Sunday, 22 January 2017

पाच नोव्हेंबर ... विनीत वर्तक
पाच तारखेच माझ्या आयुष्यात महत्व थोड जास्तीच आहे. जन्मतारीख असल्यामुळे म्हणा किंवा ह्या अंकाबद्दल आकर्षण थोड जास्तीच आहे. काही विशिष्ठ घडामोडी सुद्धा ह्याच तारखेला घडलेल्या आहेत. अगदी सांगायचं झाल तर आधीच्या पिढीच्या भाषेत "हातच सोडून पळत्यापाठी" मी आजच उडी घेतली होती.
सोन्यासारखी नोकरी म्हणजे सरकारी नोकरी सोडून समुद्राच्या अथांग निळ्या पाण्यात जेव्हा काही कल्पना नसताना उडी घेतली. तेव्हा खूप मोठा जुगार खेळलो होतो. जुगारच तो ! जेव्हा पुढे काय हे माहित असताना ते सर्व सुख सोडून एखाद्या वेगळ्याच अपरिचित, माहित नसलेल्या वळणावर वळण घेण. स्पेशली जेव्हा ते वळण सरकारी नोकरीशी निगडीत असेल तर तो जुगारच.
आय कार्ड वर दिसणारे ते तीन सिंह कोणत्याही आधाराशिवाय, वशिल्याशिवाय मिळवले होते. देशाच्या उन्नतीमध्ये थोडा का होईना आपण हातभार लावू ह्या छोट्या आशेवर सुरु केलेला प्रवास दिवेसेनदिवस अपेक्षाभंग करत होता. दिवसांची वर्ष झाली. वर्षांचे दशक व्हायला आले. पण मन रमत नव्हत. कुठेतरी ते थ्रील गायब होत. तारुण्याच्या रक्ताने कुठेतरी बंडखोरी चालू केली होती. पण शिक्षणाच्या वाटेवर बसलेले धक्के पचवत लांब उडी मारण्याच्या आशा मंदावत चालल्या होत्या.
अश्याच एका क्षणी मित्राची वेगळीच नोकरी बघून बुचकळ्यात पडलो. मुंबई- अमेरिका हा प्रवास दर महिन्याला स्पोन्सर करणारी कोणती बरी कंपनी असेल? अस कोणत काम ती करत असेल? असे सगळेच प्रश्न मनात घर करून गेले. अर्थात त्या कंपनीत आपण काम करू अस त्या वेळी कधीच वाटल नाही. कारण माझ्या सर्टिफिकेट चे कागद कमी होते. त्यातही तीन सिंहाना आपण कधी सोडू अशी पुसटशी कल्पना ही मनाला शिवून गेली नाही. अर्थात ही गोष्ट होती ३-४ वर्षांपूर्वी ची जेव्हा मी सगळ्याच आघाड्यांवर धडपडत होतो. ते नाव मात्र मनात घर करून राहील.
पुढे काही वर्षांनी जेव्हा आतून पूर्णपणे पाट्या टाकायच्या कामाला कंटाळलो होतो. तेव्हा कसही करून इकडून निघावं अस रोज विचार करायचो. पण हिम्मत होत नव्हती. बरच काही दावणीला होत. सोडायचं तर आताच्या सिंहाना टक्कर देईल असच नाव पाठीशी हव होत. अचानक एके दिवशी त्याच कंपनी मधून कॉल आला. सगळे सोपस्कार पूर्ण करून हातात लेटर ही पडल. पण अजून हिम्मत होत नव्हती. नियती कधी कधी असे चमत्कार घडवते की तुम्ही काय निर्णय घेतात ह्यावर खूप काही अवलंबून असते. एकाच वेळी दोन ठिकाणची ऑफर लेटर त्यात तीन सिंहांच्या ठिकाणी माझ वर्क प्रोफाईल बदलवणार प्रमोशन अस सगळच एकाच वेळी हात जोडून समोर होत.
