Sunday 22 January 2017

श्रद्धा ... विनीत वर्तक
हॉस्पिटल च्या ऑपरेशन वॉड समोर एका बाईच्या येरझारा चालू होत्या. ऑपरेशन रूम मधून डॉक्टर बाहेर पडताच तिच मन अगदी सैरभैर झाल. डॉक्टर आता काय सांगणार? माझ्या मुलाला काय झाल? तो बरा होईल न? बाहेर येताच तिने त्या ज्युनियर डॉक्टर न थांबवून विचारले. डॉक्टर ला ही वस्तुस्तिथी लपवता आली नाही. आलेले शब्द बाहेर पडू नये म्हणून त्याचा आटापिटा चालू होता पण सत्य परिस्थिती सांगावीच लागणार होती. हृदयातील गुंतागुंतीमुळे लहानग्या चा जीव टांगणीला लागला होता. आता काही दिवस, आठवडे हाताशी आहेत अस सांगताना त्याने पुसटसा प्रकाश दाखवला. तो म्हणजे शहरातील ह्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करण्यात प्रख्यात असणाऱ्या डॉक्टर ना दाखवणे.
ज्युनियर डॉक्टर नी तिच्या मुलासाठी स्वताच वजन वापरून मोठ्या डॉक्टर शी सल्लामसलत केली. केस ची गुंतागुंत बघून त्या डॉक्टर ने ही केस हातात घ्यायचं आश्वासन दिल. ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ऑपरेशन रूम च्या बाहेर त्या माउलीच मन काही शांत बसत नव्हत. सतत तेच विचार. आपल बाळ परत चांगल होईल न? आत जाणाऱ्या त्या प्रख्यात डॉक्टर ला तिने थांबवून हाच प्रश्न केला. तेव्हा डॉक्टर कडे ही आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू ह्या शिवाय काहीच उत्तर नव्हत. गुंगीच औषध देण्यागोदर त्या लहानग्या ला डॉक्टर म्हणाले “पठ्या घाबरू नकोस आता हे ऑपरेशन झाल की तू एकदम बरा होशील” वास्तविक ऑपरेशन मधील यशाची हमी अगदी धूसर होती. पण डॉक्टर ला ही काय सांगाव काहीच कळत नव्हते.
डॉक्टर ने हे बोलताच मुलाचा प्रश्न, डॉक्टर मी बरा होईनच पण माझी एक सूचना आहे, “माझ हृद्य तुम्ही उघडणार तेव्हा एक काळजी घ्या की माझ्या हृदयात देव आहे त्याला धक्का नको बसायला. माझी आई सांगते देव माझ्या हृदयात आहे” मुलाच हे बोलण ऐकून डॉक्टर ला ही अश्रू आवरले नाहीत. शस्त्रक्रियेच्या वेळी आपला अवघा अनुभव पणाला लावून ही हृदयातील रक्तस्त्राव थांबत नव्हता शेवटी डॉक्टर नी अर्धवट शस्त्रक्रिया सोडण्याचा निर्णय घेतला. आता काही मिनिटे आणि एक जीव निघून जाईल ह्या विचारात डॉक्टर असताना नर्स ने अचानक रक्तस्त्राव थांबला अशी सूचना दिली. त्या नंतर पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सुरवात करून डॉक्टर नी ती यशस्वी केली. मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याचा पहिला प्रश्न ह्याच डॉक्टर ला होता की डॉक्टर तुम्ही देवाला पाहिलं न, तो कसा दिसत होता? त्याच्या ह्या प्रश्नावर डॉक्टर निरुत्तर झाले. आपल्या अनुभवाने सुद्धा रक्तस्त्राव कसा थांबला अचानक ह्याच उत्तर त्यांना मिळत नव्हते. जिकडे विज्ञानाची कास धरणारा एक डॉक्टर एका माउलीच्या श्रद्धेपुढे हरला होता. त्याच क्षणी डॉक्टर स्वताला सावरून म्हणाले तो न ह्याच माउली सारखा होता.
विज्ञान जिकडे तोकड पडते तिकडे काही प्रश्नाची उत्तर आपण त्याच्यावर सोडतो. त्याला काही नाव द्या देव, डॉक्टर, मसीहा, एंजल , गुरु किंवा अजून काही जी काही असते ती श्रद्धा. कोणती तरी एक शक्ती माझ्या आकलनाच्या पलीकडे कार्यरत आहे ती सगळ समजून घेईल आणि सगळ सुरळीत होईल. जीवन- मरणाचा प्रश्न असो वा आयुष्यातील कठीण निर्णयांचा आपल्यातील एक श्रद्धेचा भाग खूप मोठा न दिसणारा रोल करत असतो. ज्याची उत्तर कोणत्याही विज्ञान किंवा गणिताने देता येत नाही. आस्तिक असो वा नास्तिक पण ती श्रद्धा जर मनापासून असेल तर नक्कीच उत्तर मिळतात.
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की जिकडे काहीच सुचत नाही. पुढच काहीच दिसत नाही. मागे जाव तर काहीच सापडत नाही. अश्या वेळी आपण तुटतो. डळमळीत होतो. कधी कधी तर कोसळतो. पण श्रद्धेवर विश्वास असेल तर अश्या गोष्टीतून तारून जाता येते. आपल्याच मनासारखं होईल अस नाही. पण जे समोर येईल त्याला सामोरी जायची शक्ती श्रद्धेतून मिळते. ती कमी- जास्त असेलही पण ती मिळते हे मात्र नक्की. कोणत्याही हॉस्पिटलच्या दरवाज्याशी बसवलेला गणपती हा दगडाचा असो वा फोटोचा, कातळाचा असो वा संगमवराचा. तो सगळ्यांना मदत करतो का ते माहित नाही. पण त्याच्यावरील श्रद्धा मात्र त्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची सगळ्यांना हिंमत देते ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment