माझी दिवाळी..
फेसबुक वर सगळ्यांचे छान छान फोटो बघून खूप छान वाटल. दिवाळी च्या निमित्ताने सगळे आप आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करताना मस्त वाटल. दिवाळीच्या दिवशीच ओफशोअर ला जाव लागल्याने मन थोड खट्टू होत. नको तेव्हा चॉपर उडत नाही. दिवाळीच्या दिवशी पण न चुकता सगळ्या पायलट नी हजेरी लावली आणी घरी दिवाळी साजरी करण्याची छोटी मोठी आशा हि मालवली.
असही गेल्या कित्येक वर्षात ज्या वेळेस घरी त्या दिवशी दिवाळी असते. तरीपण अश्या दिवशी घरातून बाहेर पडलो की थोडी चुटूक ही लागतेच. सगळ्याचे फोटो बघून निदान एका गोष्टीच समाधान वाटते की जीवनासाठी तीन मुलभूत गरजा सगळ्यांच्या पूर्ण आहेत. आजूबाजूला अनेक लोक असे आहेत की ह्या तीन गोष्टींसाठी त्याचं आयुष्य पूर्ण संपून जाते. मला अजून आठवते लहानपणी दिवाळी ची सुट्टी म्हणजे नवीन गोष्टीचा खरेदीचे दिवस.
आलेल्या पगारात घर चालवताना दिवाळी म्हणजे हौसेने नवीन कपडे, घरातील वस्तू आणताना एक वेगळीच मज्जा असायची. मॉल संस्कृती मुळे आता ती मज्जा गायब झाली आहे. वर्षभर चालणारे सेल आणी वेळ घालवण्यासाठी मॉल जवळचे असल्यामुळे खरेदी साठी हक्काच असा वेळ पण आता कालबाह्य होऊ लागला आहे. दिवाळीचे पदार्थ आता रेडीमेड मिळू लागल्याने घरी बनवण्याची कसरत कमी झाली. पण त्याच सोबत खायची इच्छा ही. नाही का?
आनंद साजरा करतानाच आयुष्यात खूप काही मिळाल निदान बेसिक तीन गरजांवर आयुष्य अवलंबून राहील नाही ह्यासाठी नेहमीच त्याचे आभार मानतो. समाजातील ह्या तीन गोष्टींसाठी दररोज झगडणाऱ्या लोकांमद्धे जेव्हा गेलो. तेव्हा आपण किती लकी आहोत ते समजल. जास्ती दूर नाही पण आपल्याच आजूबाजूला अनेक जण असे आहेत की जे अजूनही हे धक्के खात आहेत. आपण काही करू नाही शकलो तरी निदान एक्स्ट्रा शेअर तर करूच शकतो अर्थात ते हि राहिलेलं नाही. तर आपण स्वताला त्यातल एक मानल तर.
सामाजिक कार्य वगरे बरेच मोठे शब्द आहेत. ते करायचं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न पण आपल्या आनंदाचे क्षण वाटू शकलो तर त्या डोळ्यात दिसणारी चमक आपली दिवाळी द्विगुणीत करेल ह्यात शंका नाही. कधी, कोणी, कस आणी का? ह्या सर्व क ची उत्तर आपणच शोधायची. कारण येणारी उत्तर आणी पडलेले प्रश्न हे शेवटी आपल्यालाच शोधायचे असतात नाही का?
संध्याकाळी हेलीडेक वरून दूरवर त्या शांत समुद्राकडे बघताना घरच्या आठवणीने थोड एकट वाटल. आपण एकटेच एकटे नाही न. आपल्यासारखेच कित्येक जण आज ह्या दिवाळी पासून एकटे असतील हे मनात जेव्हा उमगल तेव्हा स्मितहास्य करून पुढल्या कामाला लागलो. दिवाळी आली आणी जाईल पण. राहतील त्या आठवणी गेले ते क्षण. नाही का? ह्या आनंदाच्या दिवशी सगळ्यांच्या आयुष्यात हे क्षण येऊ नये हीच इच्छा.
चिअर्स ..
विनीत.
No comments:
Post a Comment