Sunday, 22 January 2017

सहिष्णुता... विनीत वर्तक
सहिष्णुता हा शब्द अगदी वरचेवर आपल्या कानावर पडत असतो. आपल्या नात्यात पण अनेकदा आपण हा शब्द ऐकला असेल किंबहुना ह्याच इंग्रजी भाषांतर म्हणजे टोलरन्स, पेशन्स. कोर्पोरेट जगतात अनेक किचकट- विचकट प्रश्न अगदी लिलया हाताळणारे अनेक जण मात्र घरच्या प्रश्नात किंवा एकूणच नातेसंबंधामध्ये त्यांची सहिष्णुता फारच कमी असते. मोठे मोठे प्रश्न हाताळणारे आपण मात्र आपल्याच माणसासमोर असे हतबल का होतो? आपली टोलरन्स लेवल इतकी कमी का होते? आपण ती वाढवू शकतो का? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात.
कोणत्याही जवळच्या नात्यात आपण एकमेकांना आधीच अपेक्षित धरून चालतो. अपेक्षेप्रमाणे गोष्टी नाही झाल्या की मूळ वादाला सुरवात होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आपण खूप लक्ष देतो. त्यातली एखादी जरी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली की आपली सीमारेषा गाठली जाते. कोर्पोरेट मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीत आपण संपूर्ण लक्ष देत नाही. म्हणजे आपल्या दिलेल्या जबाबदारी नुसार आपण तितकच लक्ष देतो. किंबहुना आपण सगळ्यात लक्ष द्यायचं ठरवलं तर ते किती जिकरीच होईल? कंपनीच्या मालकाने अगदी माल घेण्यापासून ते विकेपर्यंत सगळीकडे लक्ष द्यायचं ठरवलं तर ते शक्य होणार नाही. आणी झालच तर तो कधीच आनंदी होऊ शकणार नाही. किंवा त्याच्या टोलोरन्स च्या सीमारेषा नेहमीच गाठल्या जातील.
आपल्याला हे चांगल माहित असून सुद्धा आपण तेच करतो नाही का? आपल्या जवळील नाते संबंधात आपल लक्ष एकदम बारीक असते. अगदी अगदी छोट्या गोष्टीत पण आपण बारकाईने लक्ष देतो. नातेसंबंध तुटण्यासाठी ह्याच बारीक गोष्टी कारणीभूत असतात. कोणत्या मोठ्या गोष्टीनी नाती तुटत नाहीत. तर ह्या अश्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी साचत जाऊन मग त्याचा कडेलोट होतो. टी.टी. रंगराजन ह्यांनी आपल्या एका संभाषणात एका नवरा- बायकोच उदाहरण दिल आहे. दोघे घटस्फोटासाठी येतात. कारण काय अस विचारल तर नवऱ्याच्या मते बायकोला शिस्त नाही. रंगराजन विचारतात शिस्त नाही म्हणजे काय? तर म्हणे बायको पेस्ट घेताना ती ट्यूब मधून दाबते. आता हे काय कारण होऊ शकते का? रंगराजन ह्यांनी शेवटी त्या दोघांना सांगितलं की आता पासून दोन पेस्ट आणा. एक नवऱ्यासाठी आणी दुसरी बायकोसाठी. त्या नवऱ्याला सांगितलं तुम्हाला जशी वापरायची तशी वापरा आणी तिला जशी वापरायची तशी ती वापरेल. पण ११ रुपये ५० पैसे साठी घटस्फोट घेऊ नका.
ही गोष्ट अगदी हास्यास्पद वाटली तरी अश्याच छोट्या गोष्टीनी तर आपण संबंध तोडतो नाही का? बघा आत्तापर्यंत झालेल्या भांडणातील किंवा संबंध तोडताना घडलेल्या किती गोष्टी खरच मोठ्या होत्या? अश्या गोष्टीनी खरच जन्म- मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता का? आणी जर नव्हता तर मग खरोखर ते नात तोडण्याची किंवा त्याबद्दल उगाच मनात चलबिचल वाटण्याची गरज होती का? आजच्या काळातल कोर्पोरेट जग सांगते “एखाद्या गोष्टी च्या खोली मद्धे राक्षस आहे”. नक्कीच काहीही समजून घेण्यासाठी त्याच्या खोलात जायला हव. पण प्रत्येक ख ला मात्रा आणी ल ला वेलांटी हि द्यायला हवी. सोप्प्या शब्दात सांगायचं झाल तर जेव्हा इतरांविषयी गोष्टी असतील तेव्हा त्या लहान गोष्टीना लहान ठेवायला हव. पण त्याच जेव्हा स्वतःशी निगडीत असतील तेव्हा प्रत्येक छोट्या गोष्टीला मोठ महत्व द्यायला हव. अस जेव्हा आपण करू तेव्हा आपली सहिष्णुता वाढलेली असेलच. पण त्या सोबत आपल्या हातून होणार कार्य अगदी उत्तम असेल तर इतरांच्या लहान गोष्टीना लहान ठेवल्यामुळे नातेसंबंध ही मजबूत असतील. मग विचार कसला करता आहात? वाढवूया आपली सहिष्णुता.
पर्च... विनीत वर्तक
राधिका आपटे च्या बोल्ड सीन मुळे पर्च तसा आधीच चर्चेत आला होता. पण मुळात कथानक कस असेल ह्याबद्दल जास्ती उत्सुकता होती. लीना यादव च डायरेक्शन अजय देवगण च प्रोडक्टशन व ह्या सोबत आय.एम.डी.बी. च ७.५ रेटिंग आणि टाईम्स च ४.५ तारे व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १८ पदक ह्यामुळे ती उत्सुकता अजून ताणली गेली होती. २१ व्या शतकात डिजिटल भारत बघताना अजूनही भारताच्या काही भागात आपण खूप खूप मागे आहोत ह्याची जाणीव करून देणारा व स्त्री, तिच्या भावना, तीच स्वातंत्र्य, तिची माणूस म्हणून जगण्याची गरज, पुरुषांसोबतची बरोबरी ह्या सगळ्याच बाबतीत आपण खूप मागे आहोत हे सांगणारा. ज्या देशात वात्सायन सारखे ग्रंथ, खजुराहो सारखी सुंदर मंदिर घडवली जातात त्याच देशात सेक्स ह्या मूळ भावनेबद्दल अजून किती पल्ला गाठायचा आहे ह्याच्यावर भाष्य करणारा एक अप्रतिम चित्रपट म्हणजे पर्च.
कथानक ५ स्त्रीयांन पासून सुरु होते. एक जी बदलेल्या भारतातून इतिहासात जगणाऱ्या भारतात आली आहे. त्या इतिहासात स्त्री ला तिचा मानसन्मान देण्यासाठी धडपडते आहे. दुसरी जी वयाच्या १४-१५ व्या वर्षी लग्न होऊन एका मुलाची आई होऊन ३२ व्या वर्षी विधवेचे आयुष्य जगते आहे. समाजाच्या रिती मद्धे तिच्या स्वताच्या भावना, गरजा काबूत ठेवताना होणारी घुसमट भारतीय स्त्री च्या अनेक घरातील मनातील द्वंद उघडेपणाने मांडते. तिसरी जी पुरुषाच्या हवस ची शिकार लहानपणीच झाली. वैश्या म्हणून आयुष्य काढताना आणि अनेक पुरुषांसोबत शय्या करताना तिच्या मनाला होणाऱ्या वेदना व त्याच वेळी पुरूषांच्या नागड्या अत्याचाराच्या अनेक आठवणी सोबत घेऊन होणारा तिचा प्रवास. चौथी जी पुरुषाच्या अत्याचाराला बळी पडली आहे. बाझं किंवा मुल होत नाही म्हणून समाजाच्या तिरस्कारमद्धे आयुष्य काढताना त्या वेळी नवऱ्याकडून होणाऱ्या शारीरिक यातना निमुटपणे भोगणारी. पाचवी म्हणजे अवघी १४-१५ वर्षाची मुलगी. नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली. तीच निर्व्याज प्रेम आणि १५ व्या वर्षी लग्नाच्या बंधनात अडकून दुसऱ्या घरात आलेली.
स्त्री च्या सगळ्याच वेगवेगळ्या अनुभवांवर भाष्य करणारा पर्च मला तरी पूर्ण निशब्द करून गेला. पुरुष असण्याचा अभिमान तर सोडाच पण त्याची कीव यावी इतक नागड सत्य पर्च समोर ठेवतो तेव्हा आपण खूप मागे आहोत ह्याची जाणीव होतेच. पण लाज ही वाटते. पुरुषी लिंगाचा माज बाळगणाऱ्या समाजाने सगळ्या शिव्या पण स्त्री वर आधारित ठेवल्या आहेत. हे सत्य जेव्हा पर्च मांडतो तेव्हा हा पुरुषी अहंकार, लिंगाचा अहंकार किती तोकडा आहे ह्याची जाणीव होते. लिंगाच्या जोरावर पुरूष सगळ काही करू शकतो हा माज समाजाने पुरुषाला दिला आहे. हाच समाज जेव्हा स्त्री च्या अधिकाराविषयी निद्रिस्त होतो तेव्हा आपण कोणत्या संस्कृतीचे गोडवे गातो आहोत हा प्रश्न आल्याशिवाय रहात नाही.
सेक्स हा तर अजूनही आपल्याला न कळलेला आहे. लिंगाच्या योनी प्रवेशापलीकडे सेक्स असतो हे अजूनही भारतातल्या अनेक पुरुषांना माहित नसेल. जेव्हा एक वैश्या तिला उपभोगलेल्या अनेक पुरुषांपेकी कोणी सगळ्यात जास्ती आनंद दिला ह्याचा विचार करते तेव्हा तो पुरुष हा योनी पलीकडे भावना समजणारा असतो. मला वाटते पर्च चा तो परमोच्च क्षण आहे. हीच वैश्या जेव्हा आपल्या मैत्रिणीची कूस उगवण्यासाठी त्याच माणसाची निवड करते. तेव्हा सेक्स हा शरीराच्या लिंगात नसून मेंदूत असतो हे जळजळीत सत्य समोर येते. राधिका आपटे आणि अदिल हुसेन प्रणय करतात. तेव्हा जवळपास प्रत्येक पुरूषाच लक्ष राधिका ने दिलेल्या बोल्ड सीन कडे असेल. पण मला आवडलेला सगळ्यात अतुच्य क्षण म्हणजे त्याने केलेला नमस्कार. प्रणय करण्याआधी तो तिचे पाय पकडून नमस्कार करतो. जणू काही ती एक साधना आहे. ती सुरु करण्यापूर्वी ती संधी दिल्याबद्दल तिचे आभार मानतो. त्या सीन मधील राधिका आपटे च्या शरीरापलीकडे बघण्यासारख बरच काही आहे. ते स्पर्श, ते बिथरण, ती नजाकत हे शिकण आहे. मला वाटते त्या सेक्स पेक्षा स्त्री ला परमोच्च स्थानी नेणाऱ्या ह्याच भावना आहेत. पण छाती आणि दोन पायांच्या मद्धे अडकलेली नजर पर्च मध्ये हे बघू शकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे.
पुरुषी अत्याचार आणि स्पर्शाच्या भावनांपासून कित्येक वर्ष लांब राहिलेल्या दोन स्त्रिया जेव्हा तोच स्पर्श, त्याच भावना एकमेकिंकडून मिळवतात. तेव्हा त्यांना कोणत्या लिंगाची गरज लागत नाही. हे कटू सत्य मांडताना दोन्ही कलाकारांनी त्या सीन मध्ये जीव ओतला आहे. मोबाईलच्या व्हायब्रेटर चा वापर मोठ्या खुबीने दिग्दर्शकाने केला आहे. एका सीन मद्धे स्त्रियांच्या शारीरिक गरजा दाखवण्यात किंवा ते पूर्ण करण्यात वेगळे रस्ते पण आहेत हे खूप सुंदर रित्या मांडल आहे. वासना,लस्ट ह्या पलीकडे पुरुष खूप काही स्त्री ला देऊ शकतो. स्त्री ला हि ते हव असते. भावनिक आधार तर आलाच पण शारीरिक पातळी वर हि स्त्री च्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात हे ज्या पुरुषाला कळते. तोच तिच्या साठी तिचा शाहरुख, आमीर आणि सलमान खान असतो.
तीन खान आणि युरोप च्या सीन मद्धे रमून गाणारा हिरो आणि नायिका ह्यांच्या पलीकडे हिंदी चित्रपट जात नाही. ह्याला एक कारण आपण प्रेक्षक पण आहोत. इकडे प्रेमाच्या नावाचे टुकार सिनेमे करोडो कमावतात. पण स्त्री च्या आयुष्यावर, भावनांवर, समाजावर भाष्य करणारा पर्च सारखा अतिसुंदर चित्रपट कधी येतो आणि कधी जातो कळत पण नाही. पर्च बघाच कशासाठी तर स्त्री ला ओळखण्यासाठी. त्यासाठी कोणता ग्रंथ वाचण्याची गरज नाही. पण असे वेगळे चित्रपट स्त्री ला समजून घेण्यासाठी खूप काही मदत करू शकतात. सर्वच कलाकारांच अभिनंदन एक परिपूर्ण पण त्याच वेळी सत्याचे चिमटे काढणारी कलाकृती साकारल्याबद्दल.
द इक्वलायझर... विनीत वर्तक
२०१४ साली आलेला डेन्झेल वॉशिंग्टन अभिनेता असलेला हा चित्रपट मला प्रचंड आवडतो. दिवार ची आठवण करून देणारा अमिताभ मला डेन्झेल मद्धे ह्या चित्रपटात खुपदा दिसतो. जसा अमिताभ दिवार मद्धे गोदामाची चावी खिशात ठेवून पाय वर करून गुंडांना सांगतो “ तुम मुझे धुंड रहे थे ओर में तुम्हारा यहा इंतजार कर रहा था” अगदी तसच डेन्झेल म्हणतो “What do you see when you look at me” अस म्हणतो तेव्हा कसलेला अभिनेता काय असतो ह्याची जाणीव होत रहाते. चालण्याची पद्धत, डोळ्यातील आणि चेहऱ्यावरील भाव, सवांद फेकण्याची तऱ्हा सगळच एका वेगळ्याच आत्मविश्वासाने.
वयाच्या ६२ वर्षी सुद्धा इतक अप्रतिम काम केल आहे त्याने ह्या चित्रपटात कि बघत रहावे. एका रिटायर्ड झालेल्या ब्ल्याक ऑपरेशन कमांडो ची भूमिका निभावताना एक वेगळच आयुष्य त्याने उभ केल आहे. टापटीप आणि गोष्टींकडे अतिशय निरखून बघण्याची सवय त्याने अप्रतीम साकारली आहे. एक शांत आयुष्य जगत असताना एका रशियन मुलीच्या आयुष्याला वेगळ वळण देण्यासाठी पुन्हा एकदा त्याला भूतकाळात जावे लागते. आपल्या बायकोला दिलेल्या भूतकाळात न जाणाच्या वाचनामुळे अडचणीत सापडलेला डेन्झेल त्या रशियन मुलीची मदत करतो का? मदत केल्यावर गोष्टी तिकडेच संपतात का? पुढे कथानक कस वळण घेत जाते हे चित्रपटात बघण योग्य.
