गंडलेला खेळ... विनीत वर्तक
ऑलम्पिक मधल्या सर्वच पदकांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. जर एखाद मिळालच तर निदान पदकांच्या यादीत भारताच नाव दिसेल हीच ह्या स्वातंत्रदिनी अपेक्षा आहे. खेळ हा आयुष्याच ध्येय असू शकते हे भारतीयांच्या मनात कधी बिंबवल जात नाही. जन्माला आल्यापासून अभ्यास कर, मोठा हो, चांगली नोकरी मिळव हे सकाळ संध्याकाळ कानावर पडत असते. पण तू एक माणूस म्हणून मोठा हो. खेळत एखाद्या खेळात प्राविण्य मिळव अस कधीच ऐकायला येत नाही. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुल आज भारतात खेळ खेळतात हे सत्य कोणी नाकारू शकत नाहीत.
क्रिकेट पलीकडे कोणत्या खेळाला भारतात वलय आहे? म्हणजे एखाद दुसरी सानिया, सायना आणि अजून खेळाडू सोडले तर ऑलम्पिक किंवा तत्सम स्पर्धांसाठी आपला संघ जातो हे कोणाला माहित हि नसेल. ब्रिटीश काळापासून क्रिकेट च्या नोंदी ठेवणारे सुजाण प्रेक्षकांना भारताच्या राष्ट्रीय खेळाच्या संघातील २-३ खेळाडूंची नावे तरी सांगता येतील का? त्याच्या खेळाचे रेकोर्ड तर दूर राहिले निदान संघाचे प्रशिक्षक कोण आहेत हे हि कोणाला माहित नसेल एखाद दुसरा अपवाद वगळता. जिकडे क्रिकेट च्या वर्ल्ड कप च्या तयारीसाठी २-३ वर्षाआधीच संघ बांधायला सुरवात होते तिकडे आम्हाला ऑलम्पिक मध्ये भारत हरल्यानंतर कळते कि आपला हि संघ आहे आणि त्यांची कोणत्या देशाबरोबर म्याच होती.
ध्यानचंद कोण? हे अनेक लोकांना माहित हि नसेल. त्यांची ऑलम्पिक मधील कामगिरी किती लोकांच्या लक्षात आहे? राष्ट्रीय खेळाची हि दुरवस्था असताना बाकीच्या खेळाविषयी न बोललेलं बर. त्यात आगीत तेल ओतायला शोभा नावाने अनेक लोक डे आणि नाईट भरपूर मज्जा घेत असतात. अस तेल ओतल कि आपली अस्मिता ट्विटर आणि फेसबुक पुरती जागरूक होते. जितक्या लवकर तिचा भडका उडतो तितक्याच लवकर ती क्षमते सुद्धा कारण आपल्या अस्मिता अश्याच असतात २६ जानेवारी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्याची अस्मिता, ऑलम्पिक सुरु झाल कि खेळाची आणि खेळाडूंन विषयी अस्मिता. म्हणजे त्या एका वर्षात किंवा त्या ४ वर्षात आपण आपल्या अस्मिता गुंडाळून ठेवतो. म्हणून अनेक शोभानां तेल ओतायची आणि प्रसिद्ध व्हायची संधी मिळते.
गेल्या ४ वर्षात आपण रिओ ऑलम्पिक ला जाणाऱ्या खेळाडू किंवा पथक ह्याबाद्द्ल कधी आस्था दाखवली होती का? इतक्या वर्षात त्या खेळाडू बद्दल काही माहिती किंवा त्यांचा खेळ बघण्याची तसदी घेतली होती का? मग ऑलम्पिक सारख्या स्पर्धेतून आपली इतकी अपेक्षा का? आपण क्रिकेट शिवाय काही खेळू शकत नाही हे वास्तव स्वीकारा. कारण मायकेल फेल्प्स व्हायला आतून ते मुरलेल असायला हव. देशाचा, संस्थांचा, देशवासियांचा तसाच पाठींबा असायला हवा. नुसत पाण्यात सूर मारून पोहता कोणालाही येत. पण जेव्हा लाखो- करोडो चाहते पाठीमागे बघत असतात तेव्हा ते कुठेतरी आत मुरत आणि तेव्हाच आपण मायकल फेल्प्स सारखी अत्युच्य अशी कामगिरी करू शकतो.
मी खेळाडूना दोष देत नाही कारण त्यांना बिचार्यांना हि पोट असते. शिक्षण कमी असते कारण तेवढा वेळ देता येत नाही. ऑलम्पिक सारख्या स्पर्धा ४ वर्षात एकदाच होतात. तेव्हाच लोकांना कधी नव्हे ती त्यांची आठवण होते. त्यांच्या पोटापाण्याच काय? सरकारी नोकरी ती हि १० वेळा १० मंत्र्यांकडे फेऱ्या मारून मिळवायची. त्यातही मिळालीच तर क्रेडीट घ्यायला आहेतच बरेचजण. ती नाही मिळाली तर विचारायला नकोच आहे ते पदक विकून पोट भरायची वेळ येते. १.३ बिलियन लोकांच्या देशामध्ये एक पदक मिळवणारा स्पर्धक आपण निर्माण करू शकत नाही हि आपल्याला मारलेली एक थोबाडीत आहे. कारण शिक्षण, पैसा, नोकरी ह्यासाठी प्रत्येक घराघरातून आपण खेळाला गंडवलेल आहे.
इकडे सगळे फक्त सचिन तेंडूलकर व्हायची स्वप्न बघतात तिकडे नादिया कोमेन्स्की, मायकेल फेल्प्स कुठून तयार होणार. अनेक लोकांना वरील नावे माहित हि नसतील इथून आपली सुरवात आहे. तिकडे आपण कसे स्पर्धक तयार करणार आहोत? ऑलम्पिक मध्ये भाग घेतलेल्या आणि खेळणाऱ्या सर्व खेळाडू, त्यांचे आई- वडील, कोच, हितचिंतक सर्वांच कौतुक आहे. दोष त्यांचा नाही आपला आहे. रडीचा डाव आपण खेळून खेळाला आपण कधीच गंडवलेल आहे. आता दोन- चार दिवस मोठा धुरळा उडेल मग आय. पी. एल आल कि आपण कोणत्या खेळाडूला किती कोटी मोजले ह्याच्या बातम्या वाचण्यात धन्यता मानणार आहोत तर ह्याही पुढे फक्त अशीच धुपाटणी आली तर काही वावग वाटणार नाही.
No comments:
Post a Comment