Sunday, 22 January 2017

व्यक्तिमत्वाच आय. एस. ओ. ... विनीत वर्तक
टी. टी. रंगराजन ह्यांची एक क्लिप आहे त्यात एका टूथपेस्ट वरून घटस्पोट घेणारे जोडीदार ह्या विषयी त्यांनी खूप मिश्कील भाषेत सांगितल आहे. ते ऐकून हसता हसता आपली पुरेवाट होते. पण खऱ्या आयुष्यात असे जोडीदाराविषयी आय. एस. ओ. निकष लावणारे महाभाग हि कमी नाहीत. जोडीदार असो वा आपल्या कोणत्याही नात्यातील व्यक्ती ती एकदम सगळ्या निकषावर खरी उतरेल अशी आपली अपेक्षा कितपत योग्य आहे?
तो किंवा ती अशीच वागते? अशीच आहे? अशी अनेक वाक्य घराघरातून आपण नेहमीच ऐकतो. मुळातच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी असू शकत नाही हे सत्य पचवून सुद्धा आपण अपेक्षा मात्र तीच ठेवतो. काही बाबतीत ती खरी असेल हि पण सगळ्या बाबतीत आपल्या नात्यातील प्रत्येकाने प्रत्येक वेळेस मात्र आय. एस. ओ. निकषाप्रमाणे आपल्याला योग्य वाटेल, आवडेल, अपेक्षित असेल अस वागाव हि अपेक्षा नात्याला तोडण्यास कारणीभूत ठरते.
प्रत्येक माणूस आपल वेगळ अस्तित्व घेऊन प्रवास करत असताना त्याच अस्तित्व जपून आपल नात बहरत ठेवण हेच तर खर आयुष्य आणि हाच तर खरा अनुभव. कोणतीच व्यक्ती आयुष्यातील सगळ्याच पातळ्यांवर श्रेष्ठ कशी असू शकेल? सचिन तेंडूलकर हा खेळाडू म्हणून उत्कृष्ट असेल पण अभ्यासात नापासाचा शिक्का हि त्याच्या सोबत आहे. म्हणून आपण नापासाच्या शिक्क्याचा विचार करायचा कि त्याच्यातील खिलाडू वृत्तीचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
आदर्श असे काही नसते. आदर्श व्यक्तिमत्व हे खूप सापेक्ष संकल्पना आहे. प्रत्येकात काही न काही चांगल आणि वाईट आहे. त्याचा समतोल म्हणजेच व्यक्तिमत्वाची जडणघडण असते. चांगल आणि वाईट हे पण सापेक्ष असू शकते. एखाद्या परिस्तिथी मध्ये चांगला वाटणारा गुण वेगळ्या परिस्तिथी मद्धे वाईट हि दिसू शकतो. म्हणून पहिल्याच भेटीत किंवा दुसऱ्याच्या तुलनात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून कोणालाही तोलण्याची घाई करू नये.
प्रथमदर्शनी दिसणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला अनेक गोष्टी सांगून जातात. एखाद्या व्यक्तीची लिहिण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, शारीरिक हावभाव अनेक गोष्टी सांगतात पण त्याच काळ्या दगड्या वरच्या रेषा म्हणून स्वीकारणे चुकीचे. कारण आपण बघतो, अनुभवतो त्या पेक्षा गोष्टी, परिस्तिथी प्रचंड वेगळी असू शकते. सवांद केल्याने अनेक गोष्टी समजू शकतात. पण सवांद करताना पिवळा चष्मा मात्र उतरवून ठेवावा नाहीतर किती हि वर्ष एकत्र राहिलो आणि कितीही सवांद केला तरी मनातील अढी मात्र राहतेच.
परफेक्शन शोधायला निघालो तर कोणीच मिळणार नाही. माणूस हा काही आय. एस. ओ. ९००० किंवा १२००० किंवा १८००० नाही. ज्यात सगळ्या गोष्टी सिक्स झिग्मा प्रमाणे असतील. अपूर्णतेतील पूर्णत्व शोधण हेच तर खर आयुष्य जगण आहे. ज्या गोष्टी नकोश्या वाटतात किंवा कोणाच्यातही बदलाव्याश्या वाटतात त्या बदलताना आपण मूळ गाभ्या ला बदलू शकत नाही. हे सत्य हि आपण लक्षात ठेवायला हव. एक संवेदनक्षील माणूस म्हणून नात्यातील लोकांचा विचार केला तर माणसाला व्यक्तिमत्वाच आय. एस. ओ. लावण्याची घाई आपण करणार नाहीत कदाचित मग परफेक्शन ला इम्प्रुव करण्याची गरज भासणार नाही.

No comments:

Post a Comment