Sunday, 22 January 2017

अब तक छप्पन ... विनीत वर्तक
काल भारताच्या आर्मी ने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये ४० – ४५ पेक्षा अधिक आतंकवाद्यांचा खात्मा झाला आहे. अजून नक्की आकडा कळेपर्यंत वेळ जाईल. भारताच्या आर्मी च्या ह्या कारवाईच देशभरातून तसेच जागतिक पातळीवर कौतुक होत असताना शहीद झालेल्या त्या १८ हुतात्म्यांना योग्य ती श्रद्धांजली आज सर्वपित्री अमावस्येला मिळाली आहे. सर्जिकल स्ट्राईक हा काही खेळ नाही. तर सगळ्यात कठीण अस मिशन आहे. शत्रूला नामोहरम करताना कोल्याट्रल ड्यामेज होऊ नये ह्यासाठी प्रचंड काळजी घ्यावी लागते. तसेच आपल्या मिशन ची कल्पना शत्रूला मिळाली असेल तर ते करणाराच टार्गेट होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत गोपिनीय रित्या असे मिशन पूर्ण करायला लागतात. तसेच पूर्ण झाल्यावर त्याची जबाबदारी घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.
भारतीय आर्मी च कौतुक तर आहेच पण त्यासोबत आर्मी ला पूर्ण पाठींबा देणाऱ्या राजकीय पाठबळाच विशेष कौतुक आहे. आत्तापर्यंत आपली मवाळ इमेज सांभाळणे हेच राजकीय पटलावर केले जात होते. कोणताही अतिरेकी हल्ला झाल्यावर त्याची तक्रार अनेक देशांकडे करणे. त्यांनी पाकिस्तान ला सुनावणे व एक दोन पोकळ धमक्या देऊन पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच कहाणी मागच्या पानावरून पुढे चालू होती. आपली इमेज,वोट ब्यांक तसेच आपल्या सहकार्यांना सांभाळण्याची राजकीय कसरत करताना भारताच्या आर्मी ला नेहमीच झुकत माप दिल जात होत. भारतीय आर्मी म्हणजे पाकिस्तानी आर्मी नाही की राजकीय वचक धुडकावून स्वतः निर्णय घेईल. देशाच सार्वभौमत्व राखताना जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीचा निर्णय अंतिम मानून अनेकदा इच्छा असताना ही भारतीय आर्मी ला योग्य उत्तर देता आल नव्हत.
उरी हल्यानंतर आर्मी च्या आत्मविश्वासाला कुठे तरी तडा गेला होता. बंदूक आणी गोळी असून सुद्धा ती चालवता येत नसल्यामुळे कुठेतरी तो रोष वाढत चालला होता. अश्यावेळेस विरोधक, मिडिया, चमचे सगळेच ५६ इंचांच्या छातीच्या विधानाला पकडून पंतप्रधानांना टार्गेट करत होते. निर्णय हे व्हात्स अप, फेसबुक, मिडिया, विरोधक, चमचे ह्याच्या विधानाला धरून घेतले जात नाहीत. अश्या वेळेस संयमी राहून सगळ्या शक्यतांचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेण अपेक्षित असते. आर्मी ला योग्य ती कारवाई करण्याची मोकळीक देताना राजकीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य तो मेसेज जाईल ह्याचा विचार करून कारवाई करण्यास सांगितले गेले.
एकीकडे नद्यांच पाणीवाटप, एम एफ एन स्टेटस ह्यावर लक्ष वळवताना दुसरीकडे आर्मी ला सर्जिकल स्ट्राईक साठी योग्य तो वेळ मिळेल ह्याची दक्षता घेतली गेली. अनेक शक्यतांचा विचार करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ड्यामेज कस करता येईल ह्यासाठी मिशन ठरवण्याची जबाबदारी अजित धोभाल कडे देण्यात आली. म्यानमार सर्जिकल स्ट्राईक चे मास्टर माइंड असणारे धोभाल खूप आक्रमक अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. पंतप्रधानान कडून ग्रीन सिग्नल मिळताच सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. मिशन तयार करताना तिन्ही सेनादल, संरक्षण मंत्री, स्वतः धोबाल तसेच रॉ, आय बी, सारख्या गुप्तचर संघटना, त्याच्या जोडीला इस्रो सारख्या संस्थेंचा समन्वय साधत सर्जिकल स्ट्राईक ची योजना आखली गेली. चांदण्या रात्रीचा अडसर होऊ नये म्हणून अमावस्याच्या आसपास हे मिशन आखले गेले. ह्यावरून आर्मी ने केलेला अभ्यास किती बारीकसारीक गोष्टीचा विचार करून केला गेला हे सिद्ध होते.
