Sunday, 22 January 2017

विचारांची उत्क्रांती... विनीत वर्तक
माणूस भूतलावर आल्यापासून ते आजतागायत त्याच्यात अनेक बदल झाले आणि होत आहेत. महेंजोदाडो, इज्पित मध्ये राहणारा आणि आज त्याच भूमीवर वावरणाऱ्या माणसामध्ये अनेक बदल पिढ्यान पिढ्या होत आले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढी कडे माहिती देताना त्यात सतत काही सूक्ष्म बदल केले गेले. म्हणून ते बदल दिसायला आपल्याला अनेक शतके जावी लागली. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हेच सांगतो कि प्रत्येक प्राणी, वनस्पती आपल्या मध्ये अनेक बदल करत जातात. आपल्याला जगण्यासाठी आपल्या रंग, रूप, देह सगळ्यात अनुकूल असे बदल करून ते पुढल्या पिढी कडे हस्तांतरित करतात. म्हणजे बघा आपल्या देहात असलेले सगळे अवयव हे ह्या उत्क्रांतीचा भाग आहेत.
आपण श्वास घेतो तेव्हा अनेक वेगवेगळे बिलियन अणु आपल्या शरीरात प्रवेश करतात. पण नाकात असलेल्या ग्रंथीनमुळे काही विशिष्ठ अणुन मुळे मेंदूला सिग्नल दिले जातात. मेंदू मध्ये असलेले न्युरान्स हा संदेश मेंदूकडे पोचवतात. हे वास किंवा गंध वर्गीकरण करण्याच्या बाजूलाच आठवणींच केंद्र मेंदूत असते. ह्या न्युरोन्स च्या जाणीवेमुळे त्याला हि चालना मिळते. म्हणजे एका विशिष्ठ गंधाला आपल्याला विशिष्ठ गोष्टींची आठवण येते. मोगऱ्याचा गजरा माळून बाजूने कोणी गेल कि उद्दीपित होणाऱ्या भावना म्हणजे दुसर काय? हा सर्व वर्षोन वर्षे झालेल्या उत्क्रांतीचा भाग आहे. आगीच्या धुराचा वास आला कि आपण सतर्क होतो ते ह्याचमुळे. स्वताच जीव वाचवून ठेवण्यासाठी माणसाच्या मेंदूत हि उत्क्रांती झाली. तीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेली.
त्यामुळे येणारी प्रत्येक नवीन पिढी हि एक पाउल पुढे असते. आत्ताच उदाहरण द्यायचं झाल तर सगळेच पालक आपला मुलगा, मुलगी कॉम्प्युटर च्या बाबतीत किंवा एकूणच ग्याझेट च्या बाबतीत किती पुढे आहे हे सांगत असतात. आमच्या वेळी आम्ही घाबरायचो पण आजची पिढी सफाईने काम करते. ह्याला कारण उत्क्रांतीचा परिणाम आहे. एका पिढीने ह्या माहिती तंत्रज्ञाची ताकद ओळखल्यावर ती उद्याचा भविष्य काळ असणार आहे हे वास्तव झाल्यावर त्या साठी घडणाऱ्या पुढल्या पिढीकडे हि हेच संदेश वहन झाल. त्याचे परिणाम म्हणजे येणारी पिढी ह्या ग्याझेट ला अगदी जन्मापासून शिकून आल्यागत वापरू लागली. अर्थात ह्यात घरच वातावरण आणि इतर अनेक गोष्टी हातभार लावत असतील. पण जी भीती मागल्या पिढी ला अजून हि वाटते ती भीती कुठे तरी लांब पळून गेली आहे ह्या पिढीच्या बाबतीत.
जुन ते सोन सगळ्या बाबतीत खरे नसते. नाविन्याची साथ निसर्ग सोडत नाही तर आपण का सोडायची. उत्क्रांती ची परिभाषा तीच आहे. जे चांगल आहे ते जतन करा पण नवीन बदल करत रहा. येणारे बदल पुढल्या पिढीकडे देत चला. विचारांच्या बाबतीत हि हे लागू पडते. जे नाही चांगल ते सोडून पुढे जा. नवीन विचार ट्राय करून बघा. कदाचित पहिल्यांदा ते आवडणार नाहीत. पण जर ते चांगले असतील तर काळाच्या ओघात टिकून राहतील. पण हे चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती ना लागू आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आजही अस्तित्वात आहेत. ह्या वाईट प्रवृत्तीच उच्चाटन करायचं असेल तर चांगल्याची कास धरायला हवी. आयुष्यात, आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी घडतात, घडत असतील, घडणार. पण चांगल हि घडतेच कि. त्याचा वापर आपण किती करतो.
बातम्या, वृत्तपत्रे किंवा विचार सगळ्यातून निराशा झळकत राहिली तर मग आशा उरणार कुठे. नकळत आपल्या विचारातून पण ती दिसत चालली आहे. फेसबुक किंवा तत्सम साईट वर वाईट किंवा निराशेच्या बातम्यांना पोस्ट ना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी चांगल्या गोष्टीना नाही मिळत. एकमेकांचे वाभाडे काढणाऱ्या पोस्ट वर लोक अगदी चवीने आपले मत लिहितात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग नसताना सुद्धा आपला पाठींबा देतात. काही लोकांना तर असल्याच पोस्ट लिहिण्याची सवय आहे. कारण प्रसिद्धीची हाव कोणाला नको असते. पण हीच गोष्ट आपल्यात झिरपून पुढल्या पिढीपर्यंत उत्क्रांतीत होते आहे हे सांगण्यासाठी कोणत्या डार्विन ची गरज नाही.
गरज आहे ती आपण कोणती विचारांची उत्क्रांती पुढल्या पिढीपर्यंत पोचवणार आहोत ह्याचा विचार करण्याची. त्यासाठी जास्ती काही करायची गरज नाही. ह्या काळ्या ढगांच्या दाटीमध्ये पण सूर्याचे किरण शोधायचे. लगेच दिसतील अस नाही पण वाट पहिली कि नक्की दिसतील. विचारांची उत्क्रांती पुढे पोचवण्यात आपण पण मोलाची भूमिका निभावत आहोत. ह्या जबाबदारीच भान आल कि विचारांची उत्क्रांती झालीच म्हणून समजा.

No comments:

Post a Comment