Sunday 22 January 2017

बुरसटलेले विचार ... विनीत वर्तक (७ - सप्टेंबर - २०१६ )
काल चला हवा येऊ द्या कार्यक्रम बघताना समाजातील विचार अजूनही किती बुरसटलेले आहेत ह्याची जाणीव झाली. एच. आय. व्ही बाधित मुलांनी केलेला नृत्याचा अविष्कार बघताना थोडा वेळ स्तिमित झालो. खरे तर सर्वसामान्य, निरागस मुलांना इतका मोठा गंभीर आजार असेल ह्या कल्पनेने डोळांच्या कडा आपसूक ओल्या झाल्या. त्याच वेळी ह्या मुलांना इतका आत्मविश्वास देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या विभूतीला समाजाने वाळीत टाकलेलं बघून तळपायाची आग मस्तकात गेली.
एच. आय. व्ही. हा संसर्गजन्य आजार नसताना सुद्धा हि अश्या प्रकारची वागणूक समाजातल्या बुरसटलेल्या विचारांचं प्रतिबिंब दर्शवते. एकीकडे जिओ साठी रांगा लावून ४ जी मिळवणाऱ्या पण त्याच वेळी जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या लोकांची कीव करावी तेवढीच कमी आहे. शिक्षणाने विचारांची प्रगल्भता येते हा गोड गैरसमज आहे ह्याचा पुन्हा प्रत्यय आला. स्वताच्या शरीराबद्दल माणूस अजूनही किती मागासलेला , बुरसटलेल्या समाजाच्या दलदलीत रुतला आहे हे दिसून आल.
सेक्स बद्दल अजूनही पांढरपेश्या समाजच प्रतिनिधित्व करणार्यांना किती माहिती आहे? एकीकडे आम्ही उच्चविभूषित म्हणताना उसको एड्स है संभालके म्हणत बाजूला व्हायचं. सकाळी स्त्री व पुरुष ह्या बदलत्या मानासिकतेच प्रतिनिधित्व करणारे नवरा बायको. रात्री नवऱ्याला शरीर सुखाच्या वेळी आनंद नाही मिळत म्हणून ५-६ वेळा आबोर्शन करणारे असतात. ह्यात चुकी कोणाची? कोण किती मागासलेलं आणि पुढारलेल हे ज्याच त्यान ठरवायचं.
एड्स हा कित्येक कारणांनी होतो. पण मुल वगळता कोणीही समोर आल कि पहिल्यांदा मनात विचार हाच येतो कि ह्याच किंवा हीच कुठेतरी लफड असणार? ह्या एका कारणांनी हा रोग होतो का? अर्थात हे जरी मेन कारण असल तरी प्रत्येकवेळी तोच चष्मा वापरायची गरज नसते. रोग झाल्यावर जंग जंग फिरणारे रोग होऊ नये म्हणून किती सजग असतात? आमचे हे त्यातले नाहीत किंवा आमची हि अशी नाही म्हणताना ह्या विश्वासाला सर्वाधिक तडे जातात हे कटू सत्य आपण नेहमीच विसरतो.
कंडोम हे एस.टी.डी. टाळण्यासाठी एक महत्वाच साधन असताना किती स्त्रिया आणि पुरुष ह्या विषयी आग्रही असतात. अगदी साडीपीन म्याचींग लावणाऱ्या बायका आणि ते शर्टाची इस्त्री बद्दल सजग असणारे पुरुष कंडोम च्या वापराबद्दल किती काळजी घेतात. ५० पैश्यात ३ ते ५० रुपयात ३ ह्यातील फरक, दर्जा आणि इतर तत्सम गोष्टींबद्दल किती रस घेतात. आयुष्य ते मृत्यू ह्यातील महत्वाचा दुवा असणाऱ्या इतक्या महत्वाच्या साधनाबद्दल बोलणे तर सोडाच पण स्त्रिया बघत पण नाहीत हे आपल्या मागासलेल्या समाजच लक्षण आहे.
नवऱ्याच्या आनंदासाठी ५ – ६ वेळा गर्भपात झाला तरी चालेल पण माझ्या पतीव्रतेत खंड नको असले विचार घेऊन पतिव्रता सिद्ध करणाऱ्या अनेक उच्चविभूषित स्त्रिया आपल्याच आजूबाजूला बघयला मिळतात. स्त्री इमोशनली तयार नसताना पुरुषी हक्क गाजवणारे पती प्रत्येक घराघरात पाहायला मिळतात. ते निमुटपणे गिळून आयुष्य कंठणाऱ्या स्त्रिया हि. एक पतिव्रता ची हि जर व्याख्या असेल तर खरच आपल्याला विचारांचा खूप मोठा पल्ला पार पाडायचा आहे. आपल्या लैंगिक इच्छा , अडचणी, आवड , नावड ह्या विषयी किती जणी / जण आपल्या जोडीदाराशी बोलू शकतात. आपण स्वतः तरी ह्या अतिशय महत्वाच्या विषयांवर एकमेकांशी बोलू शकतो का? ह्याचा प्रत्येकाने विचार करावा.
जर तुम्ही विचारांनी एकत्र येऊ शकत नसाल तर शरीराने कसे येणार आणि मग ह्याचीच परिणीती पडद्यामागच्या मजेत दिसून येते. एच. आय. व्ही. सारख्या पसरलेल्या रोगांच मूळ कारण इकडेच आहे. मुळातच बुरसटलेले विचार त्यात त्या बद्दल असलेली अनास्था. चागल्या – वाईट अश्या विचारांची समाजाने केलेली भेळ. एकूणच काय सावळा गोंधळ. माणूस म्हणून बघण्याची सुरवात आपल्या जोडीदारापासून केली तर त्याच प्रतिबिंब समाजात पडल्याशिवाय राहणार नाही. माणूस म्हणून बघताना सेक्स ह्या जगातील सर्व माणसांनी केलेल्या क्रियेला योग्य तस समजून घेण आल तर येणारे अनेक जीव आपण ह्या रोगापासून वाचवू शकू. बुरसटलेले विचार आपल्या आत असतात समाज त्याच प्रतिबिंब असतो. काल त्या निरागस जीवांना नाचताना बघून आपण खरच जोडीदार, सेक्स, लैंगिक शिक्षण, समाज आणि आपले बुरसटलेले विचार ह्या बाबतीत खूप मोठा पल्ला गाठायचा आहे ह्याची जाणीव झाली.

No comments:

Post a Comment