Sunday 22 January 2017

एक प्रयोग... विनीत वर्तक
१९ फेब्रुवारी २००९ हा दिवस माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस आहे अस मलाच स्वताला आत्ता कळल. कारण म्हणजे ज्या पायरीने माझ्या मधील लेखन कलेला जागृत केल त्या पायरीचा स्पर्श मी ह्याच दिवशी केला होता. ह्याच दिवशी मी माझ फेसबुक अकौंट सुरु केल. २००९ ते २०१७ ह्या जवळपास ८ वर्षाच्या कालखंडात मी सुट्टी कधी घेतलीच नाही. फेसबुक च व्यसन म्हणा किंवा माझ्या एकटेपणाच औषध म्हणा ते सुरूच राहील. पण २०१६ साली मी ठरवलं की एक प्रयोग करायचा घ्यायची सुट्टी अगदी महिनाभर बघू काय होते ते?
प्रयोग करायचा हे कधीपासून मनात होतच पण वेळ जुळून येत नव्हती. या न त्या कारणाने त्याचा मुहूर्त पुढे जात होता. नोव्हेंबर महिन्यात काही गोष्टींमुळे अतिशय अस्वस्थ झालो. ह्याला कारण ही फेसबुक होत. थांबण्याची वेळ आली होती. मग घेतला निर्णय आणी थांबलो काही दिवस. पहिल्यांदा पचवण अवघड गेल. इतके वर्षाची कनेक्ट राहण्याची सवय कुठेतरी अस्वस्थ करत होती. सतत अपडेट्स, कमेंट्स, स्टेटस आणी त्यावर माझे व्यू. जेव्हा सुरवात केली तेव्हा फेसबुक ने झपाटून टाकल होत. स्वताला मोकळ होण्याच माध्यमाने मला कधी जाळ्यात ओढलं कळलच नाही. प्रत्येक गोष्टीवर मत मांडताना आपण अनेक गोष्टीनंमध्ये उगाचच नाक खुपसतो आहोत किंवा तिथल्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम जेव्हा माझ्या खऱ्या आयुष्यात होऊ लागला. तेव्हा डिजिटल डीटोक्स चे विचार येऊ लागले. एकदा शांतपणे बंद करून मग सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयोग केला.
थांबलो. मागे वळून बघितलं. खूप काही हाताशी लागल पण हातातून काय निसटल ते ही कळल. इतके दिवसात अनेक नको त्या गोष्टी आयुष्यात अस्थिरता निर्माण करत होत्या. ज्या गोष्टींचा माझ्याशी काही संबंध नव्हता अश्या गोष्टी अप्रत्यक्षपणे स्ट्रेस निर्माण करत होत्या. माहितीजालात गुंतून जाताना अनेक विचार , गोष्टी, भावना सगळ्याच कुठेतरी मला स्वताला माझ्यापासून लांब नेत होत्या. जेव्हा थांबलो तेव्हा हे कुठेतरी लक्षात आल. सतत भरलेल मन थोड रिकामी राहायला लागल. ह्याचा परिणाम चांगलाच झाला. कुठेतरी माझ्या विचारांचा रस्ता मी शोधायला लागलो. गेले अनेक वर्ष स्वताकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. त्या रिकाम्या पोकळीमुळे मला स्वताकडे बघता आल. स्वताला शोधता आल. अनेक नवीन गोष्टी चालू केल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे त्याचे परिणाम चांगलेच आले.
पण हे सगळ करताना स्वतातील लेखक मात्र हरवून बसलो होतो. म्हणजे लिहण्याची खुमखुमी स्वस्थ बसून देत नव्हती. पण माझ लिखाण हे फेसबुक वर बांधल्या गेलेल्या विचारांनीच कुठेतरी बाहेर येत होत. ह्या प्रयोगात हे अनुमान नक्की झाल. त्यामुळे पुन्हा आपल्यातील एका चांगल्या गुणाला कुठेतरी आपण गमावून बसतो आहे की काय? अशी भीती पण वाटली. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आणी कोणत्याही गोष्टीपासून एकदम तोडण दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. ह्यातला सुवर्णमध्य जर साधता आला तर दोन्ही कडच्या अनेक गोष्टी मिळवता येतील. म्हणून आता ठरवलं की ९०% लक्ष स्वताकडे तर १०% सोशल मिडिया कडे. हे तुलनात्मक प्रमाण शक्य तितक संतुलित ठेवायचं. शाळेत असताना प्रयोग झाला की प्रयोगाची करण्याची कारण, प्रयोग ची पद्धत व त्या नंतर अनुमान, निष्कर्ष लिहण्याची एक पद्धत होती. तीच ह्या प्रयोगात मी वापरली. असे प्रयोग पुन्हा करण्याचं ठरवून निष्कर्षांवर काम हाती घेतल. बघा तुम्ही पण असा एखादा प्रयोग करून कदाचित हरवलेल्या अनेक गोष्टींचा ठाव मिळेल.

No comments:

Post a Comment