खूप सुंदर म्युझिक, त्याच्या सोबत संवाद क्लोज कोम्ब्याट स्कील, एक सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात घडणारे प्रसंग सगळच वेगळाच आनंद देणार आहे. आपल्या जुन्या एका मैत्रिणीला भेटताना जी की एक सी.आय.ए ऑपरेटीव राहिलेली असते तो क्षण खूपच सुंदर आहे. डेन्झेल आपल्या मैत्रिणीला भेटून गेल्यावर ती आपल्या नवऱ्याला सांगते. तो मदतीसाठी आला नव्हता तर परमिशन साठी. ते वाक्य इतक सुंदर घेतल आहे की डेन्झेल च्या त्या पंच साठी आपण वाट बघत रहातो.
खरे तर कोणताही मारामारी वर आधारलेला चित्रपट हा खूप जलद असतो. पण ह्या चित्रपटात डेन्झेल ने साकारलेले क्षण अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणूनच हा चित्रपट वेगळी उंची गाठतो. डेन्झेल च काम आणि त्याचे सवांद ऐकण्यासाठी नक्कीच पाहायला हवा द इक्वलायझर.
श्रद्धा ... विनीत वर्तक
हॉस्पिटल च्या ऑपरेशन वॉड समोर एका बाईच्या येरझारा चालू होत्या. ऑपरेशन रूम मधून डॉक्टर बाहेर पडताच तिच मन अगदी सैरभैर झाल. डॉक्टर आता काय सांगणार? माझ्या मुलाला काय झाल? तो बरा होईल न? बाहेर येताच तिने त्या ज्युनियर डॉक्टर न थांबवून विचारले. डॉक्टर ला ही वस्तुस्तिथी लपवता आली नाही. आलेले शब्द बाहेर पडू नये म्हणून त्याचा आटापिटा चालू होता पण सत्य परिस्थिती सांगावीच लागणार होती. हृदयातील गुंतागुंतीमुळे लहानग्या चा जीव टांगणीला लागला होता. आता काही दिवस, आठवडे हाताशी आहेत अस सांगताना त्याने पुसटसा प्रकाश दाखवला. तो म्हणजे शहरातील ह्या गुंतागुंतीवर शस्त्रक्रिया करण्यात प्रख्यात असणाऱ्या डॉक्टर ना दाखवणे.
ज्युनियर डॉक्टर नी तिच्या मुलासाठी स्वताच वजन वापरून मोठ्या डॉक्टर शी सल्लामसलत केली. केस ची गुंतागुंत बघून त्या डॉक्टर ने ही केस हातात घ्यायचं आश्वासन दिल. ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागणार होती. ऑपरेशन रूम च्या बाहेर त्या माउलीच मन काही शांत बसत नव्हत. सतत तेच विचार. आपल बाळ परत चांगल होईल न? आत जाणाऱ्या त्या प्रख्यात डॉक्टर ला तिने थांबवून हाच प्रश्न केला. तेव्हा डॉक्टर कडे ही आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू ह्या शिवाय काहीच उत्तर नव्हत. गुंगीच औषध देण्यागोदर त्या लहानग्या ला डॉक्टर म्हणाले “पठ्या घाबरू नकोस आता हे ऑपरेशन झाल की तू एकदम बरा होशील” वास्तविक ऑपरेशन मधील यशाची हमी अगदी धूसर होती. पण डॉक्टर ला ही काय सांगाव काहीच कळत नव्हते.
डॉक्टर ने हे बोलताच मुलाचा प्रश्न, डॉक्टर मी बरा होईनच पण माझी एक सूचना आहे, “माझ हृद्य तुम्ही उघडणार तेव्हा एक काळजी घ्या की माझ्या हृदयात देव आहे त्याला धक्का नको बसायला. माझी आई सांगते देव माझ्या हृदयात आहे” मुलाच हे बोलण ऐकून डॉक्टर ला ही अश्रू आवरले नाहीत. शस्त्रक्रियेच्या वेळी आपला अवघा अनुभव पणाला लावून ही हृदयातील रक्तस्त्राव थांबत नव्हता शेवटी डॉक्टर नी अर्धवट शस्त्रक्रिया सोडण्याचा निर्णय घेतला. आता काही मिनिटे आणि एक जीव निघून जाईल ह्या विचारात डॉक्टर असताना नर्स ने अचानक रक्तस्त्राव थांबला अशी सूचना दिली. त्या नंतर पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सुरवात करून डॉक्टर नी ती यशस्वी केली. मुलगा शुद्धीवर आल्यावर त्याचा पहिला प्रश्न ह्याच डॉक्टर ला होता की डॉक्टर तुम्ही देवाला पाहिलं न, तो कसा दिसत होता? त्याच्या ह्या प्रश्नावर डॉक्टर निरुत्तर झाले. आपल्या अनुभवाने सुद्धा रक्तस्त्राव कसा थांबला अचानक ह्याच उत्तर त्यांना मिळत नव्हते. जिकडे विज्ञानाची कास धरणारा एक डॉक्टर एका माउलीच्या श्रद्धेपुढे हरला होता. त्याच क्षणी डॉक्टर स्वताला सावरून म्हणाले तो न ह्याच माउली सारखा होता.
विज्ञान जिकडे तोकड पडते तिकडे काही प्रश्नाची उत्तर आपण त्याच्यावर सोडतो. त्याला काही नाव द्या देव, डॉक्टर, मसीहा, एंजल , गुरु किंवा अजून काही जी काही असते ती श्रद्धा. कोणती तरी एक शक्ती माझ्या आकलनाच्या पलीकडे कार्यरत आहे ती सगळ समजून घेईल आणि सगळ सुरळीत होईल. जीवन- मरणाचा प्रश्न असो वा आयुष्यातील कठीण निर्णयांचा आपल्यातील एक श्रद्धेचा भाग खूप मोठा न दिसणारा रोल करत असतो. ज्याची उत्तर कोणत्याही विज्ञान किंवा गणिताने देता येत नाही. आस्तिक असो वा नास्तिक पण ती श्रद्धा जर मनापासून असेल तर नक्कीच उत्तर मिळतात.
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की जिकडे काहीच सुचत नाही. पुढच काहीच दिसत नाही. मागे जाव तर काहीच सापडत नाही. अश्या वेळी आपण तुटतो. डळमळीत होतो. कधी कधी तर कोसळतो. पण श्रद्धेवर विश्वास असेल तर अश्या गोष्टीतून तारून जाता येते. आपल्याच मनासारखं होईल अस नाही. पण जे समोर येईल त्याला सामोरी जायची शक्ती श्रद्धेतून मिळते. ती कमी- जास्त असेलही पण ती मिळते हे मात्र नक्की. कोणत्याही हॉस्पिटलच्या दरवाज्याशी बसवलेला गणपती हा दगडाचा असो वा फोटोचा, कातळाचा असो वा संगमवराचा. तो सगळ्यांना मदत करतो का ते माहित नाही. पण त्याच्यावरील श्रद्धा मात्र त्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याची सगळ्यांना हिंमत देते ह्यात शंका नाही.
लिन ऑन... विनीत वर्तक
आमच्या वसई बद्दल जागरूक असणाऱ्या किती वसई करांना माहित आहे की जागतिक विक्रीचे अनेक रेकॉर्ड रचणाऱ्या गाण्याचे चित्रीकरण त्यांच्याच वसईत झाले आहे. लिन ऑन हे गाण यु ट्यूब वर २३ मार्च २०१५ साली प्रसारित झाल आणि १४ जानेवारी २०१७ पर्यंत त्याचा हा विडीओ तब्बल १.८३ बिलियन लोकांनी बघितला आहे. हे गाण जगातील सर्वात जास्त विकल्या गेलेल्या सिंगल गाण्यांपेकी एक आहे. आत्तापर्यंत १३.१ मिलियन पेक्षा जास्ती कॉपीज ह्याच्या विकल्या गेल्या आहेत.
वसई च्या कौल हेरीटेज सिटी मद्धे आणि कर्जतच्या एन.डी. स्टुडीओ मद्धे चित्रित करण्यात आलेल हे गाण्याने अनेक देशात अनेक विक्रम रचले आहेत. It reached number one in several other countries including Australia, Ireland, the Netherlands, Mexico, New Zealand, Finland, Denmark and Switzerland. In November 2015, "Lean On" was named by Spotify as the most streamed song of all time,[7]and has over 892 million streams globally as of November 2016
ह्या गणाच्या निर्मात्याते काढलेले उद्गार खूपच सूचक आहेत. मेजर लेझर ह्या ग्रुप च्या डिप्लो ने आपल्या विडीओ विषयी सांगताना म्हणाला..
“When we toured there [in India] as Major Lazer, it was mind-blowing to see our fan-base and we wanted to incorporate the attitude and positive vibes into our video and just do something that embodies the essence of Major Lazer. Major Lazer has always been a culture mashup and to us, India feels like some kind of special creature with one foot in history and one firmly in the future”.
गाण नक्कीच मनाचा कौल घेणार आहे. वसई शी लांब का होईना नाळ जुळलेली असल्याने कौल हेरीटेज सिटी आणि वसई ह्यांना जागतिक पातळीवर प्रसिद्ध होताना बघण एक सुखदायक अनुभव आहे.
लेट ईट गो... विनीत वर्तक
जन्माला आलेला प्रत्येक माणूस आपल्या परीने वेगळा असतो. बनवणार्याने बनवताना चेहरा, ठेवण, रंग एक नाही ठेवला. तर प्रत्येक माणसाचे मन, विचार कसे एक असतील? प्रत्येक जीव जन्माला येताना स्वताचे एक अस्तित्व घेऊन येतो. आपल्या मनाच्या आंतरिक रचनेनुसार प्रत्येक माणूस आपली आवड- निवड, चांगल-वाईट, इच्छा-भिती ह्या वेगवेगळ्या भावनांचं कुंपण स्वतःभोवती घालून घेतो. आपल वेगळ असणाच्या गुणधर्मामुळे प्रत्येक माणसाची भावनिक कुंपण वेगवेगळी असतात. त्या कुंपणाच्या आत त्याची विचारशक्ती विहार करत असते. त्याच्या पलीकडे जाणून घ्यायची आपली तयारी नसते.
खरे तर हि भावनिक कुंपण आपली ओळख असतात. ह्यावरून माणसाचे स्वभाव ठरतात. त्यामुळेच प्रत्येक माणूस एक असून सुद्धा वेगळा असतो. ह्या वेगळेपणातून आपण प्रश्नांना जन्म देतो. ते प्रश्न दिसून येतात नातेसंबंधानमद्धे. जडणघडण आणि भावनिक भिंती पूर्णतः वेगळ्या असताना वैचारिक मतभेद आलेच. कोणत्याही नातेसंबंधाचा पाया हा समजून घेण्यावर अवलंबून असतो अस आपण नेहमी म्हणतो. पण हे समजून घेण म्हणजे काय? वैचारिक प्रगल्भतेने भले आपल्या प्रोफेशनल आयुष्यातील प्रश्न सुटत असतील पण वैयक्तिक आयुष्यात ते तितकस लागू पडत नाही.
समजून घेण किंवा वैचारिक प्रगल्भता देते ते म्हणजे तात्पुरता आराम. पेन रिलीफ ची गोळी घेतल्यावर मिळतो तसा. पण मुळात रोगावर उपचार होतच नाही. जवळच्या आपल्या नात्यात मतभेद जास्ती दिसून येतात ह्याला कारण हि तसेच आहे. आपल्या प्रोफेशनल आयुष्यात आपण सतत एका रस्त्याने चालतो. आपल्यातील अनेक भावनांना आपण मोकळ करत नाही. कारणे अनेक असतील. पण आपल्या माणसाकडे आपण उघड होतो. आपल्या आतील आपल्याला बनवणाऱ्या मनाची कवाड आपण उघडी करतो. तेव्हाच दोन माणसांना वेगळे करणारी भावनिक कुंपण दिसून येतात.
वैचारिक पातळी, समजून घेण हे एका सिमेनंतर निष्प्रभ होते. आधी छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आता मोठ्या होऊन खटकू लागतात. आपल माणूस, आपल नात हे आयुष्यभर पुरणारी असतात. त्यामुळे ह्या गोष्टींची फ्रिक्वेन्सी, खोली, तीव्रता, खूप जास्ती जाणवत राहते आणि वाढत रहाते. कधीकधी त्याचा कडेलोट होतो. अश्यावेळी मग एकतर ते नात कोमजते किंवा तुटून जाते. अगदी काही नाही झाल तरी त्यातली सहजता तरी नेहमीच संपून जाते.
मग ह्यावर काही उपाय? तर “लेट ईट गो” सोडून देण. म्हणजे माणूस नाही तर आपण बनवलेली भावनांची कुंपण. चांगल- वाईट, आवड-निवड ह्यांच्या बंधनातून स्वताला मुक्त करण. आता वाचयला अवघड वाटत असल तरी ते समजून घेण सोप्प आहे. एखाद्या व्यक्तीकडे तटस्थ राहून बघण. त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना आपला चष्मा बाजूला ठेवून बघण. जेव्हा आपण आपण कुंपण तोडतो तेव्हा मनात अनेक नवीन गोष्टीना जागा रिकामी होते. आपण त्या रिकामी जागेत अनेक गोष्टीना सामावून आणि तटस्थ नजरेने बघू शकतो. तेव्हा पुढल्या वेळेस आपल्या भावनांच्या भिंती एकदा “लेट ईट गो” करून एका नव्या रुपात नातेसंबंधांकडे बघूया.
आदित्य... विनीत वर्तक
सूर्याच्या संस्कृत मधील आदित्य हे नाव घेऊन सूर्याकडेच एक मिशन येत्या काळात झेपावते आहे. २०१९ च्या आसपास इस्रो आदित्य- १ ह्या नावाने एक उपग्रह सोडत आहे. सगळे ग्रह सोडून सूर्याकडे झेपावण्यासाठी इस्रो का मेहनत घेते आहे ह्याच कारण दडल आहे सूर्याच्या कोरोना मद्धे. सूर्य न्युक्लीयर फ्युजन द्वारा उर्जेची निर्मिती करतो. सांगायचं झालच तर ६२० मिलियन मेट्रिक टन इतक्या हायड्रोजन च प्रत्येक सेकंदाला फ्युजन होते ते हेलियम मद्धे. अश्या तर्हेने ह्या फ्युजन मधून जी उर्जा निर्माण होते तिनेच ही पृथ्वी जिवंत आहे. ह्या उर्जेच्या प्रचंड निर्मिती मुळे सूर्याच्या बाजूला त्याचा ऑंरा ज्याला प्लास्मा अस म्हणतात ते तयार होते. हे म्हणजेच कोरोना.
सूर्याचा हा कोरोना आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतो जेव्हा ग्रहण असते. खग्रास सूर्यग्रहणात म्हातारीने सोडलेल्या केसाप्रमाणे पांढऱ्या रंगाचे किरण आपण झाकलेल्या सूर्याच्या आजूबाजूला बघू शकतो. हा कोरोना सूर्याच्या चोहोबाजूने कित्येक हजारो किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान हे जवळपास ५७२६ डिग्री सेल्सीयस असताना त्याच्या भोवताच्या कोरोना च तापमान तब्बल ९ लाख डिग्री सेल्सियस आहे. इतक प्रचंड तापमान कोरोना मद्धे येते कुठून हा आजही न उलगडलेला प्रश्न सोलार भौतिकशास्त्र ला पडलेला आहे. ह्याचाच अभ्यास किंवा ह्या न उलगडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आदित्य झेप घेत आहे.
