Sunday 22 January 2017

नात्यातील प्रेमाची परिभाषा.. विनीत वर्तक
नात्यातील प्रेमाच्या परिभाषेचे ठोकताळे आपण आपल्या पद्धतीने मोजत असतो. " तु जर माझ्यासाठी हे केलस तर मी तुझ्यासाठी ते करीन" आणि जर "तु नाही केलस तर मग बघून घे." किंवा "बाबांवर खरच इतक प्रेम आहे तर अभ्यास मन लावून करशील" किंवा " तुझ जर खरच आई वर प्रेम आहे तर त्या मुलाशी बोलणार नाहीस".. असे आणि अश्या तर्हेचे अनेक सवांद आपण रोज ऐकत असतो. नात्यातील प्रेमाची परिभाषा आपण ह्यावरून ठरवत असतो.
नात्यातील प्रेम जर ती व्यक्तीने "काय करावे" किंवा "काय करू नये" ह्यावरून ठरत असेल तर ती नाती न रहाता त्याचा देणाघेण्याचा व्यवहार होतो. जिकडे व्यवहाराचा जमाखर्च आणी ताळेबंद जुळून येतो. पण प्रेम हरते. जिकडे नात्यात प्रेम असते तिकडे नाती ह्या व्यवहारा पलीकडे असतात. नाती, प्रेम हि खरी तर मनाची, हृदयाची परिभाषा आहे. पण जेव्हा त्यात मेंदू येतो तेव्हा त्या नात्यातली सहजता संपून जाते.
सहजता काय तर जे मनात येईल ते उत्स्फुर्तपणे, मोकळेपणे नात्यात बोलण्याची, करण्याची मुभा. जेव्हा ही सहजता हरवते तेव्हा नात्यात अविश्वास निर्माण होतो. झालेल्या आणी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी विषयी सांशकता वाटू लागते. "आपल नात टिकेल न"? "तो / ती मला समजून घेईल का"? जेव्हा माझ्या सहजतेपेक्षा व्यवहारावर प्रतिक्रिया अवलंबून असतात. तेव्हा मग मनात सतत प्रश्न असतात की मी काय करू की नात टिकून राहील? माझ्या वागण्यातून समोरच्याला काय हवे? काय नको? किंवा अस वागल किंवा तस वागल तर त्याला छान वाटेल. हाच विचार सतत मनात येत रहातो. ह्यातून दोन शक्यतांचा किंवा पर्याय समोर येतात.
एकतर मला माझ्यासारखं हव आहे सगळ. कोणाला काय वाटते ह्याचा मी विचार अजिबात करत नाही. जर कोणी मला समजून घेऊ शकत नसेल. तर असल नात मला नकोच. त्यासाठी प्रसंगी ते आणी अशी येणारी अनेक नाती तोडण्याची माझी तयारी असेल. हळूहळू ह्या सगळ्यात एकापाठोपाठ अनेक नाती तुटत जातात. अहं सुखावत जातो पण मी मात्र कुठेतरी नेहमीच सांशक असतो. एका पाठोपाठ एक नवीन नात्यात प्रवेश करत जाताना हाताशी फारस काही लागत नाही. समोर येत ते फक्त एकटेपण आणी अनेक प्रश्न की मी काय करू की नात टिकून राहील?..
दुसरा एक पर्याय की जिकडे आपण स्वताला अगदी सरेंडर किंवा शरणागती पत्करतो. त्याला / तिला आवडते किंवा तिला / त्याला चांगल वाटेल म्हणून वाट्टेल त्या टोकाला जाऊन आपली नात टिकवण्याची धडपड चालू रहाते. प्रसंगी आपली तत्व, आपले संस्कार, माझा मी , माझे विचार, माझ अस्तित्वच मी डावावर लावतो. कसही करून नात टिकाव ह्या साठी आपले प्रयत्न सुरूच राहतात. सतत विचार की आता मी काय करू कि नात्यातल्या त्या व्यक्तीला मी आनंदी करू शकेन. जेव्हा करीन तेव्हाच आमच नात टिकून राहील. ह्या दररोजच्या खेळात आपण दमून जातो. घुसमटलेला जीव कधीतरी कोलमडून पडतो. हे सगळ करून नात खरच फुलते का? तर जिकडे आपलीच घुसमट रोज होते तिकडे नात कस फुलणार?
मग सजग नात कोणत? तर जिकडे गोष्टी व्यवहारावर ठरत नाहीत. माझ्या क्रिया, प्रतिक्रियांवर ठरत नाहीत. जिकडे नात्यातील प्रेम कंडीशनल नसते. तर ते कोणत्याही कंडीशन शिवाय असते. जिकडे प्रत्येक क्षण मी मला वाटेल, आतून येईल, तसा प्रामाणिकपणे व्यक्त आणी जगू शकतो. माझ्या कोणत्याही प्रतिक्रियेवरून प्रेमाची पातळी ठरत नसते तेव्हा ते नात, प्रेम डिव्हाईन असते. अस एक नात आपल्या आयुष्यात असावं. निदान निर्माण तरी कराव. जिकडे गोष्टी चुकीच्या आहेत ते चुकीच सांगण्याची सहजता नात्यात असावी. जिकडे एकमेकांना समजून सांगण्याची सहजता असावी. नात्यांची परिभाषा सहजतेवर असेल तेव्हा ते नात परिपूर्ण असेल.
अस कोणी तर मिळण हे लक आहे. पण अस आपण बनण ही एक क्रिया आहे. कोणाची तरी वाट बघण तुम्हाला कोणावर तरी डिपेंड बनवते. तर आपण तस बनण आपल्याला डीपेंडेबल बनवते. आपण काय करायचं हे ज्याच त्याने ठरवायचं. नात्यातील प्रेम हे नात्यांवर डिपेंड नको. नात असेल नसेल पण त्यातल प्रेम मात्र तसच चिरकाळ, निरंतर राहील त्याच सहजतेने. नात्यातील प्रेमाची ही परिभाषा समजायला आहे तर खूप सोप्पी पण म्हणतात न "कॉमनसेन्स नेहमीच अनकॉमन असतो." नक्कीच सगळ्यां नात्यानसोबत ती सहजता येईल ह्याची खात्री आपण देऊ शकत नाही. सगळीच नाही पण काही. काहीच नाही तर कोणीतरी. एक कोणीतरी मात्र ह्या नात्यांच्या परिभाषेच प्रेम त्याच सहजतेने समजणार असावं.

No comments:

Post a Comment