Sunday, 22 January 2017

सहिष्णुता... विनीत वर्तक
सहिष्णुता हा शब्द अगदी वरचेवर आपल्या कानावर पडत असतो. आपल्या नात्यात पण अनेकदा आपण हा शब्द ऐकला असेल किंबहुना ह्याच इंग्रजी भाषांतर म्हणजे टोलरन्स, पेशन्स. कोर्पोरेट जगतात अनेक किचकट- विचकट प्रश्न अगदी लिलया हाताळणारे अनेक जण मात्र घरच्या प्रश्नात किंवा एकूणच नातेसंबंधामध्ये त्यांची सहिष्णुता फारच कमी असते. मोठे मोठे प्रश्न हाताळणारे आपण मात्र आपल्याच माणसासमोर असे हतबल का होतो? आपली टोलरन्स लेवल इतकी कमी का होते? आपण ती वाढवू शकतो का? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात.
कोणत्याही जवळच्या नात्यात आपण एकमेकांना आधीच अपेक्षित धरून चालतो. अपेक्षेप्रमाणे गोष्टी नाही झाल्या की मूळ वादाला सुरवात होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपण खूप लक्ष देतो. त्यातली एखादी जरी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली की आपली सीमारेषा गाठली जाते. कोर्पोरेट मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीत आपण संपूर्ण लक्ष देत नाही. म्हणजे आपल्या दिलेल्या जबाबदारी नुसार आपण तितकच लक्ष देतो. किंबहुना आपण सगळ्यात लक्ष द्यायचं ठरवलं तर ते किती जिकरीच होईल? कंपनीच्या मालकाने अगदी माल घेण्यापासून ते विकेपर्यंत सगळीकडे लक्ष द्यायचं ठरवलं तर ते शक्य होणार नाही. आणी झालच तर तो कधीच आनंदी होऊ शकणार नाही. किंवा त्याच्या टोलोरन्स च्या सीमारेषा नेहमीच गाठल्या जातील.
आपल्याला हे चांगल माहित असून सुद्धा आपण तेच करतो नाही का? आपल्या जवळील नाते संबंधात आपल लक्ष एकदम बारीक असते. अगदी अगदी छोट्या गोष्टीत पण आपण बारकाईने लक्ष देतो. नातेसंबंध तुटण्यासाठी ह्याच बारीक गोष्टी कारणीभूत असतात. कोणत्या मोठ्या गोष्टीनी नाती तुटत नाहीत. तर ह्या अश्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी साचत जाऊन मग त्याचा कडेलोट होतो. टी.टी. रंगराजन ह्यांनी आपल्या एका संभाषणात एका नवरा- बायकोच उदाहरण दिल आहे. दोघे घटस्फोटासाठी येतात. कारण काय अस विचारल तर नवऱ्याच्या मते बायकोला शिस्त नाही. रंगराजन विचारतात शिस्त नाही म्हणजे काय? तर म्हणे बायको पेस्ट घेताना ती ट्यूब मधून दाबते. आता हे काय कारण होऊ शकते का? रंगराजन ह्यांनी शेवटी त्या दोघांना सांगितलं की आता पासून दोन पेस्ट आणा. एक नवऱ्यासाठी आणी दुसरी बायकोसाठी. त्या नवऱ्याला सांगितलं तुम्हाला जशी वापरायची तशी वापरा आणी तिला जशी वापरायची तशी ती वापरेल. पण ११ रुपये ५० पैसे साठी घटस्फोट घेऊ नका.
ही गोष्ट अगदी हास्यास्पद वाटली तरी अश्याच छोट्या गोष्टीनी तर आपण संबंध तोडतो नाही का? बघा आत्तापर्यंत झालेल्या भांडणातील किंवा संबंध तोडताना घडलेल्या किती गोष्टी खरच मोठ्या होत्या? अश्या गोष्टीनी खरच जन्म- मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता का? आणी जर नव्हता तर मग खरोखर ते नात तोडण्याची किंवा त्याबद्दल उगाच मनात चलबिचल वाटण्याची गरज होती का? आजच्या काळातल कोर्पोरेट जग सांगते “एखाद्या गोष्टी च्या खोली मद्धे राक्षस आहे”. नक्कीच काहीही समजून घेण्यासाठी त्याच्या खोलात जायला हव. पण प्रत्येक ख ला मात्रा आणी ल ला वेलांटी हि द्यायला हवी. सोप्प्या शब्दात सांगायचं झाल तर जेव्हा इतरांविषयी गोष्टी असतील तेव्हा त्या लहान गोष्टीना लहान ठेवायला हव. पण त्याच जेव्हा स्वतःशी निगडीत असतील तेव्हा प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठ महत्व द्यायला हव. अस जेव्हा आपण करू तेव्हा आपली सहिष्णुता वाढलेली असेलच. पण त्या सोबत आपल्या हातून होणार कार्य अगदी उत्तम असेल तर इतरांच्या लहान गोष्टीना लहान ठेवल्यामुळे नातेसंबंध ही मजबूत असतील. मग विचार कसला करता आहात? वाढवूया आपली सहिष्णुता.

No comments:

Post a Comment