गणपती चा प्रवास... विनीत वर्तक ( २ सप्टेंबर २०१६)
गणपती ची खरी मज्जा अनुभवायची असेल तर गावाला जायलाच हव. माझ गाव तस मुंबईच्या जवळ अगदी खेटूनच. त्यामुळे मुंबई ते गाव हा प्रवास तसा खूप मोठा नसला तरी त्याची एक वेगळीच मज्जा असते. गणपती च्या आगमनाच्या दिवशी बालपणी हा प्रवास सगळ्यात अविस्मरणीय व्हायचा. एकतर ३ वेगळ्या प्रकारच्या गाड्या पकडताना होणारी दमछाक म्हणजे प्रत्येक वेळी एक नवीन शिकवण. सकाळी ६ च्या सुमारास बोरीवली वरून विरार ला जाणारी लोकल ट्रेन पकडल्यावर सुरु होणारा हा प्रवास जेव्हा १० च्या आसपास गावच्या घरी जाऊन संपायचा तेव्हा अटकेपार झेंडे फडकवल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून व्हायचा. बोरीवली ते विरार प्रवास तसा थोडा सुखकर म्हणजे सकाळच्या वेळेत विरार गाडीत बसायला मिळणे हे म्हणजे इकोनोमी क्लास मधून बिझनेस क्लास मध्ये अपग्रेड केल्यावर जितका आनंद होतो तितका होण्यासारखे.
पुढील टप्पा मात्र खरी कसोटी होती. विरार स्टेशन ला ट्रेन कोणत्या प्ल्याट्फोर्म ला येते त्या वेळेपासून गेट सेट गो अश्या कानपिचक्या असायच्या. विरार – डहाणू शटल पकडण्यासाठी केलेलं हे युद्ध फक्त दरवाजाच्या जवळ नीट उभ राहायला मिळाव म्हणून असायचं. इंजिन नंतरचा पहिला डब्बा कसाही करून पकडणे बंधनकारक कारण त्यावर पुढील रिले ची योजना असायची. कारण एक डब्बा चा फरक बस मद्धे सीट मिळणे ते लटकून जाणे हे ठरवायचा. माझ गाव तस विरार पासून दुसर स्टेशन. पण वैतरणा गेल कि युद्धासाठी तयार व्हायचं. युद्धच ते दुसर काही योग्य नाव मला तरी सुचत नाही. युद्धाच्या आधी जश्या सूचना दिल्या जातात कि कोणी कुठून हल्ला करायचा. कोणी कोणती बाजू सांभाळायची. एका बाजूने विजय मिळवला तर मग त्याची पुढची रणनीती काय असेल अश्या सर्वच सूचनांचा भडीमार तसेच प्लान बी पण सांगितला जायचा. गाडी थांबायच्या आधीच कोणी कोणत सामान घ्यायचं ते कोणती जागा पकडायची ह्याची पुन्हा एकदा रिविजन झाली कि आता प्रत्यक्ष युद्धाला सुरवात.
गाडी थांबत नाही तोवर जल्दी उतरो अस म्हणत कधी एकदा उतरतो अस व्हायचं. उतरल्यावर उसेन बोल्ट ला हि लाजवेल अश्या चपळाईने लोकांचे लोंढे हातातल्या ब्यागा सावरत अश्या काही वेगाने सुसाट पळायचे कि मागे वाघ लागला आहे. त्या सफाळे च्या एस. टी. स्थानकात शिरताना दरवर्षी प्रमाणे अतिशय कर्कश आवाजात “ चिकमोत्यांची माळ” हे गाण कानावर आदळायाच. त्याकडे लक्ष न देता ओरडत कोरा ह्या गावी जाणारी एस. टी. शोधायची. त्यावेळी एस. टी. च्या नंबर प्लेट वरचे आकडे दिसल्यावर हे लॉटरी च्या आकड्यांपेक्षा जास्त जवळचे वाटायचे.
