Sunday 22 January 2017

डिव्हाईन प्रेम / संसार ... विनीत वर्तक
परवा झी मराठी चा आस्वाद घेण्यापलीकडे पर्याय उरला नव्हता. खरे तर मी तसा टीव्ही फार कमी बघतो. त्यात मालिका आणि कार्यक्रम लागले कि उठून पलीकडे जाण्याचा सोप्पा मार्ग स्वीकारतो. एकतर कोणाच्या इच्छेला मुरड घालत नाही आणि आपल्या डोक्याचा शॉट होत नाही. त्यातल्या त्यात होममिनिस्टर हा कार्यक्रम आदेश बांदेकर च्या रुचकर संवादांनी खुलतो. खरे तर कधी कधी अश्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नात्यांचे अनेक पदर समोर येतात आणि त्यात खूप काही शिकण्यासारख असते.
परवा जो कार्यक्रम झाला त्यात जी जोडी होती ती मोठी विलक्षण होती. बायको श्रीलंकन नवरा महाराष्ट्रीयन. दोघे भेटले ते एका तिसऱ्या आखाती देशात. नोकरीच्या निमित्ताने बहरीन ला झालेली भेट हळू हळू प्रेमात रुपांतरीत झाली. मग परत आपले ते दोघे आप आपल्या देशांना रवाना झाले. पण प्रेमाची ओढ, जाणवलेली अनुभूती स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी तिने ठरवलं काही झाल तरी आपल प्रेम आपण मिळवायचं. ती निघाली एकटीच. बहिणीने परतीच तिकीट करून दिल. नाही जमल तर परत याव म्हणून. कोण, कुठला, कुठे रहातो, त्याच्या सोबत कोण? त्याने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या कि खोट्या ह्याची कोणतीच शाश्वती नसताना तिने पाउल टाकले. अंगठीच्या आत लपवलेला पत्ता घेऊन ती मुंबई विमानतळावर उतरली. जिवाभावाची भारतीय एअर होस्टेस ने जाणीवीपलीकडे मदत केली. ट्याक्सी पकडून दिली तिला. काही टिप्स दिल्या. मग काय होते हि धडकली ती डायरेक्ट बोरीवली ला त्याच्या घरी.
क्यारम खेळत असताना ट्याक्सी वाल्याने पत्ता विचारला तो नेमका त्याला. पत्यावरची अक्षरे त्याने ओळखली आणि मग आठवले कि हे तर आपलेच अक्षर. आत बघितले तर ती बसली होती. ब्याग घेऊनच इकडे शेवटपर्यंत राहण्याच्या इराद्याने. आता मात्र खरी लढाई होती. घराच्या दारावर तिसऱ्या देशात फुललेल्या प्रेमाला बघताना व कसलीच कल्पना नसताना त्याच्या पायाखालीची वाळू सरकली नसेल तर नवलच. पण त्याने हि तिला साथ दिली अश्या वेळी डगमगून न जाता तो तिच्या सोबत उभा राहिला. तिच्या धड्साच कौतुक करताना विवाह बंधनात बांधताना तिच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवल. नुसत उतरवल नाही तर तब्बल २४ वर्ष हा सुखाचा संसार चालू आहे.
कोणत्या हि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ला लाजवेल अशी हि प्रेम कहाणी ऐकताना खूप काही हाताशी लागल. आजच्या युगात अतिशय विरळाने अनुभवास येणार डिव्हाईन प्रेम. डिव्हाईन रिलेशन. आपल्याला काही हव आहे तर त्या साठी सगळ्या चौकटी मोडण्याची केलेली तयारी पण ते करताना केलेला वास्तववादी विचार. २४ वर्षापूर्वी फोन नसताना पोलीस स्टेशन च्या फोन चा आसरा घेऊन केलेल्या संवादात सुद्धा लंकेतून भारतात येण्यासाठी सेतू पार करण्याची ताकद होती. त्याने व्यक्त केलेल्या प्रेमात तो विश्वास होता. तिच्या प्रेमात स्वताला सावरून घेण्याची ताकद त्याच्याकडे होती. किती जण हे करू शकले असते. मी क्षणभर विचार केला अशी कोणी माझ्या दारात उभी राहिली तर मी तिला माझ्या घरच्यांसमोर नेऊ शकेन का? सर्वांची समजूत काढून लग्न करू शकलो असतो का? किंवा तिच्या भूमिकेत जाताना मी इतक मोठ पाउल उचलल असत का? माझ्या बहिणीने- भावाने ती मदत केली असती का? प्रेम हे १० वेळा आय लव यु बोलून सिद्ध होत नाही न? ते आतून याव लागत आणि जेव्हा ते येत तेव्हा ते इतक डिव्हाईन असायला हव.
२४ वर्षाच्या संसारात ती अस्खलित मराठी बोलते. पण घरात ते श्रीलंकन भाषा बोलतात. एकमेकांच्या आवडी निवडी हि तश्याच जपल्या आहेत. क्रिकेट ची म्याच असेल तर तो भारताला तर ती श्रीलंकेला सपोर्ट करते. घरात सर्वाना दोन्ही भाषा येतात म्हणजे भारतीय आणि श्रीलंकन. इकडे राहताना ती साडी नेसून राहते तर श्रीलंकेला २१ वर्षांनी गेल्यावर तिथल्या ड्रेस प्रमाणे. प्रेमात अपेक्षा येतात, उपेक्षा होते, अट्टाहास असतो, समजून घेण अपेक्षित असते. पण डिव्हाईन प्रेमात हे सगळ गळून पडते. काही सांगायची गरज नाही. सगळ आपोआप समजते. तिकडे असते ती साथ नेहमीच सगळ्याच बाबतीत. बाकी काही नसते. सगळ मग जुळून येते. तेव्हा नुसते पाळणे नाही हलत तर संसार होतात.
त्या डिव्हाईन प्रेमाच्या आणि डिव्हाईन संसाराच्या अदभूत जोडीला माझा दंडवत. तुम्ही पैठणी नाही जिंकलीत तर मने जिंकलीत. तुमच्या ह्या प्रेमात खूप काही आहे शिकण्यासारख , समजून घेण्यासारखं बघत ते शिकायला आणि समजून घ्यायला मनाची कवाड मात्र उघडी हवीत. माझ्या मते बांदेकरांच्या १० वर्षापेक्षा जास्ती असलेल्या होममिनिस्टर च्या कालावधीत हा भाग सर्वात अविस्मरणीय असेल ह्यात शंका नाही.

No comments:

Post a Comment