार हे लक्षात आलं. त्याने आपल्या सांगण्याप्रमाणे अमेरिका आणि फिलिपाइन्स च्या सैन्याला रोखण्यासाठी गनिमी काव्या प्रमाणे युद्ध करण्याची कल्पना मांडली. पण त्याच्या सिनिअर ऑफिसर ने ती ऐकली नाही. २८ फेब्रुवारी १९४५ ला जपान च सैन्य हरलं. पण हिरो ओनोडा ने आपल्या ३ साथीदारांसह शरण येण्यास नकार देत गनिमी पद्धतीने आपला लढा सुरु ठेवला. तो आणि त्याचे साथीदार जंगलात लपून बसत आणि अचानक तिकडे तैनात असलेल्या सैनिकांवर हल्ला करून जंगलात पसार होत. ऑगस्ट १९४५ मधे जपान ने अमेरिकेपुढे शरणागती पत्कारली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. पण संपर्काच्या कोणत्याही साधनाविना जंगलात लढणाऱ्या हिरो ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या दृष्टीने युद्ध अजून सुरूच होतं. अमेरिकेला या बेटावर लपून बसलेल्या काही जापनीज सैनिकांची कल्पना होती. त्यांना युद्ध संपल्याचं कळवण्यासाठी अमेरिकेने सगळे प्रयत्न केले. आकाशातून जपान ने शरणागती पत्करलेला कागद ही अनेक ठिकाणी जंगलात टाकण्यात आला. पण हिरो ओनोडा चा यावर विश्वास बसला नाही. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या ओनोडाला हे पचवणं कठीण जात होतं की आपला देश शत्रूपुढे तलवार म्यान करेल.
या नंतर ४ वर्ष हिरो ओनोडा आणि त्याचे तीन साथीदार जंगलात लपून आपल्या भागाचं रक्षण करत होते. फक्त ४ लोक अजूनही फिलिपाइन्स आणि अमेरिकेविरुद्ध युद्ध लढत होते. त्यांचा एक साथीदार युईची अकात्सु याने मार्च १९५० ला कंटाळून फिलिपाइन्स सैन्यापुढे शरणागती पत्कारली. त्याच्या शरणागती नंतर संपूर्ण जगाला हिरो ओनोडा आणि त्याचे साथीदार अजूनही लुबंग च्या जंगलात लपून युद्ध करत असल्याचं कळालं. अमेरिकेने पुढाकार घेऊन या तिन्ही लोकांच्या घरातील माणसांन कडून पत्र लिहून त्यांना शरणागती पत्करण्याची विनंती केली. ही पत्र पुन्हा एकदा फिलिपाइन्स च्या त्या बेटावर पसरवण्यात आली. हिरो ओनोडाला ती पत्र मिळाली पण हे सगळं अमेरिकेचं कुटील कारस्थान आहे यावर तो ठाम होता. आपला देश कधीच पराभूत होऊ शकत नाही असा दुर्दम्य आशावाद त्याच्या मनात तब्बल ५ वर्षानंतर पण होता. त्याला वाटलं की सगळी पत्र अमेरिकेने त्याच्या कुटुंबावर जबरदस्ती करून लिहून घेतली आहेत. ज्याच्यामुळे आपण शरण येऊ. पुढली २० वर्ष हिरो ओनोडा आणि त्याचे साथीदार फिलिपाइन्स सैनिकांना आपलं लक्ष्य बनवत राहिले. वेळप्रसंगी त्यांनी तिथल्या गावकरी लोकांवर ही हल्ले केले.