हे भारताच सूर्यासाठी पहिलच मिशन असणार आहे. त्याच सोबत पाहिलच अस मिशन की जिकडे उपग्रह ल्यागरेयीयन पोइंट वर प्रक्षेपित होणार आहे. ह्यातील उपकरणांवर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडू नये म्हणून ह्या ठिकाणी आदित्य प्रक्षेपित करण्यात येणार आहे. इकडून कोणत्याही अडथळ्याविना सूर्याचा स्पेशली कोरोनाचा अभ्यास करता येणार आहे. हि कक्षा पृथ्वीपासून तब्बल १.५ मिलियन किलोमीटर वर असणार आहे. आत्तापर्यंत फक्त नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी ला इकडे उपग्रह प्रक्षेपित करता आले आहेत. कारण अश्या प्रतिकूल वातावरणात उपग्रह प्रक्षेपित करण तितकच कठीण आहे.
आदित्य वरील पे लोड लक्षात घेतले तर हे मिशन किती महत्वाच आहे ते कळून येईल. त्यातील सगळ्यात महत्वाचा पे लोड आहे Visible Emission Line Coronagraph (VELC) ह्या कोरोनो ग्राफ मुळे एक कृत्रिम सुर्याग्रहणाची स्थिती तयार करून कोरोना चा अभ्यास केला जाणार आहे. ह्यात ह्या कोरोनाचे स्पेक्ट्रल इमेज घेतले जाणार आहे. ह्यावरील दुसर उपकरण तर खूपच उत्साहवर्धक आहे. Solar Ultraviolet Imaging Telescope (SUIT) हे उपकरण सूर्याची फुल डिस्क इमेज म्हणजेच पूर्ण इमेज तब्बल ११ फिल्टर वापरून घेणार आहे. २००-४०० एन. एम. ह्या व्हेव्लेन्थ मद्धे. अश्या प्रकारच चित्रण आजवर कोणीही केलेलं नाही आहे. ह्या आणि अश्या अजून ५ वेगवेगळ्या उपकरणांद्वारे सूर्याचा अभ्यास केला जाणार आहे. अशी अपेक्षा करण्यात येत आहे की आदित्य सूर्याच्या न उलगडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यास मदत करेल.
जेव्हा २०१९-२०२० च्या आसपास आदित्य मिशन इस्रो च्या सगळ्यात भरवश्याच्या पी.एस.एल.व्ही रॉकेट मधून उड्डाण भरेल. तेव्हा ज्या देशातून कित्येक वर्ष आधी प्रकाश देणाऱ्या सूर्याकडे हनुमानाने सफरचंद समजून झेपावलेल्या उड्डाणाच एक आवर्तन संपूर्ण झाल असच म्हणावं लागेल.
एस.टी.डी. बूथ... विनीत वर्तक
आज माझ्या मुलीला मी सांगितलं की कोणे एके काळी फोन करण्यासाठी रांगा लागायच्या तर तिला हसू येईल. अगदी खूप वर्षाआधी नाही तर १०-१५ वर्षापूर्वी फोन हे खेळण नव्हत तर संभाषणाच माध्यम होत. मला अजून आठवतात ते एस. टी. डी. बूथ. मुंबई च्या बाहेरचा कॉल असला की घरून कॉल करण शक्य नसायचं. अश्या वेळी लाईन लावायची ती एस. टी. डी. बूथ वर. रात्री १० नंतर होणारी अर्धी किंमत मिळावी म्हणून घड्याळात १० कधी वाजतात ते बघून कॉल व्हायचा. रांगेत वाट बघताना आधीच्या नंबरचा कॉल लागू नये आणि लागलाच तर लवकर ठेवावा ह्याच अपेक्षेने वाट बघायची. आपला नंबर आला की समोरचा उचलेल हि घालमेल मनात सतत. मित्र- मैत्रीण , नात्यातील, कुटुंबातील कोणीही असो पण एक डोळा समोरच्या वेळेकडे. जवळ असलेले पैसे आणि मिळणारा कालावधी ह्याची सतत आकडेमोड डोक्यात चालू.
त्या ५-१० मिनिटांच्या संभाषणात खूप काही बोलल जायचं. पुन्हा कधी बोलण होईल न होईल ह्या विचारांनी. सगळ जेमतेम त्या वेळेत बसवायचं. काय करतो आहेस? काय करते आहेस? असले फालतू प्रश्न मनात कधीच आले नाहीत. कारण असल्या गोष्टीना तिकडे थारा नव्हताच. दबलेल्या भावना असो, आठवणी असो, काम असो सगळच मोकळ करायला वेळेच बंधन होत. त्यामुळेच की काय माणस जोडलेली होती नाही का? एस. टी. डी. बूथ मद्धे शिरताच मागचा दरवाजा कडी लावून बंद करून घेताना त्या बूथ च्या मद्धे भावनांची कारंजी उडायची. प्रेम, राग, रुसवा, भांडण, आठवणी सगळच. त्या एस.टी.डी. बूथ ने कितीतरी अशी कारंजी अनुभवली असतील. अंतराची जाणीव तेव्हा व्हायची जेव्हा कॉल ठेवावा की चालू ठेवावा अशी निर्णायक बेल वाजत रहायची. खिश्यातील पैसे आणि ओथंबून वाहणारे शब्द ह्याच्यातील कसरत म्हणजे एस.टी.डी. बूथ मधील पैश्याच आणि वेळेच इंडिकेटर.
त्या बूथ मद्धे सगळ बाहेर यायचं. ती ५-१० मिनिट आयुष्यात खूप काही देणारी असायची. दरवाजा उघडून बाहेर पडताना चेहऱ्यावर समाधान असायचं. कोणतही कारंज आत उडाल असेल तरी आवाज ऐकल्याच समाधान नाही का? आज हातात खेळण्या प्रमाणे मोबाईल असला आणि फुकट हव तितक बोला असे सांगणारे अनेक प्लान असले. तरी बोलण्याच समाधान हरवलं आहे नाही का? सोशल मिडिया ने वेळ आणि अंतराला कधीच संपवलं आहे. वेगवेगळ्या एप्लिकेशन मुळे शहराच्या, देशाच्या, खंडाच्या भिंती कधीच पुसल्या गेल्या आहेत. वोईस कॉल आता विडीओ कॉल झाले. पण त्या बूथ मद्धे न बघता ५-१० मिनटात उडाणारी कारंजी मात्र कुठेतरी हरवली.
एके काळी फोन साठी लाईन लावणारे आज फोन असून सुद्धा संवाद करत नाहीत. आठवड्यात एकदा बोलणारे आता सतत कनेक्ट असून सुद्धा कनेक्ट होत नाहीत. त्या फोन वरच्या आवाजांनी ओले होणारे डोळे आता पाणी संपल्याप्रमाणे भकास असतात. कुठे हरवलं सगळ? अजून मोठ, अजून पुढे, अजून श्रीमंत, ह्या अजून अजून च्या चक्रात आपण पुरते फासून गेलो आहोत. स्टेटस आणि कमेंट आपल्यासाठी महत्वाच्या झाल्या आहेत. फेसबुक वर किती लाईक आले. ह्यावरून आपण कोणाला किती आवडतो ह्याची मोजदाद होते आहे. पण आपल्या नात्यात कुठे गेली ती कारंजी? ते प्रेम, ते हास्य, ते रुसण, ते रागावण, ती ओढ, ती काळजी. की ह्या सगळ्या कारंज्याना आपण त्या बूथ मध्ये सोडून आलो आहोत. आलो असू तर पुन्हा एकदा जायचं आहे त्या एस.टी.डी. बूथ मद्धे. पुन्हा एकदा तो दरवाजा असा घट्ट बंद करून ती कारंजी उडवायची आहेत. प्रेम, असूया, आठवण, काळजी, सगळीच. मोबाईल ने विश्व तर जोडलं पण तोडली ती माणस. त्यांच्यातील सवांद. आता पुन्हा एकदा मला तरी त्या हरवलेल्या एस.टी.डी. बूथ मध्ये जायचं आहे. पुन्हा एकदा चिंब व्हायचं आहे त्या कारंज्यात. पुन्हा एकदा तो दरवाजा उघडताना त्या समाधानाने बाहेर पडायचं आहे. तुमच काय?
अर्धसत्य... विनीत वर्तक
सुतार पक्ष्याची एक सुंदर कथा आहे. त्यात त्याला वाटते की आपल्या चोचीने तो कोणतही झाड पोखरू शकतो. तो समुद्रावरील सगळ्यात उंच अस नारळाच झाड शोधून ते पोखरायला सुरवात करतो. ह्याच उद्देशाने की आपण ह्या झाडाला पोखरून खाली पाडू. दिवसांमागून दिवस जातात तो न थकता एकाच उद्देशाने, एकाच ध्येयाने ते झाड पोखरत रहातो. एके दिवशी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्या क्षेत्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते. अतिशय वेगात वारे वाहू लागतात. ह्या सगळ्यात पक्ष्याच्या पोखरण्यामुळे आधीच कमकुवत झालेलं झाड धराशाई होते. पक्ष्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपण करून दाखवल. आपल्या मेहनतीनेच आपण हे साध्य केल. असच त्याला वाटू लागते. खरे तर झाड कोसळायला कारणीभूत असते ते कमी कमी दाबाचा पट्टा, त्यामुळे निर्माण झालेले चक्रीवादळ आणी वारे. नक्कीच पक्ष्याच्या पोखरण्यामुळे ते झाड कमकुवत झालेले असते. पण अर्ध्या हळकुंडाने पक्षी पिवळा होतो.
आपण ही असेच वागतो की आयुष्यातील यश हे मीच मिळवले. माझीच मेहनत, मीच तो क्रीयेटर ह्या अविर्भावात अनेक जण असतात. खरे तर आपली मेहनत किंवा आपली इच्छा त्या मागे असली तरी चक्रीवादळ आणी वाऱ्या सारख्या अनेक गोष्टी ज्या आपल्या मनाला माहित नसतात त्या पण तितक्याच कारणीभूत असतात. प्रत्येक मी च्या मागे परिस्थिती, त्याच्या आयुष्यातील माणस, वेळ, आणी काही आकलन पलीकडच्या गोष्टी कार्यरत असतात. पण आपल मन नेहमीच आपल्याला अर्धसत्य दाखवते. अनेक अपयश्याच्या क्षणी पण हीच परिस्थिती अगदी उलट्या रीतीने घडत असते. पण आपल मन मात्र स्वताला कोसते. माझ्यामुळे सगळ झाल. किंवा मीच कारणीभूत. प्रत्यक्षात तेव्हा सुद्धा मन आपल्याला अर्धसत्य दाखवते.
अर्धसत्या मुळे यशाच्या क्षणी मन आपल्याला अतिशय उंच तर अपयशाच्या क्षणी दरीत लोटते. असे प्रसंग आपल्या आयुष्यात सतत घडत असतात. चांगल – वाईट एकामागून एक. प्रत्येक वेळी दोन्ही टोक गाठताना आपल मन नेहमीच अस्थिर रहाते. आयुष्यातील कोणताही क्षण घ्या, नातेसंबंध घ्या, त्रास, आनंद सगळच ह्या अर्धसत्या वर आधारित असते. त्यामुळे आपल आकलन कोणत्याही गोष्टीच हे ह्या अर्धसत्या वर आधारित रहाते. त्यामुळेच मन हे आयुष्यभर अस्थिर रहाते.
ह्या अर्धसत्या ला काही उपाय आहे का? असा विचार केला तर नक्कीच आहे. तो म्हणजे परिस्थितीच आकलन. म्हणजे कोणत्याही यश, अपयश, नातेसंबंध ह्या सगळ्यात जे आपल्या समोर येत ते नेहमीच अर्धसत्य असते ही जाणीव. आपण बघतो, विचार करतो त्या पेक्षा कित्येक पटींनी गोष्टी वेगळ्या असू शकतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच घटना ह्या अर्धसत्य घेऊनच आपल्या पर्यंत येतात ही समज. कोणीतरी आपल्याशी अस का वागल? ह्याच्या साठी आपण समजून घेऊ शकू ह्यापेक्षा ही वेगळ्या घटना कारणीभूत असू शकतात. आपल्या यश – अपयशामद्धे आपल्या खेरीच अनेक गोष्टी सहभागी असू शकतात. मग ती लोक असतील, परिस्थिती असेल, वेळ असेल किंवा इतर काही.
अर्धसत्या ची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण आपल्या सोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी कडे बिग पिक्चर ने बघू शकतो. माझ्या समोर आलेल्या किंवा आकलन झालेल्या गोष्टीनी त्या पांढऱ्या क्यानवर्स चा छोटा भाग व्यापला आहे. त्याच्या शिवाय अजून बराच पांढरा क्यानवर्स मोकळा आहे हीच ती जाणीव. जेव्हा ही जाणीव पचवण्याची आपली तयारी असते. तेव्हा प्रत्येक गोष्टींकडे आपण वेगळ्याच नजरेने बघू शकतो. मीच का? माझ्याच बाबतीत का? सगळ माझ्यामुळे? मीच तो? ह्या टोकाच्या भुमिकेमद्धे आपण जात नाही. आपल मन हे नेहमीच आपल्याला अर्धसत्य सांगते. ते पचवण्याची ताकद आपल्यात आली की उरलेल्या अर्धसत्या पलीकडे आपला प्रवास सुरु होतो व मनाचा स्थिरतेकडे.
एक प्रयोग... विनीत वर्तक
१९ फेब्रुवारी २००९ हा दिवस माझ्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस आहे अस मलाच स्वताला आत्ता कळल. कारण म्हणजे ज्या पायरीने माझ्या मधील लेखन कलेला जागृत केल त्या पायरीचा स्पर्श मी ह्याच दिवशी केला होता. ह्याच दिवशी मी माझ फेसबुक अकौंट सुरु केल. २००९ ते २०१७ ह्या जवळपास ८ वर्षाच्या कालखंडात मी सुट्टी कधी घेतलीच नाही. फेसबुक च व्यसन म्हणा किंवा माझ्या एकटेपणाच औषध म्हणा ते सुरूच राहील. पण २०१६ साली मी ठरवलं की एक प्रयोग करायचा घ्यायची सुट्टी अगदी महिनाभर बघू काय होते ते?
प्रयोग करायचा हे कधीपासून मनात होतच पण वेळ जुळून येत नव्हती. या न त्या कारणाने त्याचा मुहूर्त पुढे जात होता. नोव्हेंबर महिन्यात काही गोष्टींमुळे अतिशय अस्वस्थ झालो. ह्याला कारण ही फेसबुक होत. थांबण्याची वेळ आली होती. मग घेतला निर्णय आणी थांबलो काही दिवस. पहिल्यांदा पचवण अवघड गेल. इतके वर्षाची कनेक्ट राहण्याची सवय कुठेतरी अस्वस्थ करत होती. सतत अपडेट्स, कमेंट्स, स्टेटस आणी त्यावर माझे व्यू. जेव्हा सुरवात केली तेव्हा फेसबुक ने झपाटून टाकल होत. स्वताला मोकळ होण्याच माध्यमाने मला कधी जाळ्यात ओढलं कळलच नाही. प्रत्येक गोष्टीवर मत मांडताना आपण अनेक गोष्टीनंमध्ये उगाचच नाक खुपसतो आहोत किंवा तिथल्या नकारात्मक गोष्टींचा परिणाम जेव्हा माझ्या खऱ्या आयुष्यात होऊ लागला. तेव्हा डिजिटल डीटोक्स चे विचार येऊ लागले. एकदा शांतपणे बंद करून मग सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयोग केला.
