Sunday 22 January 2017

गेल्या आठवड्यात अचानक फोन खणखणला तेव्हा मिलिंद पुराणिक चा अमेरिकेचा नंबर बघून थोडासा आश्चर्यचकित आणि थोडासा टेन्शन मध्ये हि होतो. मिलिंद ने माझ्या लिखाणावर प्रभावित होऊन त्याच कार्य शब्दात मांडण्याची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली. आजवर लिखाण हे माझ्या विचारांशी निगडीत होत. पण कोणाच्या तरी मनात असलेल स्वताच्या शब्दात उतरवण्याची माझी पहिलीच वेळ होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी त्याने अमेरिकेत राहून केलेलं कार्य तर खूप मोठ आहेच. पण तो सर्व प्रवास माझ्या शब्दातून मांडण्यासाठी ते समजण खूप कठीण त्याहून ते ५०० शब्दात उभ करण अजून कठीण. मिलिंद च्या इतक्या रिक्वेस्ट नंतर मला त्याला नाही म्हणणं शक्य झाल नाही. एका रात्रीत त्याने केलेला प्रवास मी त्याला शब्दात मांडून पाठवून दिला.
त्याच्या रिप्लाय बघून मला खूप छान वाटल. खरे तर त्याचा प्रवास प्रत्येकाने वाचवा असाच आहे. अमेरिकेत राहून सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य आपल्या सर्वाना प्रेरणा देईल असेच आहे. त्याच्या अश्या प्रचंड मोठ्या कार्याला माझ्या शब्दात मांडण्याचा हा छोटा प्रयत्न..
उडान ची भरारी... मिलिंद पुराणिक
सातासमुद्रापार गेलो तरी जशी आईची मुलाशी जन्म देताना जुळलेली नाळ कापली तरी ती ओढ , त्या भावना, ते नात चिरंतर टिकून रहाते तसच माझ माझ्या मातृभूमीशी. भारत जन्मभूमी आणि अमेरिका कर्मभूमी असताना सुद्धा ती मातृभूमीशी जुळलेली नाळ टिकून राहिली. महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येने अमेरिकेत सुद्धा विचलित व्हायला होत होत. मग आपण काहीतरी करू शकतो का? ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना मी व माझ्या काही सहकार्यांना उडान ची संकल्पना डोक्यात आली. जे आपण शिकलो , अनुभवल ते तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी कोणत्या पद्धतीने वापरता येईल ह्याच विचारातून उडान चा जन्म झाला.
उडान कशाची? तर तंत्रज्ञाची कोणासाठी? तर त्या शेतकर्यांना वाचवण्यासाठी. ह्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या होत्या एक म्हणजे तंत्रज्ञान, दुसरी म्हणजे ती उभ करणारी, शेतकऱ्यापर्यंत पोचवणारी यंत्रणा आणि तिसरी महत्वाची म्हणजे ह्याला लागणार अर्थाजन पुरवणारी संस्था. अश्या तिन्ही पातळ्यांवर काम करायला सुरवात केल्यावर गोष्टी पुढे सरकू लागल्या. प्राजक्ता महाजन शी बोलताना जाणवलं की प्रथम नी बनवलेलं मोबाईल सोफ्टवेअर अतिशय सुटसुटीत आणि सामान्य माणसाला हाताळता येईल अस होत. प्रथम च हे सोफ्टवेअर इंस्टोल तसेच मेंटनन्स ची जबाबदारी विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली ह्यांनी स्वीकारली तर हे सोफ्टवेअर असलेले ट्याब्लेट गरजू विद्यार्थी तसेच शेतकरी ह्यांच्या पर्यंत पोचवण्याची जबाबदारी दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने उचलली. ह्या योजनेच सामान्य माणसाला प्रवाहात आणण्याची ताकद बघून महिंद्रा ग्रुप ने आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दर्शवली.
