अर्धसत्य... विनीत वर्तक
सुतार पक्ष्याची एक सुंदर कथा आहे. त्यात त्याला वाटते की आपल्या चोचीने तो कोणतही झाड पोखरू शकतो. तो समुद्रावरील सगळ्यात उंच अस नारळाच झाड शोधून ते पोखरायला सुरवात करतो. ह्याच उद्देशाने की आपण ह्या झाडाला पोखरून खाली पाडू. दिवसांमागून दिवस जातात तो न थकता एकाच उद्देशाने, एकाच ध्येयाने ते झाड पोखरत रहातो. एके दिवशी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्या क्षेत्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते. अतिशय वेगात वारे वाहू लागतात. ह्या सगळ्यात पक्ष्याच्या पोखरण्यामुळे आधीच कमकुवत झालेलं झाड धराशाई होते. पक्ष्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपण करून दाखवल. आपल्या मेहनतीनेच आपण हे साध्य केल. असच त्याला वाटू लागते. खरे तर झाड कोसळायला कारणीभूत असते ते कमी कमी दाबाचा पट्टा, त्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ आणी वारे. नक्कीच पक्ष्याच्या पोखरण्यामुळे ते झाड कमकुवत झालेले असते. पण अर्ध्या हळकुंडाने पक्षी पिवळा होतो.
आपण ही असेच वागतो की आयुष्यातील यश हे मीच मिळवले. माझीच मेहनत, मीच तो क्रीयेटर ह्या अविर्भावात अनेक जण असतात. खरे तर आपली मेहनत किंवा आपली इच्छा त्या मागे असली तरी चक्रीवादळ आणी वाऱ्या सारख्या अनेक गोष्टी ज्या आपल्या मनाला माहित नसतात त्या पण तितक्याच कारणीभूत असतात. प्रत्येक मी च्या मागे परिस्थिती, त्याच्या आयुष्यातील माणस, वेळ, आणी काही आकलन पलीकडच्या गोष्टी कार्यरत असतात. पण आपल मन नेहमीच आपल्याला अर्धसत्य दाखवते. अनेक अपयश्याच्या क्षणी पण हीच परिस्थिती अगदी उलट्या रीतीने घडत असते. पण आपल मन मात्र स्वताला कोसते. माझ्यामुळे सगळ झाल. किंवा मीच कारणीभूत. प्रत्यक्षात तेव्हा सुद्धा मन आपल्याला अर्धसत्य दाखवते.
अर्धसत्या मुळे यशाच्या क्षणी मन आपल्याला अतिशय उंच तर अपयशाच्या क्षणी दरीत लोटते. असे प्रसंग आपल्या आयुष्यात सतत घडत असतात. चांगल – वाईट एकामागून एक. प्रत्येक वेळी दोन्ही टोक गाठताना आपल मन नेहमीच अस्थिर रहाते. आयुष्यातील कोणताही क्षण घ्या, नातेसंबंध घ्या, त्रास, आनंद सगळच ह्या अर्धसत्या वर आधारित असते. त्यामुळे आपल आकलन कोणत्याही गोष्टीच हे ह्या अर्धसत्या वर आधारित रहाते. त्यामुळेच मन हे आयुष्यभर अस्थिर रहाते.
ह्या अर्धसत्या ला काही उपाय आहे का? असा विचार केला तर नक्कीच आहे. तो म्हणजे परिस्थितीच आकलन. म्हणजे कोणत्याही यश, अपयश, नातेसंबंध ह्या सगळ्यात जे आपल्या समोर येत ते नेहमीच अर्धसत्य असते ही जाणीव. आपण बघतो, विचार करतो त्या पेक्षा कित्येक पटींनी गोष्टी वेगळ्या असू शकतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच घटना ह्या अर्धसत्य घेऊनच आपल्या पर्यंत येतात ही समज. कोणीतरी आपल्याशी अस का वागल? ह्याच्या साठी आपण समजून घेऊ शकू ह्यापेक्षा ही वेगळ्या घटना कारणीभूत असू शकतात. आपल्या यश – अपयशामद्धे आपल्या खेरीच अनेक गोष्टी सहभागी असू शकतात. मग ती लोक असतील, परिस्थिती असेल, वेळ असेल किंवा इतर काही.
अर्धसत्या ची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण आपल्या सोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी कडे बिग पिक्चर ने बघू शकतो. माझ्या समोर आलेल्या किंवा आकलन झालेल्या गोष्टीनी त्या पांढऱ्या क्यानवर्स चा छोटा भाग व्यापला आहे. त्याच्या शिवाय अजून बराच पांढरा क्यानवर्स मोकळा आहे हीच ती जाणीव. जेव्हा ही जाणीव पचवण्याची आपली तयारी असते. तेव्हा प्रत्येक गोष्टींकडे आपण वेगळ्याच नजरेने बघू शकतो. मीच का? माझ्याच बाबतीत का? सगळ माझ्यामुळे? मीच तो? ह्या टोकाच्या भुमिकेमद्धे आपण जात नाही. आपल मन हे नेहमीच आपल्याला अर्धसत्य सांगते. ते पचवण्याची ताकद आपल्यात आली की उरलेल्या अर्धसत्या पलीकडे आपला प्रवास सुरु होतो व मनाचा स्थिरतेकडे.
No comments:
Post a Comment