थांबलो. मागे वळून बघितलं. खूप काही हाताशी लागल पण हातातून काय निसटल ते ही कळल. इतके दिवसात अनेक नको त्या गोष्टी आयुष्यात अस्थिरता निर्माण करत होत्या. ज्या गोष्टींचा माझ्याशी काही संबंध नव्हता अश्या गोष्टी अप्रत्यक्षपणे स्ट्रेस निर्माण करत होत्या. माहितीजालात गुंतून जाताना अनेक विचार , गोष्टी, भावना सगळ्याच कुठेतरी मला स्वताला माझ्यापासून लांब नेत होत्या. जेव्हा थांबलो तेव्हा हे कुठेतरी लक्षात आल. सतत भरलेल मन थोड रिकामी राहायला लागल. ह्याचा परिणाम चांगलाच झाला. कुठेतरी माझ्या विचारांचा रस्ता मी शोधायला लागलो. गेले अनेक वर्ष स्वताकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. त्या रिकाम्या पोकळीमुळे मला स्वताकडे बघता आल. स्वताला शोधता आल. अनेक नवीन गोष्टी चालू केल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पणे त्याचे परिणाम चांगलेच आले.
पण हे सगळ करताना स्वतातील लेखक मात्र हरवून बसलो होतो. म्हणजे लिहण्याची खुमखुमी स्वस्थ बसून देत नव्हती. पण माझ लिखाण हे फेसबुक वर बांधल्या गेलेल्या विचारांनीच कुठेतरी बाहेर येत होत. ह्या प्रयोगात हे अनुमान नक्की झाल. त्यामुळे पुन्हा आपल्यातील एका चांगल्या गुणाला कुठेतरी आपण गमावून बसतो आहे की काय? अशी भीती पण वाटली. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आणी कोणत्याही गोष्टीपासून एकदम तोडण दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. ह्यातला सुवर्णमध्य जर साधता आला तर दोन्ही कडच्या अनेक गोष्टी मिळवता येतील. म्हणून आता ठरवलं की ९०% लक्ष स्वताकडे तर १०% सोशल मिडिया कडे. हे तुलनात्मक प्रमाण शक्य तितक संतुलित ठेवायचं. शाळेत असताना प्रयोग झाला की प्रयोगाची करण्याची कारण, प्रयोग ची पद्धत व त्या नंतर अनुमान, निष्कर्ष लिहण्याची एक पद्धत होती. तीच ह्या प्रयोगात मी वापरली. असे प्रयोग पुन्हा करण्याचं ठरवून निष्कर्षांवर काम हाती घेतल. बघा तुम्ही पण असा एखादा प्रयोग करून कदाचित हरवलेल्या अनेक गोष्टींचा ठाव मिळेल.
चुकलेला जमाखर्च... विनीत वर्तक
आयुष्याच्या पटलावर आपण कमवायला लागलो की जमाखर्चाचा हिशोब सुरु होतो. खरे तर पहिला श्वास घेताच तो सुरु होतो पण आपल्याला पैश्याची भाषा कळायला लागली की मग जमाखर्चाच गणित कळायला लागते. पण ते खरच कळते का? पैश्या आणी वस्तुत आपण इतके स्वतःला इतके गुरफुटवून टाकले आहे की आयुष्याचा जमा खर्च आपल्या दृष्टीने पैश्यात आणी वस्तुत आपण मोजतो. इथेच आपला जमा खर्च चुकतो.
आपण अनेकदा ऐकतो की जगावं तर स्वतःसाठी मग आपण खरच जगतो का स्वतःसाठी? सतत पुढे जाण्यासाठी धडपड. न संपलेल्या आणी सतत खुणावणाऱ्या शिखरांची यादी घेऊनच प्रवास करत रहातो. कधी आवडीने तर कधी मन मारून. प्रवास केलेल्या आणी राहिलेल्या प्रवासाची आकडेमोड करूनच आपण जमाखर्च मांडत रहातो. न जुळणारी ब्यालंसशिट दरवर्षी चुकती करण्याची पराकाष्ठा करत. जिकडे जमाखर्च चुकलेला आहे. तिकडे ती जुळणार कशी?
आपली जमा म्हणजे काही रक्कम आणी वस्तू नाही न. आपली जमा आपले क्षण जे आपण आनंदाने जगतो तर खर्च म्हणजे निसटलेले क्षण जे आपल्या हातातून गेलेले. आनंद कशात असतो आपला हेच कळेपर्यंत अनेक क्षण निसटून जातात. शिखरे पादाक्रांत केली की आपण आनंदी होऊ असच आपल्याला वाटत असते. पण एक शिखर ओलांडल की दुसर खुणावत असते. केलेल्या प्रवासाचा आणी गाठलेल्या शिखराचा आनंद घेण्याच सोडून आपण पुन्हा एका प्रवासाला लागतो. असच चालू रहाते. बदलतात ती शिखरे शिक्षण, नोकरी, लग्न, मुल अशी पण सुरु रहातो तो प्रवास. एकाकडून दुसरीकडे. जिकडे निसटत रहातात जगण्याचे क्षण. झालेला खर्च कळेपर्यंत वयाची पन्नाशी उलटून जाते. मग खर्च केलेल्या क्षणांना जमा करण्याची कसरत सुरु होते. पण तोवर खूप उशीर झालेला असतो. एकीकडे झालेल्या प्रवासाने शरीर आधीच थकलेल असते. त्यात नकळत झालेल्या खर्चाची आकडेमोड करण्यात मन हि थकून जाते.
कुठे थांबायचं हे माहित असल की प्रवास सुंदर होतो. कुठेच थांबायचं नसल की नुसता प्रवास होतो. अनेक कोर्पोरेट ऑफिस मध्ये गेलो की एक पाटी नेहमीच आपल लक्ष वेधून घेते. ती म्हणजे व्हिजन आणी मिशन. कोणत्याही कंपनीच्या ग्रोथ चा मार्ग हा त्या व्हिजन आणी मिशन वर अवलंबून असतो किंवा त्याच मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी सगळे काम करत असतात. आपण कधी अस ठेवतो का आपल्या आयुष्याच व्हिजन आणी मिशन. आपल व्हिजन चालू होते पैसे कमवण्या पासून आणी मिशन असते कमीत कमी वेळात, त्रासात जास्तीत जास्त पैसे कमावणे. ह्या पलीकडे क्वचितच काही जण जातात. अश्याच लोकांना आयुष्याचा खरा जमाखर्च कळतो. बाकी सगळे हिशोबातच आयुष्य काढतात.
शिखरांची ओढ कोणाला नसते. तिथवर जाण्याची इच्छा सगळ्यांची असते. पण शिखर फक्त मिळवायचं की प्रवास पण जगायचा हे ज्याच त्याने ठरवायचं. शिखरांची कमी नाही. कमी आहे ती वाटांची. आपण कोणती वाट निवडतो ह्यावर आयुष्याचा बराच जमाखर्च अवलंबून असतो. वेगळ्या वाटा माहित असताना पण आपण चुकीच्या वाटेने जाऊन जमाखर्च मोजणार असू तर आयुष्याची ब्यालंस शिट कधीच जुळून नाही येणार. त्यासाठी वेगळ्या वाटेने जायलाच हव. ती वेगळी वाट एकदम नवीन पण असेल. कधी चुकेल पण, कधी दुसरीकडे जाईल पण जेव्हा आपल व्हिजन आणी मिशन प्रवास जगण्याच आणी अनुभवयाच असते तेव्हा शिखरांची मर्यादा आड येत नाही. तेव्हा बघा आपला जमाखर्च बरोबर आहे की चुकीचा. वेळ गेलेली नाही अजून चुकलेला जमाखर्च बरोबर करण्याची.
विनयाचा भंग... विनीत वर्तक
बंगळूरू मद्धे झालेल्या प्रकाराने अस्वस्थ झालो आहे. पुन्हा एकदा पुरुषी राक्षसाने एका मादीला आपल शिकार बनवलं. मी मुद्दामून मादी म्हणतो आहे. कारण स्त्री बोलतो तेव्हा तिच्याविषयी कुठेतरी एक आदर मनात असतो. पण मादीकडे भोगी नजरेनेच पाहिलं जाते. विनयभंग हा कसा ही असू शकतो. स्पर्श, बोलण, हावभाव आणी इच्छेविरुद्ध केलेल कोणतही वर्तन हे त्याच सदरात मोडते. अगदी टोमणे आणी जोक सुद्धा विनयभंगाचा एक भागच आहेत.
कामाच्या ठिकाणी तर असले प्रकार सर्रास घडतात. पण एकतर स्त्री त्याच्याकडे दुर्लक्ष करते किंवा त्याबद्दल कुठेही बोलत नाही. अब्रू चा ठेका समाज त्यावरून ठरवत असतो म्हणून जवळपास ७०% जास्ती स्त्रिया आजही ह्याबद्दल आपल तोंड उघडत नाहीत. अस आत्ताच एका सर्वेक्षणातून पुढे आल आहे. स्त्रियांना कामाच्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी भारत सरकारने ३ सप्टेंबर २०१२ रोजी एक वेगळ विधेयक संमत केल. Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Act, 2013 ह्या नावाने त्याच ९ डिसेंबर २०१३ साली कायद्यात रुपांतर झाल.
स्त्री ला भोगी वस्तू किंवा मादी म्हणून बघण्याच्या पुरुषाच्या दृष्टीकोनात अजून खूप मोठा बदल घडवण्याची गरज आहे. नाही म्हंटल तरी एक स्त्री ला कामाच्या ठिकाणी मिळणारा आदर आणी तीच स्थान अनेक ठिकाणी दुय्यम आहे. २०१३ च्या ह्या कायद्याने स्त्री ला खूप मोठा पाठींबा मिळाला आहे. पण अस असून सुद्धा अनेक कंपन्या ह्या कायद्याच्या अंबलबजावणी साठी टाळाटाळ करतात हे ही तितकच उघड सत्य आहे. फिक्की च्या मताप्रमाणे ३६% भारतीय तर २५% परदेशी कंपन्या अजूनही ह्या कायद्याच्या शिफारशी लागू करण्यापासून लांब आहेत. कारणे काही असतील पण अजूनही मानसिकतेतील बदल किती महत्वाचा आहे. हेच ह्यातून अधोरेखित होते आहे.
काही गोष्टीला अपवाद असतात तसे इथेही आहेतच. ह्याच कायद्याचा आधार घेऊन किंबहुना समाजाचा पुरुषाकडे बघण्याचा आधार घेऊन स्त्रिया ही गैरवापर करत आहेत हे ही तितकच समजून घ्यायला हव. कायद्याने सक्षम करण्यासाठी केलेल्या कायद्यांचा आधार जर स्त्री स्वताच्या फायद्यासाठी अस्त्र म्हणून पुरुषविरोधी वापरत असेल तर अश्या स्त्रीयांचा विरोध स्त्रीयांनी पण करायला हवा. जाणून बुजून अपशब्द बोलणे, टोमणे मारणे, नजरेतून हावभाव, अश्लील वर्तन, शब्दांचा गैरवापर ते कोणताही स्पर्श सगळच विनयभंग प्रकारात येत ह्याची जाण प्रत्येक पुरुष आणी स्त्री ने ठेवायला हवी. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून किंवा कोणत्याही प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीचा विनयभंग करत नाही आहोत ह्याची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी.
स्त्री किंवा पुरुष ह्यांना त्यांच्या लिंगावरून ओळख्ण्याआधी आपण एक माणूस म्हणून त्यांचा स्वीकार केला आहे का? हा प्रश्न आपण स्वताला विचारायला हवा. कारण आपण लिंग बघून कस वागायचं ते ठरवतो. लिंग जर विरुद्ध असेल तर ती भावना उफाळून बाहेर येते. मग आपण त्या व्यक्तीकडे भोगी, मादी किंवा इतर सगळ्या रुपात बघू लागतो. लिंगाला जर आपल्या विचारसरणीत स्थान नाही दिल तर विनयाचा भंग कधीच होणार नाही. कारण विनय, नम्रता ह्या गोष्टी लिंगावर अवलंबून नसतील. तर त्या माणूस असण्यावर अवलंबून असतील. मग घडणारी प्रत्येक गोष्ट सन्मान देणारीच असेल. जोवर आपण ह्या लिंगाच्या साच्यातून बाहेर येत नाही. तोवर असले विनायाचे भंग होतच रहाणार. मग ते कामाच ठिकाण असो वा घर असो.
गावच घर... विनीत वर्तक
गावच घर नेहमीच सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय राहील आहे. गाव ही संकल्पना इतकी सुंदर आहे की त्याच्या आठवणीने खूप सारे क्षण जागे होतात. कोकण हा तर निसर्गाचा वरदहस्त लाभलेला भाग. ह्याच भागातून कामानिमित्त, शिक्षणानिमित्त किंवा इतर अनेक कारणांसाठी लोक मुंबईला आले. त्याच्या पुढल्या पिढीने श्वास घेतला तो मुंबईतच. जुन्या पिढीसाठी मात्र एक आयुष्य गावातल तर एक मुंबईतल असच नेहमी राहील. गावच्या त्या कठीण, अगदी गरीब परिस्थितीतून मार्ग काढत ह्या न झोपणाऱ्या मुंबापुरीत आपल स्वताच अस्तित्व निर्माण करण्यात एक पिढी गेलीच.
नेहमीच गावचा विषय निघाला की पूर्वी गावी अस होत तस होत हे आपण आजही आपल्या आई-वडिलांच्या तोंडून नेहमी ऐकतो. आयुष्याची २०-३० वर्ष गेलेल्या ठिकाणी आणी स्पेशली जिकडे बालपण गेल. त्या जागेचा नेहमीच एक वेगळा ठप्पा त्यांच्या मनावर कोरून ठेवला आहे. गावच घर, शेती, लोक, सण – समारंभ ते गोंधळ सगळच कस आत्ता घडून गेल अस. गरीब परिस्थिती असून सुद्धा शेती करून आमच्या पिढीच्या आजी- आजोबांनी आमच्या आई- वडिलांना शिकवण्याचे किस्से तर अनेक घरात आजही सांगितले जातात. ते किस्से खरे आणी त्यातले कष्ट वेगळेच होते. आजची पिढी थोडाफार अंदाज तरी लावू शकेल पण आमच्या पुढे येणारी पिढी तर गाव काय? असाच प्रश्न विचारते आहे.
माझ्या पिढीसाठी संक्रमणाचा काळ होता. जन्म, शिक्षण, मित्र- मैत्रिणी मुंबईच्या तर सुट्टी, गणपती , होळी सारखे सण गावी. सुट्टीतले मित्र – मैत्रिणी एक तर बाकीच्या काळातले एक. एकीकडे शहरातील मिश्र पद्धतीशी जुळवून घेताना आपल्या मुळांशी जोडून राहण्याचा प्रयत्न. खरे तर बहुतेक वेळा गावी आपल्या शहराच्या मोठेपणाचा खोटा आव दाखवण्यात माझ्या पिढीतील अनेकांचे श्रम वाया गेले. गावातील वातावरण, तिथला निसर्ग खरे तर आपल्या समोर हात जोडून उभा असताना तो अनुभवण्याची संधी अनेकांनी दवडली ह्यात शंका नाही.