उडान ची भरारी घेण्याची तयारी तर झाली होती आता त्या क्षणांची वाट बघताना तो दिवस आला आणि उडानने उंच आकाशात भरारी घेतली ती ह्या शेतकऱ्यांच आयुष्य उजळवून टाकण्यासाठी. पहिला ट्याब्लेट सेव्ह इंडियन फार्मर्स ह्या संस्थेने दत्तक घेतलेल्या बोरसिंगा गावाला देताना कल्पनेतील ह्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारताना पहात होतो. सातासमुद्रापलीकडे राहून हि आपल्या मातृभूमीच ऋण खारीचा वाटा उचलून फेडताना कुठेतरी ह्या शेतकऱ्यांच्या, तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यात आपण बदल घडवू शकू असा आत्मविश्वास आणि समाधान होत. महिंद्रा ग्रुप च्या साथीने १०० ट्याब्लेट महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यात ( यवतमाळ, बीड, वाशीम, सोलापूर) येथे वाटले जाणार आहेत.यवतमाळ जिल्ह्याचे काम पूर्ण झाले आहे आनी ह्या तंत्रज्ञाचा फायदा यवतमाळ मधील ५७० मुलांच्या आणि ८०० शेतकरयांच्या आयुष्यात बदल घडवत आहे . हे सगळेच एकतर दुष्काळग्रस्त शेतकर्यांची मुले किंवा ज्यांच्या वडिलांनी ह्या दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली अशी होती. उडान च्या ह्या भरारी मद्धे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेक लोकांनी हातभार लावला. अमेरिकेपासून मायभूमी साठी घेतलेली उडान आता मायभूमीत भरारी मारताना बघण्याच समाधान कश्यानेच विकत घेता येत नाही.
उडान इथवर थांबली नाही तर ह्या ट्याब्लेट च्या वापराने मुलांच्या आयुष्यात काय बदल केला ह्यासाठी प्रश्नपत्रिका हि सेव इंडिया फार्मर्स नि काढली व ह्यातून मिळालेल्या रिझल्ट वरून पुढील दिशा ठरवली गेली. ह्या तंत्रज्ञाचा उपयोग ह्या पिढीपर्यंत न ठेवता मागच्या पिढीला तसेच शेतकर्यांना ह्या प्रवाहात आणण्यासाठी उडान ने शेतीसंबंधीचे अनेक वेगवेगळ्या भाषेतील विडीओ मराठी भाषेत न्यू जर्सी ( अमेरिका ) येथे बनवले. जेणेकरून ह्या आधुनिक शेतीतील अनेक गोष्टी सामान्य शेतकऱ्यापर्यंत ह्या ट्याब्लेट च्या माध्यमातून पोचवता येतील. शेतकऱ्यांच्या शेती करणाच्या तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल तसेच शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणणारे हे तंत्रज्ञान बोटांच्या टोकावर उडान च्या ट्याब्लेट मुळे उपलब्ध झाले. येणाऱ्या काळात ह्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतीलच. उडान ची भरारी इतकीच नाही आहे. ये तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे म्हणत अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. खरे तर ह्या सर्व स्वप्नांच्या मागे अनेक लोकांची मेहनत मग ती शारीरिक असो वा मानसिक वा आर्थिक खूप प्रचंड आहे. देशाच्या बाहेर राहून सुद्धा आपण देशासाठी काहीतरी करू शकू का ह्या मनातील भावनेला उडान ने नुसते पंख नाही दिले तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून एक खूप मोठी भरारी घेतली. सेव्ह इंडियन फार्मर्स,विवेकानंद सेवा मंडळ तसेच दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ ह्या सारख्या संस्था त्यांचे कार्यकर्ते त्याच बरोबर महिंद्रा ग्रुप चा ह्यात खूप मोठा हातभार आहे. उडान ची उंच भरारी बघताना ह्या क्षणी हरिवंशराय बच्चनांच्या काही ओळी आठवतात.
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
शब्दांकन : विनीत वर्तक
उडान चा प्रवास त्यांच्या साईटवर हि बघता येईल.

No comments:

Post a Comment