Sunday 22 January 2017

फटाक्यांची मज्जा... विनीत वर्तक
प्रदूषण, आवाज, धूर ह्या सगळ्यांपासून माझ बालपण कोसो लांब होत. धुरवाला आला की त्याच्या धुरा मद्धे पकडा पकडी खेळण इतक की बराच वेळ तो केरोसीन चा वास अंगाला येत राहायचा. पण कधी त्रास नाही जाणवला न कधी कोणी अडवलं त्या धुरवाल्याशिवाय. अशीच मज्जा यायची ती दिवाळीत. दिवाळी येण्याच्या आधीपासून ह्या वर्षी किती रुपयांचे फटाके घ्यायचे ते कसे पुरवत पुरवत शेवट पर्यंत फोडायचे ह्याच प्लानिंग असायचं.
दिवाळीची सुरवात म्हणजे सगळ्यांच्या हातात पिस्तुली त्याने चोर- पोलीस खेळण. केपांचे रोल खिशात मावतील तितके भरून एकमेकांना गोळ्या मारत त्या पोलीस मामा प्रमाणे बेल्ट साठी असलेल्या पट्यात बंदूक अडकवून चोर- पोलीसांची मारामारी म्हणजे आजच्या भाषेत एन्काऊंटर सुरु असायचं. गोळ्या म्हणजे केप संपल्या की मग रॉकेट लोन्चर म्हणजे दोन- तीन टिकल्या एकदम भरून झाडामागे लपलेल्या चोरांवर हल्ला. टिकल्या फोडणाऱ्याचा शेप अगदी रॉकेट सारखाच. ते फुटलं की मग हातातोंडांची लढाई. शेवटची गोळी ठेवलेली असायची . अगदीच गरज पडली तर. अंधार होई पर्यंत रोज हीच धमाल. बदलायचं ते फक्त ठिकाण. मुंबईत राहून सुद्धा आज कोणाच्या वाड्यात हल्ला करायचा हे ठरायच.
मेन दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी उठून अंघोळी झाल्या की फटाके फोडायला सुरवात. आक्खी माळ एकदम संपवण जीवावर यायचं मग काय घ्या एक अगरबत्ती आणी प्लास्टिक ची पिशवी. त्यात ती सोडलेली माळ. ह्यातील प्रत्येक फटाका त्याच्या वेगळ्या स्टाइल ने फोडायचा. म्हणजे त्यावर करवंटी ठेवून, किंवा फुटलेल्या बॉल मध्ये, विहीर च्या कडे कपारीत, झाडाच्या कोपच्यात किंवा अजून कहर म्हणजे थर्मोकोल पाण्यात सोडून त्यावर. ह्यासाठी तयारी पण जय्यत. म्हणजे थर्मोकोल वर ठेवल्यावर पळायला वेळ मिळावा म्हणून त्याची वात पूर्ण सोलायची. आरामात ती हळू हळू पेटेपर्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन मग त्यावर चर्चा.
भाऊबीजेच्या दिवशी तर वेगळीच मज्जा. सगळी भावंड मामाकडे जमायचो. प्रशस्त घर आणी आम्ही जवळपास १०-१२ डोकी. त्यात शेवटचा दिवस म्हंटल की सगळा साठा बाहेर. म्हणजे तुफान मज्जा. किती फाटकांच्या माळा फोडल्या असायच्या की त्याची मोजदाद नाही. माझा एक भाऊ म्हणजे बाळू अण्णा जो एक वेगळाच अवलिया. ज्याने कधीच सरळ फटाके फोडलेच नाहीत. भूलचक्र कधीच जमिनीवर नाही. त्या भूल चक्राला मधून भोक पडायचं फुलभाजीच्या तारेने त्यातून दोरा ओवायचा. खाली एक छोट लाकडाचा तुकडा ते लटकाव म्हणून. मग ते टांगून त्याला पेटवायच. हवेत इतक्या जोरात ते फिरायचं आणी हवेतून ते ठिणग्या बाजूला टाकताना जी अनुभूती यायची तो वेगळाच प्रकार. डबल बार नेहमी आडवे. अनारू नेहमी आडवं की ते आपोआप सरळ होणार. त्या वेळेला रेल-गाडी यायच्या. लांबलचक दोरा बांधून त्याला लटकत जाणाऱ्या. तो एक वेगळाच प्रोग्राम .
भाऊबीजेच्या रात्री जरा पांगापांग झाली की उरलेल्या फटक्याच काय करायचं. म्हणजे ह्या वर्षी टार्गेट कोण अस ठरायच. मग सिक्रेट प्लान आकाराला यायचा. अगरबत्तीची पाकीट जमा व्हायची. मग वेगवेगळ्या लेंथ च्या अगरबत्तीच्या शेवटला बॉम्ब किंवा माळ जोडायची. ती व्यवस्तीथ बांधायची. लांबीच्या बाबतीत एक कटाक्ष की निदान ५-१० मिनीटाच अंतर असेल. म्हणजे खरी मज्जा तिकडेच आहे. जो टार्गेट त्याच्या बंगल्याच्या आजूबाजूला हे टाईमर लावून सगळे दुसरीकडे जाऊन वाट बघणार. एक फुटला की मग परत ५-१० मिनिटे शांतता की परत दुसरा मग तिसरा. मग बंगलेवाल्याची मज्जा बघण म्हणजे दिवाळीचा क्लायम्याक्स असायचा.
शेवटी मग शेकोटी चा प्लान. मला चांगल आठवते त्या शेकोटीत काय जळाल नसेल. राहिलेले फटाके ते जळलेले फटाके, केपांच्या बॉक्स च्या बॉक्स आगीत ओम भट स्वाहा व्हायचे. त्यातही फुलबाजीच्या काड्या एका सिक्वेन्स मद्धे राहून ते पेटताना बघण म्हणजे एक वेगळीच मज्जा. असच एक स्वस्तिक चा आकार कित्येक वर्ष मामाच्या ओटीवर कोरला गेला होता. शेवटाला नागाच्या गोळ्या निघायच्या, ते प्रकरण खूप भयंकर होत. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या पायऱ्यांवर ते कोरलेले गोळे सगळीकडे दिसत राहायचे.
इतकी सगळी मस्ती, मज्जा करून फटाक्यांच प्रदूषण नाही जाणवलं, न कधी कोणी आक्षेप घेतला, बंगले वाल्यांना पण झालेला त्रास दिवाळीची मुलांची मज्जा म्हणून ते खपवून घ्यायचे. अर्थात त्यांची मुल इतर वेळी असायची तो भाग वेगळा. पण कधीच कोणाला दुखावून काहीच केल नाही. जो काही असायचा तो निरागसपणा. आता बघताना त्यात खूप भीती वाटेल किंवा आपण हे सगळ अनुभवल ह्यावर विश्वास बसत नाही. पण ते क्षण अदभूत होते. पुढला, मागचा विचार न करता निरागस मनानी केलेली मज्जा त्यात होती. आज भाऊबिजेला सगळ आठवलं. आजची रात्र माझ्यासाठी किंवा माझ्या तमाम भावंडांसाठी फटाक्यांची मज्जा असायची. आज सगळेच मोठे झाले. पण कुठेतरी ती फटाक्यांची मज्जा आजही तितकीच मज्जा देते किंबहुना ती नेहमीच देत राहील. आजची पिढी कदाचित हे समजू पण शकणार नाही. कारण ती अनुभवायला मन निरागस लागतात खेदाने जी आजकाल कुठेच नसतात.

No comments:

Post a Comment