पर्च... विनीत वर्तक
राधिका आपटे च्या बोल्ड सीन मुळे पर्च तसा आधीच चर्चेत आला होता. पण मुळात कथानक कस असेल ह्याबद्दल जास्ती उत्सुकता होती. लीना यादव च डायरेक्शन अजय देवगण च प्रोडक्टशन व ह्या सोबत आय.एम.डी.बी. च ७.५ रेटिंग आणि टाईम्स च ४.५ तारे व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १८ पदक ह्यामुळे ती उत्सुकता अजून ताणली गेली होती. २१ व्या शतकात डिजिटल भारत बघताना अजूनही भारताच्या काही भागात आपण खूप खूप मागे आहोत ह्याची जाणीव करून देणारा व स्त्री, तिच्या भावना, तीच स्वातंत्र्य, तिची माणूस म्हणून जगण्याची गरज, पुरुषांसोबतची बरोबरी ह्या सगळ्याच बाबतीत आपण खूप मागे आहोत हे सांगणारा. ज्या देशात वात्सायन सारखे ग्रंथ, खजुराहो सारखी सुंदर मंदिर घडवली जातात त्याच देशात सेक्स ह्या मूळ भावनेबद्दल अजून किती पल्ला गाठायचा आहे ह्याच्यावर भाष्य करणारा एक अप्रतिम चित्रपट म्हणजे पर्च.
कथानक ५ स्त्रीयांन पासून सुरु होते. एक जी बदलेल्या भारतातून इतिहासात जगणाऱ्या भारतात आली आहे. त्या इतिहासात स्त्री ला तिचा मानसन्मान देण्यासाठी धडपडते आहे. दुसरी जी वयाच्या १४-१५ व्या वर्षी लग्न होऊन एका मुलाची आई होऊन ३२ व्या वर्षी विधवेचे आयुष्य जगते आहे. समाजाच्या रिती मद्धे तिच्या स्वताच्या भावना, गरजा काबूत ठेवताना होणारी घुसमट भारतीय स्त्री च्या अनेक घरातील मनातील द्वंद उघडेपणाने मांडते. तिसरी जी पुरुषाच्या हवस ची शिकार लहानपणीच झाली. वैश्या म्हणून आयुष्य काढताना आणि अनेक पुरुषांसोबत शय्या करताना तिच्या मनाला होणाऱ्या वेदना व त्याच वेळी पुरूषांच्या नागड्या अत्याचाराच्या अनेक आठवणी सोबत घेऊन होणारा तिचा प्रवास. चौथी जी पुरुषाच्या अत्याचाराला बळी पडली आहे. बाझं किंवा मुल होत नाही म्हणून समाजाच्या तिरस्कारमद्धे आयुष्य काढताना त्या वेळी नवऱ्याकडून होणाऱ्या शारीरिक यातना निमुटपणे भोगणारी. पाचवी म्हणजे अवघी १४-१५ वर्षाची मुलगी. नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली. तीच निर्व्याज प्रेम आणि १५ व्या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकून दुसऱ्या घरात आलेली.
स्त्री च्या सगळ्याच वेगवेगळ्या अनुभवांवर भाष्य करणारा पर्च मला तरी पूर्ण निशब्द करून गेला. पुरुष असण्याचा अभिमान तर सोडाच पण त्याची कीव यावी इतक नागड सत्य पर्च समोर ठेवतो तेव्हा आपण खूप मागे आहोत ह्याची जाणीव होतेच. पण लाज ही वाटते. पुरुषी लिंगाचा माज बाळगणाऱ्या समाजाने सगळ्या शिव्या पण स्त्री वर आधारित ठेवल्या आहेत. हे सत्य जेव्हा पर्च मांडतो तेव्हा हा पुरुषी अहंकार, लिंगाचा अहंकार किती तोकडा आहे ह्याची जाणीव होते. लिंगाच्या जोरावर पुरूष सगळ काही करू शकतो हा माज समाजाने पुरुषाला दिला आहे. हाच समाज जेव्हा स्त्री च्या अधिकाराविषयी निद्रिस्त होतो तेव्हा आपण कोणत्या संस्कृतीचे गोडवे गातो आहोत हा प्रश्न आल्याशिवाय रहात नाही.
