Sunday 22 January 2017

मतांची प्रगल्भता... विनीत वर्तक
गेल्या आठवड्यात लिहिलेल्या एका पोस्ट वर एकांची कमेंट की लिहताना तुम्ही अमुक एका गोष्टींचा संदर्भ दिला नसल्याने अमुक एका व्यक्तींचा अपमान झाला. खरे तर माझ्या लिखाणातून कोणाचा अपमान न होईल ह्याची काळजी मी घेतोच. कोणाच कौतुक केल्याने दुसऱ्या कोणाचा अपमान होतो असे असते का? बघणाच्या दृष्टिकोनातील फरक माणसा माणसामध्ये वेगळा असतोच. किंबहुना तो असावा म्हणून तर अनेक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची दृष्टी मिळते. दुसऱ्या व्यक्तींच्या मताचा आदर ठेवून सुद्धा आपण आपल मत व्यक्त नाही का करू शकत?
आपल मत मांडताना ते काळ्या दगड्यावरची रेष आहे. असा विचार करूनच आपण नेहमी पुढे जायच का? कोणत्याही पोस्ट, लेख, माहितीवर आपल मत मांडताना जरी ते समोरच्या लिखाणाशी विसंगत असेल तरी ते लिहण्याची, सांगण्याची एक पद्धत असते. ह्याचा किती लोक विचार करतात? मतांपेक्षा आपल्या मांडणीवरुन आपल्या विचारांची बैठक समोरच्या पर्यंत पोहचते. मुद्दा कोणत्या पद्धतीने मांडला जातो ह्या वर बरच काही अवलंबून असते.
असाच एक अनुभव दुसऱ्या बाबतीत हि आला कि आपल्याला एखादी गोष्ट पटली नसताना किंवा आवडली नसताना नुसतच लाईक करून पुढे जाण्यापेक्षा वाचून तटस्थ रहाणे किती जणांना जमते. आपल्या दोन नात्यातील मग ते कोणतही असो त्याला योग्य तो सन्मान देताना आपल शांत रहाणे पण खूप काही समोरच्याला जाणवून देऊ शकते. अर्थात तितकी प्रगल्भता समोरच्या कडे असेल तर आपल व्यक्त न होण सुद्धा लक्षात यायला वेळ लागत नाही.
मतांची प्रगल्भता म्हणजे नुसते विचार प्रगल्भ असून चालत नाही तर कोणत्या पद्धतीने ते मांडले जातात. त्याला कोणत्या शब्दांची जोड दिली जाते ह्यावर खूप काही अवलंबून असते. मत ही आवडणारी असो वा नावडणारी पण त्यांना आपण कस बंदिस्त करतो ह्यावर त्याची दिशा ठरते. फेसबुक वर असल्यापासून अनेक अनुभव आले. कित्येकदा लोक आपल मत लोकांना पटत नाही हा आपला पराभव मानतात. ग्रुप वर असल्यास तिकडून निघून जातात. काही वेळा योग्य हि असेल कारण काही तत्वांशी आपण तडजोड करू शकत नाही. जिकडे वैचारिक मतभेद असतात तिथे आपल शांत रहाण हा आपला पराभव अस बरेच जण मानतात. त्याच वेळी आपल्या मतांना प्रतीउत्तर आल नाही की आपण समोरच्याची कशी जिरवली किंवा युद्धात जिंकलेल्या लढाईच्या विजयश्री उन्मादात अर्ध्या हळकुंडाने अनेक जण पिवळे होतात.
वास्तविक आयुष्यात फेसबुक लाईक, डीसलाईक ह्याचा काहीच उपयोग आपल्याला खऱ्या आयुष्यात होत नाही. आपल वास्तविक आयुष्य आणी आभासी जगातल आयुष्य ह्यातली मंतांची भेळ आपल्याला वेगळी करता यायला हवी. आपले विचार मांडताना, सांगताना किंवा कोणाकडून त्यांचे विचार शिकताना, अवलंबिताना प्रगल्भता खूपच महत्वाची आहे. अगदी साध्या धन्यवाद पासून ते सॉरी पर्यंत सगळ्या बाजूवर विचार करताना शब्दांची बैठक आपल्याला जमवता यायला हवी. कोणाच्या विचारांच्या मागे धावताना आपल्या विचारांशी ते विचार जुळतात का? नसतील जुळत तर ते कसे सांगता येतील? सांगता येणार नसतील तर कस लांब रहाता येईल? जवळची व्यक्ती असेल तर कोणत्या पद्धतीने ते सांगावे लागतील ह्या आणी अश्या अनेक वेगळ्या पातळीवर आपल मत व्यक्त करता येण म्हणजेच मतांची प्रगल्भता.
शब्दांची गुंफण शिकण कठीण नाही. त्यासाठी आपला इगो मात्र बाजूला ठेवायची तयारी हवी. आभासी जग , खर आयुष्य ह्यातला फरक कळायची तयारी हवी. सोप्प नाही पण कठीण पण नाही. संयम हवा. विचार मांडताना समोरच्या बाजूला जाऊन हि एकदा ते बघितले. कि लागणारे काटे स्पष्ट दिसतात. ते तसेच ठेवायचे की त्यांना साफ करायचं हे ठरवायला शिकायचं. ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा ह्या पेक्षा अर्धा कसा भरता येईल ह्याचा विचार आला की मतांची प्रगल्भतेला नक्कीच सुरवात झाली.

No comments:

Post a Comment