माझ गाव तर मुंबईला खेटून त्यामुळे मुंबईच्या बदलांचे वारे तिकडे लवकर पोहचले. आधुनिकीकरण ते शहरीकरण दोन्ही अगदी वेगातच. प्रवासाचा पल्ला हि छोटाच. २ तासात इकडून तिकडे तर तिकडून इकडे. त्यामुळे गाव ही संकल्पना मला तितकीशी अनुभवता आली नाही हे हि खरच. सगळ असून सुद्धा सण – समारंभाला आख्या कुटुंबाच एकत्र येण. सख्या- चुलत भाऊ बहिणीशी मज्जा करत अनुभवलेले ते क्षण अविस्मरणीय असेच आहेत.
तांदळाच्या कणग्यान मध्ये केलेला लपाछुपी चा खेळ. ते दरवर्षी काथ्याचा बांधलेला झोपाळा. जो अनेकदा तुटायचा आणी अनेकदा त्यावर झुलताना पायाने केलेला आवाज सगळच वेचून ठेवाव अस. त्यावर कढी असेल ती समुद्राची आणी तिकडे मिळणाऱ्या त्या छोट्या वड्यांची. अगदी हाकेच्या अंतरावर असलेला समुद्र त्यात कातळाने वेढलेला समुद्र किनारा ह्यामुळे पायाला होणाऱ्या जखमा सगळच चालून जायचं. बैलगाडीतून केलेला प्रवास ते आजोबांकडून बैलगाडी चालवायच घेतलेल तुटक शिक्षण अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात अगदी ताजतवान आहे. सगळ्यात मज्जा असेल ते जेवण. मातीच्या भांड्यात केलेलं. आजीच्या हातच चिकन आणी तीच ती वाल शेंग्याची परमोच्च भाजी खाण म्हणजे शेवटच्या टप्यातील सर केलेले शिखर होते. आजी- आजोबांच्या सानिध्यात आपल्या तब्बल ६ मुलांच्या वेगवेगळ्या नातवंडानी एकत्र येण किती त्रासदायक असू शकेल ह्याची कल्पना तेच करू जाणे.
आज पुन्हा एकदा गावच्या घरी गेलो तेव्हा ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. एकेकाळी जिकडे बैलगाडी उभी रहायची तिकडे आपली स्वताची गाडी उभी असतानाचा क्षण टिपला. किती बदलेल्या काळातून आपण आज इथवर आलो त्याच एक द्योतक माझ्यासाठी होत. आज घर तेच आहे, समुद्र तोच आहे, गाव पण तेच आहे पण बदलली ती माणस. एकेकाळी तब्बल ६ वेगवेगळ्या कुटुंबांनी गजबजलेल घर शांत वाटल. आजी- आजोबा फोटोतून माझ्याकडे बघत होते. मी मात्र त्यांच्याकडे बघून गावच घर शोधत होतो.
पहिले शंभर... विनीत वर्तक
शंभर म्हंटल की समोर येते ते क्रिकेट. स्पेशली भारतीयांची उडी क्रिकेट च्या बाहेर जात नाही इतक ते आपल्या नसानसात भिनलेल आहे. क्रिकेट च्या पंढरी मद्धे पहिल्या शतकाला जितक महत्व आहे तितकच पण त्याहून थोड जास्तीच महत्व ह्या शतकाच अजून अनेक ठिकाणी आहे. आपली पहिली शंभरी आणी ती ही तितक्याच भव्य पद्धतीने जुळवून आणली तर “उसका मजा कूछ और ही हे” नाही का? असच काहीतरी होणार आहे फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात. शंभरी आणी ती ही अश्या तर्हेने की कोणी विचार केला नसेल.
१९६९ साली जेव्हा सुरवात केली तेव्हा एक साऊनडिंग रॉकेट उडवणारी संस्था म्हणून इस्रो ची ओळख होती. आता २०१७ साली एक जागतिक विक्रम करणाच्या उंबरठ्यावर स्वताला सिद्ध करायला इस्रो सज्ज होत आहे. अवकाश यान उडवण्यासाठी लागणार तंत्रज्ञान मिळवण्यासाठी एकेकाळी धडपडणाऱ्या इस्रो कडे सध्या ५०० कोटी पेक्षा जास्ती उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी च्या ऑर्डर पडून आहेत. हे यश नक्कीच एका रात्रीत मिळालेलं नाही. आज एकाच वेळी १०० उपग्रह एकाच वेळी एकाच रॉकेट मधून पाठवण्याच्या रेकोर्ड साठी इस्रो सज्ज होते आहे. खरे तर एकूण संख्या १०३ अशी आहे. पण सगळ्यात महत्वाच की ह्यातले तब्बल १०० उपग्रह भारताच्या बाहेरील देशांचे आहेत.
२०१६ मद्धे एकाच वेळी २२ उपग्रह प्रक्षेपित करून इस्रो ने आपल वर्चस्व निर्माण केल होत. आत्ता पर्यंत ५० पेक्षा जास्ती अनेक देशांचे उपग्रह यशस्वी प्रक्षेपित करणाऱ्या इस्रो ने स्वस्त आणी कमी वजनाच्या उपग्रहांच्या बाजारात आपल नाण खणखणीत ठेवल आहे ते १००% यशासह. पी. एस. एल. व्ही. च्या कामगिरीचा आलेख उंचावत नेत इस्रो ने त्याच्यावर अनेक प्रयोग केले. एकाच वेळी अनेक उपग्रह वेगवेगळ्या बनावटीचे, एकाच वेळी वेगवेगळ्या कक्षेत प्रक्षेपण. त्याच वेळी मंगळ मोहिमेच्या वेळी पण इस्रो चा विश्वास पी. एस. एल. व्ही. ने सार्थ ठरवला होता.
पी. एस. एल. व्ही सी – ३७ च्या सोबत इस्रो ह्यावेळी १०३ उपग्रह प्रक्षेपित करत आहे. ह्या आधी ८३ उपग्रह प्रक्षेपित केले जाणार होते. ज्यातील ८० हे वेगळ्या देशांचे तर ३ भारतीय होते. त्यात आणखी २० उपग्रह आणून इस्रो ने उपग्रहांची १०० गाठली आहे. १३५० किलो वजनाचे १०३ उपग्रह घेऊन पी. एस. एल. व्ही सी – ३७ येत्या फेब्रुवारी महिन्यात उड्डाण भरेल तेव्हा जगाच्या क्षितिजावर किंबहुना अवकाश क्षेत्रात भारताचा तिरंगा अश्या उंचीवर जाईल जी उंची अजून कोणाला गाठता आलेली नाही.
अमेरिका, इस्राईल, जर्मनी, नेदरलँड्स, स्वीझर्ल्यांड, कझाकस्तान अश्या अतिप्रगत ते प्रगत देशांचे वेगवेगळ्या धाटणीचे उपग्रह घेऊन इस्रो आपली शंभरी साजरी करत आहे. हे सगळे मायक्रो उपग्रह असले किंवा कमी वजनाचे असले तरी त्यांची मांडणी आणी प्रक्षेपण अतिशय गुंतागुंतीच आहे. स्वताच्या गुणांवर विश्वास किंबहुना स्वताच्या कर्तृत्वावर विश्वास असल्याशिवाय जसा कोणताही फलंदाज शंभरी चा विचार करू शकत नाही. त्याच प्रमाणे इस्रो सुद्धा कुठेतरी त्याच्या वर्कहॉर्स वर असलेल्या विश्वास आणी त्याच्या सफलतेविषयी शाश्वत असल्याने इतक मोठ धाडस करत आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात उपग्रहांच प्रक्षेपण आत्ता पर्यंत कधीच झालेलं नाही. त्यामुळे ही शंभरी इस्रो ला किंबहुना भारताला अवकाश क्षेत्रात एक मानाच स्थान तर देईलच पण प्रचंड मोठ्या प्रमाणात परीकीय चलन उपलब्ध करून देणार आहे.
पहिल्याच शंभरी साठी इस्रो कसून तयारी करते आहे. हा विक्रम पूर्ण होत नाही तोच इस्रो एका वेगळ्या तयारीसाठी तयारीला लागेल तो म्हणजे मार्च २०१७ साली सार्क उपग्रह किंवा ज्याला आता साउथ एशियन रिजनल फोरम ह्या नावाने संभोधल जाईल हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. भारतासोबत श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, भूतान ह्या सर्व देशांना ह्याचा वापर करता येणार आहे. अफगाणिस्थान ला सुद्धा ह्यात घेण्यासाठी वाटाघाटी सुरु आहेत. हे जर झाले तर पाकिस्तान ला एकट पाडण्यात भारत यशस्वी होईलच पण रडीचा डाव खेळणाऱ्या ला खेळणे पण शक्य होणार नाही आहे. इस्रो च्या पहिल्या शंभरी साठी अभियंते, वैज्ञानिक ह्यांना खूप खूप शुभेच्या आणी इस्रो पुन्हा एकदा ह्यात यशस्वी होईल ह्या आशेने एका भारतीयाकडून मानाचा सलाम.
न कळलेले महाराज... विनीत वर्तक
गेल्या काही दिवसांपासून व्हात्स अप वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जाती युद्ध सुरु झाले आहे. एकीकडे महाराजांचे कोणते सरदार, सेवक आणी जवळचे अमुक एका जातीतील होते आणी कोणते दुसऱ्या जातीतील. कसे त्यांनी महाराजांशी गद्दारी केली किंवा कसे त्यांच्यासाठी प्राण अर्पण केले हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या इतिहासाचा आधार घेऊन अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी बिनदिक्कत पणे फिरत आहेत. ह्या सर्वच गोष्टींचा महाराजांच्या कर्तुत्वाशी संबंध नसताना कोणत्या तरी एका जातीला मोठ किंवा नीच दाखवण्याचा अट्टाहास दोन्ही बाजूने केला जात आहे. कोणाला तरी वरचढ किंवा खाली दाखवण्यासाठी किंवा कोणत्या तरी जाती, धर्म ह्याचा उपापोह करण्यासाठी छत्रपतींच्या नावाचा वापर त्यांच्याच पुढच्या पिढीतील मावळ्यांनकडून केला जातो ह्या पेक्षा क्लेशदायक दुसर काहीच नसेल.
स्वराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, धर्म बघून माणस नाही निवडली. निवडली ती त्याच्यावर असलेला विश्वास, कर्तुत्व आणी निष्ठा बघून. जवळ केलेली सगळीच माणस चांगली निघतील असे नाहीच पण म्हणून काय ती जात , धर्म त्या माणसांनी ठरवली गेली का? मुळातच बनवणाऱ्या ने रक्तात काही फरक केला नाही. तर आपण कोण? महाराजांनी काय केल किंवा काही नाही केल ह्याचा उपापोह आज ३००-४०० वर्षानंतर करण्यापेक्षा आपण त्यांच्या कडून काय घेऊ शकतो हे समजण जास्ती महत्वाच नाही का?
स्वराज्य बनवताना मुळातच जनतेवर झालेल्या अन्यायाला कुठेतरी आळा बसावा ह्या उद्देशाने त्याची स्थापना झाली. त्या काळात मुळातच दबून राहिलेल्या हिंदू सामाजाला त्यांनी जागृत केले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते करताना दुसऱ्या कोणत्याच जातीला व धर्माचा कोणताही अपमान होणार नाही हे हि ध्यानात ठेवले. अस असताना त्यांच्याच नावाने त्यांचेच मावळे कुठेतरी फक्त स्वताचा धर्म, जात मोठ करण्यासाठी दुसऱ्या जाती धर्माला खाली दाखवण्यासाठी काही वाट्टेल त्या थराला जाऊन गोष्टी करत आहेत. फक्त “जय” म्हणून किंवा भगवा झेंडा आणी दाढी वाढवून किंवा अजून घोषणा देऊन महाराज आपल्याला कळले असते तर आज हि परिस्थिती आली नसती.
जाती- धर्म ह्यांच्या पलीकडे महाराजांचं कर्तुत्व होत. माणस जोडण्याच कौशल्य, संघटन कौशल्य, युद्धाच कौशल्य ही आणी अशी अनेक गोष्टी आज इतिहास आपल्याला सांगतो आहे. पण आपल्याला त्यांच्या मावळ्यानच्या , सरदारांच्या फक्त जाती, धर्म दिसतात. हे आपल दुर्दैव आहे. ज्या महाराजांनी आपल्या महारष्ट्रात, सह्याद्रीत धुंडाळून किल्यांच अभेद्य अस वैभव उभ केल. त्याच वैभवावर आज आपण दारू प्यायला जातो. तिकडेच आपण दंगा करतो. ज्यांच्या रक्तातून आज त्या चिरेबंदी तटबंद्या उभ्या राहिल्या तिकडे आज आपण आपल्या प्रेमाची नाव रंगवतो हीच हा ती श्रद्धांजली?
संघटना कौशल्य ज्यांनी दाखवून दिल ज्यांच्या दरबारात जाती, धर्म ह्या पलीकडे निष्ठेला, कर्तुत्वाला मान होता त्याच दरबारातील जाती , धर्म आता ३००-४०० वर्षांनी पोखरून काढून आपण महराजांचा कोणता आदर्श पुढे चालवत आहोत ह्याचा प्रत्येकांनी विचार करावा. लहानपणी इतिहास शिकताना, वाचताना रक्त सळसळून उठायचं. आपणही घोड्यावर बसून लढाईत जाव इतका ज्वाज्वल्य इतिहास असताना आपण आपल्या पुढल्या पिढीकडे महाराजांची जात, त्यांच्या सरदारांचा धर्म, मावळ्यांची जात देणार असू तर खरोखर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले का? असा प्रश्न प्रत्येकांनी स्वताला विचारावा.
अग्नी... विनीत वर्तक
गेल्या आठवड्यात भारताने अग्नी ५ ह्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र ची चौथी यशस्वी चाचणी घेतली. ह्या यशस्वी चाचणी नंतर हे क्षेपणास्त्र त्याच्या पुढच्या कस्टमर ट्रायल साठी सज्ज झाल आहे. शत्रूच्या मनात धडकी भरवणारे खरे तर चीन च्या गोटात खळबळ माजवणाऱ्या ह्या क्षेपणास्त्राने भारताला काही मोजक्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. तब्बल ५५०० ते ५८०० किमी पल्ला असणाऱ्या व १५०० किलोग्र्याम पर्यंत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल हे क्षेपणास्त भारताच्या भात्यातील घातक समजले जाते. चीन च्या मते ह्याची क्षमता ८००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतु आंतराष्ट्रीय मंचावर भारत जाणून बुजून ह्याचा पल्ला कमी सांगत आहे.
एक लक्ष्य भेद्ल्यावर आपण नवीन लक्ष ठेवतो आणी ते गाठलेल्या लक्ष्यापेक्षा अजून जास्ती उंचीवरच असते. अग्नी ५ यशस्वी होताच भारताने पुढल्या लक्षावर आपली नजर वळवली आहे. ते आहे अग्नी ६ किंवा सूर्य. तब्बल ८००० ते १२००० किमी चा पल्ला असणार हे क्षेपणास्त्र ३००० किलोग्र्याम वजनाची अण्वस्त्र वाहून नेऊ शकणार आहे. त्याचा पल्ला अजून गुलदस्त्यात असला तरी अग्नी ६ वेगळ्याच कारणांसाठी घातक असणार आहे. ते म्हणजे Multiple independently targetable reentry vehicle त्याच्या सोबत आहे Maneuverable reentry vehicle(MaRV). ह्या दोन्ही गोष्टी अग्नी ६ ला आणी त्यायोगे भारताला एका वेगळ्याच उंचीवर नेणार आहेत.
