Sunday, 22 January 2017

चुकलेला जमाखर्च... विनीत वर्तक
आयुष्याच्या पटलावर आपण कमवायला लागलो की जमाखर्चाचा हिशोब सुरु होतो. खरे तर पहिला श्वास घेताच तो सुरु होतो पण आपल्याला पैश्याची भाषा कळायला लागली की मग जमाखर्चाच गणित कळायला लागते. पण ते खरच कळते का? पैश्या आणी वस्तुत आपण इतके स्वतःला इतके गुरफुटवून टाकले आहे की आयुष्याचा जमा खर्च आपल्या दृष्टीने पैश्यात आणी वस्तुत आपण मोजतो. इथेच आपला जमा खर्च चुकतो.
आपण अनेकदा ऐकतो की जगावं तर स्वतःसाठी मग आपण खरच जगतो का स्वतःसाठी? सतत पुढे जाण्यासाठी धडपड. न संपलेल्या आणी सतत खुणावणाऱ्या शिखरांची यादी घेऊनच प्रवास करत रहातो. कधी आवडीने तर कधी मन मारून. प्रवास केलेल्या आणी राहिलेल्या प्रवासाची आकडेमोड करूनच आपण जमाखर्च मांडत रहातो. न जुळणारी ब्यालंसशिट दरवर्षी चुकती करण्याची पराकाष्ठा करत. जिकडे जमाखर्च चुकलेला आहे. तिकडे ती जुळणार कशी?
आपली जमा म्हणजे काही रक्कम आणी वस्तू नाही न. आपली जमा आपले क्षण जे आपण आनंदाने जगतो तर खर्च म्हणजे निसटलेले क्षण जे आपल्या हातातून गेलेले. आनंद कशात असतो आपला हेच कळेपर्यंत अनेक क्षण निसटून जातात. शिखरे पादाक्रांत केली की आपण आनंदी होऊ असच आपल्याला वाटत असते. पण एक शिखर ओलांडल की दुसर खुणावत असते. केलेल्या प्रवासाचा आणी गाठलेल्या शिखराचा आनंद घेण्याच सोडून आपण पुन्हा एका प्रवासाला लागतो. असच चालू रहाते. बदलतात ती शिखरे शिक्षण, नोकरी, लग्न, मुल अशी पण सुरु रहातो तो प्रवास. एकाकडून दुसरीकडे. जिकडे निसटत रहातात जगण्याचे क्षण. झालेला खर्च कळेपर्यंत वयाची पन्नाशी उलटून जाते. मग खर्च केलेल्या क्षणांना जमा करण्याची कसरत सुरु होते. पण तोवर खूप उशीर झालेला असतो. एकीकडे झालेल्या प्रवासाने शरीर आधीच थकलेल असते. त्यात नकळत झालेल्या खर्चाची आकडेमोड करण्यात मन हि थकून जाते.
कुठे थांबायचं हे माहित असल की प्रवास सुंदर होतो. कुठेच थांबायचं नसल की नुसता प्रवास होतो. अनेक कोर्पोरेट ऑफिस मध्ये गेलो की एक पाटी नेहमीच आपल लक्ष वेधून घेते. ती म्हणजे व्हिजन आणी मिशन. कोणत्याही कंपनीच्या ग्रोथ चा मार्ग हा त्या व्हिजन आणी मिशन वर अवलंबून असतो किंवा त्याच मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी सगळे काम करत असतात. आपण कधी अस ठेवतो का आपल्या आयुष्याच व्हिजन आणी मिशन. आपल व्हिजन चालू होते पैसे कमवण्या पासून आणी मिशन असते कमीत कमी वेळात, त्रासात जास्तीत जास्त पैसे कमावणे. ह्या पलीकडे क्वचितच काही जण जातात. अश्याच लोकांना आयुष्याचा खरा जमाखर्च कळतो. बाकी सगळे हिशोबातच आयुष्य काढतात.
शिखरांची ओढ कोणाला नसते. तिथवर जाण्याची इच्छा सगळ्यांची असते. पण शिखर फक्त मिळवायचं की प्रवास पण जगायचा हे ज्याच त्याने ठरवायचं. शिखरांची कमी नाही. कमी आहे ती वाटांची. आपण कोणती वाट निवडतो ह्यावर आयुष्याचा बराच जमाखर्च अवलंबून असतो. वेगळ्या वाटा माहित असताना पण आपण चुकीच्या वाटेने जाऊन जमाखर्च मोजणार असू तर आयुष्याची ब्यालंस शिट कधीच जुळून नाही येणार. त्यासाठी वेगळ्या वाटेने जायलाच हव. ती वेगळी वाट एकदम नवीन पण असेल. कधी चुकेल पण, कधी दुसरीकडे जाईल पण जेव्हा आपल व्हिजन आणी मिशन प्रवास जगण्याच आणी अनुभवयाच असते तेव्हा शिखरांची मर्यादा आड येत नाही. तेव्हा बघा आपला जमाखर्च बरोबर आहे की चुकीचा. वेळ गेलेली नाही अजून चुकलेला जमाखर्च बरोबर करण्याची.

No comments:

Post a Comment