Sunday 22 January 2017

न कळलेले महाराज... विनीत वर्तक
गेल्या काही दिवसांपासून व्हात्स अप वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जाती युद्ध सुरु झाले आहे. एकीकडे महाराजांचे कोणते सरदार, सेवक आणी जवळचे अमुक एका जातीतील होते आणी कोणते दुसऱ्या जातीतील. कसे त्यांनी महाराजांशी गद्दारी केली किंवा कसे त्यांच्यासाठी प्राण अर्पण केले हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या इतिहासाचा आधार घेऊन अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी बिनदिक्कत पणे फिरत आहेत. ह्या सर्वच गोष्टींचा महाराजांच्या कर्तुत्वाशी संबंध नसताना कोणत्या तरी एका जातीला मोठ किंवा नीच दाखवण्याचा अट्टाहास दोन्ही बाजूने केला जात आहे. कोणाला तरी वरचढ किंवा खाली दाखवण्यासाठी किंवा कोणत्या तरी जाती, धर्म ह्याचा उपापोह करण्यासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर त्यांच्याच पुढच्या पिढीतील मावळ्यांनकडून केला जातो ह्या पेक्षा क्लेशदायक दुसर काहीच नसेल.
स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, धर्म बघून माणस नाही निवडली. निवडली ती त्याच्यावर असलेला विश्वास, कर्तुत्व आणी निष्ठा बघून. जवळ केलेली सगळीच माणस चांगली निघतील असे नाहीच पण म्हणून काय ती जात , धर्म त्या माणसांनी ठरवली गेली का? मुळातच बनवणाऱ्या ने रक्तात काही फरक केला नाही. तर आपण कोण? महाराजांनी काय केल किंवा काही नाही केल ह्याचा उपापोह आज ३००-४०० वर्षानंतर करण्यापेक्षा आपण त्यांच्या कडून काय घेऊ शकतो हे समजण जास्ती महत्वाच नाही का?
स्वराज्य बनवताना मुळातच जनतेवर झालेल्या अन्यायाला कुठेतरी आळा बसावा ह्या उद्देशाने त्याची स्थापना झाली. त्या काळात मुळातच दबून राहिलेल्या हिंदू सामाजाला त्यांनी जागृत केले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते करताना दुसऱ्या कोणत्याच जातीला व धर्माचा कोणताही अपमान होणार नाही हे हि ध्यानात ठेवले. अस असताना त्यांच्याच नावाने त्यांचेच मावळे कुठेतरी फक्त स्वताचा धर्म, जात मोठ करण्यासाठी दुसऱ्या जाती धर्माला खाली दाखवण्यासाठी काही वाट्टेल त्या थराला जाऊन गोष्टी करत आहेत. फक्त “जय” म्हणून किंवा भगवा झेंडा आणी दाढी वाढवून किंवा अजून घोषणा देऊन महाराज आपल्याला कळले असते तर आज हि परिस्थिती आली नसती.
जाती- धर्म ह्यांच्या पलीकडे महाराजांचं कर्तुत्व होत. माणस जोडण्याच कौशल्य, संघटन कौशल्य, युद्धाच कौशल्य ही आणी अशी अनेक गोष्टी आज इतिहास आपल्याला सांगतो आहे. पण आपल्याला त्यांच्या मावळ्यानच्या , सरदारांच्या फक्त जाती, धर्म दिसतात. हे आपल दुर्दैव आहे. ज्या महाराजांनी आपल्या महारष्ट्रात, सह्याद्रीत धुंडाळून किल्यांच अभेद्य अस वैभव उभ केल. त्याच वैभवावर आज आपण दारू प्यायला जातो. तिकडेच आपण दंगा करतो. ज्यांच्या रक्तातून आज त्या चिरेबंदी तटबंद्या उभ्या राहिल्या तिकडे आज आपण आपल्या प्रेमाची नाव रंगवतो हीच हा ती श्रद्धांजली?
संघटना कौशल्य ज्यांनी दाखवून दिल ज्यांच्या दरबारात जाती, धर्म ह्या पलीकडे निष्ठेला, कर्तुत्वाला मान होता त्याच दरबारातील जाती , धर्म आता ३००-४०० वर्षांनी पोखरून काढून आपण महराजांचा कोणता आदर्श पुढे चालवत आहोत ह्याचा प्रत्येकांनी विचार करावा. लहानपणी इतिहास शिकताना, वाचताना रक्त सळसळून उठायचं. आपणही घोड्यावर बसून लढाईत जाव इतका ज्वाज्वल्य इतिहास असताना आपण आपल्या पुढल्या पिढीकडे महाराजांची जात, त्यांच्या सरदारांचा धर्म, मावळ्यांची जात देणार असू तर खरोखर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले का? असा प्रश्न प्रत्येकांनी स्वताला विचारावा.

No comments:

Post a Comment