Sunday, 22 January 2017

अंबाजी चा उडनखटोला... विनीत वर्तक
गुजरात मध्ये काम करत असताना अंबाजी ला जायचा योग आला. कामाच्या निमित्ताने फिरताना देवीच्या दर्शन पण झाले. अंबाजी म्हणजे इथल सर्वात पूज्य दैवत. महाराष्ट्रात शिर्डी देवस्थानाचा जो मान आहे तितकच गुजरात मध्ये अंबाजी ला मानल जाते. नवरात्र नुकतीच संपल्याने गर्दी कमी असेल अस ड्राईवर कडून कळल्यावर दर्शन चांगल मिळेल ह्या आशेने अगदी वेळेवर धावत पळत ट्रीप प्लान केली.
अम्बाजीच मंदिर तस दोन ठिकाणी आहे. एक एका टेकडीवर दगडाच्या टोकावर मूळ मंदिर आहे. तर नवीन बांधलेले मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. डोंगरावर जाण्याचा मार्ग तसा खडतर आहे. सगळ्यांना इतक्या उंचीवर जायला जमेल अस नाही. त्यामुळे नवीन मंदिराच बांधकाम झाल अस ड्राईवर कडून कळाल. मंदिर खूपच प्रशस्त आणी शिस्तप्रिय वाटल. ऑड दिवशी गेल्यामुळे गर्दी अशी नव्हतीच. त्यामुळे अगदी मनभरून शांतपणे दर्शन घेता आल.
शहरातल्या मंदीराच दर्शन आधी घेतल आणी मग मोर्चा वळवला तो डोंगरावरील मंदिराकडे. मंदिराकडे पोहोचताच भव्य कमानी ने लक्ष वेधून घेतल. तिकडून आत प्रवेश करताच मोर्चा वळवला तो सगळ्यात वाट बघितलेल्या रोप वे कडे. इथल्या अनेक गोष्टींची माहिती ड्राईवर आम्हाला देतच होता त्यामुळेच तशी उत्सुकता वाढली होती. ९२ रुपये ५० पैश्याच तिकीट घेऊन रोप वे च्या रांगेत उभ राहिलो. रोप वे ला हिंदीत उडनखटोला अस म्हंटल जाते हे तिकडेच कळल. अतिशय शिस्तबद्ध रितीत उडनखटोला आपल काम करत होता. आमचा नंबर आल्यावर त्या चेअर मध्ये बसताना उत्सुकतेसोबत एक छानशी भावना ही होती ती म्हणजे भक्तांनी दिलेल्या दानाचा योग्य उपयोग. अगदी कोणालाही घाम आणेल अशी असणारी उंची त्यामुळे तिथवर चालत जाणे हा पर्याय अनेकांच्या दृष्टीने व्यवहारिक नव्हता. अंबाजी माते साठी अनेक लोक इथवर चालत येतात अस कळल. तरीसुद्धा वर पर्यंतची चढण नक्कीच घाम काढेल अशी होती ह्यात शंका नाही. उडनखटोला ने उड्डाण केल आणी मी मात्र तो प्रवास मनाच्या कप्प्यात साठवू लागलो.
जवळपास ५-७ मिनिटांचा हा रस्ता. अर्ध्यापेक्षा अधिक पूर्ण केल्यावर उंचीचा अंदाज येऊ लागला. चोहोबाजूने मोकळ असल्याने ती उंची अधिकच भासत होती. मनात अनामिक भीती होतीच पण कुठेतरी अंबाजी मातेच्या दर्शनाचे विचार मनात असल्याने तितकीशी जाणवली नाही. उतरल्यावर अतिशय शिष्टबद्ध रीतीने दर्शन करता आल. सगळ्या ठिकाणी योग्य ती सोय केलेली होती. उंचावरून अरवली पर्वतांच्या रांगा बघताना खूप सुंदर वाटत होत. दर्शन झाल्यावर पुन्हा एकदा उडन खटोला कडे मोर्चा वळवला. पुन्हा एकदा तो रोमांचित करणाऱ्या प्रवासाचा आनंद मनात साठवून ठेवला.
दर्शन, शिस्त आणी सुविधांच्या बाबतीत अंबाजी मंदिर नक्की भावल. श्रद्धेच्या भागापलीकडे काय आवडल असेल तर केलेल्या सुविधा. देवाला मिळणाऱ्या पैशाचा योग्य विनियम हा त्याच्या भक्तांसाठी योग्य रीतीने केला तर त्या देवस्थानाच पावित्र्य टिकून रहाते नाहीतर त्याचा बाजार होतो. शेगाव हे माझ्या दृष्टीने आजही नंबर एकच देवस्थान आहे. अंबाजी मातेच मंदिर कदाचित त्यांनी केलेल्या भक्तांच्या सुविधेसाठी त्याच्या मागे येऊ शकेल. माता अंबाजी ला भेटायला जाताना केलेल्या उडनखटोला चा प्रवास मात्र नेहमीच लक्षात राहील ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment