Sunday 22 January 2017

विजय दिवस ... विनीत वर्तक
गेल्या वर्षी ह्याच दिवशी ह्याच वेळी कारगिलच्या त्या पर्वत रांगांन समोर उभ राहून भारताचा तिरंगा डौलाने फडकताना बघताना छाती ५६ इंचाची झाली पण डोळांच्या पापण्या अलगद ओल्या झाल्या. प्रचंड थंडी, बोचरी हवा, क्षणा क्षणाला बदलणार हवामान, पाउस, बर्फाच्छादित शिखरे, मागे मैदान तर समोर हि सरळ सोट शिखरे. त्याच्या टोकावर बसलेला शत्रू आणि टिपून टिपून मारणाऱ्या त्यांच्या गोळ्या ह्या सर्वांवर मात करत गाठलेला विजय. कारगिल ला त्याच पर्वत रांगान समोर उभ राहून अनुभवणं म्हणजे आयुष्यातील अत्युच्य क्षण होता. ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष ह्या युद्धात भाग घेतला. शत्रूला चारी मुंड्या चीत केल अश्या सैनिकांना, अधिकार्यांना त्यांच्या कुटुंबियांना स्यालुट करण्याचा, त्यांच्याशी हात मिळवून एका सामान्य नागरिकाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा क्षण म्हणजे माझी आयुष्यातली खरी कमाई म्हणता येईल.
ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व ज्यांच्यामुळे आज मोठ्या गर्वाने भारत माझा देश आहे अस म्हणू शकतो. त्यांना मानवंदना म्हणजे एकदा तरी आयुष्यात तिकडे जाऊन त्या सैनिकांना भेटण त्याच्याशी बोलण. त्यांना सहानभूती नको आहे आपली. पण आयुष्य वेचलेल्या क्षणांसाठी निदान आपण काही क्षण आपल्या आयुष्यातले दिले तरी ते हि नसे थोडके. इकडे बसून देशाच्या सहिष्णूतेबद्दल बोलण खूप सोप्प आहे. कारण आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने देशासाठी दिलेलं योगदान हे भरणाऱ्या ट्याक्स पुरती मर्यादित असते. त्यामुळे देश आपल्यासाठी आपल्या हक्कांसाठी मर्यादित असतो. काश्मीर प्रश्न, कारगिल युद्ध आणि पाकिस्तान ह्या सर्वांवर आपण ए. सी. रूम मद्धे बसून खूप मोठ्या चर्चा करतो. “ गोळी का नाही घालत त्यांना” किंवा “निरपराध लोक मारली जात आहेत” अशी टोकाची वाक्य पण बोलून मोकळे होतो.
कारगिल मध्ये युद्ध होई पर्यंत काय झोपले होते का? सर्व राजकारण आहे. असे अनेक फवारे आपण इकडे न तिकडे सोडत असतो. पण प्रत्यक्षात कधी युद्धभूमी अनुभवली आहे काय? आम्ही लेह-लडाख ला जातो पेंगोंग लेक बघयला कारण तिकडे ३ इडियटस च शुटींग झाल. अमीर खान जाऊन आला मग ते पवित्र झाल आता आम्ही तिकडे जाऊन तेच सेल्फी काढण्यात धन्यता मानतो. कारण लेह-लडाख आमच्यासाठी सुट्टी असते. कारगिल ला काय आहे बघण्यासारख?? कारण तिकडे अजून कोणते खान आणि इतर तत्सम अभिनेते पोचले नाहीत. हीच तर आमची खरी शोकांतिका आहे.
मनाली ते लेह-लडाख प्रवास करताना निसर्गाने अक्षरशः पाणी पाजल. हतबल होण्याशिवाय पर्याय नव्हता. खायचे- प्यायचे वांदे झाले असताना मदतीला आली ती भारतीय आर्मी च. मला अजून हि आठवते तो क्षण जेव्हा एका टी. सी. पी क्याम्प ला मदतीसाठी आणि रस्ता कधी उघडेल ह्याची चौकशी करायला मी, अनुमावशी आणि आशिष गेलो असताना. सरदार साहेबांनी काही न विचारता “म्याडम जी आप पेहले खा लीजिये रस्ते तो खुलते रहेंगे”. जिकडे ४-६ महिने घर बघितले नाही तिकडे माझ्या आईने अगदी मायेने त्याच्यासाठी बनवलेले लाडू त्यांच्या हाती देताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून गेले. डोळ्यात समाधान होते ते भारताच्या नागरिकाला जाणीव झाली आहे. ह्यात सगळ्यात मोठा वाटा अनुमावशीचा आहे. १-२ नाही तर तब्बल १६ वर्ष प्रत्येक कारगिल दिवशी ती अनेक नागरिकांना ह्याच अनुभवासाठी घेऊन जाते कारगिल ला.
सैनिकांना नागरिकांकडून सहानभूती नको आहे. त्याचं कर्तव्य त्यांना माहित आहे. ते त्यांना सांगण्याची आपण गरज नाही. गरज आहे ते आपल कर्तव्य त्यांच्या प्रती ओळखण्याची. पावसाळ्यात धबधब्याखाली दारूची मज्जा घेताना एकदा त्या कारगिल च्या बोचऱ्या थंडीत बंदूक घेऊन जेवणा पाण्याशिवाय शिखर सर करताना समोर येणाऱ्या गोळीचा विचार तरी एकदा करा. मज्जा आणी सुट्टी आपण नेहमीच करतो. एकदा युद्धभूमीवर जाऊन सैनिकांना भेट द्या.. कदाचित त्यांच्यासाठी तोच त्यांचा विजय दिवस असेल.

No comments:

Post a Comment