Multiple independently targetable reentry vehicle (MIRV) म्हणजे एकाच क्षेपणास्त्र मधून अनेक अनेक क्षेपणास्त्र. अगदीच समजून घ्यायचं झाल तर रामायण सगळ्यांनी बघितल आहे. त्यात युद्धात रामाने एक बाण हवेत सोडल्यावर त्यातून अनेक बाण निघून राक्षसी सेनेला घायाळ केल्याच बघितल्याच आठवत असेल. (MIRV) म्हणजे तेच. एक अग्नी ६ डागल्यावर हवेतल्या हवेत शत्रूवर हल्ला करताना त्यातून अनेक वेगळी क्षेपणास्त्र, अण्वस्त्र वेगवेगळ्या शत्रूच्या ठिकाणावर एकाच वेळी हल्लाबोल करतील. ह्यातून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणची शत्रूची ठिकाण उध्वस्त करता येतील. काही मोजक्या देशांकडे असलेल हे प्रगत तंत्रज्ञान भारताच्या अग्नी ६ मध्ये असणार आहे.
Maneuverable reentry vehicle हे अजून वैशिष्ठ अग्नी ६ ला प्रचंड ताकद देते. एकदा लक्ष्यावर हमला केल्यावर समजा लक्ष्य बदलल किंवा त्याच स्थान बदलल तर हवेतल्या हवेत हे क्षेपणास्त्र किंवा त्यातील अण्वस्त्र हे आपल लक्ष्य त्याप्रमाणे हवेतल्या हवेत बदलवून लक्ष्याचा भेद करण्यात सक्षम असतील. ह्याला होमिंग गाईडनन्स सिस्टीम लागते. जी हे नक्की करते कि रस्ता बदलून सुद्धा क्षेपणास्त्र ठरलेल्या ठिकाणी त्याची कामगिरी फत्ते करेल. आता ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला १००००-१२००० किमी दूरवरून नियंत्रित किंवा डागत्या आल्या तर शत्रूला कळायच्या आधी त्याच खूप मोठ नुकसान झाल असेल.
एकीकडे अग्नी १,२,३ आधीच आपल्या सिमेंच्या तसेच देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असताना अग्नी ५ आपल्या डेवलपमेंट च्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून देशाच्या तिन्ही दलांच्या ट्रायल साठी सज्ज झाल आहे. त्याच वेळी अग्नी ६ आपल्या पहिल्या चाचणी साठी सज्ज झाल आहे. २०१७ मद्धे होणारी अग्नी ६ ची चाचणी भारताच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. निसर्गाच्या पाच मुलद्रव्य पेकी एक असणाऱ्या अग्नी ह्या नावावरून नाव असणाऱ्या सगळ्या अग्नी च्या कुटुंबाने आपल्या देशाला सुरक्षतेचे त्या सोबत शत्रूच्या मनात धडकी भरवणारे अग्निपंख दिले आहेत ह्यात शंका नाही.
बदललेला ग्राहक... विनीत वर्तक
काळ बदलला तशी माणस पण बदलली, त्यांच्या गरजा पण बदलल्या. चैन वाटणाऱ्या गोष्टी गरज झाल्या. गरजांची चैन झाली. ह्या बदलांचा वेग गेल्या काही काळात प्रचंड वाढला त्यायोगे गरजा पण बदलत गेल्या. एकेकाळी जिकडे नावाला महत्व होत. गुणवत्ता महत्वाची होती. गुणवत्ता आणी नावावर अनेक कंपन्यांनी अनेक वर्ष ग्राहक राजावर राज्य केल. पण जेव्हा सेवा आणी किंमत बाजारात स्पर्धा करू लागल्या तेव्हा गुणवत्ता आणी किंमत ह्याचा मेळ घालण कठीण होत गेल. बदल हाच बाजाराचा पाया झाला. त्याने बाजाराची सगळी गणित बदलवली. गुणवत्ता मागे राहिली. पुढे गेली ती किंमत. भले त्या वस्तूच आयुष्य कमी झाल पण बदलासाठी नेहमीच आग्रही असलेल्या ग्राहक राजाला युज आणी थ्रो ची सवय झाली.
अश्या सगळ्या बदलांना ओळ्खल ते चीनी बाजारपेठेने. स्वस्त आणी मस्त पण त्याच वेळेस गुणवत्तेवर कॉमप्रोमाईज करणाऱ्या चीनी वस्तूंनी जगभर आक्रमण केल. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला भारत त्यातून कसा वाचेल? एका पाठोपाठ एक अश्या वस्तूंनी भारतीय बाजारपेठा चीनी वस्तूंनी भरून गेल्या. अगदी दारावर लागणाऱ्या तोरणापासून ते हातात रेंगाळणाऱ्या मोबाईल पर्यंत. चीनी वस्तूंची त्सुनामी बाजारपेठेत वर्चस्व गाजवेपर्यंत कोणाला त्याची चाहूल लागली नाही. मग त्या त्सुनामी मद्धे अनेक कंपन्या, अनेक पारंपारिक गोष्टी, वस्तू, कारागीर आणी गुणवत्ता सगळच नष्ट झाल.
म्हणतात न की आत शिरलेल पाणी जस ओसरू लागते तस त्याने केलेल्या प्रलयाची प्रचीती येते. हळूहळू हेच परिणाम दिसायला सुरवात झाल्यावर चीनी मालाविरुद्ध उठाव सुरु झाले. ह्याला चीन च राजकारण, कुटनीती आणी भारताला रोखण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर उचललेली पावलं कमी अधिक प्रमाणात कारणीभूत असतील हि. पण प्रमुख कारण आहे की पुन्हा एकदा ग्राहक बदलू पाहतो आहे. हा बदल जर भारतीय लोकांनी, कारागिरांनी आणी भारतीय कंपन्यांनी लक्षात घेतला तर येणाऱ्या काळात ड्रयागन ला तोंडघाशी पडायला वेळ लागणार नाही.
बदलेला ग्राहक आता दोन्ही गोष्टी शिकला आहे. त्याला हव आहे ते मिलाफ काही गोष्टीत गुणवत्तेचा तर काही गोष्टीत बदलांचा. उदाहरण द्यायचं झाल तर रोजच्या आयुष्याचा अंग झालेल्या आणी सतत बदलत राहणाऱ्या मोबाईल मध्ये त्याला हव आहे तो बदल. गुणवत्ते पेक्षा १-२ वर्ष वापरून कमी किमतीत थोड्या काळाने नवीन फोन घेण्यावर त्याचा कल आहे. जिकडे गुणवत्ते पेक्षा फिचर्स, रंगसंगती, नवीन टेक्नोलोजी, स्पेस ह्यावर जास्ती लक्ष असते तर ज्या गोष्टी घरात अनेक वर्ष सेम राहतात त्यात गुणवत्तेवर भर आहे. कार, मोटर सायकल, फ्रीज, टी व्ही किंवा अगदी मिक्सर सुद्धा.
चीनी मालाने आपली छाप कुठे सोडली असेल तर रोजच्या आयुष्यात कमी आयुष्य असणाऱ्या गोष्टीत पण लांब पल्ल्याच्या प्रवासात चीनी गोष्टी तितक्या मुसंडी मारू शकलेल्या नाहीत. एखादी चीनी गाडी घेण्यापेक्षा ग्राहक जापनीज (होंडा) , भारतीय (मारुती), जर्मन (मर्सिडीज) सारख्या कार अगदी जास्तीचे पैसे देऊन विकत घेतील. अगदी चीनी गाडी कितीही आकर्षित असली तरी गुणवत्ता जीवाशी निगडीत आहे. तिकडे ग्राहक पैश्याकडे न बघता गुणवत्ता स्वीकारतो. ह्यात काही अपवाद असतील. बाजारपेठेतील कच्चे आणी पक्के दुवे ओळखणे हे एका चांगल्या कंपनी ची वाटचाल ठरवतो. त्यामुळे चीनी मालावारची ओरड चुकीची आहे अस मला वाटते. आपण व्हात्स अप वर चीनी माल वापरू नका म्हणून मेसेज पाठवताना चीनी कंपन्यांचा मोबाईल वापरत आहोत ह्याची जाण प्रत्येकाने ठेवायला हवी.
पे-टीम मध्ये चायनीज कंपनी अलिबाबा ची मालकी आहे ही ओरड करताना भारतीयांनी २०१० साली त्या कंपनी मध्ये गुंतवणूक केली नाही हे वास्तव आपण का विसरतो. रतन टाटा नी पुढली पावल ओळखून स्वतः काही भांडवल पे-टीम मध्ये घेतले होते. आज २०१६ ला जेव्हा अलिबाबा ला त्यांच्या दूरदृष्टीची फळे मिळत आहेत तेव्हा पे-टीम वापरू नका असे म्हणणे अप्पलपोटी नाही का? मुळात हि कंपनी एका भारतीयाची आहे. त्यात २५% हिस्सा अलिबाबा चा आहे. आज त्याची गुंतवणूक सर्वात जास्त परतावा मिळत असताना आपण कुठेतरी ग्राहक ओळखण्यात कमी पडलो हे झाकण्यासाठी व्हात्स अप चा वापर काही लोक करत आहेत.
ग्राहक हा राजा असतो. जो राजाच्या मनातल ओळखतो तो पुढे राज्य करू शकतो. जो नाही ओळखत त्याच अस्तित्व पुसायला वेळ नाही लागत. नोकिया त्याच ज्वलंत उदाहरण आहे. तुमच प्रोडक्ट जर खरच चांगल आहे तर ग्राहकाला झुकवता येते. आप्पल हे त्याच उदाहरण आहे. गुणवत्ता असेल तर तुम्ही आजही आपला ग्राहकवर्ग निर्माण करू शकता मर्सिडीज त्याच उदाहरण आहे. तुमच्याकडे दूरदृष्टी असेल तर योग्य गुंतवणूक जास्तीत जास्त परतावा देते ह्याच अलिबाबा हे उदाहरण आहे. तर तुमच्या कल्पनांना पंख दिले तर स्काय इज लिमिट पे-टीम ह्याच उदाहरण आहे. शेवटी काय तर बदलेला ग्राहक ओळखण हेच खूप मोठ स्कील आहे.
क्यारोलिना गोस्वामी... विनीत वर्तक
क्यारोलिना गोस्वामी नावावरून कोणीतरी विदेशी पाहुणी भारतीयाच्या नजरेत पसंद पडून लग्न झालेली असेल इतपत नावावरून आपली मजल जाते. ते खर ही आहे. क्यारोलिना चा जन्म पोलंड ला झाला आहे. २ वर्षापूर्वी भारतात आल्यावर इथल जग पाहून ती इकडेच रमली. एका भारतीयाशी लग्न करून आयुष्याची एक नवी सुरवात तिने इकडे केली. जेव्हा खरा भारत तिने बघितला तेव्हा भारताची इमेज जगात किती चुकीच्या पद्धतीने दाखवली जाते हे तिला समजून चुकल. किंबहुना भारतीयच भारताच्या बाबतीत किती अज्ञानी आहेत हे पण. एक वेगळाच भारत तिने गेल्या दोन वर्षात अनुभवला. तो सगळ्या जगापुढे आणण्यासाठी तिने वापर केला आपल्यातील लेखिकेचा.
यु ट्यूब वर गुलाबी रंगाच्या साडीत एखादी बार्बी दिसणारा चेहरा दिसला तर समजा तीच क्यारोलिना गोस्वामी. नवराच्या सोबतीने भारत अनुभवताना यु ट्यूब आणी तिच्या ब्लॉग च्या माध्यमातून तिने एका वेगळ्याच भारताची जाणीव जगाला आणी भारतीयांना पण करून दिली. https://www.youtube.com/watch?v=ijvVHdF7Ekc&t=5s (India- the future superpower is reclaiming) ह्या यु ट्यूब लिंक वरून भारत कश्या रीतीने जागतिक महासत्ता होणाच्या दिशेने वाटचाल करतो आहे हे सांगताना तिने दिलेल्या दाखल्यावरून हा आपलाच भारत आहे का? अस म्हणण्याची वेळ अनेक भारतीयांना पण येत असेल.
https://www.youtube.com/watch?v=o7Kk7sgeqU0 (Vasudeva kutumbakam) वसुधैव कुटुंबकम अस म्हणत भारताच्या संस्कृतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल आहे. ज्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ज्या देशामद्धे जवळपास सगळ्याच संस्कृती, धर्म, जाती एकत्र आजही नांदतात. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही हा गौरव जगात आजही टिकवून ठेवणारा भारत इतका वेगळा आहे. ह्याची जाणीव क्यारोलिना तिच्या बोलण्यातून करून देते.
नुसतच भारत किती गौरवशाली होता. अस भूतकाळात न रमता अगदी काल परवाच्या https://www.youtube.com/watch?v=0mpJoARC6nA (Demonetization in India) डीमोनीटायझेशन किती कठीण पण गरजेचा निर्णय होता. हे करताना मिडिया कसा चुकीच्या पद्धतीने गोष्टी जगात आणी भारतात दाखवत आहे. ह्याचा समाचार तिने घेतला आहे. प्राचीन काळचा योग https://www.youtube.com/watch?v=rcJomPVOe7w (Yoga-The empowerment of our minds) कसा एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. योगाच्या साथीने जग एका वेगळ्याच लेवल वर एकमेकांशी जोडू शकते. योग हि जगाला भारताने दिलेली सगळ्यात मोठी देणगी कशी आहे. हे सांगताना त्याच वेळी क्यारोलिना भारताने अवकाश क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करण्यास विसरत नाही. https://www.youtube.com/watch?v=uXwLCu4hAKM (ISRO Indian mission to Mars )
भारतातल्या मिडीयाला केजरी, लालू, मुलायम किंवा शाहरुख, सलमान, आमीर ह्यापासून वेळ मिळत नसेल. भारताने केलेल्या अवकाश स्वारीची बातमी एका ओळीत द्यायची पण कोणत्या चित्रपटाच्या प्रीमियर ला कोण आल ह्याच्या बातम्या दिवसभर चालवणाऱ्या मिडीयाने भारताच्या उत्तुंग भरारीला मात्र टी आर पी साठी जागा दिली नाही. मार्स मिशन आजही जगात चर्चेचा विषय आहे. एका चित्रपटाला लागणाऱ्या पैश्यापेक्षा कमी पैश्यात कोणी कस काय दुसऱ्या ग्रहापर्यंत जाऊ शकते? हा जगाच्या मिडीयाने आणी भारताच्या मिडीयाने न दाखवलेले सत्य आणी भारताच्या इस्रो चे अटकेपार झेंडे एक वेगळ्या देशाची बाई आपल्याला सांगते तेव्हा आपलीच मान लाजेने खाली जाते. आजवर जगातील सगळेच मिडिया भारताने इतके पैसे गरिबांवर खर्च करायचे होते अस बोंबलत आले. जस काय जगात सगळी गरिबी भारतात आहे. नासा च्या अवकाश कार्यक्रमांचे कौतुक करताना अमेरिकेतील असंख्य बेरोजगारांनवर ते पैसे खर्च का करत नाहीत? असा प्रश्न नाही विचारला. पण भारताच्या बाबतीत किंबहुना प्रत्येक बाबतीत मिडिया ची भूमिका किती दुटप्पी राहिली आहे. हे क्यारोलिना जेव्हा सांगते तेव्हा हाच का तो भारत आपण ओळखतो? असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.
http://www.indiaindetails.com/ ह्या साईट वरचे तिचे सगळेच ब्लॉग वाचनीय आहेत. एका पोलंड वरून आलेल्या मुलीला इतका भारत अवघ्या दोन वर्षात कळला. पण इकडे संपूर्ण आयुष्य घालवून नुसताच भारतीय असल्याचा अभिमान किंबहुना माज बाळगणार्यांनी स्वतः आपण किती भारताला ओळखतो ह्याचा विचार जरी केला तरी क्यारोलिनाच्या ह्या प्रयत्नांनी खरोखर भारतीय म्हणजे काय? हे पुन्हा एकदा भारताला शिकवलं असच मी म्हणेन. भारतात जन्म न घेता भारताच्या भारतीयाची जगाला आणी भारतातल्या लोकांना पुन्हा ओळख करून देणाऱ्या क्यारोलिना गोस्वामी ला माझा मनापासून सलाम.
