Sunday, 22 January 2017

सेल्फी च सेल्फी... विनीत वर्तक
काल मी सध्या वास्तव्यास असलेल्या वॉटर पार्क रिसोर्ट मध्ये एक मुला- मुलींचा ग्रुप आला होता. हे रिसोर्ट जवळपास ४० एकर पेक्षा अधिक जागेत वसलेल आहे. आजूबाजूला झाडांची गर्दी, विविध पक्ष्यांची रेलचेल नेहमीच अनुभवयास मिळते. इकडून जवळच पक्षी अभयारण्य असल्याने इकडेही कधीही न दिसणारे वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात. निसर्ग असा सिमेंट च्या गर्दीत आपल छान रूप दाखवत असताना सगळीच मुल- मुली मात्र सेल्फी काढण्यात मग्न होती. ते सेल्फी पण स्विमिंग पूल च्या बाजूला उभे राहून किंवा मानवनिर्मित वास्तुंसमोर उभ राहून.
फोटो काढणे किंवा सेल्फी काढणे वाईट नाहीच. आपण कुठे जाऊन आलो. आजूबाजूचा परिसर, एखादी वास्तू, निसर्ग ह्याच्या समवेत स्वताला बंदिस्त करण्यात काय ती चूक. पण हे करताना त्या वस्तूला, निसर्गाला किंवा त्या क्षणांना आपण कधी जगतो का? सेल्फी च्या नादात ते क्षण आपल्या हातातून कधी निसटून जातात हे कळत सुद्धा नाही. आपण कसे दिसतो हे लोकांना कळाव किंवा आपण इकडे जाऊन आलो हे मी कधी एकदा पोस्ट किंवा शेअर करण्याच्या नादात आपण इकडे का आलो हे पण आपण विसरून जातो.
खरे तर त्या पहाटेच्या वेळेस कितीतरी पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत होते. अगदी मोरा पासून ते अगदी रेअर असणाऱ्या अनेक पक्ष्यांच्या प्रजाती पर्यंत. एक रेअर प्रजातीत असणार पक्ष्याच कपल गवतात छान पेकी सकाळी किडे शोधत असताना सेल्फी च्या नादामुळे त्यांना डोळे भरून बघता ही आल नाही. प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये त्यांच्यासमवेत सेल्फी घेताना किती पिक्सल चा क्यामेरा आहे व त्याची लेन्स इतरांपेक्षा चांगली कशी ह्याची चढाओढ करत होता. आजूबाजूच्या निसर्गाशी समरस होण्याची इच्छा किंवा निदान विचार कोणाचाच दिसत नव्हता.
अनेकदा आपण बघतो लोक एखादी गोष्टीचा आस्वाद घेण्यापेक्षा सेल्फी घेण्यात जास्ती आनंद मानतात. आता गणपतीत गणपती बाप्पा समोर हात जोडून समरस होण्यापेक्षा त्याचा फोटो किंवा त्याच्या मूर्तीसोबत फोटो घेण्याची चढाओढ चालू असते. अजबाजुला काय चालू आहे? काय घडते आहे? आपण त्या फोटो च्या नादात कुठे जात आहोत? ह्याच काहीच भान न ठेवता फक्त शेअरिंग च्या अट्टाहासपायी सगळी मजाच हरवून बसलो आहोत. म्हणजे फेसबुक व्हात्स अप च्या लाईक, कमेंट आपल्याला समाधान देतात. पण जी गोष्ट आपण जगतो तिच्यापासून आपल्याला समाधान मिळत नाही ह्यावून माणूस यांत्रिक झाल्याच दुसर कोणत उदाहरण असू शकते.
सेल्फी च्या नादात झालेले अपघात तर वाढत आहेतच. पण स्वताला बंदिस्त करणाच्या ह्या नादात आपण जगण हरवत आहोत. ह्याची जाणीव खूप कमी जणांना आहे. एखाद्या निसर्ग सौंदर्य ठिकाणी बसलो असताना त्या शांततेची मज्जा फोटोत कशी बंदिस्त करता येणार? ती तर अनुभवावी लागते. पडणारा पाउस, सोसाट्याचा वारा, थराराचे क्षण फोटोतून कसे काय बोलणार? निसटलेले क्षण पुन्हा मिळणार नाही ह्याची खात्री असताना त्याच वाईट न वाटता सेल्फी काढता नाही आली म्हणून हिरमुसणारी तोंड आता सगळीकडे दिसायला लागली आहेत.
मला आठवते ३६ फोटोचा तो रोल संपवताना किती आतल्या आत लागायचं ते. प्रत्येक क्षण टिपताना १० वेळा विचार. अनेक क्षण फक्त ३६ फोटोत सामावताना कस लागायचा खरे तर हा आकडा मनात असल्यामुळे आपण ते क्षण मनात जास्तीत जास्त बंदिस्त करत होतो. त्यामुळेच ते सेल्फी चे फोटो बघताना पुन्हा ते सगळ आठवायचं, त्यात पुन्हा आपण रममाण व्हायचो. आता ३६०० फोटो असताना पण ते रममाण होण हरवलं आहे. आता किती सेल्फी आणी किती फोटो कधी आपल्याला लक्षात तरी असतात का? पूर्वी काढलेल्या त्या सेल्फी ने स्वताच्यात झालेले बदल अगदी जाणवायचे. तेव्हा मी असा मिसरूड फुटलेला कसा दिसायचो किंवा त्या तारुण्य पिटिका कश्या तेव्हा चेहऱ्यावर उठून दिसायच्या सगळच एक समाधान,आनंद देणार.
आता कुठेतरी सेल्फी मध्ये आपण सेल्फ ला हरवून बसलो आहोत. स्वताला बघण्याच्या नादात स्वताला विसरत जातो आहोत. जगण्याच सोडून बंदिस्ताच्या मागे धावतो आहोत अगदी कशाच भान न ठेवता. मनात विचार आला त्या मुलांनी एकदा पक्ष्यांकडे निरखून तरी बघितलं का? त्यांच्या त्या मंजुळ आवाजाला स्वतात कुठे बंदिस्त केल का? ती काळी वळलेली चोच आणी नर - मादी च एकमेकांना भरवण्याचा क्षण ह्या मुलांनी कोणत्या सेल्फी मध्ये टिपला असेल. आज त्या सेल्फी ची सेल्फी काढण्याची वेळ आली आहे. एकदा काढून बघा हातातून किती क्षण निसटून गेले ह्याचा थोडा तरी अंदाज येईल. पुढल्या वेळेस सेल्फी काढताना आधी ते अनुभवून मग बंदिस्त करण्याची समज जरी आपल्याला सेल्फी च्या सेल्फी ने आली तर पुन्हा एकदा आपण जगायला लागलो अस म्हणता येईल..

No comments:

Post a Comment