Monday, 30 May 2022

रक्ताने माखलेल्या शाळा... विनीत वर्तक ©

 रक्ताने माखलेल्या शाळा... विनीत वर्तक ©

शाळा म्हणजे विद्येच माहेरघर असं म्हंटल जाते. पण अमेरिकेत आता शाळा म्हणजे रक्ताने माखलेल्या भिंती अशी म्हणायची वेळ आलेली आहे. काही दिवसांपूर्वी टेक्सास राज्यात शाळेत झालेल्या गोळीबारात १९ विद्यार्थ्यांना तर दोन शिक्षकांना असं मिळून २१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही काही अमेरिकेच्या इतिहासातली पहिली घटना नाही. उलट २०१२ पासून तब्बल ५४० अश्या घटनांची नोंद अमेरिकेत झालेली आहे. गेल्या १० वर्षात ५४० पेक्षा जास्ती घटनांमध्ये शाळेत गोळी चालवून त्यात कोणीतरी जखमी अथवा मृत्युमुखी पडलेलं आहे. एकूणच काय तर हे आकडे अमेरिकेतील रक्ताने माखलेल्या शाळांचं चित्र पुरेसं स्पष्ट करत आहेत. या सगळ्या घटनांचा मागोवा घेतला तर त्यामागची कारणं समोर येतात. ती कोणती आणि त्या सर्वांचा भारतावर किंवा एकूणच भारतीयांवर कसा नकळत परिणाम पडतो तसेच या सगळ्यातून आपण काय शिकलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. 

शाळेत होत असलेल्या या घटनांच मूळ हे अमेरिकेच्या समाजव्यवस्थेत दडलेलं आहे. मी, माझं, स्वतःचा स्व जपण्यासाठी अमेरिकन माणूस कोणत्याही थराला जाण्याच्या मनस्थितीत असतो. अगदी इतपर्यंत की आपल्या जागेत चुकून पाय ठेवलेल्या व्यक्तीवर गोळी झाडण्याचा अधिकार हा त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो. जगाला माणुसकीची भाषा शिकवणारी अमेरिकन व्यवस्था आणि संस्कृती आपल्या स्वतःच्या घरात मात्र संपूर्णपणे या बाबतीत अपयशी ठरलेली आहे. इतिहास हेच दाखवतो की अगदी रेड इंडियन पासून ते आजपर्यंत बंदूक ही अमेरिकन समाज व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिलेली आहे. बंदूक बाळगणं आणि त्याचा वापर करण हे आजही अमेरिकन माणसाला लोकशाहीने दिलेला मूलभूत अधिकार वाटतो. सुरक्षेसाठी अतिशय आग्रही असणारा अमेरिकन समाज याच सुरक्षिततेच्या अति वापरापायी त्याच्याखाली कोलमडून पडताना आज दिसतो आहे. 

आज मिसरूड फुटलेला कोणीही अगदी एखाद्या मॉल मधून कायदेशीररित्या आणि सहजपणे सेमी ऑटोमॅटिक ते ऑटोमॅटिक गन विकत घेऊ शकतो. टेक्सास मधे झालेल्या घटनेत वापरण्यात आलेली ए.आर. १५ रायफल ही सेमी ऑटोमॅटिक पद्धती मधील होती. याचा अर्थ फक्त नेम धरून चाप ओढला की ही रायफल एका मिनिटात १०-१२ गोळ्या डागू शकते. एका मॅगझीन मधे साधारण ३० राउंड असतात. याचा अर्थ दोन मिनिटात जवळपास ३० गोळ्यांचा वर्षाव या रायफल मधून केला जाऊ शकतो. हा हल्ला करणारा साल्वाडोर रामोस याने आपल्या १८ व्या वाढदिवसाची आठवण म्हणून ही रायफल आणि जवळपास ३०० गोळ्या खरेदी केल्या होत्या. हा सगळा सौदा त्याला अवघ्या २००० अमेरिकन डॉलर ला पडला. या सर्व गोष्टी त्याने कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेतलेल्या होत्या. त्यामुळे लोकांना यात संशय यावं असं काहीच वाटलं नाही. १८ वर्षाच्या साल्वाडोर च्या हातात ऑटोमॅटिक रायफल सुरक्षिततेच्या दृष्टीने असणं हे अमेरिकन संस्कृतीने स्वीकारलेलं आहे. यात राजकारण, गन लॉबी, रिपब्लिकन सिनेटर च पाठबळ या सर्व गोष्टी गृहीत धरल्या तरी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकन व्यवस्था यातून आपल्या रक्ताने माखलेल्या हाताची सुटका करू शकत नाही. हे वास्तव स्विकारणं हेच जड जाते आहे. 