आता सुरवात होती ती खऱ्या चक्रव्ह्यूव्याची. एस. टी. समोर दिसल्यावर स्वताला सावरत “ जो बोले सो निहाल.... “ अस म्हणत आक्रमण करायचं. मग पुढे जे होत असेल ते म्हणजे घनघोर युद्ध. कोणाच्या ब्यागेचा पट्टा कोणाच्या खांद्यात अडकतो ते कोणाचा हात कोणाची मान अडकवतो असे सगळे सोपस्कार पूर्ण केल्यावर आपल्याला आवडणारी सिट मिळणे म्हणजे माझ्यासाठी स्वराज्य जिंकण्याहून कमी नव्हते. अर्थात आता प्लान बी ची सुरवात असायची. धडाधड सगळीकडे हाताला लागेल ते पसरून जागा अडवणे. ह्या सगळ्यात बाकीचे मावळे लढाई करत असायचे. मग महाराज भावनेने विजयी मुद्रेने खिडकीतून हात दाखवून सर्व काही सुखरूप असल्याचे मावळ्यांना सांगायचे तेव्हा कुठे जग जिंकल्याचा आनंद काय असतो ह्याचा थोडा का होईना अंदाज यायचा.
बर एवढ सगळ युद्ध करून माझ सगळ लक्ष त्या काटेरी आसनावर. लहानपणा पासूनच ड्राईविंग च वेड होतच. त्यामुळे ड्राईवर काका कधी एकदा येतात आणि त्या काटेरी आसनावर त्यांच्या परवानगीने स्थानापन्न होतो अस मला व्हायचं. ते आसन म्हणजे ड्राईवर च्या डाव्या बाजूला असलेल ब्याटरी बॉक्स. त्या मळलेल्या लाकडाच्या फळीवर बसायला मिळणे माझ्यासाठी स्वर्गीय सुखापेक्षा कमी नव्हत. एकतर ड्राईविंग करताना इतक जवळून बघयला मिळणे. त्यात तो डीझेल चा मती गुंग करणारा वास, गियर शिफ्ट करताना खड खटयाक अस होणारे आवाज. त्यात माझ्या बापाचा रस्ता आहे अश्या अविर्भावात एस.टी. महामंडळाच्या ड्राईवर काकांची बस चालवण्याची स्टाईल. ते शर्ट काढून बिनबाह्यांच्या गंजीवर थोड उजीविकडे तिरक बसून गाडी चालवण्याची पद्धत म्हणजे माझ्या कोवळ्या मनावर झालेले ड्राईविंग चे संस्कार होते. ह्या सर्वसोपस्कारा नंतर जवळपास १ तासाने विजयी मुद्रेने ड्राईवर काकांच्या दरवाज्यातून गावच्या स्टोप वर उतरणे म्हणजे युद्ध जिकून राज्यात परत आलेल्या राजाने पालखीतून उतरण्या सारखे मला वाटायचे.
गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी. आता अस काहीच नाही. त्या एस. टी. काळाच्या ओघात लुप्त झाल्या आणि तो प्रवास पण. आता बोरीवली – सफाळे लोकल ट्रेन आली. शटल ट्रेन बंद. बस ची जागा टमटम नी घेतली आणि माझा प्रवास कार ने सुरु झाला. होंडा च्या त्या आरामदायी सीट वर त्या ब्याटरी बॉक्स ची काय मज्जा. बोटांनी बदलेल्या गियर ना त्या खड खटयाक ची सर नाही. सिट बेल्ट लावून गाडी चालवणाऱ्या ड्राईविंग मध्ये कुठे आली आहे ती थोड उजवीकडे तिरक बसून गाडी चालवण्याची शान. आता सोमवारी गावाला जाताना पुन्हा एकदा ह्या सगळ्या आठवणी ताज्या होतील. पण तिकडे पोचल्यावर विजयी मुद्रेने पालखीतून उतरल्याची जी शान अनुभवायचो लहानपणी ती कुठेच नसेल.
No comments:
Post a Comment