आता नाही तर कधीच नाही हे मनातून आल. वयाच्या २७ व्या वर्षी नाही तर मग पुढे कधीच सिंहाची साथ सुटणार नाही. निर्णय घेतला आणी म्हणतात न जेव्हा तुम्हाला खरच आतून काही करायचे असते तेव्हा गोष्टी त्या साठी स्वताला त्या रेषेत आणतात. असच काहीस झाल. एक गाठ सोडवता सोडवता पुढच्या अनेक गाठी आपोआप सुटत गेल्या. ३-४ वर्षापूर्वी जे मनात आल होत. की मी कधी अश्या कंपनी मध्ये जॉब करेन का जी मला वेगळ्या देशात पाठवू शकेल. ते प्रत्यक्षात पूर्ण होत होत. नवीन वळणाची सुरवात ती पण वेगळ्याच देशात.
नाव उच्चारण्यापासून सगळच कठीण होत. पण कुठेतरी आशा होती की मेहनतीची आपली तयारी आहे. बाकी जे होईल त्याला आपण सामोर जायचं चांगल- वाईट जे काही. कारण आता मागे बघण नाही. बाजूला कोणीच नव्हत. कारण तीन सिंहांची साथ सोडून निळ्या पाण्यात उडी मारताना ते कुठे घेऊन जाणार आहे. ह्याची काही कल्पना नसताना असा निर्णय म्हणजे सगळ्याच्या दृष्टीने पायावर धोंडा मारल्या सारखा होता. अनेकदा मी पण बावरलो की करतो ते योग्य आहे न? समुद्रात बुडलो मग? ना इकडे ना तिकडे अशी अवस्था होईल आपली. पण जुगार खेळल्यावर हरण्याची तयारी आणी जिंकण्याची स्वप्न घेऊन एक प्रवास सुरु केला.
५ नोव्हेंबर ची ती सकाळ विसरू शकत नाही. पहिल्यांदा घरापासून लांब दुसऱ्या देशात एका नवीन वळणाची सुरवात माझ्यासाठी खूप अनपेक्षित होती. सगळच वेगळ होत. जे कोणी सोबत होते ते बिनधास्त होते. मी मात्र तीन सिंह आणी ९ वर्ष मागे ठेवून उडी घेतली होती. सगळच काही छान नव्हत. अनेक धक्के तिकडे ही बसले. पण टिकून राहिलो. आज पण तीच तारीख आजही धक्के आहेतच पण मागे वळून बघताना त्यावेळी खेळलेल्या जुगाराने आज खूप काही मिळवून दिल. स्वतावर असलेला विश्वास, आर्थिक सामर्थ्य आणी बरच काही. एक माणूस म्हणून स्वताला समृद्ध होताना बघायला मिळाल. देशोदेशी हिंडताना, फिरताना माणस शिकायला मिळाली. त्यातून मी घडत गेलो.
ती सकाळ आणी आजचा दिवस अजून काहीच नक्की नाही. पण नक्की आहे ते स्वताला सिद्ध करण्याची उर्मी, ती जिद्द. जिकडे सगळे म्हणाले की तू हे नाही करू शकत तिकडे करून दाखवल. कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वताला उंचावण्यासाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तारीख असते की जी नेहमीच स्वताच वेगळ स्थान ठेवते. माझ्यासाठी ती पाच आहे. ह्या आयुष्यात पहिल्यांदा डोळे उघडताना आणी स्वतः च अस्तित्व निर्माण करताना योगायोगाने ह्याच दिवशी त्याचा श्रीगणेशा केला होता. पाच नोव्हेंबर च ते वळण अजून ही आयुष्यात चालू आहे. अजून किती वर्ष चालू राहील माहित नाही. पण त्या पाच पासून ह्या पाच पर्यंत सगळा प्रवास मात्र खूप सुंदर होता ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment