अंधश्रद्धेची श्रद्धा .. विनीत वर्तक
अंधश्रधा आणि श्रद्धा ह्या दोन्ही आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा रोल निभावतात. श्रद्धा हि मनातून असते. एक आंतरिक परिणामांवर वसलेली ज्यात सगळ्या भौतिक सुखाच्या संकल्पना मोडीत निघतात. अत्युच्य असा समाधानाकडे जाणारा रस्ता आपल्याला गवसतो. तर अंधश्रध्दा मुळी असतेच भौतिक सुखावर वसलेली. पण ह्या दोहोत खूप धूसर लाईन आहे हे आपण बऱ्याचदा विसरून जातो. खरे तर ते स्विकारायची आपली तयारी नसते किंवा समजून पण आपण त्यातले नाहीत हे आपल्याला ठासवयाचे असते. म्हणून गरज लागते ती अंधश्रद्धेच्या श्रद्धेची.
अंधश्रद्धेची श्रद्धा म्हणजे नेमक काय? असा प्रश्न आलाच असेल. तर श्रद्धेच्या खांद्यावर बंदूक ठेवून अंधश्रद्धेची गोळी चालवणे. ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला रोजच्या जीवनात अनेक वेळा पाहायला मिळतात. खरे तर आपण हि त्यात गुंतलेले असतो. जस, कोणत्या देवाने, धर्माने सांगितले आहे कि देवाला पैसा दिला कि तो पावतो? म्हणजे त्याच्या पर्यंत आपल दुख पोहचते? सेवाभाव असावा अस म्हंटलेल आहे. पण सेवा हि पैशाच्या स्वरूपात अस कुठेच नाही? म्हणजे पैश्याशिवाय आपण काही देवाला देऊ शकतो का ह्याचा विचार आपण करतच नाही.
कोणत्याही देवळात जा देवाच्या पुढे दान पेटी असते. दान हे पैश्याने, कपड्याने, सोन्याने, दागिन्यांनी कराव अस कुठे म्हंटल आहे? दान हे कसलही असू शकते. वेळेच दान असू शकते, श्रमदान असू शकते, सेवा दान ज्यात व्यक्ती सेवा असू शकते असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे अमुक दिवशी देवाला ह्या दिवसाच वस्त्र देण्याच्या घोषणान पेक्षा ह्या दिवशी देवळाची साफसफाई अमुक व्यक्तीकडून केली जाईल अस कधीच सांगितल जात नाही. देवाला अभिषेक घालून स्वच्छ करताना रोज देवळाची आणि आजूबाजूची सफाई ह्या साठी कधी पावत्या फाडल्या जात नाहीत. मंदिराची पवित्रता काय फक्त देवाच्या मूर्तीत दडली आहे का? ह्याचा आपण एक क्षण तरी विचार करतो का?
मंदिर कसही असो देव मात्र स्वच्छ असला पाहिजे हे कुठे लिहील आहे? दान पेटीत फक्त पैसे जातील इतकीच फट असते. अभिषेक, अन्नदान ह्या सोबत रक्तदान ची पावती हि फाडता यायला हवी. म्हणजे अमुक एक दिवशी अमुक एकांकडून २५० मिली रक्त देवाच्या कृपेने दान करण्यात आले. त्याचा वापर गरजू व्यक्तींसाठी केला जाईल. देव काही खुश होणार नाही का अश्या दानाने? किंवा अमुक एका गटाकडून श्रमदान करून देव स्थानाच्या आजू बाजूला एखादा बंधारा, विहीर , वृक्षारोपण किंवा मुलांसाठी कॉम्प्यूटर , पुस्तके , शाळेची फी अस दान केल्याने देव पावणार नाही का? देवाच्या पेटीत पैसे टाकल्याने देव पावतो अस काही आहे का?
अनेक राजे आणि नवसाला पावणारे देव ह्याचं दर्शन घेतल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात का? म्हणजे श्रद्धा नक्कीच आहे तिच्या जागी. पण १२- १८ तास लाईन मध्ये उभ राहून १ सेकंद मुखदर्शन केल्याने देवाला आवडणार दान आपण केल का? देवाच्या पुढे मोठ्या मोठ्या डीजे मद्धे चित्रपटातील गाणी लावून आणि हिडीस नृत्य करून देव प्रसन्न होतो का? नक्की आपण काय साधतो आहोत ह्यातून. ह्याचा प्रत्येकांनी विचार करायला हवा. देव, शक्ती जी काही तिची रूप आहेत त्यावर श्रद्धा असावी नक्कीच असावी. तीच शास्त्रात किंवा योग्य रीतीने पूजन हि केल जाव. त्यातली संस्कृती, शास्त्र , पद्धती नक्की जिवंत ठेवाव्यात पण हे करताना आपण नकळत अंधश्रद्धेच्या श्रद्धेवर तर स्वार होऊन आपण हे करत नाही ना ह्याचेही भान ठेवावे. आपण त्यातले आहोत का? उत्तर नाही असेल तर मग सुरवात आपल्यापासून करू पेटीत टाकणारे पैसे अनेक विधायक कामांना त्याच देवाच्या नावाने दान नक्कीच करू शकतो.
हुंडीत हिरे, माणक, पैसे, सोने आणि १२-२४ तास लहानग्या मुलांना सोबत घेऊन , धक्काबुक्की करून, घाण- गोंधळ करून कोणतेही साईबाबा आणि कोणताही लालबाग चा राजा आणि सिद्धिविनायक पावत नसतो हे सत्य स्वीकारण्या इतपत आपली श्रद्धा असली पाहिजे. अंधश्रद्धेची श्रद्धा काय, कोणती, कशी ह्याचा विचार ज्याचा त्याने करावा. कोणाच्याही श्रद्धेला बदलणारा किंवा बदलायला सांगणारा मी कोणीच नाही. आपण कुठे आहोत ह्या सगळ्यात आणि कुठे जायचं आहे ह्याची निवड आपण आपली करावी. फक्त ती करताना खांदा कुठला आणि गोळी कुठली ह्याच तारतम्य ठेवल तर अंधश्रद्धेची श्रद्धा श्रद्धेत बदलायला वेळ लागणार नाही.
No comments:
Post a Comment