साम, दाम, दंड, भेद अशी चोहोबाजूने पाकिस्तानची कोंडी करताना एक लीडर म्हणून मोदी तसेच त्यांच्या
 सहकार्यांच कौतुक कराव तितक थोड आहे. आंतराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान ला एकट पाडण्यात भारत यशस्वी झाला. मग ते सार्क समिट असो वा चीन, अमेरिकेने दिलेली तंबी असो. कधी नव्हे ते कौम च्या नावाखाली एकत्र जमणारे मित्र सौदी अरेबिया, इराण, कतार, यु. ए. ई. अश्या सगळ्या साखळ्या तोडण्यात राजकीय डिप्लोमसी ने खूप मोलाची भूमिका बजावली. तिकडे पाणी बंद करण्यापासून ते एम. एफ. एन. चा दिलेला दर्जा काढून टाकण्यापासून आर्थिक प्रतिबंध लादण्यासाठी पावले उचलली गेली. ह्या सगळ्यात कोणत्या फ्रंट वर काय मत द्यायचं ह्यात पाकिस्तानचे राजकरणी गोंधळून गेले. एकीकडे अमेरीकेच वाढणार प्रेशर, दुसरीकडे भरवश्याच्या मित्रांनी दिलेला दगा, आर्थिक कोंडी ते पाण्या सारख्या मुद्यावर पाकिस्तान विचित्र कोंडीत सापडला गेला.
ह्या सगळ्या गोंधळात भारताने सर्जिकल स्ट्राईक करताना पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केल. एकतर अश्या प्रकारचा हल्ला झाला अस कबूल करताना अतिरेकी आपलेच होते हे स्वीकार करण तर दुसरीकडे दोन सैनिकांसाठी कारवाई केली तर आख्या जगात पाकिस्तान ला कोणीच समर्थन देणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यात भारत यशस्वी झाला. ह्यामुळे पाकिस्तानची अजूनच गोची झाली आहे. अण्वस्त्र टाकण्याची भाषा करणारे आता शेपूट गुंडाळून बिळात लपले. कारण आता नक्की काय करावे ह्या संभ्रमात पाकिस्तानातील सरकार आणी आर्मी दोघेही पडले आहेत.
५६ इंचाची छाती वरून टोचणारे विरोधक आता गप्प बसले आहेत. भारतीय आर्मी तेव्हा हि उत्तर द्यायला सक्षम होती व आताही आहे. फरक इतकाच आहे कि ५६ इंचाची छाती त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे. ह्यावरून मला कोणी मोदिभक्त म्हंटल तरी चालेल पण गेल्या ६८ वर्षात एकाही पंतप्रधानाला जे जमल नाही ते करण्याची धमक त्यांनी दाखवली. १८ वीर जवानांच होतात्म्य वाया जाणार नाही व भारतीय आर्मी योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी त्याचा बदला नक्की घेईल हे शब्द खरे करून दाखवताना राजकीय मुत्सुदेगिरी मोदी नी काय असते हे दाखवून दिले आहे. पूर्ण कारवाई होई पर्यंत पंतप्रधान सगळ ऑपरेशन मॉनेटर करत होते. असही म्हंटले जाते आहे कि ऑपरेशन पूर्ण होइ पर्यंत त्यांनी पाणी हि प्यायल नाही. ह्यातली सत्यता माहित नाही. पण सगळ्यातून एक सिद्ध होते ते म्हणजे निर्णय घेणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले आहेत. आता पुढल्या वेळी हल्ला करताना पाकिस्तान अब तक छप्पन चा विचार नक्की करेल ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment