Sunday 22 January 2017

जेसन बोर्न .... विनीत वर्तक
हॉलीवूड मद्धे एखाद्या चित्रपटाचा दुसरा , तिसरा भाग कालांतराने काढून कथेला पुढे न्यायची पद्धत आहे. असे अनेक चित्रपट आपल्या पाहण्यात आहेत. अगदी रॉकी पासून ते टर्मिनेटर पर्यंत अनेक सिरीज चित्रपटांनी हॉलीवूड ला समृद्ध केल आहे. अनेकदा अस होत कि अश्या चित्रपटातील एखादा चित्रपट खूप गाजतो. मात्र त्या मानाने इतर चित्रपट तोकडे पडतात. तसेच कथानक कुठेतरी नवीन रूप घेते आणि गाडी बऱ्याचदा भरकटत जाते. तरीपण सिक्वेल चित्रपटातील गोष्टी एखाद्या कलाकाराला त्याच नाव देतात. टर्मिनेटर म्हंटल कि अर्नोल्ड श्वान्झनेगर, रॉकी म्हंटल कि सिल्वेस्टर स्त्यालोन त्यातलच एक नाव म्हणजे जेसन बोर्न.
म्याट डेमोन ने साकारलेला जेसन बोर्न आपल्याला अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांच्या ताकदीची थोडीशी चुणूक तर दाखवतोच पण किती प्रचंड प्रमाणात राजकारण, अर्थकारण गुंतलेले आहे ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो. रोबर्ट रुडलम च्या कथेवर बसलेले हे चित्रपट बघणे म्हणजे प्रचंड असा वेगळा अनुभव आहे. एका बोटीवर सुरु होणारा प्रवास असे काही वळण घेतो कि प्रत्येक क्षणी आपण पुढे काय होणार ह्या उत्कंठेने चित्रपट बघू लागतो. म्याट डेमोन ने साकारलेला जेसन हळू हळू स्वताला शोधायला निघतो. त्याच्या समोर येत ते सगळ हादरवून टाकणार असते.
अमेरिकेच्या गुप्तचर संघटनाचे गुप्त प्रोग्राम काही फसलेले पण त्याची व्हीलेव्हाट लावता न आल्याने खेळलेले राजकारण अगदी एकमेकांना संपवण्यापासून. आपण त्यातले नाहीत हे दाखवण्यासाठी चाललेली धडपड आणि ह्यात स्वताच अस्तित्व शोधणारा जेसन बघण म्हणजे सशक्त कथेचा परमोच्च क्षण आहे. जेसन च्या भूमिकेला म्याट ने दिलेला न्याय अप्रतिम आहे. संयमी पण त्याच वेळी संतुलन सांभाळू न शकणारा जेसन साकारण प्रचंड कठीण अशी भूमिका आहे. चित्रपटाच्या पहिल्या ३ भागात हि उत्कंठा इतकी वाढते कि पुढे काय असा आपण सतत विचार करतो.
२००२ साली आलेल्या बोर्न आयडेनटीटी ने सिरीज ची सुरवात होते. २००४ साली जेसन भारतात आपल्या प्रेयसी बरोबर गोवा ला रहात असताना इतिहासाची पाने पुन्हा त्याचा भूतकाळ उकरून काढतात. त्यात त्याच्या प्रेयसीचा बळी गेल्यावर जेसन पुन्हा एकदा इतिहासाची पाने शोधण्याच्या मोहिमेवर निघतो. त्याचा भारतातून सुरु झालेला हा प्रवास २००७ साली पुन्हा एकदा बोर्न अल्टिमेटम च्या स्वरूपात आपल्या समोर उलगडतो. हा प्रवास इकडेच संपला अस वाटत असताना २०१२ साली आलेल्या बोर्न लेगेसी ने त्या आठवणी जाग्या केल्या पण जेसन ला म्याट ने इतक स्वतात मिसळवल होत कि म्याट नसलेल्या जेसन चा चित्रपट लोकांनी सपशेल नाकारला. हि सिरीज २००७ साली संपली अस मनोमन स्वीकारल्यावर २०१६ जेसन पुन्हा एकदा त्याच रुपात म्याट घेऊन आला. पुन्हा एकदा जवळपास १० वर्षांनी जेसन चा प्रवास भूतकाळात घेऊन गेला.
२००२ ते २०१६ अस जवळपास १४ वर्ष एकाच कथेवर ४ चित्रपट काढणे हे हॉलीवूड च करू शकते ह्याच कारण म्हणजे सशक्त असलेली कथा. जेसन ह्या पात्राला आपल्या अभिनयाने जिवंत ठेवणे हे म्याट च करू जाणे. चित्रपटातील हाणामारीचे प्रसंग तर खूप सुंदर असे आहेत. नुसत हाणामारी न करता डोक्याने हि अनेकदा हात न उचलता प्रतिस्पर्ध्याला उल्लू बनवता येते हे बघण म्हणजे एक वेगळा क्लास आहे. गुप्तहेरांच्या आयुष्यावर थोडा का होईना प्रकाश टाकणारा जेसन प्रत्येकाने एकदा बघायलाच हवा. ४९० मिलियन डॉलर खर्चून केलेल्या ४ भागांच एकत्रित उत्पन्न आहे तब्बल १ अब्ज अमेरिकन डॉलर. ह्यावरून जगात ह्या जेसन ने काय जादू केली आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. चित्रपट च्या शेवटी लागणार माझ एक आवडत गाण एक्स्ट्रीम वेज हे तितकच सुंदर आहे. मला चित्रपटातील सगळ्यात आवडणारा सवांद कोणता असेल तर एकदम शेवटी जेसन फोन वर पाम ला सांगतो...
"Get some rest, Pam. You look tired"

No comments:

Post a Comment