१९७२ पर्यंत त्याचे राहिलेले दोन्ही साथीदार फिलिपाइन्स पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. पण तरीही हिरो ओनोडा डगमगला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमी साठी लढण्याचा त्याचा निर्धार पक्का होता. तब्बल २० वर्ष देशासाठी फिलिपाइन्स च्या जंगलात लढा देत असलेल्या हिरो ओनोडा ची गोष्ट जपान मधे सर्वांना माहित झाली होती. जपान मधील एक साहसी तरुण नोरिओ सुझुकी याने त्याला भेटायचं ठरवलं. त्याचा मागोवा घेत तो चक्क लुबंग च्या जंगलात जाऊन पोहचला त्याने तिकडे हिरो ओनोडा ची भेट घेऊन त्याला सगळी परिस्थिती कथन केली. त्याने हे ही त्याला सांगितलं की जपानचे लोक आणि जपानचे राजे यांना त्याची काळजी आहे. तू इकडे अजून युद्ध का करतो आहेस? तू शरणागती पत्करायला काय करणं गरजेचं आहे? त्यावर त्या वेळी ही एखाद्या सैनिकाप्रमाणे ड्युटी वर असणाऱ्या हिरो ओनोडा ने स्पष्ट शब्दात सांगितलं. जोवर माझे कमांडिंग ऑफिसर मला शस्त्र खाली ठेऊन शरणागती पत्करायला सांगत नाहीत तोवर माझा लढा सुरु राहणार.
नोरिओ सुझुकी ने हा सगळा वार्तालाप जपान सरकार समोर सादर केला. जपान सरकारने तत्परतेने हिरो ओनोडा च्या त्याकाळी असणाऱ्या कमांडिंग ऑफिसर चा शोध घेतला. सैनिकी सेवेतून निवृत्त होऊन एक पुस्तकाचं दुकान चालवणाऱ्या आणि हिरो ओनोडा चे कमांडिंग ऑफिसर त्याकाळी असणाऱ्या मेजर योशिमी तानिगूची यांना ताबडतोब हजर राहण्याचे आदेश दिले गेले. जपान शिष्टमंडळ मेजर योशिमी तानिगूची यांना घेऊन लुबंग, फिलिपाइन्स इकडे पोहचलं. आपल्या कमांडिंग ऑफिसर चा आदेश ऐकण्यासाठी हिरो ओनोडा २९ वर्षानंतर जंगलातून बाहेर आला. बाहेर येताना पण त्याला यात काहीतरी खोटं असल्याचं वाटत होतं म्हणून तो पूर्ण तयारीनिशी समोर आला. त्याची रायफल, ५०० जिवंत काडतूस, सैनिकी तलवार, चाकू अश्या संपूर्ण सैनिकी वेशात त्याने आपल्या कमांडिंग ऑफिसर च्या आदेशानंतर फिलिपाइन्स चे तत्कालीन राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस यांच्या समोर ११ मार्च १९७४ ला आपली सैनिकी तलवार त्यांना देऊन आपण शरण येत असल्याचं मान्य केलं. आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाला त्याने सॅल्यूट केला. पण कुठेतरी जपान हे युद्ध हरला हे मानायला तो आयुष्याच्या शेवटपर्यंत तयार नव्हता. जपान मधे त्याच प्रचंड स्वागत झालं. त्याच्या देशभक्तीला जपान ने ही तर संपूर्ण जगाने सॅल्यूट केला.
वयाच्या ९१ व्या वर्षी ६ जानेवारी २०१४ ला हिरो ओनोडा इतिहासाच्या पानात लुप्त झाला. पण आपल्यामागे अनेक पिढयांना मार्गदर्शन करेल असं आयुष्य जगून गेला. देशभक्ती, निष्ठा, निर्धार, वचन काय असते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच 'हिरो ओनोडा'. तो नावाप्रमाणेच जगला. आपला देश हरला याच मारताना ही त्याला सगळ्यात जास्त दुःख होतं. जपान मधे परत आल्यावर पण त्याने जपान ने पुन्हा एकदा युद्ध करून आपली गमावलेली पत पुन्हा परत घेतली पाहिजे यासाठी तो आग्रही राहिला. हिरो ओनोडा एक दंतकथा बनला. तब्बल २९ वर्ष जंगलात राहून तो फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी लढला. त्याच्या या वृत्तीला सॅल्यूट करताना फिलिपाइन्स च्या राष्ट्रपती नी त्याच्यावर असलेल्या अनेक फिलिपिनो लोकांच्या हत्येसाठी आणि सैनिकांच्या आरोपातून त्याला दयेच्या अधिकाराने माफ केलं. देशभक्ती आणि पराक्रमाची एक वेगळीच गाथा लिहणाऱ्या पराक्रमी हिरो ओनोडाला माझा कडक सॅल्यूट.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment