एस.टी.डी. बूथ... विनीत वर्तक
आज माझ्या मुलीला मी सांगितलं की कोणे एके काळी फोन करण्यासाठी रांगा लागायच्या तर तिला हसू येईल. अगदी खूप वर्षाआधी नाही तर १०-१५ वर्षापूर्वी फोन हे खेळण नव्हत तर संभाषणाच माध्यम होत. मला अजून आठवतात ते एस. टी. डी. बूथ. मुंबई च्या बाहेरचा कॉल असला की घरून कॉल करण शक्य नसायचं. अश्या वेळी लाईन लावायची ती एस. टी. डी. बूथ वर. रात्री १० नंतर होणारी अर्धी किंमत मिळावी म्हणून घड्याळात १० कधी वाजतात ते बघून कॉल व्हायचा. रांगेत वाट बघताना आधीच्या नंबरचा कॉल लागू नये आणि लागलाच तर लवकर ठेवावा ह्याच अपेक्षेने वाट बघायची. आपला नंबर आला की समोरचा उचलेल हि घालमेल मनात सतत. मित्र- मैत्रीण , नात्यातील, कुटुंबातील कोणीही असो पण एक डोळा समोरच्या वेळेकडे. जवळ असलेले पैसे आणि मिळणारा कालावधी ह्याची सतत आकडेमोड डोक्यात चालू.
त्या ५-१० मिनिटांच्या संभाषणात खूप काही बोलल जायचं. पुन्हा कधी बोलण होईल न होईल ह्या विचारांनी. सगळ जेमतेम त्या वेळेत बसवायचं. काय करतो आहेस? काय करते आहेस? असले फालतू प्रश्न मनात कधीच आले नाहीत. कारण असल्या गोष्टीना तिकडे थारा नव्हताच. दबलेल्या भावना असो, आठवणी असो, काम असो सगळच मोकळ करायला वेळेच बंधन होत. त्यामुळेच की काय माणस जोडलेली होती नाही का? एस. टी. डी. बूथ मद्धे शिरताच मागचा दरवाजा कडी लावून बंद करून घेताना त्या बूथ च्या मद्धे भावनांची कारंजी उडायची. प्रेम, राग, रुसवा, भांडण, आठवणी सगळच. त्या एस.टी.डी. बूथ ने कितीतरी अशी कारंजी अनुभवली असतील. अंतराची जाणीव तेव्हा व्हायची जेव्हा कॉल ठेवावा की चालू ठेवावा अशी निर्णायक बेल वाजत रहायची. खिश्यातील पैसे आणि ओथंबून वाहणारे शब्द ह्याच्यातील कसरत म्हणजे एस.टी.डी. बूथ मधील पैश्याच आणि वेळेच इंडिकेटर.
त्या बूथ मद्धे सगळ बाहेर यायचं. ती ५-१० मिनिट आयुष्यात खूप काही देणारी असायची. दरवाजा उघडून बाहेर पडताना चेहऱ्यावर समाधान असायचं. कोणतही कारंज आत उडाल असेल तरी आवाज ऐकल्याच समाधान नाही का? आज हातात खेळण्या प्रमाणे मोबाईल असला आणि फुकट हव तितक बोला असे सांगणारे अनेक प्लान असले. तरी बोलण्याच समाधान हरवलं आहे नाही का? सोशल मिडिया ने वेळ आणि अंतराला कधीच संपवलं आहे. वेगवेगळ्या एप्लिकेशन मुळे शहराच्या, देशाच्या, खंडाच्या भिंती कधीच पुसल्या गेल्या आहेत. वोईस कॉल आता विडीओ कॉल झाले. पण त्या बूथ मद्धे न बघता ५-१० मिनटात उडाणारी कारंजी मात्र कुठेतरी हरवली.
एके काळी फोन साठी लाईन लावणारे आज फोन असून सुद्धा संवाद करत नाहीत. आठवड्यात एकदा बोलणारे आता सतत कनेक्ट असून सुद्धा कनेक्ट होत नाहीत. त्या फोन वरच्या आवाजांनी ओले होणारे डोळे आता पाणी संपल्याप्रमाणे भकास असतात. कुठे हरवलं सगळ? अजून मोठ, अजून पुढे, अजून श्रीमंत, ह्या अजून अजून च्या चक्रात आपण पुरते फासून गेलो आहोत. स्टेटस आणि कमेंट आपल्यासाठी महत्वाच्या झाल्या आहेत. फेसबुक वर किती लाईक आले. ह्यावरून आपण कोणाला किती आवडतो ह्याची मोजदाद होते आहे. पण आपल्या नात्यात कुठे गेली ती कारंजी? ते प्रेम, ते हास्य, ते रुसण, ते रागावण, ती ओढ, ती काळजी. की ह्या सगळ्या कारंज्याना आपण त्या बूथ मध्ये सोडून आलो आहोत. आलो असू तर पुन्हा एकदा जायचं आहे त्या एस.टी.डी. बूथ मद्धे. पुन्हा एकदा तो दरवाजा असा घट्ट बंद करून ती कारंजी उडवायची आहेत. प्रेम, असूया, आठवण, काळजी, सगळीच. मोबाईल ने विश्व तर जोडलं पण तोडली ती माणस. त्यांच्यातील सवांद. आता पुन्हा एकदा मला तरी त्या हरवलेल्या एस.टी.डी. बूथ मध्ये जायचं आहे. पुन्हा एकदा चिंब व्हायचं आहे त्या कारंज्यात. पुन्हा एकदा तो दरवाजा उघडताना त्या समाधानाने बाहेर पडायचं आहे. तुमच काय?
No comments:
Post a Comment