सेक्स हा तर अजूनही आपल्याला न कळलेला आहे. लिंगाच्या योनी प्रवेशापलीकडे सेक्स असतो हे अजूनही भारतातल्या अनेक पुरुषांना माहित नसेल. जेव्हा एक वैश्या तिला उपभोगलेल्या अनेक पुरुषांपेकी कोणी सगळ्यात जास्ती आनंद दिला ह्याचा विचार करते तेव्हा तो पुरुष हा योनी पलीकडे भावना समजणारा असतो. मला वाटते पर्च चा तो परमोच्च क्षण आहे. हीच वैश्या जेव्हा आपल्या मैत्रिणीची कूस उगवण्यासाठी त्याच माणसाची निवड करते. तेव्हा सेक्स हा शरीराच्या लिंगात नसून मेंदूत असतो हे जळजळीत सत्य समोर येते. राधिका आपटे आणि अदिल हुसेन प्रणय करतात. तेव्हा जवळपास प्रत्येक पुरूषाच लक्ष राधिका ने दिलेल्या बोल्ड सीन कडे असेल. पण मला आवडलेला सगळ्यात अतुच्य क्षण म्हणजे त्याने केलेला नमस्कार. प्रणय करण्याआधी तो तिचे पाय पकडून नमस्कार करतो. जणू काही ती एक साधना आहे. ती सुरु करण्यापूर्वी ती संधी दिल्याबद्दल तिचे आभार मानतो. त्या सीन मधील राधिका आपटे च्या शरीरापलीकडे बघण्यासारख बरच काही आहे. ते स्पर्श, ते बिथरण, ती नजाकत हे शिकण आहे. मला वाटते त्या सेक्स पेक्षा स्त्री ला परमोच्च स्थानी नेणाऱ्या ह्याच भावना आहेत. पण छाती आणि दोन पायांच्या मद्धे अडकलेली नजर पर्च मध्ये हे बघू शकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे.
पुरुषी अत्याचार आणि स्पर्शाच्या भावनांपासून कित्येक वर्ष लांब राहिलेल्या दोन स्त्रिया जेव्हा तोच स्पर्श, त्याच भावना एकमेकिंकडून मिळवतात. तेव्हा त्यांना कोणत्या लिंगाची गरज लागत नाही. हे कटू सत्य मांडताना दोन्ही कलाकारांनी त्या सीन मध्ये जीव ओतला आहे. मोबाईलच्या व्हायब्रेटर चा वापर मोठ्या खुबीने दिग्दर्शकाने केला आहे. एका सीन मद्धे स्त्रियांच्या शारीरिक गरजा दाखवण्यात किंवा ते पूर्ण करण्यात वेगळे रस्ते पण आहेत हे खूप सुंदर रित्या मांडल आहे. वासना,लस्ट ह्या पलीकडे पुरुष खूप काही स्त्री ला देऊ शकतो. स्त्री ला हि ते हव असते. भावनिक आधार तर आलाच पण शारीरिक पातळी वर हि स्त्री च्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात हे ज्या पुरुषाला कळते. तोच तिच्या साठी तिचा शाहरुख, आमीर आणि सलमान खान असतो.
तीन खान आणि युरोप च्या सीन मद्धे रमून गाणारा हिरो आणि नायिका ह्यांच्या पलीकडे हिंदी चित्रपट जात नाही. ह्याला एक कारण आपण प्रेक्षक पण आहोत. इकडे प्रेमाच्या नावाचे टुकार सिनेमे करोडो कमावतात. पण स्त्री च्या आयुष्यावर, भावनांवर, समाजावर भाष्य करणारा पर्च सारखा अतिसुंदर चित्रपट कधी येतो आणि कधी जातो कळत पण नाही. पर्च बघाच कशासाठी तर स्त्री ला ओळखण्यासाठी. त्यासाठी कोणता ग्रंथ वाचण्याची गरज नाही. पण असे वेगळे चित्रपट स्त्री ला समजून घेण्यासाठी खूप काही मदत करू शकतात. सर्वच कलाकारांच अभिनंदन एक परिपूर्ण पण त्याच वेळी सत्याचे चिमटे काढणारी कलाकृती साकारल्याबद्दल.
No comments:
Post a Comment