भरलेल्या जागा... विनीत वर्तक
आयुष्य परिपूर्ण नसतेच त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात गाळलेल्या जागा असतातच. त्या भरण्यासाठी प्रत्येक जण त्याला हवा तसा शोध घेत असतोच. मग तो आयुष्याचा साथीदार असो वा फेसबुक मित्र / मैत्रीण. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या गाळेलेल्या जागा समोर येतात. जस वय वाढते तश्या त्या वाढत जातात. वयाच्या उत्तरार्धात मात्र भरलेल्या जागा पुन्हा रिकाम्या होतात. ह्या रिकाम्या झालेल्या जागा पुन्हा भरत तर नाहीच. पण त्यांनी निर्माण केलेली पोकळी ही प्रचंड अस्वस्थ करणारी असते.
पण अशी ही एक वेळ येते जेव्हा भरलेल्या जागांमध्ये पोकळी निर्माण होते किंवा त्या जागेसाठी अनेक दावेदार आपल्या आयुष्यात येतात. एकच व्यक्ती आयुष्याच्या सगळ्याच टप्प्यावर सगळ्याच जागा भरू शकेल अस खूप कमी वेळा होते. अनेकदा अनेक व्यक्ती आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर भरलेल्या जागा पुन्हा भरतात. त्या प्रत्येक व्यक्तीच स्वताच अस स्थान किंवा वैशिष्ठ असते. कोणीच परिपूर्ण नसल तरी सगळेच अपूर्ण असतात असा त्याचा अर्थ होत नाही. वेगवेगळ्या काळाच्या प्रवासात असणारी सोबत सेम असेल अस आपण गृहीत कस काय धरू शकतो? पडणारा पाउस दरवर्षी सारखा नसतो तर आयुष्याच्या भरणाऱ्या जागेतील माणसे कशी सारखी असतील? नक्कीच काही गोष्टी ह्याच्या पलीकडे असतात. काळाच्या परिणामांचा त्यावर काहीच असर होत नाही. इंद्रधनू सारखे त्यांचे सातही रंग सगळ्याच उन पावसात सारखे राहतात.
काही जागांना वेगवेगळे पर्याय ही असू शकतात. एकाच वेळी ते सगळे पर्याय योग्य असू शकतात. प्रत्येक पर्याय हा जागा भरण्यासोबत एक वेगळी अनुभूती देत असतो. म्हणून तर प्रत्येक माणूस एकमेव असा आहे. एकाच वेळी भरलेल्या प्रत्येक जागेची अनुभूती वेगळी यायला जागा भरणारी माणस कारणीभूत असतात. माणूस समृद्ध होतो म्हणजे काय तर एकाच वेळी वेगवेगळ्या अनुभूतींची जाणीव तो अंगिकारु शकतो. अस अनेकदा अनेक गाळलेल्या जगात होऊ शकते. ह्याचा अर्थ प्रत्येक वेळी नाविन्य असा कोणी काढू नये आणी अस स्वीकारणारा स्वैराचार करणाराच किंवा करणारीच असते असा ही काढू नये.
मला एक ओळ ह्या निमित्ताने आठवली “No matter how good you are, You can always be replaced” हे आयुष्यातील एक सत्य आपण नेहमी डोळेझाक करतो. अगदी काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या जागा सोडल्या तर सगळीकडे रिप्लेसमेंट होऊ शकते. डिव्हाईन अशी नाती खरे तर ती आधी जागा भरायला काहीतरी स्पेशल लागते. ती सहजा सहजी होत नाहीत. अशी नाती इंद्रधनू प्रमाणे असतात काळाच्या पलीकडे असणारी पण बाकी पावसा सारखी काळाप्रमाणे रिप्लेस होणारी. हे माहित असून सुद्धा आपल मन स्वताला स्पेशल समजत. मग सुरु होतो एक खेळ जिकडे भरलेल्या जागेवर दुसऱ्या कोणाला न येऊ देण्याचा. शेअरिंग आपल्याला जमत नाही. वरच वाक्य कितीही माहित असल तरी आपण स्वताला प्रत्येक गाळलेल्या जागेत इंद्रधनू समजतो. प्रत्यक्षात त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी आपण असल्यावर सुद्धा जागा रिकामी असू शकते. ती कोणीतरी भरू शकते हे समजण्याची प्रगल्भता किती मनात आणी लोकात असते.
कोणत्या जागा रिकामी ठेवायच्या कोणत्या भरायच्या आणी कोणत्या भरून सुद्धा रिकामी ठेवायच्या ह्याचा निर्णय प्रत्येक जण आपआपल्या परीने घेतो. जो भरलेल्या जागेत राहून सुद्धा नवीन आलेल्या पावसासाठी जागा देऊ शकला तो जिंकला. इंद्रधनू व्हायला त्याला उतरावं लागते. तो नेहमीच नाही उतरत तेव्हा भरलेली जागा पण रिकामी असू शकते हे वास्तव स्विकारायची मानसिकता आपण बनवायला हवी. नाही का?
बदललेले निकाल... विनीत वर्तक
१९९० चा काळ आणी २०१६ चा काळ या मद्धे शाळेत काय फरक पडला? अस कोणी मला विचारल तर माझ उत्तर असेल शाळा तीच आहे. अभ्यास पण तोच आहे. बदलल काही असेल तर निकाल आणी त्यात असणाऱ्या अपेक्षांचं ओझ. १९९० साली जी लोक दप्तर घेऊन शाळेत जात होती. ती आता पालकांच्या भूमिकेत आहेत. गेल्या २५-२६ वर्षात ह्या दोन्ही भूमिकेत वावरताना तेच जे ह्या ओझ्याखाली दबले गेले होते . तेच आता अजून जास्ती आपल्या मुलांना त्या खाली दाबत आहेत.
मला अजून आठवते माझ्या १३ वर्षाच्या शालेय कारकिर्दीत अनेक उतार- चढाव आले. असाही मी खूप हुशार नसल्याने उतारच जास्ती आले ते काही वेगळ सांगायला नकोच. पण इतक असून सुद्धा मला आठवत नसेल कि ४-५ पेक्षा जास्ती वेळा माझ्या आई- वडिलांना शाळेत यायची गरज भासली होती. स्पर्धा त्या वेळी हि होती. परीक्षा, गेम , सांस्कृतिक कार्यक्रम , चित्रकला, हस्तकला आणी स्पर्धा परीक्षा. १९९० च्या काळात परीक्षा, निकाल होते. आता २०१६ साली पण सगळ तेच आहे. त्यातली स्पर्धा, मज्जा आजही आणी तेव्हाही तीच होती. पण आज बदलेल त्याच स्वरूप म्हणजे बदललेले निकाल.
१९९० च्या काळात म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो. तेव्हाचा काळ आणी त्याच्या आसपास. स्पर्धांची मज्जा ही विद्यार्थान पर्यंत मर्यादित होती. त्यातल हरण, जिंकण हे त्यांच्या पर्यंत. मला नाही आठवत माझ्या पालकांनी कधी काय रे? ह्या वर्षी कब्बडी कोणती इयत्ता आणी तुकडी जिंकली? किंवा धावण्याच्या शर्यतीत कोण पहिला आला किंवा आली? ह्या वर्षी तू तिसराच का? असले प्रश्न विचारले. ह्याचा अर्थ मुलांच्या जडणघडणी मद्धे त्याचं लक्ष नव्हत अस नव्हता न. जर तस असत तर हा लेख लिहण्याइथवर मी पोहचलो नसतो. टिळक महराष्ट्र विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा किंवा तत्सम स्पर्धेत सर्टिफिकेट मिळाल म्हणून पालकांनी कधी एवढ का? तेवढ का? किंवा चांगले मार्क मिळाले म्हणून गवगवा केला नव्हता. रिझल्ट च्या दिवशी पण माझ्या शिक्षकांना माझे पालक कधी भेटल्याच आठवत पण नाही मला. अमुक एका तुकडीत का टाकल? किंवा अमुक एकाच्या बाजूला का बसवलं? तुला त्यांनी का मारल? शिक्षा का दिली? असले विषय तर घरपर्यंत जात पण नसत. गेले तरी मीच काहीतरी चुकीच केल असणार म्हणून शिक्षकांनी शिक्षा दिली असेल हे त्याचं मत मला त्यावेळी जरी चुकीच वाटल तरी आज मागे वळून बघताना बरोबर वाटल.
अस म्हणतात की १९९० च्या काळातील विद्यार्थी सगळ्यात जास्ती स्थित्यंतरा मधून गेले. मोकळी अर्थव्यवस्था, कॉम्प्युटर चा झालेला प्रवेश, पेजर, मोबाईल ह्यांचा नकळत झालेला घरापर्यंतचा प्रवेश. त्या योगे निर्माण होणाऱ्या संधी, स्पर्धा ह्या सगळ्याच बदलांना ही पिढी पुरून उरली. मग शाळेत अश्या निर्णयात लक्ष न देणाऱ्या पालकांनी पिढी घडवली की नाही? ह्याच उत्तर त्या वेळी विद्यार्थी दशेत पण आता पालकांच्या भूमिकेत असणाऱ्या पिढीने द्यायचं आहे.
काही महिन्यांपूर्वी सई च्या शाळेत रिझल्ट निमित्ताने जाण झाल. पहिलीतील मुल सगळी पण सगळ्यांचे आई- बाबा बऱ्याच टेन्शन मध्ये दिसत होते. म्हणजे आता त्यांच्या मुलाला बी, सी ग्रेड मिळाली. तर आयुष्य संपल असाच काय तो चेहऱ्यावर अविर्भाव. माझ्या नावाची मुलाने लाज काढली अश्या समजुतीतून काही पालक मुलांवर ओरडत होते. तर काही सगळ्यात ए मिळाल म्हणून त्यांची छाती ५६ इंचाची झाली होती. मुलांना त्याच काही सोयरसुतक नसल तरी निरागस, कोवळी मन मात्र बावरलेली होती. काय होणार? रिझल्ट काय लागणार? वय वर्ष ५-६ वयात जर आपण मुलांच्या मनात रिझल्ट च टेन्शन निर्माण करायला लागलो. तर दहावीत जाऊन त्यांनी आत्महत्या केली तर त्यात काही वावग वाटणार नाही.
मी स्वताला एक पालक म्हणून प्रश्न विचारतो. १९८५-८६ साली मी जेव्हा पहिलीत होतो. तेव्हा मला कोणती ग्रेड होती? किती टक्के मार्क्स होते? अगदी १० वी च्या आधीचे कोणतेच मार्क किंवा नंबर माझ्या लक्षात नाहीत. मग त्या निरागस जिवाकडून मी कोणत्या अधिकाराने मार्कांची आणी ग्रेडची अपेक्षा करत आहे. १९९० ते २०१६ नक्कीच काळवेळ बदलला. परीक्षा, स्पर्धा ह्याच स्वरूप बदलल म्हणून ते निरागस जीव नाही न बदलले. दप्तरांच्या ओझ्याखाली दबून सुद्धा त्या वेळी आपल्या पालकांनी आपल्याला, आपल्या पद्धतीने निरागस आयुष्य जगण्याची मोकळीक दिली. मग आपण २०१६ मद्धे ते आयुष्य कोणत्या अधिकाराने ह्या निरागस जिवांकडून खेचून घेतो आहोत? प्रत्येक पालकाने ह्याचा विचार करावा.
अभ्यास, स्पर्धा सगळ असावं पण निकालंवर स्वताची इमेज मोठी होताना बघण हा त्या निरागस मनांवर केलेला अन्याय आहे. आपण सगळेच जास्ती लांब नाही एक २५-३० वर्षापूर्वी त्याच भूमिकेतून गेलो आहोत. आपल्या आईवडिलांनी लक्ष नाही दिले म्हणून आज आपण जे आहोत ते आहोत. कदाचित जास्ती लक्ष दिले असते तर उमलायच्या आधीच त्याची फुल बाजारात विकायला ठेवली असती. आपण उमलण अनुभवल मग तीच संधी आपल्या मुलांना आपण कधी देणार आहोत? बदललेले निकाल बदलवण्याची संधी आपण त्यांना कधी देणार आहोत? सगळ्यांनी विचार करा. निदान १९९० ते २०१६ असा प्रवास केलेल्या सगळ्यांनी..
शिनम्यावा यु एस-२ ... विनीत वर्तक
गेल्या आठवड्यात जपान आणी भारताने नागरी सहकार्य अणुकरारावर स्वाक्षऱ्या केल्या. साउथ चायना सी मध्ये चीन ची चाललेली अरेरावी थांबवण्यासाठी जपान ला आंतरराष्ट्रीय साथ हवी आहे. त्यासाठी चीन ला अटकाव करण्यासाठी जपान भारताकडे एक सच्चा मित्र म्हणून बघत आहे. त्यासाठी जपान अनेक तऱ्हेने भारताला सहकार्य करत आहे. मग ती मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन असो वा शिनम्यावा यु एस-२.
शिनम्यावा यु. एस.- २ हे एक जगातील अतिशय प्रगत अस विमान आहे. STOL म्हणजेच "शोर्ट टेक ऑफ ल्यांडीग" प्रकारातील ४ टर्बो इंजिन असलेल हे विमान जमीन किंवा पाणी कोणत्याही पृष्ठभागावर अतिशय कमीत कमी धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण भरू शकते. टेक ऑफ किंवा उड्डाण भरण्यासाठी जमिनीवर ४९० मीटर तर पाण्यावर फक्त २८० मीटर धावपट्टी ची गरज असते. तर उतरण्यासाठी जमिनीवर फक्त १५०० मीटर आणी पाण्यावर ३३० मीटर धावपट्टी ची गरज लागते. अतिशय खवळलेल्या समुद्रात ३ मीटर उंचीच्या लाटांमद्धे ही उड्डाण भरू किंवा उतरू शकते. तसच हे विमान अतिशय काटक असल्याने लेवल ५ च्या समुद्राच्या स्थितीत म्हणजे वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ३८ किमी असताना सुद्धा कार्यरत राहू शकते. एकदा इंधन भरल्यावर ४५०० किमी चा पल्ला गाठू शकते. ह्यामुळे ह्याची रेंज जगात अतिशय उत्कृष्ठ समजली जाते. ह्याचे पंख हे कार्बन काम्पोझीट मेटल पासून बनवलेले आहेत. त्यामुळे अति उंचीवर पण हे उड्डाण भरू शकते.
