Sunday, 22 January 2017

नोटांच्या आठवणी.. विनीत वर्तक
माझ नोटांशी असलेल प्रेम तस खूप जुनच. वेगवेगळ्या देशांची नाणी जमा करण्याचं वेड लागल लहानपणीच. त्या काळात अनेक नाणी आणी नोटा माझ्या खणात जमा झाल्या. लहानपणी बाबा आजोबा पेपर वाचून दाखव म्हणून रोज सकाळी मला पेपर वाचयला लावायचे. त्यांच्या धोतराच्या कुपीत बांधलेला रुपया मला देतील ह्या आशेवर मी रोज पेपर वाचून दाखवायचो. खूप जुन्या काळातल ते नाण आपल्या संग्रही असावं अस मला नेहमी वाटे. अर्थात ते कधी नाही मिळाल. पण माझ्या आजीने प्रचंड जुन्या काळातली अस्सल चांदीची दोन नाणी मात्र मला दिली. ह्या चांदीच्या नाण्यांवर रामराज्य आणी बरच काही कोरलेल आहे. ती कोणत्या काळातील आहेत मला माहित नाही. वारसा रूपाने ती दोन नाणी आणी त्या आठवणी माझ्याकडे अजूनही जपून आहेत. त्यांची कधी किंमत होणार नाही.
नाण्यान कडून नोटांकडचा प्रवास व्हायला कारणीभूत ठरला तो अमिताभ बच्चन चा दिवार चित्रपट. “फेके हुवे पैसे मै आज भी नही उठाता” ते त्याचा ७८६ नंबरचा बिल्ला ह्याचा सगळा परिणाम माझ्या बालमनावर शेवटपर्यंत कोरला गेला. मग शोध सुरु झाला तो ७८६ नंबर असलेल्या नोटांचा. अनेक वर्षांच्या प्रवासातून १ रुपयाच्या नोटेपासून १००० रुपयाच्या नोटेपर्यंत ७८६ नंबरच्या सगळ्या नोटा माझ्या पोकेट च्या चोर खिश्यात विराजमान झाल्या त्या आजतागायत. १,२,५,१०,२०,५०,१००,५००,१००० अश्या सर्व नोटांना अगदी मानाच स्थान तिकडे मिळाल. ३-४ दिवसांपूर्वी जेव्हा ५००-१००० च्या नोटा रद्द होणार अस जाहीर झाल. तेव्हा माझ्या मित्राचा प्रश्न आता तुझ्या संग्रहाच काय करणार? म्हंटल त्याचं मोल नाही करू शकत. त्याचं स्थान नेहमीच मानाच असेल.
प्रत्येक नोटेच वेगळच अस वैशिष्ठ मला जाणवलं. ७८६ ह्या नंबरची क्रेझ कमी झाल्यावर पण त्या निमित्ताने आपण एक चांगला संग्रह केला अस मला आजही वाटते. नोटेच्या किमतीपेक्षा त्यावर असलेल्या प्रिंट ने मला नेहमीच आकर्षित केल. एक रुपयांच्या नोटेवर मागच्या बाजूस असलेल्या चित्राने माझ लक्ष त्या बालवयात वेधून घेतल होत. हे काय आहे? असा प्रश्न नेहमी डोक्यात असायचा. शाळेत कोणीतरी सांगितलं की ती ओईल रिग आहे सागर सम्राट. ओईल रिग काय असते? आणी तीच चित्र नोटेवर छापण्याच काम काय? असे अनेक प्रश्न डोक्यात उभे राहिले. पुढल्या आयुष्यात अश्या कोणत्यातरी क्षेत्रात आपण काम करू असा विचार ही त्या काळात मनाला शिवला नाही. पण त्या चित्राने मनात घर केल ते कायमच.
दोन रुपयांच्या नोटेवरचा आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो म्हणजे अवकाश क्षेत्रात भारताने पाउल ठेवल्याची वर्णी होती. परवा जेव्हा २००० रुपयांच्या नोटेवर मंगळयानाचे चित्र बघितले तेव्हा त्या दोन पासून ह्या दोन हजार मद्धे जितका प्रवास आणी जितकी जास्ती किंमत आहे. तितकीच किंबहुना थोड जास्तीच उंचीवर भारताने अवकाश क्षेत्रात आपल स्थान निर्माण केल आहे. एक उपग्रह ते एक इंटर प्लानेटरी मिशन असा प्रवास स्वबळावर होणाच्या ह्या दोन्ही नोटा साक्षी आहेत. उद्या जेव्हा २००० ची नोट त्या दोन रुपयांसोबत माझ्या पॉकेट मद्धे येईल तेव्हा अवकाश क्षेत्रातील प्रगतीच एक वर्तुळ भारताने पूर्ण केल असच मला वाटेल.
पाच रुपयांवरील ट्राक्तर असो वा पन्नास च्या नोटेवरील भारतीय संसद, वीसच्या नोटेवरील सूर्यमंदीराच चाक आणी शंभराच्या नोटेवरील कांचनगंगा असो वा पाचशे च्या नोटेवरील दांडी यात्रा. सगळ्याच नोटेवरील भारताच्या आजपर्यंतचा प्रवास सगळा डोळ्यासमोर उभ राहिला. माझ्या ७८६ च्या वेडाने हा सगळा प्रवास नेहमीच माझ्यासोबत टिकून ठेवला. परवा सगळ्यांनी ५००-१००० नोटांना आदरांजली वाहिल्यावर मित्र आणी मी मात्र सगळ्या प्रवासाचे साक्षीदार ह्या नोटांमुळे होत होतो. माझ्यासाठी तर ते क्षण खासच होते. एका छोट्या आवडीमुळे जपून नोटांच्या रुपात जपून ठेवलेला ठेवा काहीच खर्च न करता इतका प्रवास घडवेल अस मला कधीच वाटल नव्हत. मला परत दिवार आठवला “तुम्हारे पास क्या हे” मेरे पास काला धन तो नही लेकीन वो नोट हे जिन्होने बिना खर्च किये बिते हुवे कल का पुरा सफर करवा दिया..

No comments:

Post a Comment