अमेरिकेतील गन लॉबी जन्माला घातली ती अमेरिकन लोकांनीच. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात एक पुसटशी रेषा असते ती त्यांनी कधीच ओलांडली आहे. आज नवीन तयार होणारी पिढी एक वैफल्यग्रस्त पिढी म्हणून समोर येते आहे. ड्रग्स, सेक्स, पार्टीज, हिंसाचार, वंशवाद, बुलिंग, रॅगिंग अश्या अनेक रस्त्यांनी ती निराशेच्या गर्तेत लोटली जात आहे. तिला सावरणारी बालक- पालक कुटुंब व्यवस्था संपूर्णपणे आज अमेरिकेत संपुष्टात आलेली आहे. आपला पाल्य कोणासोबत असतो, तो/ ती काय करते, मित्र- मैत्रिणी कोण?, त्याची / तिची मानसिक अवस्था काय?, त्याच्या/ तिच्या आयुष्याची ध्येये काय? अश्या सर्व गोष्टींपासून कुटुंबव्यवस्था आज वेगळी आहे. एकटेपणाची भावना, टोकाची निराशा, आयुष्याची धूसर स्वप्न अश्या सगळ्या गोष्टींच्या निराशेतून त्यांचा प्रवास एका गुन्हेगारी प्रवृत्तीकडे होताना स्पष्ट दिसत आहे. मग त्यातून मी नाही तर कोणीच नाही. हातात सहज मिळालेला बंदुकीचा चाप त्यातून अश्या घटनांना खतपाणी घालतो आहे. हे सगळं करताना आपलं नाव इतिहासाच्या पानात वाईट घटनेने का होईना कोरण्यासाठी किंवा आपल्यावर झालेला अन्याय, छळ आणि अपमान याला वाचा फोडण्यासाठी साहजिक टार्गेट बनल्या त्या शाळा. 

शाळेतील हिंसाचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही घसरत्या समाज व्यवस्थेचं एक प्रतिबिंब आहे. आज एक साल्वाडोर रामोस मेला तरी असे अनेक साल्वाडोर अमेरिकेत तयार होत आहेत. कुठे, कुठे आणि किती अमेरिकन लोक आपल्या पुढल्या पिढीची सुरक्षा करणार आहेत? आज महत्वाचा प्रश्न बाजूला राहतो तो म्हणजे असे साल्वाडोर रामोस तयार होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो? बंदुकीचा कायदा बदलून अश्या घटनांवर अंकुश नक्कीच बसेल पण हा प्रश्न सुटणार नाही. आता अनेक थिअरी या घटनेतून बाहेर येतील. राजकारण केलं जाईल आणि शेवटी लोक सगळं विसरून पुन्हा एकदा कामाला लागतील. पण त्या १०-११ वर्षांच्या मुलांच्या बालमनावर या घटनेचे उमटलेले प्रतिसाद मात्र आयुष्यभर त्यांच्या सोबत राहतील. 

भारताने आणि भारतीयांनी यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. अपयशाचा लवलेशही आपल्या पाल्याच्या जवळ येऊ न देणाऱ्या आजच्या पिढीला आपण मी, माझं यात गुंतवत चाललेलो आहोत. परस्थिती अगदी अमेरिकेसारखी बिघडलेली नसली तरी त्याची सुरवात मात्र झालेली आहे. सुख आणि आनंद देण्याच्या नादात आपण पुढल्या पिढीचं जगणं एक प्रकारे निष्क्रिय करत जात आहोत. आपल्या समाजव्यवस्थेच्या साखळ्या हळूहळू तुटायला सुरवात झाली आहे. ती बंधन योग्य का अयोग्य हे आपण त्याचा कसा वापर करतो यावर अवलंबून असणार आहे. आपल्या शाळा अमेरिकेप्रमाणे रक्ताने माखू द्यायच्या नसतील तर काळाची पुढली पावलं आपण वेळीच ओळखायला हवीत. नक्कीच या पावलांच स्वरूप कदाचित आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने येईल पण त्याची मूळ मात्र आपल्याच समाजव्यवस्थेत असतील हे मात्र नक्की. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



No comments:

Post a Comment