अस बहुउपयोगी विमान आपल्या सागरी सीमांच रक्षण करण्यास प्रचंड सक्षम आहे. जपान ने दुसऱ्या महायुद्धा नंतर स्वतावर अनेक निर्बंध घातले होते. त्यातील महत्वाचे म्हणजे कोणत्याही युद्ध सामुग्रीच निर्यात आणी न्युक्लीअर तंत्रज्ञान. २०१३ साली जेव्हा जपान ने स्वताहून स्वतावर घातलेले निर्णय रद्द केले. तेव्हा पहिला कस्टमर म्हणून त्यांनी भारताची निवड केली. न्युक्लीयर टेक्नोलोजी च्या बाबतीत स्वताहून पहिला अण्वस्त्र हल्ला करणार नाही हे भारतच बंधन भारताची जमेची बाजू ठरली. तर साउथ चायना सी मध्ये जर आपल अस्तित्व टिकवायच असेल तर भारता सारख्या मोठ्या देशाची मदत घेतल्याशिवाय ते शक्य नाही. जर भारताची मदत घ्यायची असेल तर तंत्रज्ञान हस्तांतरण करण तितकच गरजेचे आहे. हे जपान ला पक्क माहित आहे. म्हणून पहिली सिविल न्युक्लीयर डील तर पहिला युद्ध सामुग्री विक्रीचा करार त्यांनी भारतासोबत केला आहे.
तब्बल १०,००० कोटी रुपयांची शिनम्यावा यु एस २ ची १२ विमाने भारत खरेदी करणार आहे. अनेक वर्ष निगोशियेशन केल्यावर हा करार मार्गी लागला आहे. आधी ह्यातील प्रत्येक विमानांची किंमत ही १३३ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी जपान ने ठेवली होती. त्याला भारताचा विरोध होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी जापनीज पंतप्रधान शिंझो एबे ह्यांच्यात चर्चा होऊन मग हि किंमत ११३ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी खाली आणली गेली. त्या नंतर भारताने अशी १२ विमान खरेदी करण्याचा करार केला. मेक इन इंडिया ह्या तत्वाला जागून ह्यातील फक्त २ विमान ही फ्लाय अवे म्हणजे रेडीमेड तर उरलेली १० तंत्रज्ञान हस्तांतरण TOT (Technology of Transfer) करून भारतात बनवण्यात येणार आहेत.
भारताची सागरी सीमा तब्बल ७५०० किमी ची आहे. ह्याच्या देखरेखीची जबाबदारी भारतीय नौदलावर आहे. शिनम्यावा यु एस २ च्या येण्याने नौदलाच्या शक्तीत कैक पटीने वाढ होणार आहे. ह्या विमानांचा उपयोग नौदल माणसांची येण- जाण, सप्लाय साठी, स्पेअर पार्टस जे युद्धनौकांना लागतात ते नेण्यासाठी, शोध मोहिमेसाठी तसेच नजर ठेवण्यासाठी करू शकेल. तसेच ह्यांची प्रचंड मोठी अशी रेंज बघता अंदमान- निकोबार बेटांवर ही तैनात करण्यात येतील. ज्यामुळे भारताच्या आख्या पूर्व किनाऱ्यावर नजर ठेवता येणे शक्य होणार आहे. आशियातील नंबर २ आणी नंबर ३ च्या अर्थव्यवस्थानमधील हा करार त्यांच्या एकजूटीमधील महत्व अधोरेखित करतो आहे.
नोटांच्या आठवणी.. विनीत वर्तक
माझ नोटांशी असलेल प्रेम तस खूप जुनच. वेगवेगळ्या देशांची नाणी जमा करण्याचं वेड लागल लहानपणीच. त्या काळात अनेक नाणी आणी नोटा माझ्या खणात जमा झाल्या. लहानपणी बाबा आजोबा पेपर वाचून दाखव म्हणून रोज सकाळी मला पेपर वाचयला लावायचे. त्यांच्या धोतराच्या कुपीत बांधलेला रुपया मला देतील ह्या आशेवर मी रोज पेपर वाचून दाखवायचो. खूप जुन्या काळातल ते नाण आपल्या संग्रही असावं अस मला नेहमी वाटे. अर्थात ते कधी नाही मिळाल. पण माझ्या आजीने प्रचंड जुन्या काळातली अस्सल चांदीची दोन नाणी मात्र मला दिली. ह्या चांदीच्या नाण्यांवर रामराज्य आणी बरच काही कोरलेल आहे. ती कोणत्या काळातील आहेत मला माहित नाही. वारसा रूपाने ती दोन नाणी आणी त्या आठवणी माझ्याकडे अजूनही जपून आहेत. त्यांची कधी किंमत होणार नाही.
नाण्यान कडून नोटांकडचा प्रवास व्हायला कारणीभूत ठरला तो अमिताभ बच्चन चा दिवार चित्रपट. “फेके हुवे पैसे मै आज भी नही उठाता” ते त्याचा ७८६ नंबरचा बिल्ला ह्याचा सगळा परिणाम माझ्या बालमनावर शेवटपर्यंत कोरला गेला. मग शोध सुरु झाला तो ७८६ नंबर असलेल्या नोटांचा. अनेक वर्षांच्या प्रवासातून १ रुपयाच्या नोटेपासून १००० रुपयाच्या नोटेपर्यंत ७८६ नंबरच्या सगळ्या नोटा माझ्या पोकेट च्या चोर खिश्यात विराजमान झाल्या त्या आजतागायत. १,२,५,१०,२०,५०,१००,५००,१००० अश्या सर्व नोटांना अगदी मानाच स्थान तिकडे मिळाल. ३-४ दिवसांपूर्वी जेव्हा ५००-१००० च्या नोटा रद्द होणार अस जाहीर झाल. तेव्हा माझ्या मित्राचा प्रश्न आता तुझ्या संग्रहाच काय करणार? म्हंटल त्याचं मोल नाही करू शकत. त्याचं स्थान नेहमीच मानाच असेल.
प्रत्येक नोटेच वेगळच अस वैशिष्ठ मला जाणवलं. ७८६ ह्या नंबरची क्रेझ कमी झाल्यावर पण त्या निमित्ताने आपण एक चांगला संग्रह केला अस मला आजही वाटते. नोटेच्या किमतीपेक्षा त्यावर असलेल्या प्रिंट ने मला नेहमीच आकर्षित केल. एक रुपयांच्या नोटेवर मागच्या बाजूस असलेल्या चित्राने माझ लक्ष त्या बालवयात वेधून घेतल होत. हे काय आहे? असा प्रश्न नेहमी डोक्यात असायचा. शाळेत कोणीतरी सांगितलं की ती ओईल रिग आहे सागर सम्राट. ओईल रिग काय असते? आणी तीच चित्र नोटेवर छापण्याच काम काय? असे अनेक प्रश्न डोक्यात उभे राहिले. पुढल्या आयुष्यात अश्या कोणत्यातरी क्षेत्रात आपण काम करू असा विचार ही त्या काळात मनाला शिवला नाही. पण त्या चित्राने मनात घर केल ते कायमच.
दोन रुपयांच्या नोटेवरचा आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो म्हणजे अवकाश क्षेत्रात भारताने पाउल ठेवल्याची वर्णी होती. परवा जेव्हा २००० रुपयांच्या नोटेवर मंगळयानाचे चित्र बघितले तेव्हा त्या दोन पासून ह्या दोन हजार मद्धे जितका प्रवास आणी जितकी जास्ती किंमत आहे. तितकीच किंबहुना थोड जास्तीच उंचीवर भारताने अवकाश क्षेत्रात आपल स्थान निर्माण केल आहे. एक उपग्रह ते एक इंटर प्लानेटरी मिशन असा प्रवास स्वबळावर होणाच्या ह्या दोन्ही नोटा साक्षी आहेत. उद्या जेव्हा २००० ची नोट त्या दोन रुपयांसोबत माझ्या पॉकेट मद्धे येईल तेव्हा अवकाश क्षेत्रातील प्रगतीच एक वर्तुळ भारताने पूर्ण केल असच मला वाटेल.
पाच रुपयांवरील ट्राक्तर असो वा पन्नास च्या नोटेवरील भारतीय संसद, वीसच्या नोटेवरील सूर्यमंदीराच चाक आणी शंभराच्या नोटेवरील कांचनगंगा असो वा पाचशे च्या नोटेवरील दांडी यात्रा. सगळ्याच नोटेवरील भारताच्या आजपर्यंतचा प्रवास सगळा डोळ्यासमोर उभ राहिला. माझ्या ७८६ च्या वेडाने हा सगळा प्रवास नेहमीच माझ्यासोबत टिकून ठेवला. परवा सगळ्यांनी ५००-१००० नोटांना आदरांजली वाहिल्यावर मित्र आणी मी मात्र सगळ्या प्रवासाचे साक्षीदार ह्या नोटांमुळे होत होतो. माझ्यासाठी तर ते क्षण खासच होते. एका छोट्या आवडीमुळे जपून नोटांच्या रुपात जपून ठेवलेला ठेवा काहीच खर्च न करता इतका प्रवास घडवेल अस मला कधीच वाटल नव्हत. मला परत दिवार आठवला “तुम्हारे पास क्या हे” मेरे पास काला धन तो नही लेकीन वो नोट हे जिन्होने बिना खर्च किये बिते हुवे कल का पुरा सफर करवा दिया..
चिंता आणी प्रभावाची वर्तुळ... विनीत वर्तक
कालच माझ्या मित्राला खूप काळजीत बघितलं. काय झाल अचानक ह्याला? ह्या विचारांनी न राहवून विचारल. तर एकदम काळजीच्या स्वरूपात तो म्हणाला आता कस होणार? मी म्हंटल कस होणार म्हणजे? काय झाल? तो म्हणे मोदींनी ५००-१००० नोटा बंद केल्या. मी म्हंटल मग त्याने काय झाल? तो म्हणजे काही झाल नाही. पण आता देशाच कस होणार? मी म्हंटल देशाच काय? तो लगेच अरे तस नाही इतक करप्शन आहे सगळीकडे. सगळे राजकारणी भ्रष्टाचारी. मग मी म्हंटल ह्यावर तू काय कारणार? तो म्हणे विचार करतो आहे? मी म्हंटल कसला. तर म्हणे देशात असे राजकारणी नको. देशात निरक्षरता नको. गरिबी नको. मी म्हंटल तुझ्या चिंतेच्या वर्तुळातून बाहेर येऊन प्रभावाच्या वर्तुळात काही करू शकतो का? ह्यावर तो प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे बघत राहिला. म्हणजे काय? ह्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मी म्हंटल सांगतो.
आपण सतत दोन वर्तुळांमध्ये फिरत असतो. एक म्हणजे चिंतेच आणी दुसर प्रभावाच. ही वर्तुळे आपल्याला समजली तर खूप बदल आपण करू शकतो. चिंतेची वर्तुळ म्हणजे पोकळ काळजी म्हणू त्याला. जस माझ्या मित्राला जाणवत होती. राजकारणी भ्रष्टाचारी, देशातील निरक्षरता, देशातील गरिबी, शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा, त्याला काय वाटते, त्याने / तिने अस वागायला नको होत हे किंवा असे काळजीचे अनेक डोंगर आपल्या मनात घर करत असतात. हे डोंगर किंवा ही वर्तुळ म्हणजे मृगजळा सारखी फसवी असतात. ह्या पोकळ भावना. पोकळच त्या. कारण आपण त्यात काहीच करू शकत नाही. राजकारणातील भ्रष्टाचार दूर इकडे समुद्रात राहून बंद होणार का? शिक्षणपद्धतीत बदल मी करण्याची माझी शिक्षणिक, सामाजिक पात्रता आहे का? किंबहुना मी करू शकतो का? त्याला किंवा तीला काय वाटावे हे मी ठरवू शकतो का? किंबहुना माझ ऐकून ती किंवा तो वागू शकेल का? देशातील गरिबी आणी निरक्षरता मी विचार करून संपणार आहे काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच येत होती. म्हणजे माझ्या मित्राच्या विचारांना, काळजीला खरे तर काहीच अर्थ नव्हता. ह्या वर्तुळात खरे तर काहीच आपण करू शकत नाही. पण त्याची काळजी, विचार करून मानसिक, शारीरिक शक्ती खर्च करतोच. त्याशिवाय येणार दडपण, चिंता ह्या वेगळ्याच.
दुसर वर्तुळ म्हणजे प्रभावांच. वर आलेल्या विचारांना मी कस उत्तर शोधू शकतो. तर मी माझ्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिक नक्कीच राहू शकतो. मी गरीब मुलांना, लोकांना आर्थिक मदत करू शकतो. मी माझ्या ज्ञानाचा फायदा उपेक्षित लोकांपर्यंत नक्कीच पोहचवू शकतो. मी माझ्या क्षेत्रात एक मापदंड बनवू शकतो की जो येणाऱ्या लोकांना मार्गदर्शक बनू शकेल. मी कसा वागेन किंवा कोणत्या प्रसंगात कशी प्रतिक्रिया देईन ह्याच कंट्रोल स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो. म्हणजे जिकडे माझा प्रभाव आहे. किंवा जिकडे मी स्वतः काही प्रभाव पाडू शकतो. अश्या गोष्टीनचा आपण कितीसा विचार करतो?
चिंतेच वर्तुळ आपल खूप मोठ असते. पण प्रभावाच अगदी छोट. समाजात उच्च, मानाच स्थान असलेल्या कोणत्याही व्यक्ती बघा. त्याचं प्रभावाच वर्तुळ हे खूप मोठ असते तर चिंतेच खूप कमी. अश्या यशस्वी व्यक्तीना आपल्यासारखे विचार येत नसतील का? नक्कीच येत असतील. पण फरक आहे तो वर्तुळांचा. सर्व सामान्य चिंतेच वर्तुळ मोठ करण्यात आपली शक्ती घालवतात तर यशस्वी प्रभावाच. “ Instead of expecting world to change they become agent of change” म्हणजेच आपल्या प्रभावाच वर्तुळ मोठ करतात. हे वर्तुळ जितक मोठ होत जाते. तितकीच त्या माणसांची उंची. त्याचवेळी कमी होत जातात ती चिंतेची वर्तुळ. असलेली शक्ती कोणत्या वर्तुळात गुंतवायची हे आपण ठरवायचं. चिंतेच्या की प्रभावाच्या.
माझ्या बोलण्यानंतर मित्राच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान दिसल. माझ्या बोलण्याने त्याच्या चिंतेची वर्तुळ कुठल्याकुठे गायब झाली होती. पण सगळ्यात समाधान होत ते उमलत असलेली प्रभावाची वर्तुळ बघण. कस होणार? ह्या पेक्षा कस होऊ शकते ह्या पासून कोण करणार? ते मी काय करू शकतो. ह्यापर्यंत त्याचा झालेला प्रवास माझ्यासाठी सुखद अनुभव होता. प्रत्येकांनी विचार करा आपण आपली शक्ती कुठे खर्च करत आहोत. चिंता की प्रभावाच्या वर्तुळात.