Sunday 22 January 2017

दहावी ई ... विनीत वर्तक
दहावी फ नावाचा एक चित्रपट येऊन गेला. ब्याक बेंचर्स च आयुष्य, त्यांना शाळेत मिळणारी वागणूक, शिक्षकांचा एकूणच अश्या विद्यार्थांकडे किंवा अश्या मागच्या तुकड्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन अस सगळ त्यात दाखवल होत. मग विद्यार्थांकडे एका वेगळ्या दृष्टीतून बघणारा शिक्षक लाभल्यावर त्यांच्यात होणारे ते बदल सगळ स्वतः पण अनुभवल होत. फक्त फ च्या जागी ई हाच तो फरक.
खऱ्या आयुष्यात हि ह्याच अनुभवातून जाताना सगळच खूप जवळून अनुभवल आहे. ब्याक बेंचर्स चा असलेला शिक्का नेहमीच सगळ्या शाळेच्या दिवसात माझ्या कपाळावर लागलेला असायचा. त्या दिवसात त्याची इतकी सवय होती कि त्याचे काही अप्रूप वाटायचं हि सुटल होत. इतक ते भिनल होत कि ते स्वीकारून मग सगळ्याच गोष्टींची तयारी असायची. शाळेच वार्षिक मासिक असो ते शाळेच्या स्पर्धा-परीक्षा किंवा शाळेचे वार्षिक खेळ. वाट्याला येणारी थोडी झुकलेली मानसिकता स्वीकारून ह्या सर्वात भाग घेऊन त्यात सुद्धा आनंदी असायचो. कारण स्पर्धा करण्याची मानसिकता तेव्हा भिनलेलीच नव्हती. जे बाहेर यायचं ते उत्स्फूर्त. झुकत माप अ ला मिळाल ती त्यात भाग घेण्याच समाधान आणि आनंद नेहमीच आम्ही सगळेच अनुभवायचो.
दहावी ई मध्ये मी म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी असलाच प्रकार. अभ्यास तर कोसो लांब असायचा जो काही व्हायचा त्याची सुरवात आमच्यापासून व्हायची. मी आणि इतर काही मित्र – मैत्रिणी म्हणजे ई मधील ३-४ लंगड्या गाई. म्हणजे ओलम्पिक मधील दीपा कर्माकर ची कामगिरी. जगाच्या दृष्टीने तिची कामगिरी बेताची असली तरी भारताच्या दृष्टीने ते अटकेपार झेंडे लावल्याचा अभिमान. दोन्ही गोष्टी तितक्याच सापेक्ष. कोणीच चुकीच किंवा बरोबर नाही. दोन टोकांनवरून गोष्टी बघताना दिसणारा फरक इतकाच काय तो त्यात फरक. फ आणी ई सगळ सेम. शिक्षकांपासून ते विद्यार्थानपर्यंत. तिकडे एक अतुल कुलकर्णी येतो इकडे अजून कोणी पण तेच शिक्षक सर्वांच्या जास्तीत जास्त लक्षात राहिले.
आज अनेक वेळा लोक मला विचारतात कि तु किती हुशार आहेस, लिखाण एवढ समृद्ध आहे, तेव्हा न राहवून मला दहावी ई ची आठवण येते. दहावी च्या प्रिलीम पर्यंत कधी ५०% मोठ्या मुश्किलीने मिळवणारा मी त्यांच्यासमोर हे सत्य सांगतो तेव्हा हे शक्यच नाही. अश्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया असतात. खरे तर विचारांची समृद्धी, आयुष्यातील वाटचाल, विचारांची प्रगल्भता हि कागदी मार्कांवर किंवा मिळवलेल्या टाक्यांवर कधीच अवलंबून नसते. अर्थात चांगल्या शिक्षणाने अनेक संधी उपलब्ध होतात हे जरी खरे असले तरी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा ते क्षेत्र निवडणाऱ्या व्यक्तींना पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही हे वास्तव स्वीकारण्याची मानसिकता अजून आपली झालेली नाही.
सगळेच धीरुबाई अंबानी आणि बिल गेट्स होत नाहीत. पण सगळेच अयशस्वी होतात असे हि नाही. माझ्याच वर्गातील अनेक ई वर्गमित्र आज अनेक क्षेत्रात उच्च पदावर तसेच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात अभिमानास्पद अशी कामगिरी करत आहेत. खरे तर ज्यांच्याकडून कधी अपेक्षा केली गेली नाही ते पण. मग ते राजकारण असो किंवा खेळ, इंजिनिअरींग असो वा आर्किटेक्चर. आपआपल्या क्षेत्रात हि सगळीच मंडळी दादा आहेत खरे तर कांकणभर सरसच. कारण अपयश, झुकलेल माप, तिरसट नजरा ते तुम्ही असेच अशी विशेषण कोळून प्यायलेले अश्या गोष्टी कोर्परेट क्षेत्रात जास्ती चांगल्या पद्धतीने स्वीकारू शकतात. अर्थात काही अपवाद असतील हि. पण कुठेही त्यांच्या वाटेला आलेली ब्याक बेंचर्स ची मानसिकता त्यांना पुढे जाण्यापासून रोखू शकलेली नाही उलट त्यांच्या प्रगतीत एक मैलाचा दगड ठरलेली आहे. निदान माझ्या तरी.
आयुष्यातील यश – अपयश मार्कांच्या आणी सर्टिफिकेट च्या तराजूत तोलणाऱ्या पालकांनी मुलांना उमलायला मदत करा. त्याच उमलण तो किंवा ती कोणत्या शाळेत, वर्गात शिकतो ह्यावर अवलंबून नसून आयुष्याच्या अश्या अनुभवांना तो किती सामोरा / सामोरी जाते ह्यावर अवलंबून आहे. मार्कांच्या – इयत्तेवरून मुलाचं बौद्धिक मुल्यांकन कधीच बरोबर नसते. शाळेतील पहिल्या, दुसऱ्या नंबर ला व तिकडे मिळालेल्या टक्यांना पुढील आयुष्यात कोणी विचारत नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेल्यावर ती आवड नेहमीच सगळ्या अडचणीतून तारून नेते असा माझा तरी अनुभव आहे. म्हणून अभ्यास न करणे हि सबब नाही होऊ शकत. आपल्या कुवतीनुसार प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत आणि करायला हवेत. फक्त प्रयत्नांची तुलना दहावी ई वरून होऊ नये इतकीच काळजी पालक म्हणून आपण घेतलीच पाहिजे.

No comments:

Post a Comment