Sunday 22 January 2017

गावच घर... विनीत वर्तक
गावच घर नेहमीच सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय राहील आहे. गाव ही संकल्पना इतकी सुंदर आहे की त्याच्या आठवणीने खूप सारे क्षण जागे होतात. कोकण हा तर निसर्गाचा वरदहस्त लाभलेला भाग. ह्याच भागातून कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा इतर अनेक कारणांसाठी लोक मुंबईला आले. त्याच्या पुढल्या पिढीने श्वास घेतला तो मुंबईतच. जुन्या पिढीसाठी मात्र एक आयुष्य गावातल तर एक मुंबईतल असच नेहमी राहील. गावच्या त्या कठीण, अगदी गरीब परिस्थितीतून मार्ग काढत ह्या न झोपणाऱ्या मुंबापुरीत आपल स्वताच अस्तित्व निर्माण करण्यात एक पिढी गेलीच.
नेहमीच गावचा विषय निघाला की पूर्वी गावी अस होत तस होत हे आपण आजही आपल्या आई-वडिलांच्या तोंडून नेहमी ऐकतो. आयुष्याची २०-३० वर्ष गेलेल्या ठिकाणी आणी स्पेशली जिकडे बालपण गेल. त्या जागेचा नेहमीच एक वेगळा ठप्पा त्यांच्या मनावर कोरून ठेवला आहे. गावच घर, शेती, लोक, सण – समारंभ ते गोंधळ सगळच कस आत्ता घडून गेल अस. गरीब परिस्थिती असून सुद्धा शेती करून आमच्या पिढीच्या आजी- आजोबांनी आमच्या आई- वडिलांना शिकवण्याचे किस्से तर अनेक घरात आजही सांगितले जातात. ते किस्से खरे आणी त्यातले कष्ट वेगळेच होते. आजची पिढी थोडाफार अंदाज तरी लावू शकेल पण आमच्या पुढे येणारी पिढी तर गाव काय? असाच प्रश्न विचारते आहे.
माझ्या पिढीसाठी संक्रमणाचा काळ होता. जन्म, शिक्षण, मित्र- मैत्रिणी मुंबईच्या तर सुट्टी, गणपती , होळी सारखे सण गावी. सुट्टीतले मित्र – मैत्रिणी एक तर बाकीच्या काळातले एक. एकीकडे शहरातील मिश्र पद्धतीशी जुळवून घेताना आपल्या मुळांशी जोडून राहण्याचा प्रयत्न. खरे तर बहुतेक वेळा गावी आपल्या शहराच्या मोठेपणाचा खोटा आव दाखवण्यात माझ्या पिढीतील अनेकांचे श्रम वाया गेले. गावातील वातावरण, तिथला निसर्ग खरे तर आपल्या समोर हात जोडून उभा असताना तो अनुभवण्याची संधी अनेकांनी दवडली ह्यात शंका नाही.
माझ गाव तर मुंबईला खेटून त्यामुळे मुंबईच्या बदलांचे वारे तिकडे लवकर पोहचले. आधुनिकीकरण ते शहरीकरण दोन्ही अगदी वेगातच. प्रवासाचा पल्ला हि छोटाच. २ तासात इकडून तिकडे तर तिकडून इकडे. त्यामुळे गाव ही संकल्पना मला तितकीशी अनुभवता आली नाही हे हि खरच. सगळ असून सुद्धा सण – समारंभाला आख्या कुटुंबाच एकत्र येण. सख्या- चुलत भाऊ बहिणीशी मज्जा करत अनुभवलेले ते क्षण अविस्मरणीय असेच आहेत.
तांदळाच्या कणग्यान मध्ये केलेला लपाछुपी चा खेळ. ते दरवर्षी काथ्याचा बांधलेला झोपाळा. जो अनेकदा तुटायचा आणी अनेकदा त्यावर झुलताना पायाने केलेला आवाज सगळच वेचून ठेवाव अस. त्यावर कढी असेल ती समुद्राची आणी तिकडे मिळणाऱ्या त्या छोट्या वड्यांची. अगदी हाकेच्या अंतरावर असलेला समुद्र त्यात कातळाने वेढलेला समुद्र किनारा ह्यामुळे पायाला होणाऱ्या जखमा सगळच चालून जायचं. बैलगाडीतून केलेला प्रवास ते आजोबांकडून बैलगाडी चालवायच घेतलेल तुटक शिक्षण अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात अगदी ताजतवान आहे. सगळ्यात मज्जा असेल ते जेवण. मातीच्या भांड्यात केलेलं. आजीच्या हातच चिकन आणी तीच ती वाल शेंग्याची परमोच्च भाजी खाण म्हणजे शेवटच्या टप्यातील सर केलेले शिखर होते. आजी- आजोबांच्या सानिध्यात आपल्या तब्बल ६ मुलांच्या वेगवेगळ्या नातवंडानी एकत्र येण किती त्रासदायक असू शकेल ह्याची कल्पना तेच करू जाणे.
आज पुन्हा एकदा गावच्या घरी गेलो तेव्हा ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. एकेकाळी जिकडे बैलगाडी उभी रहायची तिकडे आपली स्वताची गाडी उभी असतानाचा क्षण टिपला. किती बदलेल्या काळातून आपण आज इथवर आलो त्याच एक द्योतक माझ्यासाठी होत. आज घर तेच आहे, समुद्र तोच आहे, गाव पण तेच आहे पण बदलली ती माणस. एकेकाळी तब्बल ६ वेगवेगळ्या कुटुंबांनी गजबजलेल घर शांत वाटल. आजी- आजोबा फोटोतून माझ्याकडे बघत होते. मी मात्र त्यांच्याकडे बघून गावच घर शोधत होतो.

No comments:

Post a Comment