Sunday 22 January 2017

हरवलेल्या नात्यांचा लुप्त प्रवास... विनीत वर्तक
अस म्हणतात कि नात्यांची मज्जा ती उलगडण्यात आहे. पण आपण ती उलगडूच देत नाहीत. उलगडायला आज काल ती आपल्या पासून लुप्त झाली आहेत. आभासी जगात आपण इतके वाहत पुढे आलो आहोत कि नक्की सुरवात कुठून केली. हातात काय होत आणि वाहताना काय निसटून गेल ह्याची मोजदाद हि आपल्याला नाही. समजूस तोवर आपण इतके पुढे गेलेलो असतो कि नक्की कुठे काय बिनसल हे कळत नाही.
एक काळ असा होता कि कॉम्प्यूटर ला लोक घाबरायचे. हळूहळू त्याने आपल्या जीवनात असा काही प्रवेश केला कि आता पुन्हा एकदा त्याला घाबरायची वेळ आली आहे. वाय टू के ते २०१६ असा पल्ला गाठताना त्याचा वेग आणि आपल्या जीवनातील प्रवेश इतका प्रचंड आहे कि त्यात आपण अनेक गोष्टी हरवून बसलो आहोत ह्याची आपल्याला तिळमात्र कल्पना हि नाही.
स. न. वि. वि. ने सुरु होणार पत्र आता लुप्त झाल आहे. कागदाची जागा आता आभासी मेल ने घेतली. पूर्वी लागणारा महिन्याचा कालावधी आता काही सेकंदावर आला. त्यामुळे आता आपली नाती घट्ट होतील अशीच आपली कल्पना होती. कारण काही महिन्यांचा सवांद आता काही सेकंदात झाल्यावर आपल्याला किती अजून वेळ मिळेल आणि त्याने नाती अजून फुलतील असाच आपला गोड गैरसमज होता. इमेल हि मग तोकडे पडू लागले. त्यावेळी च्याटिंग ने हळू हळू प्रवेश केला. याहू च्याटिंग ने देशाच्या सीमा ओलांडल्या आणि आपण पूर्ण जगाशी सवांद साधायला मोकळे झालो. त्याच वेळी मोबाईल फोन आणि एस. एम. एस ने आपल्या लोकल नात्यांची आणि सावांदाची परिभाषा बदलवून टाकली. एकीकडे जगाशी सवांद तर दुसरीकडे हव तेव्हा चालता बोलता आपल्या लोकांशी सवांद करण्याच्या ह्या जाळ्यात आपण इतके गुरफटून गेलो कि सवांद फक्त शब्दांनी होत नाहीत त्याला भावना लागतात हेच विसरलो.
फेसबुक आणि व्हात्स अप ने त्याला वर्चुअल भावनांची जोड दिली. मग काय हवे होते. सगळच एका नवीन रुपात समोर आल्यावर आपल्या सवांदाची परिभाषा पूर्ण बदलली गेली. लोल, आय. एल. यु., आर. आय. पी. च्या शोर्टफॉर्म्स नि आपल्या संवेदना आपण पोचवायला लागलो. लाईक , सेल्फी, स्टेटस, फिलिंग ते चेक इन आणि शेअरिंग हे सगळ्यांना भावना पोचवण्याची साधन झाली. मला काही वाटत असू दे. लाईक दाबल कि उत्तराची अपेक्षा संपली. फिलिंग टाकल कि मला काय वाटते हे सगळ्यांना समजेल, किंवा आर. आई. पी टाकल कि समोरच्याच्या दुखःत मी सहभागी आहे हेच समजून , उमजून आपल कर्तव्य पूर्ण केल असच मानत आलो. अर्थात वाहण्याच्या नादात आपण संवादाच सर्वस्व हरवून बसलो आहे हे लक्षात हि आल नाही आपल्या.
ती हुरहूर पत्राची वाट बघण्यातली, ते आतुरतेचे क्षण पत्र वाचतानाचे, शब्दात मांडलेल्या भावना, ती पत्रासाठी केलेली धडपड, तो आश्वासक खांद्यावरचा हात, ते स्मित हास्य, तो कटाक्ष, ते भरलेले डोळे, त्यातून टीपूसाप्रमाणे वाहणाऱ्या भावना, ते शब्द सांगताना आणि ऐकताना अंगावर येणारे शहारे, ती नजर आणि तोच डोळे पुसणारा हात सगळच लुप्त झाल आज. त्याच शब्दांच्या पलीकडे. सवांद साधण्यासाठी निर्माण केलेले रस्ते आज आपल्याला अश्या चक्रव्ह्यूव्यात अडकवून टाकल आहे कि बाहेर पडायचे सगळे मार्ग आपण विसरून गेलो आहोत.
हा शेवट आहे का? हेच आपल्याला हव होत का? हाच सवांद आपल्याला अभिप्रेत होता का? हीच ती नाती आपल्याला अपेक्षित होती का? कुठेतरी सगळच तुटक आहे. का नको थांबूयात आपण. एकदा ती मज्जा अनुभववा पुन्हा एकदा. लिहा पत्र आपल्या आवडत्या व्यक्तीला, एकदा मनापासून भेटा, हसा , रडा, बोला, ऐका, डोळे ओले करा आणि डोळे पुसा पण. जास्ती काही नको आहे. त्या लोल आणि आर. आय. पी. ला भिंतीच्या पलीकडे भावनांची जोड द्या कदाचित हरवलेल्या नात्यांच्या लुप्त झालेल्या अनेक गोष्टी आपल्या हाताशी मिळतील.

No comments:

Post a Comment